प्रमोद मुनघाटे

‘हिटलरांना माणसाचीच तोंडे असतात

हुबेहूब.

किंवा असेही म्हणू शकतो आपण

की फसवणुकीला रान मोकळे करून देणारे

ते मुखवटे असतात..

एक खरे, की प्रत्येक हिटलराला

दुतोंडी साप असण्याचा गौरवच वाटतो.

तरीही

लोकांना विद्वेषाची सवय होत नाही

हा मोठाच दिलासा आहे.’

..यशवंत मनोहर यांच्या ‘तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता’ या नव्या संग्रहातील ‘दिलासा’ ही कविता. मनोहर यांनी या संग्रहातील कवितांतून वर्तमानकालीन राजकीय व्यवस्थेतील दहशत आणि सामाजिक वातावरणातील विद्वेषावर थेट प्रहार केला आहे. मनोहर हे समकालीन मराठीतील एक प्रमुख आणि दलित कवितेच्या पहिल्या पिढीतील कवी. ‘वेदना’, ‘विद्रोह’ आणि ‘नकार’ ही प्रारंभी दलित साहित्याची त्रिसूत्री होती. पुढे स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या मूल्यांचा स्वीकार या साहित्याने केला. सातत्याने पुढे जाऊन, नवनवीन आव्हाने स्वीकारून विषमताविहीन समाजव्यवस्थेची निर्मिती हे ध्येय या लेखक-कवींनी उराशी बाळगलेले दिसते. मराठी साहित्यात कलावादाची व निखळ सौंदर्यवादी साहित्य व्यवहाराची दीर्घ परंपरा आहे. या परंपरेस आव्हान देऊन सामाजिक बांधिलकीचे परिमाण मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य दलित साहित्याने केले आहे.

आजच्या कवितेपुढचे आव्हान मात्र अजूनच वेगळे आहे. बाजारीकरणाबरोबरच हिंसक राष्ट्रवाद आणि लोकशाहीला नख लावू पाहणारी प्रच्छन्न धार्मिक हुकूमशाही हे एकूणच वर्तमान मानवी अस्तित्वापुढचे प्रश्न आहेत. त्यांना वळसा घालून कोणतीच कविता पुढे जाऊ शकत नाही. म्हणूनच मनोहरांच्या नव्या कवितासंग्रहाचे मुख्य सूत्र हेच आहे.

मनोहरांच्या कवितेत भोवतालच्या जातीय/ वर्णीय विषमता, हिंसा आणि अन्याय यांचा वारंवार विदारक अनुभव व्यक्त होत असला तरी माणसाच्या आत्मसन्मानाच्या लढाईवर आणि सनातन बंधुत्वावर त्यांचा प्रगाढ विश्वास दिसतो. त्यांनी ‘बंधो’ असे संबोधन वापरून लिहिलेल्या कवितामालिकांचा आशय हाच आहे..

‘आपण माणसे आहोत

आपण मातीतून उगवलो

झाडांसारखे.

आपण आहोत सार्वभौम

अंतराळासारखे..’

किंवा-

‘प्रश्न माणसांना जिवंत करतात.

माणसांच्या जिवंतपणाला

प्रश्नामुळे येतात नवनवे धुमारे..’

अथवा-

‘ज्यांच्या मनात प्रश्न उगवत नाही

त्यांची मने कोमेजून जातात..’

अशा प्रकारच्या संदेशवजा कविता ‘तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता’ या संग्रहाशी सुसंगतच आहेत. मानवता, न्याय व समतेसाठी संघर्ष आणि विवेकवाद, बुद्धिप्रामाण्यवाद यांचा कुणाला तरी उद्देशून केला जाणारा संदेश हेही या कवितांचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे त्यांत अनुभवापेक्षा सुविचारदर्शक विधाने अधिक प्रमाणात येतात.

‘मृत्यूतून झेपावणारा रोहित नावाचा फिनिक्स’ ही आणखी एक दीर्घ कवितामालिका या संग्रहात आहे. अलीकडच्या हिंस्र सांस्कृतिक राष्ट्रवादी आक्रमणाचा बळी म्हणजे हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या विद्यार्थ्यांने केलेली आत्महत्या. सनातनी, धर्माध व वर्णविद्वेषी राजकारणाचा निषेध म्हणून मनोहरांनी ‘रोहित’ला संबोधून मांडलेले गाऱ्हाणे हे पुरोगामी-लोकशाहीवादी चळवळीचा एक भाग आहे. अत्यंत दाहक अशा शब्दांत त्यांनी आवाहन केले आहे. रोहितच्या आत्महत्येच्या निमित्ताने ईहवादी, परिवर्तनवादी विचारांची अनेक परिमाणे ते गुंफतात. धार्मिक असहिष्णुतेच्या विषवल्लींचा प्राचीन पुराण-इतिहासात जाऊन ते शोध घेताना दिसतात.

‘रोहित,

तुझी चूक एकच होती-

‘माणूस असणं हा माझा

जन्मसिद्ध अधिकार आहे

आणि तो मी मिळवीनच’

असं तू म्हणालास.

‘मी किडाच राहीन,

मी गुलामच राहीन सांगकाम्या’

असं म्हणाला असतास

तर सन्मान केला असता

गुलामीच्या सर्व परंपरांनी तुझा..’

किंवा-

‘रोहित,

तू दार उघडायला गेलास

जीवनाचं

आतून बंद केलेलं.

तू तोडायला गेलास तुरुंग

माणसांभोवतीच्या

कुविचारांचे..’

