कोकणातील निसर्गसौंदर्य हे अनेकांच्या आकर्षणाचा विषय. समुद्रकिनाऱ्यापासून ते विविध प्रकारच्या झाडाझुडुपांनी येथील निसर्ग नटलेला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा तर या सौंदर्याचा मुकुटमणीच. येथे आढळणारी तऱ्हेतऱ्हेची रानफुले म्हणजे वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक आणि पर्यावरण संवर्धकांसाठी अमूल्य ठेवाच आहे. हा ठेवा निसर्गप्रेमींपर्यंत पोहोचविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे आणि निसर्ग अभ्यासक वामन पंडित हे या विषयावरील छायचित्रांची प्रदर्शने, माहिती संकलन, साहित्य अभिवाचन आदी उपक्रम राबवीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्गातील रानफुलांची माहिती देणारी ‘१०० वेलीफुले’ ही छोटेखानी, परंतु सुबक पुस्तिका त्यांनी तयार केली आहे. तीत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आढळणाऱ्या सुमारे १०० वेलीफुलांची माहिती वाचायला आणि पाहायलाही मिळते.
या पुस्तिकेत वेलीफुलांची माहिती त्यांच्या बाह्य स्वरुपाच्या वर्णनाबरोबरच खोड, पाने, पुष्पसंभार, फळे आदींच्या शास्त्रीय माहितीसह वाचायला मिळते. मुख्य म्हणजे या माहितीबरोबरच वेलीफुलांची सुंदर रंगीत छायाचित्रेही देण्यात आलेली आहेत. तसेच या वेलीफुलांच्या शास्त्रीय नावांप्रमाणेच त्यांची मराठी नावे, फुले-फळे येण्याच्या कालावधीविषयीही माहिती मिळते. मोरवेल, बेंदरीलची वेल, वासन वेल, कांगली, खांड वेल, गोमेटी, शेंगाळो, रवांतो, गारंबी, समुद्र अशोक, गावेल आदी लोकांच्या नेहमीच्या माहितीतल्या तसेच बऱ्याचशा अज्ञात अशा वैशिष्टय़पूर्ण वेलीफुलांची माहिती ‘१०० वेलीफुले’ मध्ये वाचायला मिळते. निरनिराळ्या प्रकारची वेलीफुले, त्यांची परस्परांहून भिन्न अशी रूपे तसेच वैशिष्टय़ांची माहिती निसर्ग-अभ्यासकांबरोबरच सामान्य निसर्गप्रेमींसाठीही उपयुक्त अशी आहे.
‘१०० वेलीफुले’- डॉ. बाळकृष्ण गावडे- वामन पंडित, पंडित पब्लिकेशन्स, कणकवली. पृष्ठे-१००, किंमत- १०० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review of dr bala balkrishna gawade and vaman pandit
First published on: 05-06-2016 at 02:25 IST