scorecardresearch

Premium

‘श्री ४२०’ – समीक्षकांच्या नजरेतून!

‘श्री ४२०’ चित्रपटाचे मूल्यमापन त्या काळात कसे झाले, याचे दर्शन घडवणारा लेख.

‘श्री ४२०’ – समीक्षकांच्या नजरेतून!

सप्टेंबर १९५५ मध्ये राज कपूर यांच्या आर. के. फिल्मस्चा ‘श्री ४२०’ हा बोलपट दक्षिण मुंबईतल्या रीगल या वातानुकूलित सिनेमा हॉलमध्ये थाटामाटात प्रदíशत झाला त्याला आता ६० वष्रे पूर्ण झाली. तेव्हा देश स्वतंत्र होऊन जेमतेम आठ वष्रे झाली होती. साम्यवाद आणि समाजवादाचं गारूड समाजमनावर प्रभाव टाकीत होतं. १९५१ च्या देशविदेशात गाजलेल्या ‘आवारा’नं याची झलक सिनेमाच्या जगात दाखवली होतीच. त्यातली काही गाणी आजही रशियातसुद्धा ऐकायला मिळतात. त्याचे लेखक के. ए. अब्बास व वसंतराव साठे हे डाव्या विचारसरणीचे होते. त्यांनीच ‘श्री ४२०’ची पटकथा व संवाद लिहिले. बोलपट गाजला; पण त्याची म्हणावी तशी चर्चा झाली नाही. आज ६० वर्षांनंतर देशापुढचे मॉडेल- प्रारूप बदललेलं असताना जुने व नवे समीक्षक त्याच्याबद्दल काय म्हणतात ते पाहणं मनोरंजक ठरू शकेल.
विकिपीडियावर याला ‘कॉमेडी फिल्म’ म्हणजे चक्क विनोदी बोलपट असं म्हटलं आहे. एका वाक्यात कथासूत्र दिलं आहे- ‘मोठी स्वप्ने घेऊन शहरात आलेल्या तरुणाला प्रामाणिकपणा व यश यातून निवड करायची आहे.’ त्याच सुमारास भाकरी व चंद्राच्या शोधात मुंबईत येऊन झगडलेल्या व आज स्थिरावलेल्या प्रत्येकानं ही निवड कशी केली ते आपलं आपण आठवावं. हा बोलपट त्यासाठी एक प्रकारे समोर ठेवलेला आरसाच आहे. त्याची इंग्रजी सबटायटलसह उत्तम िपट्र ‘यू टय़ूूब’वर उपलब्ध आहे. ‘विद्या’ व ‘माया’ या दोन नायिकांचा प्रभाव आजही मुंबईतल्या ‘विद्यानगरी’ व ‘मायानगरी’च्या रूपानं बदलत्या स्वरूपात आपल्या समाजावर कायम आहे.
बोलपटाचं चित्रीकरण पूर्ण होत आलं तरी त्याला नाव कोणतं द्यावं हे ठरत नव्हतं. ‘धोकेबाज’ हे नाव नíगसच्या मते चांगलं होतं. पण हे तर स्टंटपटाला शोभेसं नाव आहे असं इतरांचं मत पडलं. नावाची चर्चा चालू असतानाच स्टुडियोमधले दोन कर्मचारी भांडत आले. एकानं राजसाहेबांपुढे तक्रार मांडली. ‘देखीये राजसाहब, इस आदमीने चारसोबीसी करके मुझसे पचास रुपये लिये है. ये पक्का चारसोबीस है. आप इसको सजा दो’. हे ऐकून राजजींचा चेहरा चमकला. त्याच्या हातावर १०० रुपये ठेवून सिनेमाला ‘४२०’ हे नाव द्यायचं ठरलं. इंडियन पिनल कोड ‘४२०’ हे बदमाशीला लावलं जातं हे सगळ्यांना ठाऊक होतंच. हे नाव काहीसं अर्धवट वाटल्यानं नíगसनं त्यामागं ‘श्री’ शब्द जोडला आणि ‘श्री ४२०’ पुरा व्हायला एक वर्ष लागलं. ट्रायल बघितल्यावर हा चित्रपट कमीत कमी रौप्यमहोत्सव साजरा करणार हे नíगसचे शब्द खरे ठरले. विकिपीडियावरच्या माहितीप्रमाणे या बोलपटानं २० दशलक्ष म्हणजे दोन कोटी रुपये कमावले. हा विक्रम पुढे १९५७ मध्ये ‘मदर इंडिया’ बोलपटानं ४ कोटी रुपये मिळवून मोडला.
‘फिल्म इंडिया’ च्या नोव्हेंबर १९५५च्या अंकात संपादक व समीक्षक बाबूराव पटेल यांनी ‘बकबक करणाऱ्या निर्मात्याचा असामाजिक- अ‍ॅंटी सोशल पिक्चर’ असं शीर्षक देऊन समाचार घेतला आहे. इंग्रजीतली शेलकी व अर्थासाठी शब्दकोश पाहावा लागेल अशी अगम्य विशेषणं वापरून त्यांनी सिनेमाला अक्षरश: झोडपून काढलंय. राज त्यांच्या मर्जीतले नसल्याचा पण हा परिणाम असावा. अलाहाबाद युनिव्हर्सटिीचा पदवीधर तरुण मुंबईतल्या भिकाऱ्याकडून अप्रामाणिकपणाचा उपदेश घेऊन आपले प्रामाणिकपणासाठी मिळवलेलं सुवर्णपदक गहाण ठेवतो हे बाबूरावांना पटत नाही. तीन-पानी पत्त्यातलं त्याचं कसबही त्यांना भावत नाही. १०० रुपयातलं जनता घर घेण्यासाठी लोक वेडय़ासारखे का धावतात असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. १६००० फुटांची अतक्र्य लांबण व वैताग व बोअरडम असं वर्णन ते करतात. मात्र संवाद, सेटस् व छायाचित्रणाचं माफक कौतुक करून संगीत व गाणी खास नव्हेत, पण बरी आहेत असं बाबूराव लिहितात.
