‘माझ्यासारख्या कवीला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शब्द आपल्यासारखेच वाटतात;

आपण जसे आहोत तसे आपले शब्द असतात;

आपले शब्द आपलेच प्रतिनिधित्व करतात!’

– गेल्या साडेचार दशकांहूनही अधिक काळ काव्यनिर्मिती करणाऱ्या गोविंद कुलकर्णी यांच्या ‘परिमाण’ या नव्याकोऱ्या कवितासंग्रहातील या ओळी. कुलकर्णी यांच्या कवीपणाची वीण स्पष्ट करणाऱ्या. कुलकर्णी यांच्या या काव्यविषयक भूमिकेचा प्रभाव तब्बल २०० कवितांच्या या संग्रहभर आहे. एकीकडे आवाजी होत चाललेल्या गद्यप्राय कवितेचा गाजावाजा असताना कुलकर्णी यांच्या संयत, साध्या, तरी मूल्यगर्भ कवितेचे वेगळेपण नक्कीच जाणवते.

या संग्रहातल्या साऱ्याच कविता अतिशय मोकळेपणाने संवाद साधणाऱ्या आहेत. हे करताना कवीने प्रतिमांचा, अलंकृततेचा सोस मात्र बाळगलेला नाही, ही या कवितेची जमेची बाजू. आपल्या आजूबाजूचा भवताल कुलकर्णी यांनी कवीच्या नजरेतून टिपलेला आहे. हे टिपणे खास त्यांच्या शैलीतील आहे. सर्जनशील व्यक्तीची बदलाच्या, संक्रमणाच्या काळात होणारी तगमग कुलकर्णी यांच्या कविता शब्दांकित करतात. या तगमगीत जगताना, कवी म्हणून त्यात समरस होताना दिसलेले, जाणवलेले, आवडलेले, नावडलेले सारे काही कुलकर्णी या कवितांतून सांगू पाहतात. मात्र त्यात कुठेही आकांती भाव येत नाही. त्यांची काव्यभाषा संग्रहातल्या साऱ्याच कवितांमध्ये हा संयतपणा टिकवून आहे. भवताल अधिकाधिक हिंसक, आक्रमक होत असताना कुलकर्णी यांच्या कवितांतील निवेदन, ते व्यक्त करण्याची शैली भविष्यातील मानवी जगण्याविषयी आश्वस्त करणारी आहे. एका कवितेत ते म्हणतात-

‘प्रत्यक्षाला कल्पनेहूनही अधिक सुंदर बनविण्यासाठी

कल्पनेला जवळ करायला हवं,

जीवनाला कवितेहूनही अधिक अर्थपूर्ण बनविण्यासाठी

कवितेच्या जवळ जायला हवं!’

असे केल्यास काय होईल, हेही त्यांनी या संग्रहातील शेवटच्या कवितेत सांगितले आहे. ते लिहितात..

‘..बघण्याची दृष्टीच बदलते;

डोळ्याला सगळं काही सुंदरच दिसते!’

तेव्हा या संग्रहातील कविता आपल्याशा करायलाच हव्यात!

  • ‘परिमाण’- गोविंद कुलकर्णी,
  • प्रतिभा प्रकाशन
  • पृष्ठे- १४०
  • मूल्य- २०० रुपये.
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govind kulkarni parinam book review
First published on: 07-01-2018 at 01:32 IST