scorecardresearch

माणूसपणाच्या जवळ जाणारी कविता

ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या बहुचर्चित अशा ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहाला अलीकडेच साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले.

माणूसपणाच्या जवळ जाणारी कविता
(संग्रहित छायाचित्र)

आश्लेषा महाजन

ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या बहुचर्चित अशा ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहाला अलीकडेच साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. नुकताचा त्यांना राज्य सरकारचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून येत्या मराठी भाषादिनी त्यांचा सन्मान केला जाणार आहे.

कवयित्री म्हणून मराठी साहित्यात एक विशेष ओळख असलेल्या पाटील यांचा हा पाचवा कवितासंग्रह आहे. त्यांच्या ‘दिगंत’(१९८१), ‘तरीही’ (१९८५),  ‘दिवसेंदिवस’, (१९९२) व ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’ (२००५) या आधीच्या चार कवितासंग्रहांतील कविताही मौलिक आहेत.  काळाचे टप्पे घेत लिहिलेली त्यांची कविता वाचकप्रिय आहे. सर्वच कवितासंग्रहांची शीर्षकेही वैशिष्टय़पूर्ण आहेत. वरवर साधी वाटणारी ही शीर्षके अंतर्यामी जगण्यातील प्रहरांचे प्रवाह घेऊन येतात. जीवननाटय़ातला स्थळ-काळ-दिशा यांचा रंगपटच त्या मांडतात. ‘कदाचित अजूनही’ हा संग्रहही या नाटय़ाला पुढची कलाटणी देणारा अंक.

अनुराधाबाईंच्या कविता म्हणजे जीवनाचे उत्खनन. जगण्याच्या सखोल गाभ्यातून त्या उपसून काढतात.. कधी अंधार, कधी उजेड, कधी तलखी, कधी ओलावा, कधी दमटपणा तर कधी भुई फोडून वर येणारा फुटवा. कविता करणे म्हणजेच त्यांच्यामते माणसाच्या अधिकाधिक जवळ जाणे! एकीकडे निर्गुण निराकाराचे निर्थकाचे अध्यात्म त्यांना मान्य नाही, पण संस्कृतीच्या, प्रथांच्या, महाभारतासह पुराणवाङ्मयाच्या आणि दंतकथांच्या तळाशी जाऊन त्या शोध घेतात मानवाच्या भल्या-बुऱ्या संचिताचा. इतिहासाने हरणाऱ्यांवर अन्याय केलेला असला तरी त्या कथित ईश्वराकडे मुळीच करुणा भाकत नाहीत. याउलट त्या लिहितात,

‘पण असलास कुठेतरी तर ईश्वरा,

तू आमचा स्वीकार कर

आणि फिरव पाठ आमच्याकडे कायमची

हात आशीर्वादासाठी उंचावतात

खोडून काढ

हाडामांसी रुजलेला

भ्रामक भोळेपणा आमचा..’

त्या पुढे असंही लिहितात की, ‘तू पिंजऱ्यात कोंडलेला एकमेव हिरवा रावा अंतहीन आभाळात सोडून दे.’ तसेच ‘विस्तीर्णाच्या अफाट किनाऱ्यावर तुझा हासभासही नसलेल्या नव्या जन्मात आमची नाव फुटू दे’ याचा अर्थ कवयित्रीला ईश्वराचा पांगुळगाडा नको आहे. ती संघर्ष करायला सक्षम आहे. एक खरे की ‘आता एक कर’ या कवितेत म्हटल्याप्रमाणे- जीव उधळून, चौकटी तोडून तिला जगता आलं नाही. कवयित्री जशी जगण्याची उत्कटता, असोशी मांडते तशीच निरवानिरवीची भाषा, निर्वाणाची आस, मृत्यूचे आकर्षण आणि पुनर्जन्माची आशासुद्धा व्यक्त करते. दैहिक, मानसिक, सामाजिक बंधांतून हळूहळू मुक्त होण्याची ओढ त्यांच्या अनेक कवितांचा विषय ठरते. जीवनाचा तळ खोलवर ढवळून, हाती लागलेल्या आशय अलगद आणि संयतपणे काव्यात गुंफणे ही तर बाईंच्या कवितेची खासियत. ‘खुशाल येऊ दे’ या कवितेत त्या लिहितात –