फिल्मफेअरच्या ११ नोव्हेंबर १९५५ च्या अंकात परीक्षण आलं असून, ते कुणी लिहिलंय हे समजत नाही. सौम्यपणे पण नाराजीचाच सूर इथं पण लावलेला आहे. तर्काला सोडून जाणारी पटकथा व राज कपूर यांची चार्ली चॅप्लीनची अतिरेकी नक्कल हास्यास्पद झाली आहे. राजभोवतीच फिरत राहणारा कॅमेरा ही बाब उबग आणणारी आहे असं म्हटलंय. पण भव्य सेटस्, छायाचित्रण व नृत्यांची प्रशंसा केलेली आहे. अभिनयासाठी महत्त्वाच्या प्रत्येक कलाकारावर स्वतंत्र परिच्छेद दिलाय. त्यात राज, नर्गीस, निमो, (सेठ सोनाचंद धर्मानंद), ललिता पवार, शीला वाझ व कुमार यांच्या अभिनयाची तारीफ केली आहे. नादिराच्या रोल व अभिनयाबाबत मात्र ‘वाईट’ या शब्दात टीका केली आहे. गाण्याचे बोल चांगले, पण संगीत काही चांगलं म्हणता येत नाही असं समीक्षक नोंदवितो. पुण्याच्या फिल्म अर्काईव्हच्या उत्तम ग्रंथालयात त्या काळातली ही दोनच परीक्षणं सापडली. प्रादेशिक भाषांतली व सिनेमाला वाहिलेली मासिकं व साप्ताहिकं त्या काळात फारशी नसावीत. मात्र रशियन शीर्षकाचं पोस्टर मात्र फिल्म अर्काईव्हच्या संचालकांच्या दालनातच िभतीवर टांगलेलं आढळलं.
ज्या संगीत व गाण्यांविषयी इंग्रजीतल्या समीक्षकांनी फारसं बरं लिहिलं नाही त्या गाण्यांसाठीच केवळ अनेकदा सिनेमा पाहणारी मंडळी अगदी आजतागायत आहेत. ‘दिग्दर्शक राजकपूर’ हे भाई भगत यांचं पुस्तक आहे. त्यात गाण्यांच्या चित्रीकरणावर (टेकिंगवर) दोन पानांचा मजकूर आहे. भाई या क्षेत्रातले असल्याने त्यांनी शॉटस् व कटिंगच्या परिभाषेत माहिती देऊन रसग्रहण केलेलं आहे. उदा. ‘मेरा जूता है जपानी’ गाण्यात २६ शॉटस् आहेत तर ‘मूड मूड के ना देख’ गाणं ६६ शॉटस्मध्ये विभागलेलं आहे. सर्वात उत्तम टेकिंग ‘रमया वस्तावैया’चं आहे असं त्यांना वाटतंय.
आधुनिक काळात इंटरनेटवर पुष्कळ ठिकाणी या बोलपटावर लिखाण केलेलं आहे. एकानं तर शॉट बाय शॉट संपूर्ण सिनेमाचं रसग्रहण केलेलं आहे. त्यावर इतरांच्या कॉमेंटस् व शेरेबाजीही आहे. मात्र गाण्यांचं गारूड पक्कं आहे. हाय डेन्सिटी व्हिडीयो फिल्मस व रिमिक्स गाण्यांचं पेवच फुटलेलं आहे. त्यात ‘इचक दाना बिचक दाना’, ‘मेरा जूता है जपानी’, ‘मूड मूड के ना देख’ ही गाणी आहेतच, पण सर्वात जास्त रिमिक्सचे नमुने ‘प्यार हुवा इकरार हुवा’ या गाण्याचे आहेत. हे असं का, याचं उत्तर सामाजिक शास्त्राच्या अभ्यासकांनी शोधायचं आहे.
राज कपूर यांचा जन्म १९२४ चा. आपल्या वयाची तिशी ओलांडताना त्यांनी हा बोलपट बनवला. ६३ वर्षांचे असताना १९८८ साली दिल्ली येथे दादासाहेब फाळके अ‍ॅवॉर्ड समारंभाच्या दालनातच ते कोसळले व गेले. पण मागे अनेक यशस्वी बोलपट ठेवून. ‘श्री ४२०’ हा त्यातला गाजलेला व आजही तेवढाच प्रभावी व महत्त्वाचा!
सुरेश चांदवणकर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Film critics view on raj kapoor movie shree

First published on: 27-09-2015 at 01:03 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×