‘मला कधी कधी प्रश्न पडतो- कारण मी जरी स्वत: पोलीस असले तरीही काही वेळा मी स्वत:शीच न्याय करू शकले नाही, तर लोकांची मदत कशी करणार? आणि माझ्यासारखे कितीतरी पोलीस आपली वाचा गिळून, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असतील त्यांचा आवाज मला व्हायचं आहे. मी पोलीस आहे, पण बाई आणि माणूस म्हणून असणाऱ्या माझ्या कळा इतरांसारख्याच आहेत हे समाजाला मान्य नाही याचीही खंत वाटते..’
‘मॅगझिनीतून सुटतेय गोळी’ या कवितासंग्रहाच्या मनोगतातील बालिका ज्ञानदेव या कवयित्रीच्या या काही ओळी. या मनोगतातून कवयित्रीच्या कार्यक्षेत्राची कल्पना येते. पोलीस म्हणून कार्यरत असणारी ही कवयित्री आपल्या कवितेतून अत्यंत रोखठोक बोलते. आपल्या जगण्याशी, भाषेशी कोणतीच प्रतारणा न करणारी ही एक अलीकडच्या काळातील महत्त्वाची आणि वेगळ्या अनुभवविश्वाची कविता म्हणून या संग्रहाची नोंद घ्यायला हवी. स्त्रीवादी कवितेने तर या कवितेची आवर्जूनच दखल घ्यायला हवी, कारण कुठल्याच रूढ आणि सांकेतिक स्वरूपातले हे अनुभव नाहीत.
‘काठीच्या तालावरचं जगणं’, ‘हा आतला समुद्र’, ‘बाई म्हणून जगताना’ आणि ‘भेटलेल्या काही चेहऱ्यांत’ अशा चिंतनाच्या चार सूत्रांत विभागलेल्या या संग्रहात ७० कविता आहेत. आणि या सर्व कविता कवयित्रीच्या भावविश्वाशी निगडित आहेत. मानव्याशी सर्जनशील नाते सांगणारी आणि माणसांविषयी प्रचंड आस्था असलेली ही कविता जीवनविषयक नवा दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवते. मुळात या संग्रहातील कवयित्रीचे जे साडेचार पानांचे मनोगत आहे, तेच खूप हादरवून टाकणारे आहे. एखाद्या आत्मकथनातील मनोगत वाटावे तसे. अत्यंत प्रामाणिक आणि सहज. कवितेच्या मागे जी एक पाश्र्वभूमी असते, ती जर तकलादू असेल तर तुमची निर्मितीसुद्धा अगदी वरवरची होऊ शकते. इथे मात्र तसे घडत नाही. अभाव, दारिद्रय़, बुरसटलेले विचार आणि यातून सुटका करू पाहणारं एक सर्जनशील मन असा हा एक लढा आहे. कुटुंब, प्रशासन आणि समाज अशा अनेक पातळ्यांवरचा हा संघर्ष म्हणजे प्रस्तुतचा संग्रह होय.
आमूलाग्र परिवर्तनाचा प्रारंभ करणाऱ्या महात्मा फुले यांना उद्देशून लिहिलेली ‘जोतीरावतात्या’ ही या संग्रहातील पहिली कविता, तर ‘बाबा तुम्हीच सांगा’ ही डॉ. आंबेडकरांशी संवाद साधणारी शेवटची कविता. भारतीय समाजाला दृष्टी आणि नवे आत्मभान देणारे दोन महापुरुष बालिका ज्ञानदेवच्या सांस्कृतिक परंपरेतले पूर्वज आहेत ही गोष्ट महत्त्वाची आहे. या दोन कवितांमधला आशय हा समग्र समाजाला विचार करायला लावणारा आहे. स्वत:च्या परंपरेचे डोळस भान कवयित्रीला आहे.
एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे प्रत्यक्ष वैयक्तिक जगण्यातले मूल्य आणि सामाजिक पातळीवरचे मूल्य नेमके कोणते असावे, असा पेच सतत राहत आलेला आहे. हा पेच ज्याचा त्यानेच विवेक ठेवून सोडवायचा असतो. कवयित्री या दोन्ही पातळ्यांवरचा हा पेच सोडवते. स्वत:चं जगणं आणि प्रत्यक्ष सामाजिक व्यवहार यांतला विरोधाभास म्हणूनच ती सक्षमपणे अधोरेखित करू शकते. किंबहुना, त्याचमुळे ती सत्याच्या बाजूने उभी राहते. शासनाच्या, सत्तेच्या विरोधात लिहिण्याचे धाडस शक्यतो नोकरदार करत नसतात, परंतु बालिका ज्ञानदेव अत्यंत धीटपणे पोलीस खात्यातील अनेक नकारात्मक बाजू समोर आणतात. अर्थात् हे करण्यामागे त्यांचा हेतू सनसनाटी निर्माण करण्याचा किंवा उथळ नाही, तर त्यात काही सकारात्मक बदल व्हावेत, ही कवयित्रीची मनोधारणा आहे. आणि म्हणूनच ती व्यवस्थेची चिकित्सा करण्याचे धाडस करते. म्हटलं तर ही बंडखोरी आहे, म्हटलं तर प्रामाणिकता.
पोलिसांकडे- विशेषत: स्त्री-पोलिसांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन अत्यंत संशयास्पद असतो. कवयित्री यासंदर्भात पुढील ओळी लिहिते..
