अ‍ॅम्बेसेडर ही भारतीय ऑटोमोबाइल विश्वाचा चेहरा झाली होती. मागे बसायला ऐसपस जागा, गाडीच्या बॉडी डिझाइनमध्ये असलेला डौल यामुळे ही गाडी राजकारण्यांची आवडती गाडी झाली. त्यानंतरच्या काळात भारतीय राजकारण अन् राजकारणी या गाडीशिवाय हलतच नसत. ही गाडी थोरामोठय़ांची ‘स्टेटस सिम्बॉल’ झाली. विविध रंग-रूपांत या गाडीने भारतीयांच्या मनात आपले मानाचे स्थान पक्के केले होते. अलीकडेच अ‍ॅम्बेसेडर ब्रँड हा प्युजो एस. ए. या फ्रेंच कंपनीने ऐंशी कोटी रुपयांना विकत घेतला. त्यानिमित्ताने..

नुकतीच बातमी वाचली, की अ‍ॅम्बेसेडर ब्रँड हा प्युजो एस. ए. या फ्रेंच कंपनीने ऐंशी कोटी रुपयांना विकत घेतला.. अन् अ‍ॅम्बेसेडर गाडीविषयीच्या असंख्य आठवणी दाटून आल्या..

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
D Gukesh
१७ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने रचला इतिहास, विश्वनाथन आनंदनंतर ‘ही’ कामगिरी करणारा दुसरा भारतीय
America Police
अमेरिकेत चाललंय काय? आणखी एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू, वाणिज्य दूतावासाने दिली माहिती
Tata Altroz Racer to launch in coming weeks
मारुती, महिंद्रा, ह्युंदाईची उडाली झोप, टाटा ‘या’ हॅचबॅक कारला देशात आणतेय स्पोर्टी अवतारात; कधी होणार विक्री?

गाडी आणि गाडीची दुरुस्ती, गॅरेज या विषयाने पछाडले होते त्या काळात डोळ्यासमोर तीनच प्रवासी वाहने होती- हिंदुस्थान मोटर्सची अ‍ॅम्बेसेडर, प्रीमिअर ऑटोमोबाइल्सची पद्मिनी आणि मिहद्रा जीप. यातील जीप बहुधा पोलिसांची किंवा कुटुंबनियोजनाची जाहिरात करणारी सरकारी गाडी; प्रीमिअर पद्मिनी एखाद्या डॉक्टर-वकिलाची किंवा मुंबईतील काळी-पिवळी टॅक्सी असे समीकरण डोक्यात फिट्ट बसले होते. परंतु अ‍ॅम्बेसेडर मात्र पांढरीशुभ्र, डौलदार आणि वर लाल दिवा असेल तर अगदी तिच्या मालकासारखीच भारदस्त आणि तोऱ्यातली वाटायची.

वाढत्या वयासोबत गाडीचे आणि गाडीदुरुस्तीचे वेडही वाढतच गेले अन् जिज्ञासाही वाढली. मग त्यासंबंधीचे वाचनही वाढत गेले. गाडीची दुरुस्ती शिकण्याकरता प्रत्यक्ष गॅरेजमध्ये काम शिकायला लागलो, तेही अ‍ॅम्बेसेडरवरच.

सी. के. बिर्ला ग्रुप स्वातंत्र्यपूर्व काळापासून गुजरातमधील पोर्ट ओखामध्ये मॉरीस मोटर्स या ब्रिटिश गाडय़ांचे असेम्बलिंग करत असे. १९५६-५७ च्या आसपास याच कंपनीने कलकत्त्याच्या जवळ उत्तरा पाडा भागात ‘हिंदुस्थान मोटर्स’ नावाने गाडय़ा बनविण्याचा कारखाना सुरू केला. प्रथमत: ते लँड मास्टर नावाची गाडी तिथे बनवत असत. १९५७ सालच्या आसपास या कंपनीने मॉरीस ऑक्सफर्ड या गाडीचे उत्पादन सुरू केले. त्या गाडीत १५०० सीसीचे चार सिलेंडर असलेले पेट्रोल इंजिन होते. १९५७ सालातील मॉडेलच्या मॉरीस ऑक्सफर्ड सीरिज-३ या गाडीच्या मूळ रचनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. जसे की- गाडीच्या अर्धवर्तुळाकार असणाऱ्या मागच्या भागात (Quarter Panels) टेल फिन्स जोडण्यात आल्या, बॉनेटच्या आकारात बदल करण्यात आला, तसेच मूळचे साइड व्हॉल्व्ह असलेले इंजिन हेड बदलून त्या जागी ओव्हरहेड व्हॉल्व्ह (OHV) असलेले इंजिन हेड बसवण्यात आले. नवीन स्टेअिरग व्हील व लाकडी डॅश बोर्डसहित ही गाडी वितरित करण्यात आली. गाडीच्या या सुधारित आवृत्तीला नाव देण्यात आले- ‘अ‍ॅम्बेसेडर मार्क १.’ आणि त्यावर बॅच चिकटवण्यात आला- ‘winged OHV’!

