|| कौस्तुभ केळकर- नगरवाला
जिगरी मतर सदाभौ यांस,
दादासाहेब गावकरचा दंडवत!
वडक्कम सदाभौ.
तुम्चं व्हेकेशन धुमधडाक्यात झालं म्हना की राव. कशी काय हाय उटी?
बर्फावानी गारेगार वाटलं की न्हाई?
तिकडं चाकाफीच्या मळ्यामंदी घुटक घुटक चा पिताना बी तुमी आमाला इसरला न्हाई. जीवाला लई थंडक पोचली राव. यंदाच्या साली सूर्यनारायन कोपला हुता जणू. जीवाची लई काहिली होवून ऱ्हायलीय.
तुमी उटीला ग्येलं बेस झालं. फोटूचं येवढं मनावर घेऊ नगा सदाभौ. फ्यामिलीबरूबर मस फोटू काढाया हवं. आवं, आठवनींचा आल्बम आसतुया तो. उद्याच्याला घरटय़ातली चिमणपाखरं दूर उडून ग्येली की आल्बम रिवाइंड करावा लागंल. आनंदाचा धबधबा फोटूमंदीच कैद करता येतू फकस्त.
बाकी ही व्हेकेशनची शिष्टीम भारीच हाई गडय़ाहो. सायबानं सुरू केल्याली.
सायबाची हिथल्या समरमंदी लई वाट लागायची. गोरा साहेब पार काळवंडून जायचा म्हनं. मंग सुट्टी घेवून साहेबलोक हिल ठेसनला जायचं. आक्षी तुम्च्यावानी. आवं, कोर्ट बी समर व्हेकेशनला जातंय आपल्याकडं.
आता समद्येच हिल ठेसनाला जात्यात. तिथं बी गर्द गर्दी. गर्दीला पोटात घ्याया डोंगर पोखरून, झाडं कापून हाटंलं बांधत्यात. त्यामुळं तिथल्ली थंडाई गायब होतीया.
सदाभौ, व्हेकेशनचा खरा शीजन आसाया हवा श्रावनाचा म्हैना. तुमास्नी म्हून सांगतू.. आम्चं बी येक रोमांटी प्रायव्हेट सपान हाये. कुटं बोलू नगा. आमास्नी येक डाव ममईच्या पावसात जोडीनं भिजायचं हाये गडय़ाहो. तुम्च्या वैनीसायबाला बरूबर घिवून हिंडायचंय ममईच्या रस्त्यांवरनं. आक्षी आमिताभ आन् मौशमीसारकं. मनाच्या कानामंदी ‘रिमझिम गिरे सावन’ ऐकू येतंया. तुम्चा तो रानीच्या हारावानी वळणदार रस्ता. उधाण आलेला सिमदर. बेभान वारा. जगबुडी पाऊस. लाथेनं उडीवलेला वल्या पावसाचा बदाबदा धबधबा. हातातली छत्री पतंगावानी सोडून देयाची. पार ढगापत्तुर उडाया हवी ती. हळूच हातामंदी हात घेयाचा. तुम्च्या वैनीसायेबानं लटक्या रागानं आमच्याकडं बगाया हवं. ‘जावा तिकडं..’ आसं दटावनारं त्यांचं डोळं. ओंजळीत भरून घ्येतल्याला पाऊस. डोईवरचा फेटा उडवीत आमी हिरोवानी गानं म्हनायचं.. ‘येक लाजरा बुजरा च्येहरा चंद्रावानी खुलैला गं..’
मन वढाय वढाय.. खरं रोमांटी व्हेकेशन.
अवगड हाये. आमी मनाच्या शेफ डिपाझिट लाकरमंदी जपून ठय़ेवल्यालं सपान रिअलमंदी न्हाई यायचं कंदी. ह्य शीझनमंदी रान हिरवं हुतं. कामाची धूमशान. ल्येकीची साळा. कसं ममईला जानार?
आनं तुम्च्या ममईलासुदीक पाऊस झ्येपेना आजकाल. टीचभर पावसानं ढीगभर तुंबून ऱ्हायलीये ती. रामपारी कामाला ग्येलेला मानूस सांच्याला घरी पोचंलची ग्यारंटी न्हाई. जुनी पिक्चरवाली ममई हरवलीया जनू.
सदाभौ, तुम्ची हालत मंजी- ‘तुमारी दो टकै की नौकरी ने, किया मेरा लाखों का सावन बरबाद..’ सारकी झालीया.
