विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जन्मलेला जेम्स न्यूमन एक अतिशय हुशार अमेरिकन गणितज्ञ. जेम्सनं जगाला ‘गुगल’ आणि ‘गुगलप्लेक्स’सारख्या संकल्पना दिल्या. अमेरिकेच्या उच्चभ्रू वर्तुळात वावरणारा जेम्स आइन्स्टाइनचा मित्र होता. बायकांचं आणि महागड्या गाड्यांचं वेड असणारा हा गणितज्ञ बऱ्याचदा ‘चिंताग्रस्तते’च्या विकारानं ग्रासलेला असायचा. जेनिमा हेरिंगटननं जेम्सच्या घरी १९४८ मध्ये घरकामाला सुरुवात केली. अशिक्षित असलेली जेनिमा जन्मानं आफ्रिकन अमेरिकन होती. ख्रिाश्चन धर्मावर नितांत श्रद्धा असणाऱ्या जेनिमाला आकड्यांच्या जुगाराचं व्यसन होतं. त्या काळातला ‘पॉलिसी’ नावाचा आकड्यांचा जुगार ती खेळायची आणि बऱ्याचदा जिंकायची. जेनिमा आणि जेम्स दोघांनाही असणाऱ्या ‘आकड्यां’विषयीच्या समान वेडातून वर्णद्वेषाच्या त्या काळातदेखील त्यांच्यात एक अनोखं ‘मैत्र’ निर्माण झालं. ते रुजलं, फुललं. अशा या जगावेगळ्या मैत्रीची, प्रेमाची कथा म्हणजे ब्रूक न्यूमननं लिहिलेलं ‘जेनिमा अॅण्ड जेम्स’ हे कृष्ण-धवल स्मरणचित्र.
या पुस्तकातला काळ बराचसा १९४० ते १९५०च्या दशकाचा आहे. या काळात अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि राजकीय बदल घडत होते. रूढार्थानं जेनिमा अशिक्षित असली तरी तिच्या स्वभावातल्या उपजत शहाणपणाची आणि बोलण्यातल्या ‘उर्मट’ विनोदाची जेम्सला बहुदा भुरळ पडली असावी. जेनिमाच्या स्वभावातलं हे अनोखं मिश्रण जेम्सला रूथमध्ये, त्याच्या सुंदर, बुद्धिमान आणि कलात्मक मनोवृत्तीच्या बायकोमध्येही सापडलं नसावं. म्हणूनदेखील तो तिच्याकडे आकर्षित झाला असावा. कारण काहीही असो, उच्चभ्रू अमेरिकन वर्तुळात वावरणारा एक अतिश्रीमंत, गोरा, जगप्रसिद्ध गणितज्ञ आणि त्याच्या घरी घरकामाला असणारी एक अशिक्षित, दरिद्री, आफ्रिकन अमेरिकन बाई यांच्यातल्या भावसंबंधाची, मैत्रीची, प्रेमाची ही कथा आपल्याला सामाजिक-आर्थिक दरीच्या, वर्ण-वंश भेदाच्या पार नेत माणूस म्हणून आपल्या आकलनाच्या कक्षा रुंदावते.
‘जेनिमा आणि जेम्स’ – ब्रूक न्यूमन – अनुवाद – दुलारी देशपांडे, मेहता पब्लिशिंग हाऊस, पाने- २४४, किंमत- ४२० रुपये.