‘आतला कप्पा’ हा कविता शिरोडकर यांचा दुसरा कथासंग्रह त्यांच्या ‘शिशिरपर्ण’ या पहिल्या कथासंग्रहाप्रमाणेच स्त्रीमनाच्या जाणिवेतील आणि नेणिवेतील भावविश्वाचा वेध घेणारा आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक आतला कप्पा असतोच. मुखवटा आणि चेहऱ्याच्या पलीकडे प्रत्येकाचं एक स्वतंत्र जग असतं. त्या जगातील मनोव्यापार फक्त त्यालाच माहीत असतात. समोरच्या माणसाच्या बोलण्यावरून वा वागण्यावरून त्याच्या अंतर्मनात चाललेल्या खळबळीचा थांग त्याच्याशिवाय इतर कुणालाही लागणं कठीणच. त्यातही स्त्रीमनाचा थांग लागणं ही तर फार दूरची गोष्ट. मात्र, या कथासंग्रहात लेखिकेने अनेक कथांमधून व त्यातील प्रसंगांमधून प्रामुख्याने स्त्री-व्यक्तिरेखांच्या तसेच इतर पात्रांच्या मनोविश्वाचा अंतशरेध घेण्याचा केलेला प्रयत्न या कथांना एक वेगळे परिमाण देऊन जातो.
या कथासंग्रहात एकंदर नऊ कथा आहेत. त्यातील एक-दोन कथा वगळता बाकीच्या नेहमीच्या कुटुंबकथांपेक्षा वेगळ्या आहेत. त्या स्त्रीकेंद्रित असल्या तरी कथेतील पात्रं आणि त्यांचं जगणं या साऱ्या अनुभवाकडे त्रयस्थ वृत्तीने पाहतानाच त्यांचं मनोविश्व उलगडण्याचा प्रयत्न लेखिका करते. त्यामुळे प्रत्येक कथेमध्ये त्या व्यक्तिरेखांच्या अंतरंगातील अनेक गूढ आणि चमत्कारिक भासणाऱ्या भावना धक्का देऊन जातात.
‘आतला कप्पा’ या कथेत अगदी लहान वयातील अप्रिय घटनांचा बंद केलेला कप्पा जर एखाद्या घटनेच्या धक्क्याने उघडला तर एखाद्या मनोविकारतज्ज्ञाच्या आयुष्यात केवढी उलथापालथ माजते, ही घटना सुन्न करणारी आहे. ‘आवरण’ या कथेतील मानसीला ट्रेनमध्ये भेटलेली आणि तिची प्रवासातील मैत्रीण झालेली निमिषा हिला चांगलं सासर मिळालेलं असतानाही दु:खात राहायची व दुसऱ्याची सहानुभूती मिळवायची सवय लागते. ती तिच्या मानसिकतेचाच भाग बनते. आणि त्यातूनच ती आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून बसते. हा विचित्र अनुभव ही तिच्या आईकडूनच तिला मिळालेली देणगी आहे हे समजताच मैत्रिणीला धक्का बसतो.
‘कोश’ या कथेत चितारलेली मुलावर पराकोटीचा मालकी हक्क गाजवणाऱ्या आईची शोकांतिकाही तिच्या मनोविकृतीचे अनेक पदर दाखविणारी आहे. मंदबुद्धीच्या बहिणीमुळे उपवर झालेल्या कावेरीला सतत नकार येतात. तरी ती त्या बहिणीचं सारं काही प्रेमाने करत असते. एकदा ती मंदबुद्धीची बहीण शालू गॅलरीतून खाली पडते. पण गादीच्या ट्रकवर पडल्यामुळे वाचते. मात्र, त्याच रात्री ट्रेनमधून पडून कावेरीचा मृत्यू होतो.नियतीच्या एका विचित्र खेळाला तिच्या आईला सामोरं जावं लागतं. या कथेतही आईच्या आणि मोठय़ा बहिणीच्या मनातील घालमेल परिणामकारकतेने व्यक्त करण्याची ताकद लेखिकेच्या संवादशैलीत आहे.
