हरिहर कुंभोजकर

‘‘इंग्रज मोठा डोकेबाज. त्यानं घोडय़ाशिवाय गाडी चालवली,’’ असे १८५३ साली सुरू झालेल्या पहिल्या आगगाडीचे वर्णन वाचायला मिळते. आपल्या देशात आधुनिक काळात विज्ञान आयात झाले; त्याची निर्मिती झाली नाही. त्याचा एक दुष्परिणाम असा झाला की आपल्याकडे वैज्ञानिक उपकरणे आली; पण वैज्ञानिक दृष्टी फारशी आली  नाही. आजही या परिस्थितीत बदल होण्याची फारशी चिन्हे दिसत नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात काही फरक पडत आहे, पण तो मुख्यत्वे संख्यात्मक आहे; गुणात्मक नाही. याचे प्रमुख कारण- हजारो वष्रे ज्ञानभाषेची लोकभाषेपासून झालेली फारकत. आजही विज्ञानाचे शिक्षण आपण मुख्यत्वे इंग्रजीतच देतो. मातृभाषेत नाही. त्यामुळे बहुसंख्य समाज वैज्ञानिकदृष्टी निर्माण होण्याच्या प्रक्रियेपासून दूरच राहतो. अशा स्थितीत आधुनिक विज्ञानासंबंधी अद्यावत माहिती लोकांच्या पुढे त्यांच्या भाषेत पोचवणे फार महत्त्वाचे ठरते. या महत्त्वाच्या कामाला समर्थपणे हातभार लावल्याबद्दल लेखक डॉ. विश्राम मेहता आणि ग्रंथाली प्रकाशन अभिनंदनास पात्र आहेत.

Yavatmal Washim Lok Sabha Constituency, Fears of declining Low Voting, Wedding Season, Rising Temperatures, yavatmal news, washim news, lok sabha 2024, election 2024, marathi news,
वाढते तापमान, लग्नसराई, अवकाळीमुळे मतदानात घट होण्याची भीती; राजकीय पक्षांसमोर टक्का वाढविण्याचे आव्हान
Lakshmi Narayan Yog
Lakshmi Narayan Yog : लक्ष्मीनारायण योग तयार झाल्याने ‘या’ राशींना मिळणार छप्परफाड पैसा, अचानक होणार धनलाभ
Bird Flu Outbreak Signs & Symptoms, Treatment
बर्ड फ्लूचा धोका वाढला! चिकन खाण्याआधी ‘ही’ काळजी घ्याच; डॉक्टरांनी सांगितली आजाराची लक्षणे व उपचार
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

‘.. परी जीनरूपे उरावे’ या सुमारे पावणेतीनशे पानांच्या पुस्तकात नऊ प्रकरणे आहेत. त्यातील पहिले- ‘मुंगीला मारणे अनतिक आहे काय?’ सर्वात लहान, प्रकरण अडीच पानांचे आहे. आणि आठवे ‘चार अक्षरांची सजीव राज्यघटना’ सर्वात मोठे म्हणजे सुमारे साठ पानांचे आहे. पण कोठेही लेखकाने क्लिष्टता येऊ दिलेली नाही.

पुस्तकात चर्चा केलेले प्रश्न मोठे विचारात टाकणारे आहेत. मानवाचे साथीच्या रोगांपासून रक्षण वैद्यकशास्त्राने केले की उत्क्रांतीतून निर्माण झालेल्या जेनेटिक्सने? (लक्षात घ्या, लेखक व्यवसायाने  डॉक्टर आहेत.) मधुमेहासारखे विकार हे शरीरातील विकृती म्हणायची की अतिशय खडतर परिस्थितीत मानवजात टिकवण्यासाठी केलेली निसर्गाची योजना? सामाजिक जाणीव, देशप्रेम.. इत्यादी संस्कारातून निर्माण होते की उपजत असते? नर-मादीमध्ये आकर्षणातून  निसर्गाला केवळ प्रजननच साधायचे आहे की आणखी काही? आणि शेवटी, भविष्यकालीन वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जीन आम्हाला घडवतात तसे आम्ही त्यांना घडवू शकतो का? हे आणि यांसारख्या अनेक प्रश्नांची चर्चा पुस्तकभर पसरली आहे.  ज्यांना केवळ मनोरंजनासाठी पुस्तक वाचायचे आहे त्यांचे सात्त्विक मनोरंजन होईल असेही पुस्तकात बरेच काही आहे.

पुस्तकात अनेक किस्से आहेत. चौदाव्या शतकात युरोपात आलेल्या महाभयंकर प्लेगच्या साथीचे वर्णन मुळातूनच वाचले पाहिजे. प्लेगमुळे अडीच कोटी लोक मृत्युमुखी पडले. त्या काळात युरोपची लोकसंख्या पाचकोटीपेक्षा जास्त नसावी हे लक्षात घेतले तर मृत्यूच्या प्रलयंकारी  तांडवाची कल्पना यावी. पण या प्रलयाचा स्पर्श ज्यू लोकांना फारसा झाला नाही. याचे शास्त्रीय कारण आज कळते. पण तेव्हा लक्षात येणे अशक्य होते. ते कळले असते तर प्लेग एवढा पसरलाच नसता. त्यामुळे ही ज्यूंचीच करणी आहे असे समजून त्यांच्यावर हल्ले झाले. त्यात अनेक ज्यू मेले. भारतातील ब्रिटिश काळात झालेल्या प्लेगचाही त्यात उल्लेख आहे. मलेरिया आणि जेनेटिक्स, वनस्पतीमधील समाजव्यवस्था, मधमाश्यांतील जातिव्यवस्था, मनुष्य आणि चिंपांझीसारखे मानवाशी साधम्र्य असलेले प्राणी अन्न सामुदायिकरीत्या वाटून घेतात आणि विरुद्ध िलगाच्या जोडीदाराबाबत मालकीहक्क गाजवतात याचे जीवशास्त्रीय कारण.. यांसारख्या अनेक गोष्टींची जेनेटिक्सच्या दृष्टिकोनातून केलेली मीमांसा हे पुस्तकाचे वैशिष्टय़ ठरावे. पुस्तक एकाच वेळी भरपूर माहिती देते आणि विचारही करायला लावते. किंबहुना वाचकाला विचारप्रवृत्त करणे हा पुस्तकाचा उद्देशच आहे. त्यामुळे लेखक आपली मते कोठेही नि:संदिग्धपणे मांडत नाही. पण माहितीच इतकी प्रक्षोभक आहे की ती वाचकाला विचार करायला भाग पाडते.

