इ. स. २००० सालानंतरच्या पिढीने अनुभवलेल्या अस्थिरतेच्या भावनेवरचे सदर.. ज्यात व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णने, बदलते संगीत आणि सिनेमाचा ऊहापोह असेल. तसेच नवी पुस्तके, तंत्रज्ञान, कलेच्या नव्या बाजारपेठा, बदलती भाषाशैली इत्यादीची चर्चाही. थोडक्यात- तात्पुरतेपण आणि अस्थिरतेचे वरदान लाभलेल्या पिढीची ही डायरी आहे..

काळ पुढे सरकतो आहे. शांतपणे. एका लयीत. जग बदलते आहे. काळ नाही. काळ फक्त मूकपणे प्रवास करतो आहे. कष्टाने केलेली उपासना, कार्यातून निर्माण केलेल्या सुंदर स्मृती आणि जुन्या वास्तू या तिन्हींच्या निमित्ताने काळ थांबून राहिला असे वाटत असले तरी तसे नाही. काळ शांतपणे आणि हट्टाने पुढे सरकतो आहे.

इंदूरच्या विमानतळावर विमान उतरण्याआधी शेकडो एकरांची सुंदर हिरवीगार शेतजमीन दिसते. ती जमीन माळवा प्रांतात आपले स्वागत करते. नजर जाईल तिथपर्यंत हिरव्यागार जमिनीचे तुकडे. नावालाही मनुष्यवस्ती नाही. त्या शेतांमधून जाणारे नागमोडी वळणावळणाचे सुंदर रस्ते. फुलांचे मोठाले ताटवे. मला वरून पाहताना पु. ल. देशपांडे, सुनीता देशपांडे आणि त्यांच्या मित्रांची अचानक ठरवलेली सहल आठवते. कुमारजींना भेटण्यासाठी सहज आठवण आली म्हणून पुण्यातून गाडी काढून निघालेले मित्र आणि त्या नागमोडी रस्त्यांवरून देवासच्या दिशेने निघालेली त्यांची मोटारगाडी. प्रत्यक्ष भेटण्याआधी किंवा अनुभवण्याआधी मी अनेक कलाकारांना सुनीता देशपांडे यांच्या लिखाणातून भेटलेलो असतो. कोमकली कुटुंबीय हे त्यापैकी एक. आपल्या सर्वाचे लाडके कुमारजीच नाहीत, तर संपूर्ण कोमकली कुटुंबाची एक साजिरी चौकट महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना पु. ल. आणि सुनीताबाईंनी लिखाणातून समोर ठेवली आहे. मला त्या उभयतांची या प्रवासात तीव्रतेने आठवण येते. आणि पुढचे दोन्ही दिवस ती आठवण सोबत राहते.

कुमार गंधर्व हे असे व्यक्तिमत्त्व आहे- जे मला देशात आजही जागोजागी सापडत, उमजत आणि कोडय़ात टाकत जाते. मी अनेक वयाच्या आणि तीन ते चार पिढय़ांच्या कोणत्याही कलासक्त माणसाशी भारतात कुठेही बोलत असेन तरी कुमार गंधर्व हा विषय निघाला की नुसते शास्त्रीय गायनाचे रसिकच नाही, तर अनेक कलामहाविद्यालयांतील विद्यार्थी, चित्रपटकलेचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, नृत्यकलेचे विद्यार्थी, पाश्चात्त्य वाद्यरचना शिकणारे विद्यार्थी गप्पा मारू लागतात. या सर्वाना कुमारजी अतिशय आपले वाटतात. त्यांच्याविषयी ममत्व वाटते. यात अगदी विशीतली तरुण मुलेही आली- जी बाकी कोणत्याही प्रकारचे शास्त्रीय संगीत ऐकत नाहीत- ती कुमारजींचे गाणे त्यांच्या फोनवर बाळगून असतात. एखाद्या पॉप- स्टारचे गाणे ऐकून ऊर्जा मिळावी, स्वतंत्र, मोकळे झाल्याची अनुभूती व्हावी, आपल्या अनाथ पाठीवरून प्रेमळ हात फिरावा तसे कुमारजींच्या आवाजाने मनाचे होऊन बसते. त्यामुळे ते भारतातल्या सर्वाचे आपले आहेत. जवळचे आहेत. त्यांच्याविषयी ममत्व नसेल असा माणूस मला आजपर्यंत भेटलेला नाही.