सदाभौ, तुम्चं सेल्फीश रेनी व्हेकेशनचं इन्व्हीटय़ेशन लई आवडलं बगा आमास्नी. आवं, दिसामाजी धा टायमाला धा-धा मिन्टं फोनवर बोलतू आपन. पर सौतासंगट बोलायला टाईम गावत न्हाई. तुम्ची आयडिया येकदम ब्येश. तुमच्यावानी आम्चं येक दोस्त हाईत कोकनातलं. पार तिकडं गुहागरजवळच्या मालदोलीतलं. तेंच्याकडं जावू आपुन दोगंच. वाशिष्टीच्या काटी लाल कौलारू घर. जनू पान्यामंदी पाय सोडून बसल्यालं. डोळ्याच्या फोकसमंदी मावनार न्हाई येवढा ईशाल पान्याचा पसारा. आजूबाजूचं हिरव्या पाचूवानी नटल्यालं डोंगर. पेन्टरच्या कलर-कार्डाला झ्येपनार न्हाईत येवढय़ा हिरव्या रंगाच्या छटा. हिरव्या डोंगरातून दुडुदुडु धावनारे दुधावानी पांढरे झरे. दनादन उडय़ा मारत नदीकडं झ्येपावनारं पानी. मस्त रानात हिंडू.
सौताशीच गप्पा मारू म्यूट च्यानलवानी दिसभर. सदाभौ, आम्ची बीयेला आस्तानाची येक नोटबुक हाये. बालकवी, विन्दा, बोरकर, ग्रेस यांच्या लई भारी कविता हाईत तिच्यामंदी. रातच्याला माशाचं कालवण. नदीमंदी पाय सोडून बसू. कंदिलाच्या उजेडात येक येक कविता ऐकू. श्येजारचं वाहनारं पानी घडीभर थांबंल. अक्षरान्ची जादू हुईल. येखादा शबुद काळजाला भिडला की पान्याची खोली वाढंल. चुकून आसलेच तर आकाशातलं चांद-तारे जमिनीवर वाकून बघतील. या शबुदान्च्या चांदन्यापुडं त्येंचं चांदनं फिकं पडंल. सदाभौ, तुमी-आमी घर थकलेले संन्यासी होवू. घडय़ाळ इसरून रातभर अक्षरलेन्याची लूट करू. समदी गनगन इसरून जाऊ. ‘इस रात की सुबह नही’ म्हनायचं आन् नदीकाटी चांदनं पांघरून आडवं हुयाचं.
दुसऱ्या दिशी येकदम फ्रेश. फ्रेशनेशचं टानीक सालभर पुरतंय. मंग नव्या उमेदीनं ‘आमी जातो अमुच्या गावा..’
सदाभौ, रोजची लडाई लडाया आता धा हत्तीचं बळ येतुया आपुआप.
आत्ता न्हाई, पर धा-पंधरा वर्सानंतरचं प्लानिंग क्येलंया आमी मनातल्या मनात. ल्येकीला मस शिकीवनार हाई. ती शिकली, सौताच्या पायावर हुभी ऱ्हायली की चांगला जावय शोधनार. तिचं लगीन लागलं की आम्ची जिम्मेदारी संपंल. मंग आमी निवांत. दोन वर्सापूर्वी लोकप्रभामंदी येक ल्येख पब्लीश झाला हुता. मान्सूनच्या प्रवासाइषयीचा. आक्षी तसाच प्रवास करायचा हाई आमास्नी. सदाभौ, तुमी भी ऱ्हावा संगट. केरळपासून सुरवात करायची. मान्सूनचा पाऊस पुडं पुडं जाईल तसं तसं आपुन पुडं जायाचं. पार कच्छपर्यंत जायाचं. पावशा पक्ष्यावानी पावसाचं सोगत करायचं.. पुडं पुडं सरकत ऱ्हायाचं. झिम्माड भिजत ऱ्हायाचं. येकदम सराट वाटंल. जमंल तसं आमाला आईसायेबांना आन् तुम्च्या वैनीसायेबांना ‘लेडीज पेशल’ ट्रीपला पाटवायचं हाये. दोगी बी आलवेज आन डय़ुटी असत्यात. व्हेकेशनची खरी निकड तेन्लाच हाई. चांगलं धा-पंदरा दीस मजा कराया हवी तेन्नी.
