शहरी मध्यमवर्गीय माणसाच्या दैनंदिन जीवनातल्या वागण्यातील विसंगतीची खिल्ली उडवत त्यावर मार्मिक बोट ठेवणारे, सरकार, प्रशासन, राजकीय पक्ष, शिक्षण, स्वयंसेवी संस्था, नाती, प्रतिष्ठेच्या कल्पना, तसेच तत्कालीन घटनांतले विरोधाभास हेरणारे, त्यातल्या चेष्टेच्या जागा शोधणारे मिश्कील, गमतीशीर सदर..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अरे सारिका, बोल. बरं झालं गं, तू मला आत्ता फोन केलास. मी वाटच बघत होतो कोणीतरी मला फोन करावा म्हणून. खूप एकटं एकटं वाटत होतं. घनव्याकूळ होऊन रडू येईल असं वाटत होतं.. आणि तू फोन केलास.. ढग दाटून आले की जी व्याकुळता येते ना, तशी मला दाटून आली होती. बोल, काय म्हणतेस?’

हे मी कॉल सेंटरवरून मार्केटिंगचा कॉल करणाऱ्या एक मुलीला म्हणालो, तर तिने ‘थँक्यू सर’ म्हणून घाबरून फोनच ठेवून दिला.

मागे एकदा मला मी वर्तमानपत्र वाचत बसलेलो असताना एकीने इन्शुरन्स विकायचा प्रयत्न केला, तर मी तिला निम्मा अग्रलेख वाचून दाखवला होता. व्हेनेझुएलामधल्या आíथक संकटावरचे संपादकांचे विचार मी तिला ऐकायला लावले होते.

हे असे अचानक फोन करून लाघवी बोलणाऱ्या कॉल सेंटरवरच्या मुलींचे काय करायचे, हा प्रश्न मला ‘मोक्ष मिळाल्यावर जिथे नेतील तिथे मिसळ मिळत असेल की नाही?’ या प्रश्नापेक्षा जास्त सतावतो.

सतत दिवसाच्या कोणत्याही प्रहरात फोन करून काहीतरी विकायचा प्रयत्न करणाऱ्या मुलींशी माझे काही मित्र फार तुसडेपणाने वागतात. त्यांना या मुलींचा खूप संताप येतो. काहीतरी उद्धट उत्तर देऊन ते फोन ठेवून देतात. मी त्यांना नेहमी सांगतो की, ‘चिडू नका, आपण मराठी असलो तरी एका दिवसात किती जणांशी तुसडेपणाने बोलायचे याला आपल्यालाही मर्यादा आहेतच. आपण काही अभेद्य नाहीओत. आपल्याला या मुलींशी बोलायला स्वत:ला तयार करावे लागेल.’

भरपूर विचारांती कॉल सेंटरवरच्या मुलींशी बोलायची एक पद्धत मी विकसित केली आहे; ज्याचा पाया अजिबात चिडायचे नाही, हा आहे. कोणी इंग्रजीत फोन केला तर ज्युलिया रॉबर्ट्स, िहदीत फोन केला तर दीपिका पदुकोन आणि मराठीत फोन केला तर सई ताम्हणकर पलीकडे आहे असे समजायचे, म्हणजे आपला निम्मा राग तिथेच कमी होतो. जवळच्या स्त्रियांनी प्रेमानं आणि आदरानं बोललेलं ऐकायची आपली सवय जवळजवळ निघून गेलेली असते. फोनवर का होईना, कोणीतरी स्त्री आपल्याशी अत्यंत उत्साहानं, प्रेमानं- आणि मुख्य म्हणजे आदरानं बोलते आहे याचं मूल्य आपण समजून घ्यायलाच हवं.

दिवसाच्या या प्रहरात ‘गुड मॉìनग’, ‘गुड आफ्टरनून’, ‘गुड इव्हििनग’ यापकी काय म्हणायला हवे, या प्रश्नाने गोंधळून जाऊ नका. ती मुलगी जे म्हणेल तेच तुम्हीही म्हणा. ती तुम्हाला विचारेलच की, तुम्ही कसे आहात? तो तिच्या रडढ चा भाग आहे. तुम्हीही तिला विचारा, की घरी कोण कोण असतात? काय करतात? कोणी लग्नाचे आहे का? किंवा सांधेदुखीवरचे कोणते हुकमी औषध तिला इतक्या वर्षांच्या फोनवर बोलायच्या अनुभवातून माहीत झाले आहे का?

