२२ ऑक्टोबरच्या ‘लोकरंग’मध्ये माझ्या ‘भारताची कुळकथा’ या ग्रंथाचे ‘भारताची (अधुरी) कुळकथा’ हे डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी केलेले परीक्षण वाचले. त्यात काही विधाने आणि प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचे स्पष्टीकरण आवश्यक आहे असे लेखक म्हणून मला वाटते.
परीक्षणाच्या सुरुवातीस शीर्षकातच हे पुस्तक ‘अधुरी’ कुळकथा आहे असे म्हटले आहे आणि समारोपातही त्याचा पुनरुच्चार केला आहे. विशेष म्हणजे मी स्वत: प्रस्तावनेत प्रस्तुत ग्रंथ केवळ पुरातत्त्वीय पुराव्यांवर आधारलेला आहे आणि त्यात उपलब्ध पुराव्यांचा विचार केला आहे, असे स्पष्ट म्हटले आहे. असे असताना परीक्षणात ‘त्यात संस्कृतीचे दुसरे अंग मनोमय सृष्टी- जिच्यात धर्म, तत्त्वज्ञान, समाजरचना, साहित्य, कला आणि विज्ञान यांचा समावेश होतो- याचा विचार केलेला नाही,’ अशी टिप्पणी केली आहे. त्याचा विचार ज्यांचा त्यावर विश्वास आहे, ते इतिहासकार करतील.
डॉ. देगलूरकर यांना ‘सिंधू संस्कृती’ आणि ‘आर्य : एक यक्षप्रश्न’ ही दोन प्रकरणे महत्त्वाची वाटतात. सिंधू संस्कृती आर्याची होती, असे मत जेव्हा पूर्वी काही विद्वानांनी मांडले त्यावेळी पुरातत्त्वज्ञांनी त्यावर टीका केली होती. आणि आता सिंधू संस्कृती आर्याची होती, हे मत मान्य करणे त्यांना भाग पडले आहे. विश्वसनीय पुरावा असेल तर तो मान्य केलाच पाहिजे. इथे हे लक्षात ठेवले पाहिजे, की ही शक्यता आता निर्माण झाली आहे; आज जो पुरावा उपलब्ध आहे, तो त्यावेळी नव्हता. एखाद्याचे पूर्वी मांडलेले मत आता पुराव्यामुळे सिद्ध झाले तर ते मान्य करण्यात गैर काय आहे? अशी पूर्वी मांडलेली काही मते आहेत- की जी पुरावा नसताना मान्य झाली होती, परंतु आता नव्याने उजेडात आलेला पुरावा त्याच्या विरुद्ध आहे. याचे एक उदाहरण येथे देत आहे.
आजवर असा समज होता की, सिंधू लोकांत मृताचे दफन आणि दहन दोन्ही पद्धती रूढ होत्या. परंतु आता हे सिद्ध झाले आहे, की हडप्पामध्ये दहनाचा कोणताही पुरावा नाही. त्यावेळी फक्त एका कुंभात दोन जळकी हाडे सापडली होती, त्यावरून हे विधान वत्स यांनी केले होते. ती पक्ष्याची आहेत असे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे सिंधू काळात दहनाची पद्धत नव्हती असे म्हणावे लागते. फक्त तर्खानवाला डेरा या ठिकाणी मात्र पुरावा आहे. दहनाची पद्धत रूढ असल्याचे मत नानी गोपाल मजुमदार यांनी प्रथम मांडले. हडप्पा येथील अस्थिकुंभात फक्त हाडे होती. त्यावरून इतरत्र दहन करून अस्थिकुंभात ठेवून त्यांचे दफन केले असावे. तर्खानवाला डेरा येथे तो आहे, परंतु सिंधू नगरात किंवा इतरत्र स्थळांच्या उत्खननात तो अद्याप मिळालेला नाही. कदाचित एखाद्या जमातीत दहनाची पद्धत रूढ असावी.
