सागर नाईक
‘रणजी ट्रॉफी’चं नामकरण ज्यांच्या नावे झालं आहे अशा स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्थानिक रणजीतसिंहजी या क्रिकेटपटूचं शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मवर्ष कालच (१० सप्टेंबर रोजी) सुरू झालं. त्यानिमित्त त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीचा आणि त्यांना सामोऱ्या जाव्या लागलेल्या आव्हानांचा परामर्श..
‘‘भारतीय जंगलांमधल्या एखाद्या वेलीसारखं लवचीक आणि मजबूत मनगट, उसळी मारणाऱ्या चेंडूचं प्रत्येक वळण आणि फिरकी हेरणारे गडद डोळे अशा रूपातील रणजीतसिंहजी यांनी क्रिकेटचा खेळ आत्मसात करून त्याचं रूपांतर पूर्वेकडील कृतिशीलतेच्या कवितेमध्ये केलं आहे..’’ प्रसिद्ध इंग्रजी कवी आणि पत्रकार एडविन अरनॉल्ड यांनी हे उद्गार रणजीतसिंहजी (१० सप्टेंबर १८७२ – २ एप्रिल १९३३) यांच्या क्रिकेट खेळण्याला उद्देशून काढले होते. नवानगर संस्थानाचे जामसाहेब कुमार रणजीतसिंहजी यांच्या खेळामुळे इंग्रजी पत्रकार, कवी, चित्रकार आणि एकूणच इंग्रजी सार्वजनिक अवकाशाला पहिल्यांदाच एका भारतीयाची दखल घ्यावी लागली. प्रथमच एखाद्या भारतीयाने ब्रिटिश साम्राज्याच्या कल्पनाशक्तीला गवसणी घातली होती. क्रिकेटपटू म्हणून रणजीतसिंहजींच्या खेळाचा गौरव ब्रिटनने केला खरा, परंतु क्रिकेट या अस्सल इंग्रजी खेळात एका भारतीयाने- म्हणजे गौरेतर वर्णाच्या माणसाने नैपुण्य मिळवले म्हणून त्यात एक वांशिक अस्वस्थतासुद्धा होतीच. म्हणूनच रणजीतसिंहजी यांच्या खेळाकडे नेहमीच वांशिक चौकटीतून पाहिले गेले. रणजीतसिंहजी, क्रिकेट, ब्रिटिश साम्राज्य आणि वंशवाद या सर्वाचे आंतरसंबंध बघितले तर आपल्याला ब्रिटिश साम्राज्याचं ‘युगमानस’ लक्षात येतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रिकेटची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. त्यामुळे क्रिकेट हा खास इंग्रजी खेळ मानला जायचा. क्रिकेट खेळण्यासाठी लागणारी सचोटी, एकाग्रता, धैर्य, स्वत:वरचे नियंत्रण आणि चपळाई यांसारखे गुण हे गौरवर्णीयांची अंगभूत वैशिष्टय़े आहेत, आणि इतर वंशांच्या लोकांमध्ये असे अंगभूत गुण नसल्याने ते क्रिकेट खेळण्यास अपात्र ठरतात अशी धारणा क्रिकेटच्या बाबतीत ब्रिटिशांच्या मनात घट्टपणे रुजली होती. ब्रिटिशांच्या लेखी तथाकथित वांशिक शुद्धतेचे व श्रेष्ठतेचे प्रतीक आणि व्हिक्टोरियन मूल्यांचा आविष्कार म्हणून क्रिकेटला इंग्रजी संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. अशा काळात १८९३ च्या दरम्यान क्रिकेटच्या क्षितिजावर रणजीतसिंहजींचा उदय झाला आणि त्यांच्या अभूतपूर्व खेळाने एकूणच इंग्रजी जनमानस ढवळून काढले.
रणजीतसिंहजींचे शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये झाले. तिथे कावसजी देसाई नावाच्या प्रशिक्षकांनी रणजीतसिंहजींना क्रिकेटचे प्राथमिक धडे दिले. पुढील शिक्षणासाठी त्यांची रवानगी इंग्लंडला करण्यात आली. तिथे त्यांनी क्रिकेटमध्ये विशेष चमक दाखवली. त्यामुळे त्यांचा केम्ब्रिजच्या डोमेस्टिक क्रिकेट संघासाठी विचार होणे जवळपास अपरिहार्यच होते. परंतु कर्णधार एफ. एस. जॅक्सन (जे नंतर बंगालचे गव्हर्नर झाले.) यांनी रणजीतसिंहजींना संघात घ्यायला नकार दिला. पूर्वेकडील लोकांच्या क्रिकेट खेळण्याबद्दल जॅक्सन यांना खात्री वाटत नव्हती. परंतु केम्ब्रिज जर्नलमध्ये रणजीतसिंहजींच्या खेळातील कौशल्याविषयी संपादकीय लेख छापून येण्याइतपत त्यांची लोकप्रियता तेव्हा वाढलेली होती. शेवटी, रणजीतसिंहजींना वगळणे घोडचूक होती, अशी कबुली जॅक्सन यांना द्यावी लागली. ऑस्ट्रेलियाशी होणाऱ्या कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघात रणजीतसिंहजींचा समावेश व्हावा की नाही यावरही अनेक वाद झाले. तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर लॉर्ड हॅरीस यांनी रणजीतसिंहजींच्या निवडीवर तीव्र आक्षेप घेतला होता. हॅरीस हे ‘सामाजिक डार्विनवादा’चा विचार मानणारे होते. (‘जगायला लायक असेल तो जगेल’ हे उत्क्रांतीचं तत्त्व सामाजिक घडामोडींना लावणारी ही विचारसरणी होती. वंशाने श्रेष्ठ असणारे लोक समाजात यशस्वी होतात व फक्त त्यांच्या अंगभूत गुणांमुळेच यश मिळवत असतात असा आता चुकीचा सिद्ध झालेला गर्भितार्थ त्यात होता.) स्वाभाविकपणेच त्यांच्या मते, श्रेष्ठ वंश वगळता इतर लोक क्रिकेट खेळण्यास अपात्र होते. असं असलं तरी रणजीतसिंहजींची लोकप्रियता शिखरावर होती आणि ब्रिटिश चाहत्यांच्या रेटय़ामुळे शेवटी त्यांची संघात निवड झाली. परंतु त्यासंदर्भात वादविवादाच्या अनेक फैरी झडल्या. ऑस्ट्रेलियन संघाला आपल्यासमवेत खेळायला अडचण नसेल तरच आपण खेळू असं रणजीतसिंहजींचं याबाबतीत म्हणणं होतं. ऑस्ट्रेलियन संघाने त्यांच्या निवडीला होकार दिल्यामुळे त्यांचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण झाले.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian cricket ranji trophy ranjit singh golden jubilee amy
First published on: 11-09-2022 at 01:03 IST