scorecardresearch

Premium

अनिवासी भारतीयांची व्यथा

कादंबरीतल्या बऱ्याच स्थलांतरित भारतीयांना आपल्या समाजातील जाचक रूढी, परंपरांपासून दूर राहावेसे वाटत असल्यामुळे कितीही कठीण आयुष्य लंडनमध्ये वाटय़ाला आले तरी ते मायभूमीला परतण्याचा विचार करीत नाहीत.

Lapalela London arvind ray Plight of NRIs
अनिवासी भारतीयांची व्यथा (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

ज्या देशावरचा सूर्य कधीही मावळत नव्हता, असं कधीकाळी ज्या देशाविषयी म्हटले जात होते तो देश म्हणजे इंग्लंड. अशा देशाची राजधानी असणाऱ्या लंडन शहराला पाहण्याची, जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असतेच. या जगप्रसिद्ध शहराचे एक वेगळे रूप ‘लपलेलं लंडन’ या कादंबरीतून आपल्याला वाचायला मिळते. २००४ पासून लंडनला वास्तव्य करणारे अरविंद रे यांनी या कादंबरीतून भारत, पाकिस्तान, पोलंड, ग्रीस, इस्टोनिया, बल्गेरिया, आफ्रिका अशा अनेक देशांतून आलेल्या स्थलांतरितांचे जीवन, त्यांना करावा लागणारा संघर्ष यांचे चित्रमय शैलीत, संवेदनशीलतेने व खेळकर वृत्तीने केलेले शब्दचित्रण या कादंबरीत वाचकांना वाचायला मिळते.

करोनाकाळात जगभर लोक आपापल्या घरात बंदिस्त झाले होते त्या वेळी अरविंद रे यांनी या कादंबरी लेखनाचा घाट घातला. ‘‘जे लिहितो आहे, ते वाचकानं जांभया देत बाजूला ठेवलं नाही की केलेल्या अक्षरांचे श्रम वाया गेले नाहीत – असं समजायचं. असा एक जरी वाचक मिळाला तरी पुरेसा आहे,’’ असं विनयाने अरविंद रे आपल्या मनोगतात म्हणत असले, तरी कादंबरी वाचणाऱ्या प्रत्येकाला लंडनमधला लपलेला कोपरा वाचावासा वाटणारा आहे. वाचक तिथल्या लोकांचे जगणे समजून घेत लंडनच्या सफरीबरोबर लुब्लिनचीही सफर करून येतो.

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
Nitin Gadkari
“चांगलं काम करणाऱ्याला सन्मान मिळत नाही, अन् वाईट…”, नितीन गडकरींचा रोख कोणाकडे?
lalit kala kendra ram leela pune marathi news, pune ram leela controversy marathi news
पुण्यामधल्या ललित कला केंद्रात नेमकं काय झालं? ‘नाटका’नंतरच्या ‘नाटकां’चं काय करायचं?

कादंबरीत लंडन जीवनशैलीचे एकेक पदर उलगडत जातात, त्यामुळे वाचकांची उत्सुकता कादंबरीच्या शेवटापर्यंत टिकून राहते. मुकुंद दीक्षित या समंजस, सहृदयी इंग्रजी शिक्षकाच्या नजरेतून लपलेले लंडन वाचक पाहात, अनुभवत राहतो. लंडनमधली संस्कृती, स्थलांतरित लोकांना स्थायिक होण्यासाठी करावा लागणारा संघर्ष वाचताना स्थलांतरितांचे दु:ख, अस्तित्व टिकविण्यासाठी पासपोर्ट जाळणे, कागदी लग्न जुळवणे.. अशा शोधलेल्या पळवाटा परदेशातले जगणे सोपे नाही हे अधोरेखित करत राहते.

कादंबरी तीन भागांत विभागलेली आहे. पहिला भाग ‘ढिंका चिका’. या भागात कादंबरीचा नायक मुकुंद औरंगजेब या पाकिस्तानी मित्रासोबत टीचर्स ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी लुब्लिनला कसा जातो, शिक्षकांना इंग्रजीचे ट्रेनिंग देताना त्याला कोणते अनुभव येतात, लुब्लिन शहराचे वेगळेपण कसे आहे, या सगळय़ा गोष्टी वाचनीय आहेत. नायकाने आस्वाद घेतलेला आलं-संत्र्याचा चहा पिण्याचा मोह कादंबरी वाचताना नकळत मनात निर्माण होतो.