‘निर्वाणाची ही ठाम लय

नसानसांतून धावताना

घेरतंय अपरंपार मौन

कणाकणाला

आणि थोडा व्याकुळतोय जीव

पलतीरावर पाय ठेवण्याआधी

हे खरं,

पण किलबिल करणारं

एखादं पाखरू

मला सोडू दे तुझ्या अंगणात

आणि खुशाल येऊ दे मग

अशाश्वताचा

मरणगंध हवेलाही.’

जाणिवांच्या खोल तळाशी नेणारी ही कविता प्रासादिक आहे. अतिशय वेधक, स्पष्ट, रोखठोक प्रतिमा असलेली ही कविता आहे. कारणाशिवायचा आनंद आणि कारणाशिवायचे दु:ख यांच्या सृजनस्पर्शापाशी घेऊन जाणारी ही कविता लक्षवेधी आहे. ‘पत्ता बदलला तरी’मध्ये आपल्याच घरात आपण कसे निर्वासित होतो नि हाकारे घालत रान उठवणाऱ्यांची गर्दी तेवढी कशी दाटत जाते भोवती, हे सांकेतिकपणे मांडले आहे. जागतिकीकरणातून निर्माण झालेल्या आधुनिक गदारोळात स्वत्त्व जपण्यासाठी आटापिटा करावा लागतो. हे सारेच अगदी तरलपणे अनुराधा बाईंच्या कवितेतून येते.

स्त्री-जाणिवांचा जागर हा तर त्यांचा चिंतनाचाच विषय. बाईबद्दलच्या कविता लिहिताना त्या अतिशय मूलभूत विषयांना हात घालताना दिसतात. ‘भुकेला लाज नसते आणि बाईच्या चामडय़ाला जात नसते’ हे कटू सत्य सांगत कवयित्री प्रेम आणि द्वेषाच्या मधली जागाही शोधू पाहते. त्यात प्रत्यक्ष स्त्रीच नव्हे, तर तिची भयमुक्त जगाची स्वप्नंही देशांतराला जातात! कोत्या, दुबळ्या पुरुषाच्या कल्पनेला सापडतच नाही, कळतच नाही बाई हे सांगताना-

‘ज्याला पाहता येत नाही

खोल विहिरीच्या तळाशी जाऊन

वरचं सबंध आकाश

हयातभर धक्के खाऊनही

कळत नाही

मोडण्याइतकंच

जोडण्याचंही मोल

ज्याला ऐकू येत नाही

फुटक्या बासरीतून पाझरणारी

बेसूर गाणी

आणि पाण्यात उतरूनही

कळत नाही कधीच

की आपल्या कल्पनेपेक्षा

अधिक खोल असतं

आपण उथळ समजलो  ते पाणी’.. अशा अर्थगर्भ ओळी त्या लिहून जातात.

‘प्रयोग संपल्यावर’, ‘ती घरी परतली’, ‘आणि पुसून जाईल’, ‘पण तरीही’ अशा ओळीने दिसणाऱ्या कविता बाईच्या जगण्याच्या अनेक तऱ्हा दाखवतात. आपला जीवनसाथी आयुष्यभर एकाच घरात राहूनही आपला असतो का? आपण त्याला व तो आपल्याला कळलेले तरी असतो का? आपलं घर, या खोलीतून त्या खोलीत फिरणारे दिवस, आपल्या कविता, आपली मुले, सगेसोयरे, गावाशिवाची ओढ हे सारे आपले आहे का? की सारेच निर्थक आहे? असे अनेक प्रश्नांचे कोलाहल कवयित्रीला घेरतात. जगण्याने भलेबुरे पदरी घातले तरी कवयित्रीला अखेरीस सारे निस्तरून जायचे आहे. म्हणूनच त्या मागणे मागतात-