त्यांच्या पंचविसाव्या पुण्यतिथीनिमित्त देवासला ‘भानुकुल’ या त्यांच्या प्रसिद्ध निवासस्थानी कलापिनीने तिच्या आप्तांच्या आणि अनेक गंधर्वप्रेमी सहकाऱ्यांच्या मदतीने एक देखणा सोहळा आयोजित केला आहे.

माळव्यातील प्रेमळ हिंदी भाषा तुम्हाला फार पटकन् कवेत घेते. त्या भाषेतील अगत्य, तिची चाल आणि त्यातला साधेपणा तुमचं परकेपण कमी करतो. या हिंदी भाषेत उर्दूचे मिश्रण नाही. त्या भाषेला मराठीप्रमाणे स्वत:ची लाज वाटत नाही. ती खेळती, गाती, भांडती, मोकळी भाषा आहे. कोमकली कुटुंबातील माणसे एकाच वेळी सफाईदारपणे ही हिंदी, माळवी आणि मराठी बोलतात. कलापिनी एका लंब्याचौडय़ा वाक्यात अनेक वेळा सफाईने या भाषांचे मिश्रण करून जाते. ‘‘अपने करतलध्वनी के साथ उनका स्वागत कीजिये,’’ असे कार्यक्रमाचे सूत्रधार म्हणतात. टाळ्यांना असलेला ‘करतलध्वनी’ हा शब्द ऐकून मी पुढचे दोन दिवस आपले मुंबईचे हिंदी बोलून इथे शोभा करून घ्यायची नाही, हे मनातल्या मनात मराठीतच ठरवतो.

कवी अशोक वाजपेयी आपल्या मिश्कील, हसऱ्या शैलीने कार्यक्रमाची सुरुवात करतात. भानुकुलच्या प्रांगणात उभारलेला विशाल मंडप अनेक संगीतप्रेमी रसिकांनी भरून गेला आहे. अशोक वाजपेयी असे बोलत आहेत- जणू समोर कुठेतरी कुमारजी बसून त्यांचे बोलणे ऐकत असावेत. ते काळ थांबवू बघतात. श्रोत्यांना भूतकाळात नेण्याऐवजी आपल्या प्रसन्न शैलीने आणि भाषाप्रभुत्वाने ते कुमारजींना वर्तमानात आणू पाहतात. आठवणी आणि किस्से यांच्या पलीकडे जाऊन आपल्या मित्राला आठवण्याची एक गत त्यांना अवगत आहे. ते सिद्धहस्त कवी आहेत. त्यांच्या आठवणी साध्या आणि लोभस आहेत. कोणत्याही प्रकारे ते कुमारजींचा सुपरहीरो करत नाहीत. ना ते आपल्या मित्राच्या नसण्याचे शोकमय वातावरण तयार करत. कारण आपला मित्र कुठेही गेला नाहीये यावर त्यांचा नितांत विश्वास आहे. आणि त्यामुळे आपल्या अतिशय साध्या, पण विचारपूर्वक केलेल्या भाषणाने ते कुमारजींचे या कार्यक्रमाकडे लक्ष वेधून घेतायत असे वाटते. आपण ज्याप्रमाणे प्रेमाने देवाला आमंत्रित करतो; तू आमच्याकडे पाहा, आमच्यासोबत जेवायला ये असे म्हणतो, त्याप्रमाणे.

आता याआधी कधीही न अनुभवलेला अनुभव येतो, तो म्हणजे दिल्लीच्या गांधर्व वाद्यवृंदाचा समूहगानाचा कार्यक्रम. भारतातल्या प्रत्येक संगीतप्रेमी माणसाने घ्यायला हवा असा हा अनुभव आहे. मधुप मुद्गल या समूहगानाचे संचलन करतात. मराठी, पंजाबी, कोकणी, राजस्थानी, बंगाली, काश्मिरी, उर्दू अशा अनेकविध भारतीय भाषांमधील लोकगीते, समूहगीते, प्रार्थना हा गायकांचा संच पाश्चिमात्य समूहगानाच्या शैलीत सादर करतो. त्यात माळव्यातील भजने गायली जातात. रवींद्रसंगीत सादर केले जाते. या समूहातील गायक नंतर एकत्र जेवताना मला आणि सचिन खेडेकरला मराठी गाणे गाऊन दाखवतात.

