अर्नेस्ट हेमिंग्वे या अमेरिकन साहित्यिकाने ‘सिक्स वर्ड्स स्टोरी’ हा प्रकार गेल्या शतकात प्रचलित केला. आज पुनश्च तंत्रज्ञानाच्या रेटय़ाने समाजमाध्यमांतील लेखक त्याकडे वळले आहेत. लघुत्तम लेखन हा तसा निसरडाच प्रकार. परंतु समाजमाध्यमं नामक जादूच्या कांडीने त्यास पुनर्जन्म दिला आहे. यानिमित्ताने आधुनिक तंत्रज्ञानाने साहित्यावर केलेल्या परिणामांचे विश्लेषण करणारे दोन लेख..
‘‘नुसत्या आमच्या टीचभर गावात शेपन्नास कवी आहेत..’’ मी म्हणालो.
‘‘टीचभर गावात शेपन्नास कवी ही संख्या जीवाचा थरकाप उडवणारी आहे. सबंध महाराष्ट्रात किती असतील?’’ सतीश तांबेंनी स्मायली टाकून हसून विचारलं.
‘‘कवी, अ-कवी, न-कवी वगैरे सगळे प्रकार धरून महाराष्ट्रात निदान एखाद् कोटी नक्कीच असतील.’’ मी सांगितलं.
कवींच्या संख्येचा हा महास्फोट व्हायला विशेषत: कारणीभूत ठरलेल्या फेसबुकवरच्याच एका पोस्टवर ज्येष्ठ कथाकार सतीश तांबे आणि मी बोलत होतो. यातल्या संख्येच्या (कदाचित) अतिशयोक्तीचा भाग सोडला तरीसुद्धा उरणारी कवींची संख्या जीवाचा थरकाप उडवणारीच असेल याबाबत मला तरी शंका नाही. मात्र, असा थरकाप उडवण्यासोबतच एका अर्थी ती जीव सुखावणारीसुद्धा आहे. कथितपणे सुशिक्षित; पण सांस्कृतिकदृष्टय़ा आजवर निरक्षरच राहिलेल्या आपल्या समाजात ‘साहित्याकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्या वाढणं’ हे चित्र काही प्रमाणात आशादायकच मानायला हवं. नुसत्या कवींचीच नव्हे, तर एकूणच वाचत्या/ लिहित्या हातांची संख्या आज वाढलेली दिसते आहे. नुसत्या कवितेचाच प्रदेश घेतला तरी जागतिकीकरणोत्तर भोवतालातल्या अराजकी कोलाहलाचा चौफेर वेध घेऊ पाहणाऱ्या सक्षम कवींची एक मोठी फळी आज समाजमाध्यमाच्या साह्यने प्रकाशात आली आहे. प्रेषित सिद्धभट्टी, अजित अभंग, सत्यपालसिंग राजपूत, शर्मिष्ठा भोसले, चैताली आहेर, स्वप्नील शेळके, सुदाम राठोड, माधवी भट, योजना यादव, महेश लोंढे, कुणाल गायकवाड, प्रणव सखदेव, फेलिक्स डिसोझा, अविनाश किणकर, गोपाल तिवारी ही लिहिताना चटकन् लक्षात आलेली यातली काही सशक्त नावे. आणखीही अनेक आहेत. ज्या कविता कदाचित कुणी कुठे छापल्याच नसत्या, त्या आज समाजमाध्यमाद्वारे शेकडो-हजारो लोकांसमोर येत आहेत आणि त्यावर साधकबाधक चर्चा झडत असल्याचे चित्रही पाहायला मिळते आहे.