खरं तर त्या काळापासूनच अ‍ॅम्बेसेडर ही भारतीय ऑटोमोबाइल विश्वाचा चेहरा झाली होती. मागे बसायला ऐसपस जागा, गाडीच्या बॉडी डिझाइनमध्ये असलेला डौल यामुळे ही गाडी राजकारण्यांची आवडती गाडी झाली. त्यानंतरच्या काळात भारतीय राजकारण अन् राजकारणी या गाडीशिवाय हलतच नसत. ही गाडी थोरामोठय़ांची ‘स्टेटस सिम्बॉल’ झाली. विविध रंग-रूपांत या गाडीने भारतीयांच्या मनात आपले मानाचे स्थान पक्के केले होते. भारतातल्या रस्त्यांची ती सम्राज्ञी झाली. तिने फार वैभवाचा काळ पाहिला. संगीत नाटकांच्या भरभराटीच्या आणि वैभवाच्या काळात ज्याप्रमाणे नाटकातील नायिका भरजरी शालू, पठणी, शेला ल्यालेली भामिनी, शकुंतला, सुभद्रा, देवयानी किंवा शारदा बनत असे, अगदी तसेच वैभव या गाडीलाही प्राप्त झाले होते. राजकारण्यांची शुभ्र- वस्त्रांकित लाल दिव्यांचा तन्मणी परिधान केलेली सम्राज्ञी, मिलिटरीच्या जनरलची हिरवा शालू ल्यालेली, नेव्हीच्या अ‍ॅडमिरलची काळी चंद्रकळा नेसलेली, तर पोलीस कमिशनर आणि अन्य उच्चपदस्थांची धवल वस्त्रांकित सहचारिणी अशा रूपांत ती वावरली.

एस. टी. महामंडळाच्या ताफ्यात तेव्हा एशियाड बसेस आलेल्या नव्हत्या. त्याकाळी  मुंबई-पुणे टॅक्सी सíव्हसला अ‍ॅम्बेसेडरशिवाय पर्यायच नव्हता. ‘मोनोकोक्यू स्ट्रक्चर’ (Monocoque Structure- चासिस आणि बॉडी एकत्रित) बांधणीची ही गाडी बसायला आरामदायी होती. स्टेअिरग कॉलममध्ये गिअर लिव्हर असल्याने चालकाच्या शेजारी बसायला मुबलक जागा या गाडीत होती. प्रामुख्याने पगारी चालकाने चालवायची आणि मालकाने आरामात मागे बसण्यासाठी म्हणून ही गाडी प्रसिद्ध होती. अ‍ॅम्बेसेडरचे पोर्टर नावाचे स्टेशनवॅगन प्रकारातले आणि कमíशअल (मालवाहू) प्रकारचे मॉडेलदेखील काही काळ उपलब्ध होते.

परंतु काळाची बदलणारी पावले या गाडीच्या निर्मात्यांनी ओळखली नाहीत. अन् जसे बोलपट आल्यानंतर जी अवस्था संगीत नाटक व त्यातल्या नाटय़-क लावंतांची झाली, तीच या गाडीचीही झाली.

भारतीय वाहन उद्योगात त्यावेळी काही प्रतिष्ठित घराण्यांची मक्तेदारी निर्माण झाली होती. स्पर्धा अशी नव्हतीच. ग्राहकाला गृहीत धरले गेले होते. उत्पादनाचा दर्जा सुमार होता. त्यात नावीन्य नव्हते. आणि सरकारदरबारीही तेव्हा ‘परमिट राज’ अस्तित्वात होते. गाडी खरेदी करण्याकरिता ग्राहकाला नंबर लावून दोन-चार महिने वाट बघावी लागत असे. ग्राहक स्वतचे पसे खर्चूनही याचक झालेला होता. शिवाय, गाडीच्या विक्रीपश्चात खात्रीदायक अशी सेवाही उपलब्ध करून दिली जात नव्हती.