पहिल्या रात्रीची सांगता कुमारजींच्या एका जुन्या मैफिलीचे व्हिडीओ रेकॉर्डिग पाहून होते. ज्याच्यासाठी आपण भारतभरातून सगळे चाहते, स्नेही इथे जमलो तो माणूस समोर पडद्यावर अवतरतो. मी अशा काळात जगतो- जिथे मला पडद्यावर दिसणारे काही भूतकाळातले असण्याची गरज नसते. वर्तमानकाळातील अनेक माणसांना मी फक्त पडद्यावरच भेटत असतो, बोलत असतो. कुमारजी त्या मैफिलीत पडद्यावर अवतरतात तेव्हा, हे पूर्वी कधी होऊन गेले आहे, ही भावना माझ्या मनाला स्पर्शही करत नाही. लांबवर कुठेतरी हे चालू आहे असे मन समजून घेते आणि समोर कुमारजी गात असलेल्या सुरांच्या जाळ्यात मन उडी मारून टाकते. १९८० च्या आसपास मुंबईत झालेली ती मैफल आम्ही सगळे एकत्र बसून अनुभवू लागतो. लांबवर ती चालू असते. दूरच्या देशात. दूरच्या काळात नव्हे. जणू ते कुठेसे गातायत आणि पडद्यावर ती मैफल आम्हाला लाइव्ह दिसते आहे. माझ्या शेजारी बसलेली कलापिनी अलिप्तपणे आनंदाने ती मैफल पाहत आहे. त्याचवेळी समोर कुमारजींच्या मागे तानपुऱ्यावर ती बसलेली दिसते आहे. मला जाणवतात ते त्या मैफिलीतील कॅमेऱ्याला घाबरणारे जुन्या ८० च्या दशकातील मराठी माणसांचे चेहरे. भुलाभाई देसाई रोडवरील एका घरात बसून शांतपणे कुमारजींना ऐकणारी ती माणसे कॅमेरा समोर आला की संकोच करीत आहेत. वसंत बापट सोडून. बापट तीन ते चारदा गाणे सोडून कॅमेऱ्यात डोकावून बघतायत. पण इतर माणसे त्या काळाला साजेसे वागत आहेत. वातावरणात एक साधेपणा आहे. कुणी झकपक कपडे केलेले नाहीत. कुणी उगीच काही कळत नसताना ‘क्या बात’असे आचरटपणे ओरडत नाही. कुमारजींचे गाणे ही छोटीशी प्रयोगशाळा असल्यासारखे आहे. गाताना त्यांना स्वत:ला प्रमाणाबाहेर आनंद झालेला त्या कॅमेऱ्याने नीट टिपला आहे. ते सुराला शारीरिकता देतात. ते सुराकडे पाहिल्यासारखे करतात. त्याला हाताळल्यासारखे करतात. त्याला आकाशात सोडून दिल्याची मुद्रा करतात. गाताना त्यांच्या डोळ्यांत एक पाणावलेली माया येऊन जाते. बापट अजूनही कॅमेऱ्यात पाहतच आहेत. माझ्या शेजारी बसलेली एक धटिंगण बाई कलापिनीला धक्का मारून ‘‘किती वयाची होतीस गं तू त्यावेळी?’’ असले काहीतरी अनावश्यक विचारते आहे.

मला श्रोत्यांचे आणि प्रेक्षकांचे चेहरे बघायला फार आवडतं. मी अनेक वेळा सिनेमा पाहत असलो की मधेच आजूबाजूच्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील भाव पाहत बसतो. आमच्या अगदी शेजारी एक पोलीस उभा आहे. त्याने आपल्या बोटांनी उभ्या उभ्या ताल धरला आहे. त्याची नजर मांडवाबाहेरील गर्दीवर असली तरी त्याच्या मनाचा एक कप्पा गाण्यात नकळत शिरला असावा. कुमारजी एका बंदिशीला विराम देऊन थांबतात आणि कलापिनी पुढे जाऊन तो व्हिडीओ  बंद करून सर्वाना जेवणाला पिटाळते. पण तेसुद्धा फार गोड हिंदी बोलून.

रुचकर, गरमागरम आणि अनोख्या माळवी पद्धतीने तिच्या वैयक्तिक देखरेखीखाली बनवलेले अप्रतिम जेवण भानुकुलच्या अंगणात आमची वाट पाहत आहे.

(क्रमश:)

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com