‘पण मावळत्या सूर्याला

सन्मुख होताना

राहू नये धुळीच्या कणाएवढंही

किल्मिष मनात

एवढीच प्रार्थना उमटते आज

माझ्या मौन ओठांवर

आणि लिहीत जाते मी

इतरांचेही माफीनामे

मनातल्या मनात

विरत चाललेल्या आयुष्याच्या

या पानावर.’

कवयित्रीच्या मनात अपार करुणा आहे. अगदी रेल्वेच्या फलाटावर झोपलेल्या माणसांपासून अभावाचे जिणे जगणाऱ्या प्रत्येकाबद्दल. पण त्या करुणेत भाबडेपणा नाही. जगून जून झालेले शहाणे विचार ते कवितेला देतात. कष्टाच्या किर्र रानात थकणाऱ्या मुलीसाठी त्या लिहितात-

‘शिकव तिला

प पाण्याचा आणि

भ भाकरीचाच असला तरी

भूक आणि भय यांना

सामोरं जाण्याची रीत

समजू दे तिला

माणसांच्या जगात

गमावण्यातलं आर्त सर्वंकष.’

जगणे कवयित्रीला लिहायला लावते, तसे कधी तिचे लिहिणे थांबवतेसुद्धा. कवयित्री लिहिते- ‘फांद्यांत अडकलेल्या पतंगासारखे दिशाहीन जगणे, ओळखीच्या डोळ्यांत अनोळख नि दबलेली हिंस्र चेतावनी पाहता पडून राहतो कागद कोराच दहशतीमुळे.’ आपण कविता लिहितो, परकायाप्रवेश करून शब्दांतून काही मांडतो. अभिव्यक्त होतो. यामधली निर्थकताही बहुतेक सर्व कवींप्रमाणे अनुराधाबाईंनाही त्रास देते. कवितेच्या पोहऱ्यातून मनातला काळोख-चिखल उपसून उपसूनही पुन्हा काळोख उरतोच. ही निर्थकताच पुन्हा कवितेच्या प्रसवाचा रेटा ठरते. कवितेशिवायच्या जगात कवयित्रीला पोकळ पोकळ वाटते. त्या लिहितात, ‘मी खूप शांत समंजस पण संपूर्ण निरुपयोगी होत चाललेय कवितेशिवायच्या भाकड जगात.’ म्हणूनच कदाचित अजूनही त्या लिहित्या आहेत. स्वत:तून स्वत:ला मांडत आहेत. भोवतालच्या कोलाहलाकडे दूर कोपऱ्यात बसून शांतपणे पाहणे, एकेका घटिताचा अर्थ उकलणे या त्यांच्या प्रकृतीमुळेच त्यांच्या कवितेत स्वतंत्र चिंतन दिसते. शांत, संयमित व्यक्त होणं परंतु विचारांचा गाभा मात्र धारदार, टोकदार अशा अनुराधा पाटील यांची कविता मराठीतील कवितांमध्ये आपला अमीट ठसा उमटवते. ही कविता माणूसपणाच्या अधिकाधिक जवळ जाणारी आहे.

उत्तम कागद, सुबक मांडणी व अर्थपूर्ण मुखपृष्ठामुळे हे पुस्तक लक्षवेधी झालेले आहे. कवितांचा अवकाश पिंजून काढलेले सरदार जाधव यांचे मुखपृष्ठ संग्रहाला कलात्मक

आयाम देते.

‘कदाचित अजूनही’

– अनुराधा पाटील

शब्द पब्लिकेशन्स, पृष्ठे – १२८, मूल्य – २०० रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2020 at 04:13 IST

संबंधित बातम्या