दक्षिण आफ्रिका या देशाचे नाव ऐकताच तिथली जंगले आणि वन्यप्राणी डोळ्यासमोर न आले तरच नवल! मुळातच हा देश अरण्य आणि त्यातील वन्यजीवांसाठी ओळखला जातो. तिथे येणारा पर्यटक तिथल्या एका तरी जंगलास भेट दिल्याशिवाय राहत नाही. मुळात तिथल्या नागरिकांनाही जंगल आणि वन्यजीवांविषयी तितकीच कणव असल्याचे या देशात गेल्यानंतर जाणवते. बहुधा म्हणूनच त्या ठिकाणी अनेक जणांनी त्यांच्या खासगी मालकीची जंगले तयार केली आहेत. अर्थात त्यामागे त्यांचा दृष्टिकोन व्यावसायिक असला तरीदेखील ती जपली जातात, हेही तेवढेच खरे!

दक्षिण आफ्रिकेतील निसर्गसौंदर्य अजूनही चांगले टिकून आहे. येथील अनुकूल वातावरणात निसर्ग आणि वन्यजीव अतिशय जवळून न्याहाळता येतात. त्यावेळी मिळणारा आनंद पराकोटीचा असतो. पहिल्यावहिल्या खासगी जंगलात आम्ही हे अनुभवलं. जोहान्सबर्गच्या उत्तरेकडील मँगेलिस खोऱ्यातले हे खासगी मालकीच्या जंगलाचे संगोपन बिल हॅरॉप हे ७३ वर्षांचे गृहस्थ करतात. त्यांच्या मालकीच्या या जंगलात बलून सफारीतून जंगलाचा विस्तार अनुभवणे खूपच रोमांचक होते. हॉट एअर बलूनच्या साहाय्याने जमिनीपासून सहा हजार फूट उंचीवर गेल्यावर आणि हळूहळू खाली येताना जंगलाची आणि तिथल्या वन्यजीवांची विविध रूपं बघायला मिळाली. या खासगी जंगलात व्यावसायिक पर्यटन उपक्रम राबवला जात असला तरी तिथल्या वन्यप्राण्यांना त्याची झळ पोहोचू दिलेली नव्हती. जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाचा पहिला धडा असा एका खासगी जंगलातून मिळाला. त्यामुळे इतर जंगलांत गेल्यावर तिथले व्यवस्थापन काय असू शकेल याची कल्पना आली.

इथले पिलान्सबर्ग राष्ट्रीय उद्यान एका प्राचीन ज्वालामुखीच्या खड्डय़ात वसवलेले आहे. पर्यटक इथे फिरायला येतात तेव्हा असे काही या ठिकाणी असेल हे त्यांना सांगितल्याशिवाय कळणे शक्य नाही. या उद्यानाच्या उत्तर भागाचे मूळ मालक बाकग्टाला-बा-कगाफेला आदिवासी होते. तर दक्षिणेकडील भागात १९८० च्या दशकात स्थानिक शेतकऱ्यांनी शेती स्थापित केली होती. दरम्यान जवळच्याच वेन्टर्सडॉर्प या शहरातून आलेल्या बाकुबंग जमातीने या जमिनीवर स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. अशा बऱ्याच घडामोडी घडून पिलान्सबर्ग राष्ट्रीय उद्यानाचा विकास झाला. जगातील हा सर्वात महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. हे उद्यान एका संक्रमण क्षेत्रात आहे. या जंगलातील वनस्पतींमध्ये कोरडा आणि रूक्ष समजला जाणारा कालाहारी वृक्ष आणि ओलसर म्हणून गणला जाणारा लोवेल्ड वृक्षही आढळून येतात. वन्यप्राणी तसेच वनस्पतींचे अनेक प्रकार या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करतात. दक्षिण आफ्रिकेतील वन्यप्राण्यांच्या सर्व प्रजाती येथे आढळून येतात. सुमारे ३६० पक्षी प्रजाती या ठिकाणी आहेत. दक्षिण आफ्रिकेतील हे चौथ्या क्रमांकाचे राष्ट्रीय उद्यान आहे आणि प्रिटोरिया/जोहान्सबर्ग येथून तिथे जाण्याकरिता सुमारे दोन तासांचा कालावधी लागतो. या उद्यानात टेकडय़ांच्या चार रिंग आहेत. त्यातून फिरताना वन्यप्राण्यांचे होणारे दर्शन सुखावणारे आहे. या उद्यानातील सफारीसाठी आम्ही उद्यानाच्या आतील बाकुबंग येथे थांबलो, पण बाकुबंगमध्ये प्रवेश करण्याआधीच एका विशालकाय हत्तीने आम्हाला दर्शन दिले. त्यामुळे सर्वाचीच सफारीची उत्सुकता ताणली गेली. सकाळी सकाळीच आम्हाला सिंहाच्या एका जोडीने किमान अर्धा तास तरी त्यांच्या मागे मागे फिरायला लावले. तब्बल अर्ध्या तासानंतर ते आमच्या मार्गातून बाजूला सरले आणि आमचे वाहन पुढे सरकले. दरम्यान सिंहाचा शिकारीचा एक फसलेला प्रयत्न आम्ही पाहिला. या ठिकाणी उत्तम व्यवस्थापनाचा एक नमुना दिसून आला. या जंगलात वाहनांचा ‘वन वे’ आहे. समोरून दुसरे वाहन येत नाही. आणि वन्यप्राण्यांपासून ठरावीक अंतरावरच वाहन ठेवले जाते. त्या प्राण्याला ओलांडून जाण्याची घाई केली जात नाही.