‘एका प्रेमकथेची अखेर’ ही कथा ऑफिसात नवीन आलेल्या सुंदर आणि स्मार्ट मुलीच्या प्रेमात इतरांनी पाडलेल्या एका पात्राची आहे. समज- गैरसमज, ‘मुंगेरीलाल के सपने’ आणि त्यातून शेवटी मिळणारा धक्का हा सारा अनुभव मजेशीर वाटला तरी मानवी स्वभावाचे विविध कंगोरे दाखवणारा आहे. तर होणाऱ्या सुनेला आपली अडचण वाटते आहे हे आधीच ओळखून दूर राहण्याचा निर्णय स्वत:हून घेणारी समंजस सासू ‘पारख’ या कथेत दिसते. ‘लाइमलाइट’ ही कथा आजच्या जगातील स्वार्थी स्पर्धेचे चित्रण करणारी आहे. आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी वाटेल त्या थराला जाणाऱ्या स्त्री-व्यक्तिरेखांची अस्सलता इथे ठाशीवपणे व्यक्त होते. कुणी बेडर, कुणी नेमस्त, तर कुणी परिस्थितीशरण मुली त्यांच्या जगातील शह-काटशहच्या चित्रणासह येथे व्यक्त होताना दिसतात. या कथेतील घटनांना चित्रपटकथेसारखा ‘स्पॅन’ आहे.
प्रत्येक कथा गतिमान आहे. मोजक्या शब्दांत खूप काही व्यक्त करण्याची ताकद वर्णन आणि संवादांत आहे. वाचनीयता हा या कथांचा मोठा गुण आहे. साधी, सोपी भाषा हे या कथांचं वैशिष्टय़ असलं तरी काही चमकदार वाक्येही कृत्रिम न वाटता अगदी सहजपणे येतात. जसं- ‘दु:खाची साय त्यांच्या अंगावर चढत होती. त्याने त्या तृप्त होत होत्या..’ किंवा ‘कामामुळे वेळ आपला शत्रू झालाय’ हे वाक्यही खूप काही सांगून जाते. ‘दूध तापत ठेवल्यावर त्यावर लक्ष ठेवावं लागतं, नाहीतर ते उतू जातं, तसंच जीवनाचं आहे. त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर ते केव्हा उतू गेलं, हे कळत नाही..’ अशी वाक्यं योग्य तो परिणाम साधून जातात. हे परिपक्व जीवनानुभव आहेत. माणसे वाचण्याची, त्यांच्या अंतरंगात डोकावण्याची शक्ती लेखिकेकडे आहे, हे विविध विषयांची हाताळणी आणि त्या विषयाला अनुकूल अशा पद्धतीने व्यक्त करण्याच्या लेखिकेच्या अनुभवावरून लक्षात येते. अनेक पात्रांचे जीवन, त्यांचे नातेसंबंध, त्यांचे स्वभाव, परिस्थितीला सामोरे जाण्याची तऱ्हा, त्यातून उद्भवणाऱ्या घटना, त्यांचे होणारे परिणाम, तसेच त्यांच्या मानसिक जडणघडणीतून, विचार, विकार, आचार यांतून उद्भवणारे प्रसंग आणि त्यातील मानवी भावनांची स्पंदने टिपण्याचा प्रयत्न इथे दिसतो. त्यामुळे कथेचा आकृतिबंध त्या अनुभवविश्वाला न्याय देईल इतकाच सीमित होतो, तर कधी विस्तारतो.
मराठी साहित्यात कौटुंबिक कथा बऱ्याच लिहिल्या जातात, परंतु त्यापलीकडे जाऊन स्त्रीमनाचा परिपूर्ण धांडोळा घेणाऱ्या लेखिका फार कमी आहेत. कविता शिरोडकर या लेखिकेची कथा मात्र त्यादृष्टीने वाटचाल करीत आहे, हे महत्त्वाचे. रहस्यप्रधान कथानकांची आवड लेखिकेला आहे, हे एक-दोन कथांवरून जाणवतं. परंतु माणसाचं आयुष्य हेच एक रहस्यप्रधान, गुंतागुंतीचं रसायन असतं, हे लक्षात आलं की तो दोष न ठरता अनुभवाचाच एक भाग ठरतो. स्त्रीची घुसमट वेगळ्या तऱ्हेने व्यक्त करणाऱ्या या कथा म्हणूनच अस्सल वाटतात.
‘आतला कप्पा’- कविता शिरोडकर,
संधिकाल प्रकाशन,
पृष्ठे : १३६, किंमत : १४० रुपये.

भास्कर सहस्रबुद्धे