‘उत्थानगुंफा’ या पहिल्या संग्रहातील मनोहरांच्या कवितेचा बाज वेगळा आहे. विद्रोहाच्या तीव्र संवेदना संयत, पण अनवट शब्दांत व्यक्त करणारी त्यांची शैली समकालीन विद्रोही कवींमध्ये वेगळ्या सौंदर्याने उजळून निघालेली दिसते. पुढच्या ‘मूर्तिभंजन’सारख्या संग्रहातही ही शब्दकळा त्यांच्या काव्याचे शक्तिस्थळ झालेली आहे. पण ‘जीवनायन’पासून या पाचव्या संग्रहातील कवितेचे स्वरूप काहीसे बदललेले दिसते. अर्थात भोवतालचे वास्तव व प्रश्न बदलल्याने त्यांनी जाणीवपूर्वक कविता तशी घडवली असेही म्हणता येईल.

याच संग्रहात ‘कवितेभोवती हिंस्र दिवसांचा गराडा’ या कवितामालिकेत ते म्हणतात,

‘कवितेभोवती इतके हिंस्र दिवस

कधीच जमा झाले नव्हते.

कवितेने आता

बंदुकींना प्रेम शिकविण्याचा

निश्चय करावा.

द्वेषाची आग विझते

फक्त करुणेने.

एका दाण्यातून हजार दाणे

उगवतात

तसे प्रेमातूनच मोहरून येते

प्रेमाचे असीम अंतराळ..’

सारांश, मनोहरांच्या कवितेचे हे नवे वळण त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारलेले दिसते. त्यांनी स्वत: घडवलेल्या ‘आंबेडकरवादी साहित्यशास्त्रा’शी ते सुसंगतच आहे. आपल्या भोवतालची माणसे, त्यांचे दु:ख, त्यांचे प्रश्न, वर्तमान सामाजिक व राजकीय शोषणाचे तुरुंग यांतून मुक्तता करण्यासाठी त्यांना त्यांचे शब्द ही मौल्यवान कृती वाटते. त्यांच्या ईहवादी सौंदर्यशास्त्राचे तेच कृतिशील उपयोजन आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास दिसतो. ‘कविता होत जाईल आता क्रांतीविधान’, ‘कवितेने व्हायला हवे आता बुद्धाचे आणि सॉक्रेटिसाचे शेवटचे भाषण’, ‘कविता मुकी होत नसते, ती होऊ देत नाही स्वतला शहामृग’ किंवा ‘कविता हा जगाच्याच वास्तवाचा भ्रमार्थ असतो.. ती असते समीक्षा सर्व समीक्षांची!’ अशा विधानांमधून मनोहरांची कवितेविषयीची भूमिका या संग्रहातून स्पष्ट होते.

यशवंत मनोहरांच्या आत्यंतिक समाजाभिमुख भूमिकेतून त्यांच्या अनुभवास येणारे वर्तमान वास्तव किती भीषण आहे, यावर भाष्य करणाऱ्या कविता हा या संग्रहाचा एक मोठा भाग आहे. कवितेसाठी आता चांगले दिवस उरले नाहीत असे त्यांना वाटते. तिला ‘आनंदी आनंद गडे’ म्हणणे आता जमत नाही. आजचे वर्तमान जणू एखाद्या ‘कॉन्सन्ट्रेशन कॅम्प’सारखे झाले असून ‘परिवर्तन’ या शब्दाचा उच्चारही गुन्हा ठरू लागला आहे, असे ते म्हणतात. म्हणूनच त्यांना ‘तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता’ लिहायची आहे, हेही स्पष्ट होते.

वांशिक दहशतवाद आणि धर्माध राष्ट्रवाद हा आजच्या सत्तेचा खरा चेहरा कसा आहे, हे ते ‘सत्तेचा चेहरा आणि मुखवटा’ या शीर्षकाच्या कवितेत सांगतात-

‘सत्ता जिभा कापत नाही

मेंदू कापते लोकांचे!

जे जगत नाहीत

त्यांना प्रश्नाची गरज नसते.

सत्ता न जगणाऱ्या धडांची निर्मिती करते.’

अशा रीतीने माणसांचे माणूसपण घालवून त्यांचे यंत्रमानव केले की प्रश्नच उरत नाहीत. मनोहर लिहितात..

‘माणसे पांगळी झाली की

गोठत जाते लोकशाही

माणसे मुकी झाली की

सार्वभौम होते हुकूमशाही..’

या सर्व पाश्र्वभूमीवर यशवंत मनोहर थेटपणे प्रहार करतात. ‘यापुढली लढाई’ या कवितेत ते म्हणतात..

‘पाकिस्तान विरुद्ध हिंदुस्थान

अशी असणार नाही

यापुढली लढाई,

यापुढल्या लढाईचे नाव असेल

हिंदुस्थान विरुद्ध भारत.

हिंदुस्थान विरुद्ध संविधानराष्ट्र,

फॅसिझम विरुद्ध लोकशाही..’

थोडक्यात, मानवतावादी मूल्यांना बंदिस्त करू पाहणारे तुरुंग तोडण्यासाठी आता कवितेने उठाव केला पाहिजे, या जाणिवेतून लिहिलेल्या मनोहरांच्या कविता नवे समुचित वळण घेणाऱ्या आहेत.

‘तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता’

– यशवंत मनोहर,

मौज प्रकाशन, मुंबई,

पृष्ठे- ११८, मूल्य- २०० रुपये.

pramodmunghate304@gmail.com