लेखकाची भूमिका वाचकाला माहिती देणाऱ्याची आहे,  प्रचारकाची नाही. तरीही काही वेळा शब्दयोजना अधिक काटेकोर करणे जरूरीचे होते असे वाटते. उदाहरणार्थ, मधमाश्यांची जातिव्यवस्था. मधमाश्यांची  समाजव्यवस्था आदर्श आहे असे लेखकाने म्हटले आहे. ही समाजव्यवस्था जन्माधिष्ठित जातिव्यवस्था आहे. ती त्या अर्थाने परिपूर्ण (ढी१ऋीू३) आहे. पण परिपूर्णतेचाच दुसरा अर्थ प्रगतीची दारे बंद झाली असा आहे. जी व्यवस्था वैयक्तिक प्रगतीची दारे बंद करते तिला आदर्श कसे म्हणता येईल? मानवी स्वभावाच्या उत्क्रांतीसंबंधी लिहिताना स्त्री-पुरुषांच्या स्वभावातील स्वाभाविक फरकासंबंधी लेखक म्हणतात, पुरुष स्वभावत:च आक्रमक, महत्त्वाकांक्षी आणि सत्ता गाजवणारा असतो. आणि स्त्री प्रेमळ, सहनशील, आणि तडजोड करणारी असते. सारख्याच प्रकारे वाढवलेले जुळे मुलगा आणि मुलगी यांच्यासमोर खेळणी ठेवली तर मुले बंदुका, तलवारी, कार निवडतात, तर मुली बाहुल्या निवडतात. संस्काराने यात काही फरक पडतो काय, हे पाहण्यासाठी तीन पिढय़ांचे निरीक्षण केले आणि हा प्रयोग सोडून देण्यात आला. हे एक असे क्षेत्र आहे की ज्यामधील संशोधन आíथक, राजकीय, सामाजिक आणि मानसिक क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात कोणतेही मत निश्चित करण्यापूर्वी बरेच संशोधन आवश्यक वाटते. लेखक शेवटी एपिजेनेटिक्सकडेही वळतो. ‘ऌ४ेंल्लीस्र््रॠील्ले स्र्१्नीू३’ पूर्ण झाल्यानंतर जगाचे स्वरूप काय असेल ते सांगणे कठीण आहे. पण ते सध्याच्या जगापेक्षा वेगळं असेल हे नक्की.

जेनेटिक्स संबंधीच्या अनेक प्रकारच्या ऐतिहासिक, सामाजिक, तात्त्विक, वैज्ञानिक माहितींनी हे पुस्तक ओतप्रोत भरले आहे. त्यामुळे ते निश्चितच संग्रा झाले आहे. असे असले तरी एका बाबतीत ते गोंधळात टाकणारे आहे. उत्क्रांती झाली की केली? पुस्तकात अनेक ठिकाणी ‘उत्क्रांती केली’, ‘उत्क्रांतीचा हा हेतू होता’ अशा आशयाची वाक्ये वरचेवर येतात. उत्क्रांती केली असेल तर ती करणारा कोण? त्याने मग हे सारे का केले? त्याचा हेतू काय? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न आपल्याला अध्यात्माकडे घेऊन जातात. पुस्तकाचे शीर्षकसुद्धा त्यादृष्टीने गोंधळात टाकणारे आहे. ‘मरावे परी कीíतरूपे उरावे’ या रामदासांच्या उक्तीवरून शीर्षक बेतले आहे हे उघड आहे. पण तेथे रामदासांना माणसाने (सु)कीर्ती वाढेल असे काम करावे दुष्कीर्ती मिळवू नये, असा उपदेश करायचा आहे.  येथे जीनरूपे उरायचे म्हणजे आम्ही काय करायचे? उलटपक्षी जीन्सच कोणत्याही परिस्थितीत आपण अमर राहिले पाहिजे अशा तऱ्हेने वागत असतात. येथे आपण करण्यासारखे काहीच नसते.

पुस्तकातील चित्रांनी आणि व्यंगचित्रांनी पुस्तकाची रंजकता वाढवली आहे. पुस्तकाला डॉ. राणी बंग यांची प्रस्तावना आहे आणि प्रसिद्ध पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी ते पुरस्कृत केले आहे.  पुस्तकाची बांधणी आणि मुखपृष्ठ  ग्रंथालीच्या लौकिकाला साजेसे आहे.

परी जीनरूपे उरावे’ – डॉ. विश्राम मेहता, ग्रंथाली प्रकाशन,

  • पृष्ठे- ३२४, मूल्य -४०० रुपये.