‘बिकट वाट..’ या नीती बडवे यांच्या पुस्तकात सहा स्त्रियांच्या जीवन संघर्षांची कहाणी सांगितलेली आहे. लेखिकेच्याच शब्दात सांगायचं तर ‘‘सर्वसामान्य बायकांच्या असामान्य मानसिक बळाच्या आणि आंतरिक शक्तीच्या या गोष्टी आहेत.’’
यातल्या नीरा, कमल आणि शांताबाई या तिघी जणी आदिवासी आहेत. सुभद्राबाई आणि नागिणी गरीब, ग्रामीण शेतकरी वर्गातील आहेत, तर राजश्री भटक्या-विमुक्त जातीतील आहेत. या सगळ्या जणींचा जन्म छोटय़ा, गरीब, दूरवरच्या आडवस्तीत झालेला आहे आणि अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्यांचं आयुष्य गेलं आहे. या स्त्रियांमधल्या काही निरक्षर किंवा अशिक्षित आहेत, तर काही जणी जेमतेम लिहा-वाचायला शिकल्या आहेत. काही विधवा, परित्यक्ता आहेत. जन्मच मुळी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाला असल्याने लहानपणापासूनच या सर्वाच्या वाटय़ाला मुळात आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे. कोणत्याही सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात येणारे बालपण, तरुणपण हे वाढीचे, विकासाचे स्वाभाविक टप्पे त्यांच्या आयुष्यात येऊ शकलेले नाहीत. त्यांना थेट आयुष्यालाच भिडावं लागलं आहे.
वाटय़ाला आलेली हलाखीची परिस्थिती हे समान सूत्र असलं, तरी यातील प्रत्येकीची कहाणी थोडीफार वेगळी आहे. आपल्यापेक्षा वयाने खूप मोठय़ा आणि पाच मुलांचा बाप असलेल्या माणसाशी अजाणत्या वयात लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या पाचही मुलांना (नंतर झालेल्या स्वत:च्या मुलाइतकंच) ‘आपलं’ मानणाऱ्या, कंबर कसून घरच्या शेताच्या तुकडय़ात राबणाऱ्या आणि नंतर अनंत अडचणींना तोंड देत आणि अपार कष्ट करत मुलाबाळांचे संसार मार्गी लावून देणाऱ्या आणि आज त्यांच्या गावातील एक लहान उद्योजिका असलेल्या केशेगावच्या सुभद्राबाई.
लहान वयात लग्न होऊन अल्पावधीतच एड्सच्या गंभीर आजारात नवरा गमावलेली आणि पदरात दोन लहान मुलं असताना नंतरच्या कठोर परीक्षा पाहणाऱ्या काळाला चिकाटीने, धर्याने सामोरं जात आणि शर्थीची धडपड करत स्वत:चा मार्ग शोधणारी एक हुशार मुलगी नागिणी.
प्रतिकूल परिस्थितीतही वडिलांच्या पािठब्याने बारावीपर्यंत शिकलेल्या, लग्नानंतर एकत्र कुटुंबात विकासाची संधी मिळत नाही हे लक्षात आल्यावर, लहान बाळासकट माहेरी परतणाऱ्या आणि अंधकारमय भविष्य डोळ्यासमोर दिसत असतानाही खचून न जाता ‘डोअरस्टेप स्कूल’च्या माध्यमातून रोजगार कमावणाऱ्या आणि स्वत:चा विकास साधणाऱ्या वडारी समाजातील राजश्रीताई. आश्रमशाळेत दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलेली आणि नंतर ‘अंकुर’ या सेवाभावी संस्थेची कार्यकर्ती म्हणून काम करत स्वत:बरोबरच आपल्या आदिवासी वाडय़ा-वस्त्यांच्या विकासाकरिता धडपडणारी नीरा.
बारावीपर्यंतचं शिक्षण उत्तम रीतीने पूर्ण करणारी आणि नंतर नोकरी न करता श्रमिक क्रांती संघटनेच्या माध्यमातून दुर्लक्षित, दरिद्री कातकरी आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्याकरिता झटणारी कमल.
अवघ्या बाराव्या वर्षी लग्न करून देण्यात आलेल्या आणि त्या लग्नात वडिलांनी खोताकडून कर्ज म्हणून घेतलेल्या पाचशे रुपयांची परतफेड करण्याकरिता पुढची वीस वर्ष त्या खोताकडे नवऱ्यासकट ढोरमेहनत करणाऱ्या आणि ‘सर्वहारा जन आंदोलन’ संस्थेत कार्यकर्ती म्हणून सामील झाल्यावर हे बंधन धर्याने झुगारून देणाऱ्या; आणि आज त्याच जोमाने या संस्थेचं काम करणाऱ्या शांताबाई.
‘बिकट वाट’ मध्ये अशा या सहा झुंजार स्त्रियांच्या दुर्दम्य वाटचालीचा गोफ विणलेला आहे. यांच्या या वाटचालीतलं आणखी एक समान सूत्र असं दिसतं, की स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवण्याकरिता यापकी प्रत्येकीने जी धडपड केली आणि जो मार्ग स्वीकारला, त्यातून आपसूकच त्यांच्या आजूबाजूच्या समाजाच्या विकासाच्या प्रक्रियेत त्या सामील झाल्या आहेत. नव्हे; त्यांची ही वाटचाल एकच आणि अभिन्न आहे. त्यातूनच त्यांना आत्मभान आलेलं आहे.
या प्रत्येकीच्या कहाणीचा आलेख लेखिकेने संवेदनक्षम रीतीने मांडला आहे. त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन समक्ष भेटी घेऊन एखाद्या रिपोर्ताजच्या शैलीत या सहा जणींच्या भेटींचा तपशील लेखिकेने वाचकांसमोर उलगडला आहे, हे या पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल. या स्त्रियांच्या जिद्दीला ज्या संस्थांचं पाठबळ लाभलं त्यांची थोडक्यात माहिती आणि त्यांचे पत्ते पुस्तकाच्या शेवटी लेखिकेने आवर्जून दिले आहेत. त्याचप्रमाणे या स्त्रिया ज्या परिसरात कार्यरत आहेत आणि राहतात, त्या उस्मानाबाद आणि रायगड जिल्ह्यांचे नकाशे सुद्धा आहेत.
पुणे विद्यापीठात जर्मन भाषेची प्राध्यापक म्हणून काम करत असताना लेखिकेने एक अभ्यास प्रकल्प म्हणून मुळात जर्मन भाषेत या कहाण्या लिहून त्या पुस्तक रूपात प्रसिद्ध केल्या. त्याला आता काही कालावधी लोटला आहे, म्हणून या स्त्रियांची सद्य:स्थिती जाणून घेण्याकरिता लेखिकेने पुन्हा
एकदा या सर्वाची भेट घेतली. ही माहिती या पुस्तकातील प्रत्येक कहाणीनंतर ताजा कलम जोडून वाचकांना दिली आहे.
वाटय़ाला आलेली बिकट वाट हिमतीने पार करत इतरांनाही मदतीचा हात देऊ करणाऱ्या स्त्री-शक्तीचं यथार्थ दर्शन या पुस्तकातून आपल्याला होतं आणि तीच या पुस्तकाची ताकद आहे. ल्ल
‘बिकट वाट ..’ सहा महिलांचा जीवनसंघर्ष’
नीती बडवे
साधना प्रकाशन
पृष्ठे- ११२, किंमत- १०० रुपये

 

शुभदा चंद्रचूड
smcmrc@gmail.com