इतके दिवस धुक्याच्या पडद्याआड असलेली माणसं आता समोर प्रकटली होती. चालती-बोलती हाडामांसाची माणसं. माझी माणसं! जिगसॉच्या कोडय़ामधले हरवलेले तुकडे गवसले होते. चित्र पूर्ण झालं होतं. एक पोकळी भरून निघाली होती. प्रश्नचिन्हाचं उद्गारचिन्ह झालं होतं.
प्रेमाची माणसं भेटली की एकत्र जेवण करून आनंद व्यक्त करायचा, ही जगाची रीत आहे. पाच दिवसांच्या माझ्या दिव्होनच्या मुक्कामात खूप मेजवान्या झडल्या. खुद्द नोएलच्या.. नाताळाच्या दिवशी बाबुच्काने- म्हणजे माझ्या आजीने खास रशियन जेवण स्वत: बनवले. ‘बोर्श’ हे त्यांचं विख्यात सूप आणि खिमा भरून रोस्ट केलेले टोमॅटो असा बेत होता. रोस्ट टर्की होताच. घासाघासागणिक तिचा सुग्रणपणा पटत होता. माझ्या आत्याचा मात्र प्रयोग पार फसला. मला शाकाहारी आवडेल म्हणून मुद्दाम रने मला जीनिव्हाच्या महागडय़ा ‘व्हेज’ रेस्ट्राँमध्ये घेऊन गेली. खाल्ल्या मिठाला न जागण्याचं पाप पत्करून मी असं म्हणेन की, मी इतकं नीरस जेवण कधीच जेवले नव्हते. कशालाच काहीही चव नव्हती. शाकाहारी पाककलेची कमाल पाहायला कुणीही भारतात यावं. एक नवा अनुभव म्हणून मी तिथली एक खासियत असलेलं समुद्री शेवाळं खाल्लं. बशीभर. मला छान अद्दल घडली! जेराल्डकडे (काका) आंद्रेनं मात्र फार अप्रतिम बेत योजला होता. तिनं स्विस ‘फोंद्यू’ (fondu) हा नामी प्रकार घरी बनवला. करायला अगदी सोपा. लागायला विलक्षण रुचकर. ‘मी करिअरवाली आहे. (आंद्रे यूनोमध्ये मोठी पदाधिकारी होती.) तेव्हा मी आपले सोपे पदार्थच करायला शिकले आहे,’ ती प्रांजळपणानं म्हणाली. तिचे माझे सूर जुळले, ते उगीच नाही. फोंद्यू खायला सगळ्यांनी टेबलाभोवती बसायचं. मधे छोटी धगधगती शेगडी. तिच्यावरच्या पातेल्यात वाइनमध्ये मिसळलेल्या चार प्रकारच्या चीजचं खदखदणारं वितळण (माझा शब्द). एका लांब काडीला पावाचा मोठा तुकडा टोचून तो त्या चीजच्या काल्यात बुचकळायचा. छान लडबडला की सरळ तोंडात रवाना करायचा. वा!
