ग्रीस आणि भारत हे अतिशय प्राचीन संस्कृतीचा उज्ज्वल वारसा असलेले देश आहेत. प्रत्येक देशाच्या पुराणकथा हा केवळ मनोरंजकच नव्हे तर उद्बोधक ठेवा असतो, सांस्कृतिक वारसा असतो. ग्रीस व भारताची पुराणे हा तर फारच मोठा मौल्यवान खजिना आहे. ही पुराणे इतिहासाइतकीच महत्त्वाची असतात. कारण आपल्या स्वत:च्या संस्कृतीचे पूर्वज कसे होते, त्यांचे सार्वजनिक व व्यक्तिगत जीवन कसे होते, त्यांच्या श्रद्धा, विचार व भावना काय होत्या, हे समजावून घ्यावेसे आपल्याला वाटतच असते. ग्रीकपुराणाच्या ज्ञानाचा उपयोग सर्व पाश्चात्त्य कला, साहित्य आणि एकूणच ती संस्कृती समजून घेताना निश्चितच होतो. ग्रीक पुराणे व भारतवर्षांतील ‘कथासरित्सागर’ हे खरोखरच कथांचे अद्वितीय सागर आहेत आणि प्राचीन मानवी कल्पनाशक्तीचे सर्व प्रकारचे आविष्कार त्यांच्यामध्ये दिसून येतात. हे जीवनाचं कथारूप दर्शन आहे आणि मानवी अस्तित्वाचं विश्लेषणही त्यात सूक्ष्मपणे निहित आहे. ग्रीकांची व भारतीयांची प्रतिमा उभ्या करण्याची शक्ती थोर होती. त्या शक्तीमुळे या दोन देशांची पुराणे आजही आकर्षक रूपात टिकून आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दोन्ही देशांच्या पुराणकथांमधले साम्य ही एक विलक्षण गोष्ट आहे. फ्रॉइडच्या मते, मिथ वा पुराणकथा म्हणजे माणसाच्या दडपलेल्या इच्छांचे, कल्पनांचे व्यक्तीकरण. संस्कृतीच्या एका अवस्थेमध्ये साऱ्याच मनुष्यजातीच्या भावभावना बहुधा एकाच प्रकारच्या असाव्यात. सुंदर स्त्रियांना पळवून नेणे ही अगदी नेहमी घडणारी घटना. मग साहजिकच त्यांना सोडवण्यासाठी साहसे अथवा युद्ध करणे आलेच! त्यांच्या रोमहर्षक कथा झाल्या. ‘रामायण’, ‘इलियड’मध्ये सीता, हेलन या सुंदर नायिकांना पळवून नेले गेले आणि त्यांना परत मिळवण्यासाठी युद्धे झाली. नायकाच्या दीर्घ आणि लांबवरच्या प्रवासात त्याला चमत्कृतीपूर्ण अनुभव मिळत असत. अपोलोनिअसच्या ‘आर्गोनॉटिका’ नावाच्या काव्यामध्ये जासनने सोनेरी लोकर आणण्यासाठी केलेल्या दीर्घ, रोमांचक, विलक्षण व विचित्रही घटनांनी भरलेल्या समुद्रप्रवासाचे वर्णन आहे. श्रीरामचंद्र, पांडव, विशेषत: अर्जुन व भीम, ओडिसिअस दीर्घ प्रवास करतात. ‘रामायण’ हा शब्दच रामाचे अयन म्हणजे प्रवास करणे अशा अर्थाचा आहे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sahasrabuddhe new book on greek mythology
First published on: 15-04-2018 at 00:30 IST