हेही वाचा… पडसाद: स्तुत्य उपक्रम

‘डब्लू डब्लू डब्लू लंडन डॉट कॉम’ या कादंबरीच्या दुसऱ्या भागात प्रत्यक्ष लंडनमधले जीवन, स्थलांतरित झालेल्या लोकांचा इंग्रजी शिकण्यासाठी चाललेला आटापिटा, इंग्रजी शिकविण्यासाठी गल्लोगल्ली शाळा-कॉलेजांचे फुटलेले पेव. भरमसाट फी देऊनही विद्यार्थ्यांची होणारी फसवणूक, शेअरिंग हाऊसमध्ये दाटीवाटीने राहणाऱ्या टेनंट्सच्या व्यथा, पौंडात कमविण्यासाठी लंडन सोडावे लागू नये म्हणून स्थलांतरितांकडून शोधल्या जाणाऱ्या पळवाटा, इत्यादी गोष्टी वाचून लंडनसारख्या शहरात राहणे सोपे नाही हे समजते.

‘सॉरी, वुइ मिस्ड यू’ या तिसऱ्या भागात शिक्षक असणाऱ्या नायकाचे इंग्रजी शिकवणीला येणारे देशोदेशीचे शिष्य कसे पांगतात याचे वर्णन येते. तिथे मोठय़ा प्रमाणात असणाऱ्या शीख संप्रदायातील लोकांची पारंपरिक विचारसरणी, त्यामुळे तरुणांवर येणारा अप्रत्यक्ष दबाब कुलदीप व मनमीत या पात्रांच्या जीवनप्रवासातून अनुभवायला मिळतो. कादंबरीतल्या बऱ्याच स्थलांतरित भारतीयांना आपल्या समाजातील जाचक रूढी, परंपरांपासून दूर राहावेसे वाटत असल्यामुळे कितीही कठीण आयुष्य लंडनमध्ये वाटय़ाला आले तरी ते मायभूमीला परतण्याचा विचार करीत नाहीत. ही गोष्ट आपल्याला अंतर्मुख करणारी आहे.

‘लपलेलं लंडन’ कादंबरीची सुरुवात खेळकर, आनंदी ढिंका चिका वृत्तीने झाली आहे. त्यामुळे वाचकही मनात हीच वृत्ती ठेवून वाचत राहतो. पण शेवटी नायकाचे शिष्य एक एक करत त्याला सोडून जातात व त्यातला मनमीतसारखा उमदा तरुण स्वत:चा आत्मघात करून घेतो, हा कादंबरीचा शेवट वाचकाचे मन व्याकूळ करून जातो.

कादंबरीतले निवेदन प्रथमपुरुषी असल्यामुळे नायकाचे अनुभव मनाला जास्त भिडतात. लंडनच्या सांस्कृतिक संकेतांविषयी काही गोष्टी आपल्याला समजतात जसे- लंडनमध्ये घुबडाला ज्ञानाचे प्रतीक मानले जात असल्यामुळे घरोघरी घुबडाच्या विविध कलाकृती ठेवल्या जातात. पारंपरिक कादंबरीची चौकट न मानता वाचकाला आवडेल अशी पद्धत स्वीकारून अरविंद रे यांनी लेखन केले आहे.

सतीश भावसार यांचे मुखपृष्ठ व आतली चित्रे अतिशय बोलकी आहेत. ब्रिटिशांच्या पोशाखाचा महत्त्वाचा भाग असणारी हॅट, त्यावर ब्रिटिश संस्कृतीचा महत्त्वाचा भाग झालेला वेळ आणि पैसा यांचा ताळमेळ दाखविणारे चित्र मुखपृष्ठावर रेखाटून, त्याखाली विविध प्रांतांतून आलेल्या स्थलांतरितांचे दडलेले जीवन दाखवून कादंबरीच्या शीर्षकाची समर्पकता छान स्पष्ट केली आहे. लपलेल्या मनाचा शोध घेणाऱ्या प्रत्येकाला अर्पण केलेली ‘लपलेलं लंडन’ ही कादंबरी अ-निवासी भारतीयांच्या व्यथा आणि कथा आपल्यापर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झाली आहे.

‘लपलेलं लंडन’, – अरविंद रे, राजहंस प्रकाशन, पाने- ३४३, किंमत- ४८० रुपये.

mukatkar@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lapalela london novel by arvind ray plight of nris and london stories dvr

First published on: 19-11-2023 at 01:15 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×