घरची काळजी बिल्कूल कराया नगं.
आवं, गृहलक्ष्मी प्रशन्न झाली की आविष्याचा स्वर्ग होतु की राव!
आम्चं आबासायेब, प्रगतीशील श्येतकरी हुते. रानात गेल्याबिगर तेन्ला करमायचं न्हाई. दावनीची म्हस आबासायेबांशिवाय दूध देयाची न्हाई. पाहुन्याकडं लगीन आसलं तरी आबासायेब सांच्याला घरला परत. जिंदगीभर आम्चं आबासायेब रानात राबलं आन् आखिरला रानातच ग्येलं.
आमी मस म्हनायचो, ‘आबासायेब, दोन-चार दिस सुटी घेवा. पंढरीला जावा. ईठोबाचं दर्शन हुईल.’ पन येक न्हाई की दोन न्हाई.
आबासायेब म्हनायचं, ‘जो मनुक्ष आपल्या कामावर प्रीत ठेवतु, त्येला कामामंदीच देव भेटतुया. अशा मनुक्षाला सुट्टीची निकड भासत न्हाई. कामाचा कटाळा आला की सुट्टीचं सपान पडतंया.’
सदाभौ, आम्च्या आबासायेबांच्या डिक्शनरीत व्हेकेशन शबुदच न्होवता गडय़ा. पर आता असं जगनं मुश्कील हाई. जिंदगी श्ट्रेशफुल्ल होवून ऱ्हायलीय. थोडा ब्रेक पायजेल. दर साली दोन-चार दिस तरी फिरून याया हवं. पर समद्यांच्याच नशिबी न्हाई सुख. हातावरचं पोट आसनाऱ्यांनी काय करावं? इस्वेस्वराकडे येवढंच मागनं हाई.. ‘द्यावा, दोन घटका निवांत इरंगुळा लाभंल इतकी व्हेकेशन परत्येकाच्या नशिबी ऱ्हावू द्या.’
आम्चा सुभान्या सांगत हुता. त्येचा पोरगा तुम्च्या ममईला ऱ्हातुया. दरवर्सी येक मे’ला त्यो येक टेम्पो ट्राव्हीलर बुक करतू. तेच्या घरला येनारा पेपरवाला, इस्त्रीवाला, किरानावाल्याचा पोऱ्या, मोलकरीन बाया, वाचमन येन्ना घेवून आलीबागची ट्रीप करतू. समदा खर्च सुभान्याचा पोरगा करतू. राबनाऱ्या हातान्ला व्हेकेशनचा खरा अर्थ ठाव आसतुया, असं म्हन्तो तो. सदाभौ, सुभान्याच्या पोराचा लई अभिमान वाटतू. श्येवटला आम्च्या गावचा पोरगा हाये तो!
कायबी आसू द्येत. मे म्हैना संपत आला की साळंचा शीजन सुरू होतू. डबा, वाटरबॅग, दप्तर, वह्य-पुस्तकं, प्येन-पेन्शील, कंपासपेटी यांचं शापिंग. नव्या पुस्तकान्चा वास पयल्या पावसाच्या वासावानीच हवाहवासा. आम्चं बीच शापिंग चाललंया.
पोरं आसू द्यात, न्हाईतर मोटी मान्सं. समद्यांची व्हेकेशन लई फाश्ट भुर्र उडून जाती. आताशा पुन्यांदा कामाला लागायचं. पोरांची साळा सुरू जाली की ती नव्या पुस्तकांत हरीवतात. साळंत रमत्यात. आपली जिंदगी बी येक साळाच हाई. रोज नवीन नवीन धडा वाचाया मिळतुया हिथं. नवीन शिकाया मिळतंया. व्हेकेशनचा डोस घेवा आन् फ्रेश मूडमंदी समद्याच कामाला लागा. समद्यांचीच जिंदगी ‘मस्ती की पाठशाला’ होवून ऱ्हायलीय बगा.
सदाभौ, च्येहऱ्यावरती येक श्मायली चिटकवा आन् पेन्शिलीवर बसा की राव. निगा सुसाट. मुखी आनंदगाणी म्हना-
‘स्कूल चले हम!’
भेटू आसंच मदल्या सुट्टीमंदी.
तवर- मस्ती की पाठशाला..
तुम्चा जीवाभावाचा दोस्त,
दादासाहेब गांवकर
kaukenagarwala@gmail.com