दिव्होनला एक विलक्षण अनुभव आला. राज्यक्रांतीनंतर देश सोडून फ्रान्सच्या आश्रयाला आलेले पपाचे एक वयस्क रशियन स्नेही होते. काऊंट दिमित्री ग्रेगॉव्ह. आपल्या सरदारकीला साजेल असं साग्रसंगीत जेवण त्यांनी आम्हाला दिलं. सदर काऊंट हे ‘इंडोफील’ होते. भारतभक्त. त्यांच्याकडे आपल्याकडच्या वस्तूंचं जणू संग्रहालयच होतं. समया, मूर्ती, आरसेकाम केलेल्या उशा, छोटा संगमरवरी ताजमहाल, गालिचे आणि असं बरंच काही. मला बोलावण्यामागे त्यांचा एक ‘अंतस्थ हेतू’ असल्याचं त्यांनी हसून कबूल केलं. त्यांच्याकडे असलेल्या एका चित्रावर काही देवनागरी मजकूर होता, तो वाचून दाखवायचा. बस्स. मी आनंदानं मान्य केलं. जेवण झाल्यावर काऊंट आम्हाला एका आतल्या दालनात घेऊन गेले. ‘माझ्याकडे गेली पंचवीस र्वष गणेशाचं एक चित्र आहे. त्याच्याखाली काही चरण लिहिले आहेत. बहुधा तुमच्या वेदामधले असावेत..’ काऊंट भारावून बोलत होते. भिंतीवर एका नक्षीदार चौकटीत गणरायाचं फार सुंदर चित्र होतं. त्याच्याखाली ठळक अक्षरात लिहिलेल्या देवनागरी पंक्तींकडे काऊंट दिमित्रीनं निर्देश केला- ‘हे वाचून दाखव.’ त्यांच्या चेहऱ्यावरून उत्कट अपेक्षा ओसंडत होती. मी ते ‘चरण’ आधी मनात वाचले. लिहिलं होतं- ‘भुस्कुटे ब्रदर्स, त्रिवेणी बाजार, काळबादेवी.’ मी आवंढा गिळला. काऊंट आणि पपा दोघे डोळ्यांत प्राण आणून माझ्याकडे पाहत होते. मग मी निर्णय घेतला आणि खोल श्वास घेऊन ‘प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्। भक्तावासं स्मरे नित्यं आयु: कामार्थ सिद्धये।’ ही गणपतिस्तोत्राची पहिलीच लांबलचक ओळ घडाघडा म्हणून दाखवली. उत्साहाच्या भरात माझ्याकडून थोडं ‘ओव्हरअॅक्टिंग’ झालं खरं. काऊंटच्या डोळ्यांत पाणी तरारलं. पपा मात्र काहीशा संशयी विस्मयानं म्हणाला, ‘तीन-चार शब्दांत हे एवढं सगळं बरं मावलं!’ आता मावलं खरं!! मी मनातल्या मनात करुणा भाकली- ‘बाप्पा मोरया, घरची शिकवण डावलून मी खोटं बोलले. पण त्या भाबडय़ा इसमाच्या आनंदावर नाही मी विरजण घालू शकले. मला माफ कर.’
दोन दिवस आंद्रे आणि जेराल्डनं माझा ताबा घेतला. त्यांना मूलबाळ नव्हतं. माझ्या मुक्कामात- आणि नंतरही कायम त्यांनी माझ्यावर मायेचा वर्षांव केला. जेराल्ड ‘त्रिब्यून द जनेव्ह’ या वृत्तपत्रात उपसंपादक होता. ‘खेळ समाचार’ हे त्याचं वैशिष्टय़. तो स्वत: पट्टीचा खेळाडू होता. स्विस टीव्हीवर तो एक मान्यवर स्पोर्ट्स समालोचक होता. त्याच्या एका प्रत्यक्ष (लाइव्ह) प्रक्षेपणाला मी जीनिव्हाच्या स्टुडिओत गेले होते. त्याच्या वशिल्यानं पॅनेलवर बसून अलिप्तपणे मी तो कार्यक्रम पाहिला. स्विस प्रोडय़ुसरच्या फ्रेंच सूचना ऐकायला गंमत वाटली. पद्धत तीच, निकड तीच, उत्साह तोच- फक्त भाषा वेगळी. जेराल्डने एका आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्याचा परामर्श घेतला. मी भारतात टी. व्ही. प्रोडय़ुसर आहे, हे कळल्यावर काकाच्या सहकाऱ्यांनी ‘ही आपल्यातली’च अशी वागणूक मला दिली.