आपण काय समजतो- की ज्या अर्थी तिने फोन केला आहे त्या अर्थी ती जे सांगेल ते आपण ऐकायलाच हवं. असं मानून घ्यायची काहीही आवश्यकता नाही. हा फोन आपल्याला व्यक्त व्हायला मिळावं म्हणून आलेला आहे अशी आपण आपल्या मनाची समजूत करून घ्यायची आणि मग बोलायचं. माझ्या एका कवीमित्राला- ज्याला सगळेजण टाळायचे; आणि कोणीतरी त्याच्या कविता ऐकाव्यात म्हणून बिचारा व्याकूळ असायचा- मी ‘कॉल सेंटरवरच्या मुलीला कविता ऐकवत जा,’ अशी आयडिया सुचवली! त्याने माझे ऐकले. पहिल्यांदा जेव्हा समोरच्या मुलीने ‘हॅलो’ म्हटलं तेव्हा ताबडतोब त्याने ‘भंगलेल्या देहापल्याडचे प्रारब्ध’ ही कविता तिला ऐकवून टाकली. ती मुलगी पण ‘वा! क्या बात है!’ म्हणाली. आता आमचा मित्र कॉल सेंटरचे नंबर सेव्ह करून ठेवतो, आणि त्यांनी फोन केला नाही तर हाच त्यांना मिस् कॉलही देतो!

या मुली आपल्याला इंग्रजी बोलण्याची तयारी करायला फार उपयुक्त ठरू शकतात. आपण इंग्रजीत बोलायला लागलो तर आपले जवळचे हसतील किंवा खिल्ली उडवतील अशी आपल्याला भीती वाटते. आपली ही भीड कॉल सेंटरवाल्या मुलींशी बिनधास्त इंग्रजी बोलून चेपू शकते. ती पोरगी आपल्या ओळखीची ना पाळखीची.. तिच्यासमोर बिनधास्त रेटून इंग्रजी बोलायला का भ्यायचं? तिला कॉल केल्याचं समाधान अन् आपल्याला इंग्रजीत बोलायला मिळाल्याचं समाधान. फिट्टमफाट!

आपण जर कामात असू आणि असा फोन आला तर बिलकूल चिडायचं नाही. आपल्याला जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हाची वेळ त्यांना सांगायची. त्या बरोबर त्या वेळेला फोन करतात. त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये वेळेची नोंद होते. त्यामुळे त्या वेळेला जी डय़ुटीवर असेल तिला कॉम्प्युटर बरोबर फोन लावून देतो. मी तर हल्ली गजर लावतच नाही. कॉल सेंटरवालीला सांगायचं- मला सकाळी साडेचारला वेळ आहे, तू बरोब्बर तेव्हा फोन कर, म्हणून. आपल्याला ती वेळेवर फोनही करते, दोन मिनिटं तिच्याशी बोलत राहिलं की आपली झोपही उडते. आणि तसंही अशा अडनिडय़ा वेळेला इतकं लाघवी ‘गुड मॉìनग’ आपल्याला करणारं तरी कोण असतं?

आपल्याकडे भरपूर वेळ आहे आणि आपण कितीही वेळ बोलत बसू शकतो असे जर या मुलींना वाटले तर त्यांचा आपल्याला फोन करायचा उत्साह निघून जातो असा माझा अनुभव आहे. थोडक्या वेळात पटापट बोलून वस्तू विकून या, असे त्यांना सांगितलेले असते. आपण खूपच निवांत आहोत असा समज जर आपण तिचा करून देऊ शकलो, तर माझा अनुभव असा आहे, की आपण पटकन् फोन संपवावा म्हणून या मुली मेटाकुटीला येतात. मी एकदा एका मुलीशी बोलत असताना मला दुसरा फोन आला, तर तिचा फोन मी माझ्या तेव्हा तीन वर्षांच्या असणाऱ्या मुलाला दिला होता. माझाच मुलगा तो- त्यानेही कार इन्शुरन्सबद्दल सविस्तर ऐकून घेतलं! करवादायचं नाही हे एकदा ठरवलं की गोष्टी फार सोप्या होतात.

आयुष्याने जर मला अशी संधी दिली तर मला कधीही आणि काहीही विकत घ्यायचे नाही. अमूक एक वस्तू किंवा सेवा आपल्या गरजेची आहे किंवा नाही, या प्रश्नाचं उत्तर मला कधीही शोधता आलेलं नाही.