दुसरा एक प्रसंग रात्रीचा! रात्री परतीच्या मार्गावरच दोन हत्तींची जोरदार झुंज सुरू होती. त्यांच्या हाणामारीने पर्यटकांची वाहने अक्षरश: रोखून धरली होती. हा थरार तब्बल तासभर सुरू होता. माघार घेण्यास एकही हत्ती तयार नव्हता. खरं तर कॅमेऱ्यात कैद करण्यासारखा हा प्रसंग! पण ‘आधी वन्यप्राणी, नंतर पर्यटक’ असा इथे पर्यटन व्यवस्थापनाचा खाक्या असल्याने वाहनांचे दिवे बंद करायला लावले गेले. कॅमेऱ्यांच्या फ्लॅशलाइटलादेखील मनाई करण्यात आली. त्यामुळे भ्रमणध्वनीतही हे दृश्य कैद करता आले नाही. हत्तीची झुंज ही त्यांच्या पद्धतीनेच शांतपणे होऊ द्यावी लागते. त्यात कॅमेऱ्याचे लाइट्स त्यांच्यावर पडले तर हत्ती आणखी बिथरू शकतात आणि मग त्याचे परिणाम काय होतील याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. तेथील प्रशासनाने यामागचे कारण सांगितले तेव्हा ‘असे आपल्याकडे का होत नाही?’ असा प्रश्न सहज मनात आला. इथे जंगलात कुठेही प्लास्टिक व वन्यप्राण्यांना धोकादायक ठरतील अशा वस्तू आढळून येत नाहीत. आणि आढळल्याच तर जिप्सी चालक स्वत: वाहन थांबवून ते उचलतो आणि मगच वाहन पुढे नेतो. ही शिस्तबद्धता आपल्याकडे का जपली जात नाही असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. जंगल सफारीत चित्त्याने जरी आम्हाला हुलकावणी दिली तरी गेंडे, जिराफ, झेब्रा यांचे कळपच्या कळप आणि हिप्पो असे नानाविध प्राणी मात्र पाहायला मिळाले. त्यातही दक्षिण आफ्रिकेतील जंगलाचे वैशिष्टय़ म्हणजे बिग फाइव्ह! यात आफ्रिकन हत्ती, केप बफेलो, सिंह, काळा गेंडा आणि बिबटा यांचा समावेश होतो. जंगल पर्यटन कसे असावे याचा उत्तम नमुना म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या जंगलांतील पर्यटन! पर्यटनाच्या माध्यमातून पैसा कमावणे हा त्यांचाही उद्देश असला तरी त्यासाठी अतिरेक करून वन्यप्राण्यांना माणसाळवले जात नाही.

ट्सिट्सिकम्मा हे स्वदेशी रेन फॉरेस्ट! उंचच उंच झाडांच्या ११६ प्रजाती इथे आहेत. तसेच सातशे वर्षांहून अधिक पुराणी असलेली आऊटइनिक्वा येल्लोवूड झाडे इथे पाहायला मिळतात. या जंगलाचा सुंदर अनुभव घ्यायचा असेल तर सर्वोत्तम मार्ग म्हणजे उंचीवरून  जंगलाची सफर करणे. हवाई मार्गे नव्हे, तर रोप- वेच्या माध्यमातून. जंगल-जमिनीपासून सुमारे ३० मीटर उंचीवरून हे रोप-वे तयार केले आहेत. अतिशय सुरक्षितपणे हार्नेस बांधून पर्यटकांना रोप-वेतून या रेन-फॉरेस्टची भ्रमंती करता येते. या जंगलावरून जेव्हा तुम्ही रोप-वेतून अक्षरश: उडत जात असता तेव्हा एक सुंदर पक्ष्यांचे जग तुम्हाला पाहता येते. सुंदर निसना लॉरीज आणि खूप कष्टांनंतर आढळणारा नरीना ट्रोगॉन या जंगलात दिसून येतात. दक्षिण आफ्रिकेतील आऊटशुर्न परिसरातील जंगलात नैसर्गिक वन्यजीव तर आढळतातच; पण त्याचबरोबर मुंगूस प्रजातीतील मिरकट या छोटय़ाशा प्राण्याला पाहण्याची मजा काही औरच. भल्या पहाटे सूर्याची कोवळी किरणे फाकत असताना विस्तीर्ण पसरलेल्या खडकाळ, रेताड जमिनीतून चार पायांचा हा प्राणी कांगारूसारखा दोन पायांच्या टाचेवर उभा राहतो. आजूबाजूला शत्रू तर नाही ना, याची टेहळणी केल्यानंतर मग त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य हळूहळू जमिनीतून बाहेर येतात. दोन पायांवर त्यांचे उभे राहणे आणि चौफेर फिरणारी मान हा खेळ पाहण्यात तास कसा जातो, हे कळतदेखील नाही. अवघे २५ ते ३५ सेंटीमीटर उंचीचे शरीर असणारा हा प्राणी २० ते ३० च्या संख्येत कळपाने राहतो. सूर्याच्या कोवळ्या किरणांनी त्यांच्या शरीरावरील सोनेरी चमचमणारे केस आपल्याला जागीच खिळवून ठेवतात. दक्षिण आफ्रिकेतील जंगल आजपर्यंत अ‍ॅनिमल प्लॅनेट, नॅशनल जिओग्राफी, डिस्कव्हरी या दूरचित्रवाहिन्यांतूनच अनुभवले होते. ते प्रत्यक्षात अनुभवल्यावर या जंगलांतील खूप साऱ्या आठवणींचा ठेवा सोबत घेऊन येता आलं. आदर्श जंगल आणि वन्यजीव व्यवस्थापन कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण आफ्रिका होय!

– राखी चव्हाण

rakhi.chavhan@expressindia.com