‘क्लूझा’ या आल्पस्मधल्या प्रसिद्ध रिसॉर्टला मी माझ्या हौशी काका-काकूंबरोबर जाऊन आले. बर्फाचा गालिचा तुडवत आम्ही मनसोक्त हिंडलो. तारेवरून सरकत जाणाऱ्या हवाई ट्रॅममध्ये बसलो. स्कीइंग पाहिलं. जेराल्ड स्वत: उत्तम स्की-पटू होता. त्याने पुष्कळ स्पर्धा जिंकल्या (आणि दोनदा पाय मोडून घेतला!), ही शिफारस. त्या बर्फील्या पहाडीवर त्याच्या मित्राचा टुमदार श्ॉले होता.. लाकडी घरकुल! ते एखाद्या बाहुलीच्या घरासारखं सुंदर होतं. या सुंदर श्ॉलेमध्ये आराम केला. एका छानशा रेस्ट्राँमध्ये झकास जेवण जेवलो. दुकानांमधून हिंडून छोटय़ा छोटय़ा प्रदर्शनी वस्तू खरेदी केल्या. आणि क्लूझाला असा एक अविस्मरणीय दिवस घालवून आम्ही परत जीनिव्हाला आलो.
खुद्द जीनिव्हातही मी मनसोक्त भटकंती केली. तिथलं एक मुख्य आकर्षण होतं ‘लाक द्यू जनेव्ह्’- जीनिव्हाचा तलाव. एक भलाथोरला सुंदर आरसा शहराच्या मध्यभागी मांडावा, तसा हा तलाव होता. नीरव, प्रसन्न, स्वच्छ, शांत. दिवसातून ठरावीक वेळा या तळ्यात एक कारंज उडतं. ते पाहण्यासाठी प्रवासी मुशाफीर ताटकळत वाट पाहतात. तळ्याजवळच्या एखाद्या टुमदार कॅफेमध्ये बसून कॉफी पीत हा उंच झेपावणारा फवारा पाहणं, हा एक सुखद अनुभव होता. ‘तुमच्या मुंबईला आहे का तलाव?’ पपानं विचारलं, तेव्हा मला बांद्रा तलाव आठवला. ‘आहे की!,’ मी गुळमुळीत उत्तर दिलं, ‘पण तो या तळ्याइतका सुंदर नाही.’ Understatement of the year!
आई आणि पपा जीनिव्हामध्ये भेटले होते. तिथं त्यांनी लग्न केलं आणि आपला दोन वर्षांचा अल्पकालीन संसार थाटला. माझ्यासाठी हा अहम् महत्त्वाचा इतिहास होता. त्याचा लेखाजोखा मला जुळवायचा होता. त्यासाठी हाताशी होते ते दिवस अपुरे होते. आणि ते भराभर जात होते. सगळ्यांनी आपापल्या परीनं ‘रिकाम्या जागा’ भरण्याची कोशीश केली.
एका नाचाच्या (बॉलरूम) समारंभात दोघे भेटले. दोघांना मांजरांचं विलक्षण प्रेम. वेडच! (ती परंपरा अद्याप चालू आहे. माझी नात अंशुनी मांजरवेडी आहे.) ‘तर संपूर्ण संध्याकाळ (रात्र) आम्ही आपापल्या मांजरांविषयी बोलत होतो,’ पपानं हळव्या आवाजात सांगितलं. मी हसून म्हटलं, How romantic!l
आतासुद्धा दिव्होनला असलेला त्यांचा ‘व्होडका’ हा गोजिरवाणा बोका अवघ्या कुटुंबाच्या गळ्यातला ताईत होता. तो अतिशय गबदुल होता. तरी पण मोठय़ा चपळाईनं उंच उडी मारून तो जॅकलिनच्या ब्युटीपार्लरचं लॅच पंजानं दाबून रुबाबात दार उघडीत असे.