‘जेव्हा मी सांगत गेले। माझी ओळख एकेकाला
तेव्हा प्रत्येकानेच चौकशी केली।
माझ्या भौतिक परिस्थितीची
माझ्या वरिष्ठांची। सहकाऱ्यांची
माझ्यासारख्या हजार जणींची।
माझ्या नाईट डय़ुटीची।
आणि आडजागीच्या बंदोबस्ताची’ (पृ. ३५)
ही कविता केवळ एक अनुभव उरत नाही, तर ती एक वास्तवच समोर ठेवते. अशा अनेक कविता या संग्रहात आहेत- ज्या अपरिचित अशा जगाची, माणसांची जाणीव वाचकाला करून देतात. अर्थात कवितेच्या कसोटीवर ही निर्मिती खूप परिपूर्ण, अंतिम वा श्रेष्ठ दर्जाची आहे असे नाही; परंतु ती अत्यंत अर्थपूर्ण आणि प्रामाणिक अभिव्यक्ती आहे, एवढे मात्र नक्की.
या संग्रहातील प्रत्येक कविता हा एक वेगळा अनुभव आहे. तो समजून घ्यायचा असेल तर या कवितेत खोलवर उतरावे लागेल. जर वाचक म्हणून आपण तसे उतरलो तरच या कवितेतील संवेदनशील अंत:करण आपल्यापुढे उलगडत जाईल. क्रांतिकारी विचारांची आणि नव्या सांस्कृतिक जाणिवांची ही कविता सामाजिक आणि राजकीयदृष्टय़ाही महत्त्वाची आहे. समकालीन प्रश्नांची सखोल आणि सूक्ष्म जाणीव या कवयित्रीला आहे. अर्थात ती जाणीव करून देण्याचा हेतू या संग्रहाचा नाही, तर आत्मसन्मानासाठी झगडणारी ही कविता आहे.
‘मॅगझीन’ ही प्रतिमा मराठी कवितेला नवी नसली तरी यापूर्वी एखाद् दुसऱ्या कवितेपुरतीच ती मर्यादित होती. मात्र, या संग्रहातला संपूर्ण आशय (प्रतीकात्मक रूपाने) या प्रतिमेला व्यापून आहे. कवयित्रीच्या जगण्याचाच तो भाग आहे. नव्या काळातल्या अभूतपूर्व स्थित्यंतरांनी माणसाच्या जीवनशैलीला आकार दिला आहे. भौतिक आणि मानसिक अशा दुहेरी कोलाहलात तो गुरफटला आहे. माणसाचं भयग्रस्त किंवा गुलाम होऊन जगणं कवयित्रीला मान्य नाही. स्त्री म्हणून असो अथवा नोकरदार म्हणून असो; ती स्वाभिमानी असली पाहिजे, अशा स्वरूपाची स्त्रीत्वाची जाणीवही ही कविता व्यक्त करते. ‘स्त्री ही आपल्या समाजातील एक जातिनिरपेक्ष अशी र्सवकष दलितता आहे..’ हे रा. ग. जाधव यांचे विधान लक्षात घेतले तर बालिका ज्ञानदेव यांच्या कवितेतील सांगण्याला एक सांस्कृतिक मूल्य असल्याचे आपल्या लक्षात येईल. कारण कवयित्री आज पोलीस म्हणून समाजाच्या मुख्य धारेत वावरत असली तरी तिचं ‘स्त्री’ असणं समाज विसरत नाही. सतत तिची अवहेलना करणं, तिला अपमानित करणं या गोष्टी घडत असतात. अशावेळी कवयित्री स्त्री म्हणून असलेली स्वत:ची अस्मिता कसोशीने जपण्याचा प्रयत्न करते. परंपरेची नाजूक, हळवी भाषा झिडकारून आधुनिक स्त्रीच्या मानसिकतेचं दर्शन ही कविता घडवते..
‘माझ्या चेहऱ्यावरचे। गोळा झालेले दुखरे भाव
आखडून घेतलेलं शरीर। आणि चालण्याची पद्धती
यावरून समजू शकत नाही का तुम्ही।
शिवलेल्या ओठांच्या आतलं। माझं घुसमटणारं दु:ख?’ (पृ.९४)
बालिका ज्ञानदेवच्या कवितेतील फार मोठा अवकाश अशा जाणिवेनं भरला आहे. आपला अनुभव व्यक्त करण्यासाठी खास वेगळी भाषा कवयित्रीला घडवावी लागत नाही. कारण ही भाषा तिच्या अनुभवविश्वाशीच जोडली गेलेली आहे..
‘तसे ‘ओन्ली पोझिशन’मध्ये आहोत आम्ही
आणि मॅगझिनमध्ये सटासट भरते मी राऊंड
रिकाम्या मॅगझिन- आदेश- ‘मॅगझिन लगावऽऽ’
रेडी, कॉक रायफल एक-दो। सेफ्टी कॅच ऑन
..ट्रिगर दबावऽऽ, धडाड् धुमऽऽ धडाम्ऽधुमऽऽ’
अशा स्वत:च्या काव्यात्म व्यक्तिमत्त्वाशी अनुरूप असलेल्या भाषेतून ही कवयित्री व्यक्त होते. त्यामुळे या कवितेचे वेगळेपण जाणवत राहते. उत्तम कांबळे यांची दीर्घ प्रस्तावना असलेला हा कवितासंग्रह आवर्जून दखल घ्यावा असा आहे.

‘मॅगझिनीतून सुटतेय गोळी’ (कवितासंग्रह)-
बालिका ज्ञानदेव, लोकवाङ्मयगृह प्रकाशन,
पृष्ठे- ११८, किंमत- १२० रुपये.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Pawar family
पवार कुटुंबीयही कौटुंबिक जिव्हाळ्याचं राजकारण करू शकतात…
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र