‘भावरवीन्द्रांजली’ हा श्रीकांत पाटील यांचा काव्यानुवादसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या काही निवडक कवितांच्या मराठी अनुवादाचा हा संग्रह. मराठी वाचकांना याआधी अनेक सारस्वतांनी टागोरांच्या कवितांची ओळख करून दिली आहे. टागोरांच्या कवितांचे काही मराठी अनुवादही प्रसिद्ध आहेत. त्या कविता याआधीही अनेकांनी वाचल्या असतील. त्यांत हा प्रस्तुत संग्रह वेगळा कसा ठरतो, असा प्रश्न अनेकांना पडू शकेल. अनुवादक श्रीकांत पाटील यांनी या संग्रहाला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्याचे उत्तर मिळते. ‘अनुवादाच्या आकृतिबंधाचा विचार करण्यापेक्षा अशी अनुवादाची प्रेरणा का निर्माण होते, याचा विचार व्हावयास हवा,’ हे सांगून त्यांनी अनुवादामागील दोन प्रेरणा येथे सांगितल्या आहेत. त्यातील एक म्हणजे साहित्यकृती आवडल्याने होणारा अनुवाद, तर दुसरी म्हणजे ती कलाकृती आपल्या स्वभावसूत्रांशी जुळते म्हणून. यातील दुसरी प्रेरणा अधिक महत्त्वाची. त्या प्रेरणेने होणारा अनुवाद हाच अस्सल आणि स्व-भावानुवादाच्या पातळीवर जाणारा ठरतो. याच प्रेरणेने हा काव्यानुवाद साकारलेला आहे. या संग्रहात रवींद्रनाथांच्या निवडक बावीस अनुवादित कवितांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्य आणि सौंदर्याकडे रवींद्रनाथ टागोरांचा असलेला ओढा त्यांच्या साहित्यातून कायमच दिसून येतो. विशेषत: त्यांचे काव्य हे या मूल्यांचा उत्कट वेध घेणारे आहे. रवींद्रनाथांनी स्व-अनुभवांना उत्कटतेने काव्यरूप दिले. निसर्ग, त्यातील उत्पत्ती-स्थिती-लयाचे चक्र, त्यातले सौंदर्य यांची उपासना त्यांनी आपल्या काव्यातून केली आहे. हे काव्य वाचणारा वाचकही सौंदर्यशोधाच्या मार्गावरील रवींद्रनाथांचा सहचर होऊ पाहतो. याचेच वानगीदाखल उदाहरण म्हणजे हा भावानुवाद होय. यात रवींद्रनाथांच्या कवितांच्या मराठी अनुवादाबरोबरच इंग्रजी तर्जुमाही दिला आहे. प्रत्येक कविता इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांत दिल्याने इथे वाचकाला अनुवादाची प्रक्रिया समजण्यास मदत होते. रसिकभावनेने शब्दांना शब्दांनी दिलेली ही दाद आहे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rabindranath tagore poems translated into marathi
First published on: 29-01-2017 at 01:45 IST