केंब्रिजमधून पदवी घेऊन आईनं जीनिव्हाला International Labour Organisation मध्ये नोकरी केली. आंद्रेनं मला आय. एल. ओ.ची इमारत आतून बाहेरून दाखवली. पपानं- जिथं त्यांचं लग्न झालं ते ऑर्थोडॉक्स चर्च दाखवलं. पपाचं लग्न झालं तेव्हा जेराल्ड अवघा तेरा वर्षांचा होता. ‘यूरा जेव्हा प्रथम तुझ्या आईला घेऊन आला, तेव्हा आम्ही सगळे अवाक् झालो. ती रूढ अर्थानं सुंदर नसली तरी विलक्षण आकर्षक होती. नजर खिळून राहावी अशी. मनात म्हटलं, ही कुठली इंडियन प्रिन्सेस घेऊन आला आहे हा? आपलं कधीकाळी असं होईल का?’ जेराल्डनं आपलं मनोगत सांगून एक मोठा सुस्कारा सोडला.
प्रत्येकाच्या निवेदनाबरोबर मी फ्लॅशबॅकमध्ये शिरत गेले. केवढी विलक्षण कहाणी! मी लिहिलेल्या, पाहिलेल्या कोणत्याही नाटक-सिनेमापेक्षा ती मला हृद्य वाटली. इतके दिवस धुक्याच्या पडद्याआड असलेली माणसं आता समोर प्रकटली होती. चालती-बोलती हाडामांसाची माणसं. माझी माणसं! जिगसॉच्या कोडय़ामधले हरवलेले तुकडे गवसले होते. चित्र पूर्ण झालं होतं. एक पोकळी भरून निघाली होती. प्रश्नचिन्हाचं उद्गारचिन्ह झालं होतं.
‘सय’ ही लेखमाला माझ्या कारकीर्दीची ओळख करून देणारी असणार आहे. तेव्हा तिच्यात खासगी टिपणीला वाव नसावा, हे मी जाणून आहे. जीनिव्हा आणि दिव्होनचा वृत्तान्त खूपच व्यक्तिगत झाला आहे. त्या कथनामध्ये मी रसिकांपुढे काय भलेबुरे कार्यक्रम सादर केले, त्याचा काहीच मागोवा घेतला नाही. मग त्या निजी कथनाचा ‘सय’शी काय संबंध? आहे.. निश्चित आहे. माझ्यामधला कलाकार जोपासण्यासाठी, माझा दृष्टिकोन अधिक गहरा करण्यासाठी त्या पाच दिवसांमधला एकेक क्षण मोलाचा होता. त्यानं माझं कलाविश्व समृद्ध केलं. शेक्सपियरचं विधान मला पटवून दिलं- ‘विश्व हा एक रंगमंच आहे.’
अखेर पॅरिसकडे कूच करण्याचा दिवस येऊन ठेपला. जड अंत:करणानं मी सगळ्यांचा निरोप घेतला. दिलासा एवढाच होता, की मी अधेमधे सुट्टीला येऊ शकत होते. पपानेही पॅरिसला चक्कर मारण्याचं कबूल केलं होतं.
फ्रेंचमध्ये निरोप घेताना जो वाक्प्रयोग वापरतात, तो अतिशय बोलका आहे. Au revoir… ओ रव्हा. म्हणजे ‘पुन्हा भेटू.’ किंबहुना, ‘आता आपण दुरावतो आहोत- ते पुन्हा भेटण्यासाठी..’ एवढा आशय त्या दोन शब्दांमध्ये सामावला आहे.
ओ रव्हा जीनिव्हा. दिव्होन- ओ रव्हा!
संग्रहित लेख, दिनांक 16th Mar 2014 रोजी प्रकाशित
जिगसॉ पूर्ण
इतके दिवस धुक्याच्या पडद्याआड असलेली माणसं आता समोर प्रकटली होती. चालती-बोलती हाडामांसाची माणसं. माझी माणसं! जिगसॉच्या कोडय़ामधले हरवलेले तुकडे गवसले होते.

First published on: 16-03-2014 at 01:14 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jigsaw completed