सिंधू संस्कृतीची प्राचीनता आता नव्या शास्त्रीय पद्धतीनुसार दोन हजार वर्षांनी मागे जाते. हरयाणामधील काही स्थळांच्या या नवीन तारखा आहेत. इतर ठिकाणांहून- विशेषत: सौराष्ट्र आणि राजस्थानातून नव्या तारखा उपलब्ध झाल्यावर चित्र पुरे होईल. सिंधू संस्कृतीच्या जडणघडणीत रावी संस्कृतीचे योगदान आहे. तिचा काळ इ. पू. ७५००-६०००, पूर्व सिंधूचा इ. पू. ६०००-३००० आणि प्रगल्भ किंवा नागरी सिंधूचा इ. पू. ३०००-२००० असा आहे. प्रश्न हा आहे, की एखादी संस्कृती हजार- दोन हजार वर्षे बदल न होता टिकू शकते काय?
आर्याचा प्रश्न सिंधू संस्कृतीशी अधिक निगडित झाला आहे. इ. पू. २२००-२००० पासून सिंधूचा ऱ्हास सुरू झाला आणि सिंधू लोकांची स्थलांतरे होऊ लागली. पूर्वेत बिहापर्यंत, दक्षिणेत महाराष्ट्रात आणि पश्चिमेत इराणपर्यंत ते पोहोचले. उत्तर वैदिक वाङ्मयात आर्याची स्थलांतरे नेमकी याच ठिकाणी झाल्याचे उल्लेख आहेत. दोहोंचा अधिवास एक, काळ एक, स्थलांतरेही नेमकी त्याच प्रदेशात. ते दोन्ही एकच असले तरच ते शक्य आहे. याच प्रदेशात नंतर महाजनपदे उदयास आली आणि नेमक्या तेथेच इंडो-आर्यन भाषा बोलल्या जातात.
हे आर्य आले कुठून? त्यांच्याबद्दल विद्वानांत दोन तट पडले आहेत. एका गटाच्या मते, ते बाहेरून आले; तर दुसऱ्यांच्या मते, ते इथलेच आहेत. लो. टिळकांच्या मते, आर्य बाहेरून भारतात आले. दोन्ही गट आता हमरीतुमरीवर आले आहेत. हा प्रश्न कधीकाळी सुटेल असे वाटत नाही. कारण प्रत्येक गटाला एक महत्त्वाचा पुरावा गैरसोयीचा आहे. आर्य भारतातून इराणमध्ये गेले असे अवेस्तामध्ये सांगितले आहे. परंतु पाश्चात्त्यांना ते अडचणीचे आहे. आणि आर्याचा घोडा- त्यांचा लाडका प्राणी- इ. पू. २००० पूर्वी भारतात नव्हता, हे दुसऱ्या गटाला मान्य नाही.
सिंधू लिपी वाचल्याचे दावे काही सामान्यजन आणि काही विद्वानांनी केले आहेत, पण कोणालाही अद्याप मान्यता मिळालेली नाही. एकाला त्यात वेदातील नावे सापडली. बिहारमधील एका अधिकाऱ्याने तेथील एका वन्य जमातीत ही लिपी वापरात असल्याचे सांगितले आहे. त्याला जेरुसलेम इत्यादी नावे त्यात आढळली आहेत. गोर्डन चाईल्ड, राम शरण शर्मा इत्यादी मंडळींवर राजकारणाचा प्रभाव आहे याचे डॉ. देगलूरकरांना आश्चर्य वाटते. पण पारंपरिक गटातील मंडळीही त्यातून सुटली नाहीत. त्याचे परिणाम आज आपण पाहतोच आहोत.
आर्याच्या मूळ वसतिस्थानाबद्दलही अनेक मते आहेत. डॉ. देगलूरकरांना वाटते की, पुरातत्त्वशास्त्र हे विश्वासार्ह असेलही; पण अवशेषाधारे किंवा पुराव्यावरून निष्कर्ष काढणाऱ्यांना मर्यादा आहेत. मग प्रचलित पद्धतीच्या इतिहासलेखनास डावलून सत्यान्वेषणासाठी पुरातत्त्वाचे प्रयोजन काय, असा प्रश्न निर्माण होतो.