आता या सगळ्या गोंधळात जेव्हा दिवसाच्या पहिल्या प्रहरात मला तीन मुली फोन करतात आणि अनुक्रमे वरळीतला ३६ कोटी रुपयांचा तीन बेडरूमचा फ्लॅट, गरोदरपणात स्त्रियांनी घालायचे गाऊन आणि केनियातली हत्ती बघायला जायची टूर फोनवर विकायचा प्रयत्न करतात, तेव्हा इतक्या कमी वेळात यातले काय आपल्याला ताबडतोब विकत घ्यायला हवे आहे, हा प्रश्न मी स्वत:ला विचारायला लागतो आणि थकून जातो. त्यामुळे होता होईल तो कोणतीही वस्तू किंवा सेवा विकत घ्यायचा निर्णय हा मी जवळच्यांवर सोपवतो आणि या निर्णयापासून पळून जातो.

आता असल्या निरुपयोगी मनुष्याला या मुलींनी आवर्जून फोन का करावा?

कोणीतरी मला म्हणाले, की कॉर्पोरेटमधले लोक फार अभ्यास करतात. ग्राहकांचे वर्तन, त्यांच्या खरेदीच्या सवयी याचा त्यांचा बारीक अभ्यास असतो. मगच ते आपल्याला योग्य ग्राहक कोण, याचा निर्णय घेतात आणि मग त्याला वस्तू विकण्याचा जोरदार प्रयत्न करतात.

ज्या अर्थी ते कॉर्पोरेट आहे आणि अभ्यासाअंती आलेले आहे, त्या अर्थी ते काहीतरी फार फार महत्त्वाचे असणारच. हे फार म्हणजे फारच घाबरवणारे आहे. ज्यांनी कोणी माझ्या ग्राहक म्हणून वर्तनाचा इतका सखोल अभ्यास केला असेल त्याला माझ्या वर्तनात असे काय दिसले असेल- ज्यामुळे त्याला वाटले, की गरोदरपणात स्त्रियांनी घालायचे गाऊन विकत घ्यायला मी एक योग्य व्यक्ती आहे? आणि मला जर फोन केला तर मी ताबडतोब एक तरी महागडा गाऊन विकत घेईनच.

आपण सहज म्हणून जे आजूबाजूला वावरत असतो त्याचे ‘ग्राहकांचे वर्तन’ म्हणून कसले निष्कर्ष कॉर्पोरेट अभ्यासाअंती निघतात, हे चक्रावून टाकणारे आहे. त्यामुळे मी योग्य ग्राहक आहे हे यांना कशामुळे वाटले असेल, या प्रश्नाचा त्रास करून घेणे मी सोडून दिले आहे.

आजकाल कोण कुणाला फोन करतो? सगळेच घाईत असतात. कोणीतरी तुम्हाला आवर्जून फोन करते आहे, तुमच्याशी लाघवीपणे बोलते आहे, तुम्ही भले कंगाल असाल, तरी तिला असा विश्वास वाटतो आहे, की तुम्ही ३६ कोटी रुपयांचा फ्लॅट सहज विकत घेऊ शकता.. हे तुम्हाला ग्रेट नाही वाटत?

शेकडो लोक या मुलींचा फोन कट करतात. तरीही त्यांना आशा वाटत राहते की, पुढचा माणूस तरी नक्की आपल्याशी बोलेल. मग आपणही ३६ कोटी रुपयांचा फ्लॅट विकत घेऊ, अशी आशा बाळगायला काय हरकत आहे? रोज या इतक्या मोठय़ा जगाच्या पसाऱ्यात किमान अशा दहा मुली आपल्याला भेटतात- ज्यांना आपल्याशी बोलायचंय. त्यांना खात्री वाटतेय, की आपण गाडी घेऊ शकतो, क्रूझवर जाऊ शकतो, महागडा इन्शुरन्स घेऊ शकतो. आपल्याबद्दल इतकी सकारात्मक भावना बाळगणाऱ्यांना आपण टाळायचं? त्यांच्याशी तुसडेपणाने वागायचं?

कधीतरी ज्युलिया, दीपिका किंवा सई कॉल करीत असेल तेव्हा तुम्ही तिचा कॉल ‘काय कटकट आहे!’ म्हणून कट कराल. तेव्हा मला सांगू नका, की मी आधी सांगितले नव्हते म्हणून!

मंदार भारदे mandarbharde@gmail.com

मराठीतील सर्व बघ्याची भूमिका बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enthusiastic woman
First published on: 01-01-2016 at 01:14 IST