नेमके त्याचवेळी ‘संजय उवाच’ म्हणून का असेना, प्रवासी वाहनक्षेत्रात नवीन काही घडत होते. ग्राहक केंद्रस्थानी मानून मध्यमवर्गाला परवडेल अशी जपानी तंत्रज्ञानावर आधारलेली छोटेखानी, वातानुकूलित, एक लिटर पेट्रोलमध्ये १५ किलोमीटरहून अधिक धावणारी आणि अ‍ॅम्बेसेडरहून कमी किंमत असलेली ‘मारुती-८००’ गाडी बाजारात आली. तिने विक्री व विक्रीपश्चात सेवेचे जाळे निर्माण करायला सुरुवात केली. आणि तिथूनच अ‍ॅम्बेसेडरची लोकप्रियता ओसरू लागली.

भारतीय वाहनव्यवस्थेचे तेव्हापासून उत्तरायण सुरू झाले. उत्तरायण म्हणजे मारुती सुझुकीचा कारखाना उत्तरेत गुरगाव, हरयाणा येथे सुरू झाला होता. अनेक परदेशी वाहननिर्माते भारतात पाय रोवू लागले होते. या स्पध्रेत टिकून राहण्यासाठी अ‍ॅम्बेसेडरमध्ये प्रथम बी. एम. सी. कंपनीचे १५०० सीसीचे डिझेल इंजिन बसवण्यात आले. ‘भारतातली पहिली डिझेल इंजिन असलेली कार’ हा मानही या गाडीने मिळवला खरा; पण या बी. एम. सी. कंपनीच्या इंजिनाची कामगिरीही सुमारच होती. मात्र, पेट्रोल व डिझेल इंधनाच्या किमतीतल्या मोठय़ा तफावतीचा फायदा ग्राहकांना होत होता. पुढे जाऊन अ‍ॅम्बेसेडरने १८०० सीसीचे इसुझू इंजिन आपल्या गाडीत बसवले. बकेट सीट्स लावल्या. पूर्वी फक्त व्ही. आय. पी. गाडीत बसवत असलेले फ्लोअर शिफ्ट पद्धतीचे गिअर लिव्हर आणि पॉवर स्टेअिरग सर्वसामान्यांच्या अ‍ॅम्बेसेडर गाडीतही बसवले जाऊ लागले. २०१३ च्या आसपास बीएस-४ हे प्रदूषण नियंत्रणात असल्याचे मानांकन असलेले इंजिन आणि ५ स्पीड गिअर बॉक्स, नवीन बंपर्स, हेडलाइट व प्लास्टिक डॅश- बोर्ड बसवण्यात आला. पण बॉडीच्या मूळ स्वरूपात मात्र काहीही मोठा बदल केला गेला नाही. अ‍ॅम्बेसेडरमध्ये केलेल्या या नवीन बदलांमुळे बाजारातील ओसरणारी तिची लोकप्रियता मात्र या गाडीचे निर्माते थांबवू शकले नाहीत. २०१३-१४ या वर्षांत िहदुस्थान मोटर्सने २५०० गाडय़ा सरकारी कार्यालये आणि टॅक्सी संघटनांसाठी दिल्ली व कोलकाता येथे विकल्या आणि उत्पादन थांबवले. अशा रीतीने पाच दशकांहून अधिक काळ चाललेल्या ‘अ‍ॅम्बेसेडर युगा’चा अस्त झाला.

सध्या जगातले सर्व अग्रगण्य आणि नामांकित ब्रँड आधुनिक तंत्रज्ञान आणि सुखसोयींनी युक्त अशी आपली नवनवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत सादर करीत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात आपली आलिशान वाहनविक्री दालने, तसेच सुस्थापित विक्रीपश्चात सेवा उपलब्ध करून देत आहेत. तरीदेखील भारतीयांच्या मनातील आठवणींचा एक कोपरा अ‍ॅम्बेसेडरने व्यापलेला आहेच. अ‍ॅम्बेसेडरचे युग संपले तरी तिची ‘यादों किबारात’ मात्र आजही भारतीयांच्या मनात कायम आहे.

मिलिंद गांगल gangalmotors2008@gmail.com