‘लोकरंग’ (१६ एप्रिल) मधील प्रा. डॉ. मिलिंद अत्रे लिखित ‘अभियंते पैशाला पासरी’ या लेखात अभियांत्रिकी शिक्षणातील सांप्रत स्थितीचा आढावा घेण्यात आला. या लेखात मांडलेल्या समस्यांवर उपाय सुचवणारा लेख..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभियांत्रिकी शिक्षणातल्या समस्या या बहुपेडी आहेत. पण त्यामागचे मुख्य कारण शोधायचे असेल, तर आजचे अभियांत्रिकी अभ्यासक्रम कुठे कमी पडता आहेत का, याचा शोध घेण्याबरोबरच मुळात ते अभ्यासक्रम शिकवायची पद्धत किती योग्य आहे, याचाही विचार करणे गरजेचे आहे. शैक्षणिक संस्थांचे, तिथल्या शिक्षण पद्धतींचे आणि विद्यार्थ्यांच्या एकूणच विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी अ. भा. तंत्रशिक्षण परिषदेने १९९४ साली ‘एआयसीटीई’ कायद्याच्या कलम १० (यू) अंतर्गत ‘एनबीए’ म्हणजे नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रिडिटेशन अर्थात, राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळाची स्थापना केली. त्याच वर्षी विद्यापीठ अनुदान आयोगानेही बंगळूरू इथे उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांचा शैक्षणिक दर्जा तपासून त्यांना अधिस्वीकृती देण्यासाठी ‘नॅक’ अर्थात, राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेची स्थापना केली. याव्यतिरिक्त अमेरिकेच्या ‘अ‍ॅबेट’ अर्थात, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान मंडळातर्फेही अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांना त्यांच्या शैक्षणिक दर्जाचे मूल्यांकन करून आंतरराष्ट्रीय अधिस्वीकृती दिली जाते. यापकी अधिस्वीकृतीसाठी अ‍ॅबेटकडे अर्ज करणाऱ्या संस्थांची संख्या एनबीए आणि नॅककडे अर्ज करणाऱ्या संस्थांच्या तुलनेत कमी असली, तरी इतक्या संस्थांचे देशातल्या अभियांत्रिकी शिक्षणाकडे लक्ष असूनही देशातले ६० टक्के पदवीधर अभियंते बेरोजगार आहेत हे चित्र का पुढे येत आहे, याचा विचार होणे गरजेचे आहे. या अधिस्वीकृती प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या विकासाचे जे मूल्यांकन केले जाते, त्यासाठी प्रामुख्याने ‘आऊटकम बेस्ड’ अर्थात, परिणामाधारित पद्धतीचा अवलंब केला जातो. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमातून कोणते परिणाम साधले जायला हवेत किंवा कोणती कौशल्ये त्यांच्यात विकसित व्हायला हवीत, ते प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला नमूद केलेले असते. आणि ते तपासण्याकरता विविध स्तरांवरच्या काठिण्याचे अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न ‘इंटरनल कण्टिन्युअस अ‍ॅसेसमेंट’- अंतर्गत निरंतर मूल्यांकनांतर्गत त्यांना विचारले जातात. यामध्ये मिळणाऱ्या गुणांचा विचार करून आवश्यक ती कौशल्ये त्यांच्यात विकसित झाली आहेत का, ते तपासले जाते. ही प्रकिया जरी योग्य असली, तरी याकरिता प्रामुख्याने ज्या १५-२० गुणांच्या लेखी चाचण्या, वैकल्पिक प्रश्न अथवा मौखिक परीक्षा घेतल्या जातात, त्यांची संपूर्ण सत्रातील संख्या एक तर बरीच असते. त्यामुळे सुमारे दर आठवडय़ाला येणाऱ्या या चाचण्या आणि परीक्षांमध्ये अधिकाधिक गुण मिळवण्याकरिता विद्यार्थी केवळ पाठांतरावर भर देतात, किंवा वैकल्पिक प्रश्नांमध्ये अंदाजपंचे दाहोदस्रे उत्तरे ठोकून देतात. मौखिक परीक्षेतही त्यांची कामगिरी यथातथाच असते. अशा प्रकारे अभ्यासक्रमातल्या धडय़ांमधल्या छोटय़ाछोटय़ा भागांची तेवढय़ापुरती तयारी करून गुणाधारित शिक्षण घेण्याकडे त्यांचा कल असतो. अर्थातच, शेवटच्या सहामाही परीक्षेत संपूर्ण अभ्यासक्रमावर प्रश्न असल्यामुळे तिथे आपला निभाव लागणार नाही याची त्यांना खात्री असल्यामुळे मग या अंतर्गत परीक्षांमध्येच काय ते गुण कमवून घ्या, असा त्यांचा खाक्या असतो. तसेच पुस्तके वाचून संदर्भ मिळवण्यापेक्षा गुगल सर्चचा त्यांना मोठा आधार वाटतो. कधी कधी नुकतीच पदव्युत्तर पदवी घेऊन एखादी स्पर्धा परीक्षा देईपर्यंत किंवा दुसरी नोकरी मिळेपर्यंत शिक्षकी पेशा स्वीकारलेले नवखे आणि तात्पुरत्या स्वरूपातले अननुभवी शिक्षकच मुलांना गुगलवर उत्तरे शोधायला सांगतात. विद्यार्थ्यांच्या खराब कामगिरीकरिता आपल्याला जबाबदार धरले जाऊ नये, म्हणून सोपे, सरळ प्रश्न असलेल्या अंतर्गत चाचण्या आणि मौखिक परीक्षा घेण्याकडेही शिक्षकांचा कल दिसून येतो. यामुळे ज्या आधारावर मूल्यमापन करून शैक्षणिक दर्जा ठरवायचा ते गुणच जर दिशाभूल करणारे असतील आणि त्यातून मुलांना खरोखर किती ज्ञान मिळाले आहे, किंवा मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून विशिष्ट परिस्थितीत अभियांत्रिकी निर्णय घेऊन समस्या कशा सोडवायच्या याबाबतची कौशल्ये जर त्यांच्यात विकसितच होणार नसलीत, तर अधिस्वीकृती प्रक्रिया कितीही चांगली असली तरी विद्यापीठांना, महाविद्यालयांना किंवा अभ्यासक्रमांना मूल्यांकनाअंती मिळणाऱ्या अधिस्वीकृतीला कोणताही अर्थ उरत नाही. या सगळ्याचा परिपाक म्हणजे उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची स्थिती ही ‘बडा घर पोकळ वासा’ अशीच असते. अर्थातच, मग अशा विद्यार्थ्यांना खरोखरीच्या अभियांत्रिकी उद्योग जगतात गेल्यानंतर निर्णयक्षमता नाही, विश्लेषक बुद्धी नाही, प्रश्न सोडवायची हातोटी नाही, यामुळे मग मागणी नसते, यातूनच बेकारी वाढते आहे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Project based engineering education need of time
First published on: 23-04-2017 at 01:51 IST