खरे म्हणजे आजवर आपण हेच करत आलो. पुरातत्त्वीय पुरावा जिथे गैरसोयीचा असेल तेथे तो नजरेआड करायचा. समग्र पुराव्याचा विचार न केल्यास तो अधिक गुंतागुंतीचा होतो. ज्ञानाच्या क्षेत्रात वाद अटळ आहे. वाद असेल तरच ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील. नवीन पुरावे नव्या समस्या निर्माण करतील. पुरातत्त्वीय पुरावा अपुरा असला तरी विश्वसनीय आणि तर्कनिष्ठ असतो. केवळ साहित्य इ. पुराव्याच्या आधारावर रचलेला इतिहास किती विश्वसनीय असेल हे सांगता येत नाही. त्याला दुजोरा देणारा पुरातत्त्वीय पुरावा हवा. तो नसेल तर तोही ‘अधुरा’ राहील.
पर्यावरणाचा प्रभाव मानवी संस्कृतीच्या जडणघडणीत लक्षणीय आहे, हे आता सर्वमान्य झाले आहे. मनोमय सृष्टीवर पर्यावरणाचा थेट परिणाम होतोच असे नाही असे डॉ. देगलूरकरांना वाटते. अनल्स संप्रदायाचा एक प्रमुख प्रणेता फर्नाड ब्रोडेल तर सांगतो की, पर्यावरण ही मानवी विकासातील एक धोंड आहे आणि तिच्याशी जुळते घेतल्याशिवाय मानवाला काही प्रगती करता येणे शक्य नाही. एकूण काय, की मानवी जीवनाचे कोणतेही असे अंग नाही ज्यावर पर्यावरणाचा प्रभाव पडत नाही. धर्माच्या बाबतीतसुद्धा पर्यावरणाचा प्रभाव पडतो. मध्ययुगात भारतात सर्वत्र संतकवी का निर्माण झाले, याचा आपण विचार करत नाही. त्या काळात निर्माण झालेले देव गोपजनांचे होते. अनेक राजवंशांचे मूळ पुरुष गोपजन होते. का? वीराचा विठ्ठल का झाला? खंडोबा, बिरोबा, इ. देव त्या काळात का निर्माण व्हावेत? कलेच्या क्षेत्रात आमची घरे सिंधूकाळापासून आजपर्यंत चतु:शाल का? विशिष्ट प्रदेशातील लोकांचे स्वभाव विशिष्ट असतात असे आढळून आले आहे. युरोपमध्ये ब्रिटिश हे राजकारणीच का? फ्रेंच कलावंतच का? जर्मन तंत्रज्ञ का? याचा अभ्यास हवलोक एलिसने ‘ॅील्ल्र४२’मध्ये केला आहे. आपल्याकडे असा अभ्यास झाला नाही. अवघड प्रश्न सोडून द्यायचे ठरवले तर असे काम होईल का? नाही. कारण आम्ही प्रश्न विचारीत नाही. बाबा वाक्यं प्रमाणम्! डॉ. देगलूरकरांच्या मते, प्रचलित इतिहासलेखनाची पद्धत सोयीस्कर आहे, त्यात पुरातत्त्वीय पुराव्याची कटकट नको. हे धोरण मानवाने अंगीकारले असते तर तो प्रगती करू शकला असता का?
प्रा. ख्रिस्तोफर होक्स (ऑक्सफर्ड विद्यापीठ) यांनी १९५३ मध्ये लिहिलेल्या एका लेखात युरोपातील नव्या पिढीने फार उडय़ा मारू नयेत, कारण पुरातत्त्वाला मर्यादा आहेत, असा सल्ला दिला होता. ते ऐकून नवी पिढी जर स्वस्थ बसली असती तर नवपुरातत्त्वाने गेल्या ६० वर्षांत जी लक्षणीय प्रगती केली आहे, ती झाली असती का? हे लोण अजून आपल्याकडे पोहोचलेले नाही, कारण आमची मंडळी व्हीलरच्या पुढे जायला तयार नाहीत.
– डॉ. मधुकर केशव ढवळीकर