मुख्य म्हणजे मंडळी बोलायला लागली आहेत. अमाप आणि आडमाप बोलायला लागली आहेत. मंडळींना उमगत नाही, उकलत नाही असा एकही विषय नाही. एसटीच्या फाटय़ापासून चार किलोमीटर आत अजूनही चालत जावं लागतं अशा ‘येडय़ाच्या वडगावा’तला कुणी बुद्रुक इसम शिवारात म्हशी राखता राखता अँड्रॉइड फोनवरून अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर छातीठोकपणे बोलताना दिसतो तेव्हा गंमत वाटते. चौथीच्या इतिहासात वाचलेल्यापैकी आजवर स्मरणात उरलेलं ‘शिवाजी महाराज नावाचा एक पराक्रमी राजा महाराष्ट्रात होऊन गेला’ हे एकच वाक्य माहीत असलेला भिडू इतरांचं ऐकून ऐकून ‘अमुक तमुकाने इतिहासाचे विकृतीकरण केले’ हे वाक्य उच्चारू लागला की इतिहासाऐवजी भविष्याबद्दलच चिंता वाटायला लागते. स्वत:च्या म्हाताऱ्या आई-बापाकडे नीट न बघणारी माणसे वृद्धाश्रमात सुन्नपणे बसलेल्या वृद्धांच्या व्हायरल झालेल्या फोटोखाली भावनाकुल कॉमेंट्स लिहिताना दिसली की चालू युगात ठासून भरलेल्या अद्भुत कोडगेपणाचा नव्याने साक्षात्कार व्हायला लागतो. स्वत:च्या गावातल्या ग्रामपंचायतीचा कारभार किती रामभरोसे चालू आहे हेही नीट माहीत नसलेली माणसे मनमोहनसिंगांचं चुकलं कुठं, नरेंद्र मोदींनी यापुढे काय काय करायला हवंय, असदुद्दिन ओवैसीची खेळी नेमकी काय आहे, अमर्त्य सेनांना अर्थशास्त्रातलं काहीच कसं कळत नाही, अमिताभ बच्चनपेक्षा हॉलीवूडमधला तो अमका नट कसा दहापट ‘भारी’ आहे, सानिया मिर्झाने पाकिस्तानी माणसासोबत लग्न करायला नको होतं, दाभोळकर-पानसरे-कलबुर्गींचे मारेकरी कोण, भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ द्यावं असं त्यांच्या लेखनात काय आहे, सचिन पिळगावकर हा केवढा किरकोळ इसम आहे, दि. पु. चित्रे आणि मन्या ओक यांच्या कवितांचा तुलनात्मक अभ्यास, नागालँडमधली परिस्थिती सुधारण्यासाठीचा नेमका उपाय काय, नक्षलवादाला आळा कसा घालता येईल.. इथपासून ते अशा अशा ‘च्याणाक्ष’ पद्धतीने पाकिस्तानात घुसून दाऊद इब्राहिमला डायरेक्ट गोळ्या घालून मारून टाकावे (कोण रे तो ‘हलुवा है क्या?’ असं विचारतोय पाकिस्तानातून?)- इथपर्यंतच्या अस्ताव्यस्त विषयांवर अत्यंत ऐसपैस अशी चौफेर तिरंदाजी करत असतात तेव्हा आश्चर्याने स्तिमित व्हायला होतं.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे साहित्यातल्या अभिव्यक्तीने कायमच वेगळी वळणे घेतलेली आहेत. म्हणजे अगदी सुरुवातीला कष्टाने भूर्जपत्रे मिळवून त्यावर लिहिणाऱ्या लोकांपेक्षा कागदनिर्मितीचे तंत्र गवसून कागदावर लिहिणाऱ्या लोकांना अधिक मनसोक्त लिहिता आलेलं असणार. किंवा बोरूपेक्षा बॉलपेनने लिहिणे नक्कीच अधिक सहज, सोपे ठरले असणार. हे नुसतं ‘सहज, सोपं ठरणं’ एकदा लिहायला लागल्यावर नवोन्मेषांना अनेक अंगांनी फुलवणारं, अडखळत्यांना सराईत बनवणारंही झालं असणार. या दृष्टीने पाहिलं तर तंत्रज्ञानातली प्रगती साहित्यालाही कशी उपकारक ठरते हे लक्षात येऊ शकतं. आता कागदांऐवजी कीबोर्डवर लिहिणारी पिढी आहे. या पिढीचे स्वत:चे फॉम्र्सही तयार होत आहेत. काही लेखी बोलण्यापेक्षा एखादा नेमका इमोटीकॉन टाकून आपल्याला काय म्हणायचे आहे ते सांगणं फार कॉमन होऊन बसलं आहे.
भराभरा स्क्रोल करण्याची सवय असलेली वेगवान पिढी दीर्घ लेखनावर फारशी रेंगाळत नाही, हे सत्य गवसलेली मंडळी समाजमाध्यमांवर गद्य लेखन करताना ते कमीत कमी शब्दांत नेमकं सांगून होईल अशा पद्धतीने मांडत असते. त्यातून काही नवे प्रकार निर्माण होतात. सध्या चालू असलेला #mysixwordsstory हा सार्वत्रिक हॅशटॅग असेल, राहुल बनसोडेंचा ‘झाडबुके म्हणाला’ किंवा सतीश वाघमारेंचा ‘पेट्रोलबाळ्या’सारखे वैयक्तिक हॅशटॅग्स असतील; नेमक्या शब्दांत अधिक परिणामकारक अभिव्यक्तीचे प्रकार ही पिढी शोधते आणि वापरते आहे. पैकी ‘झाडबुके म्हणाला’ या हॅशटॅगमधून फेसबुकवरचा अगदी सामान्य वाचकसुद्धा श्याम मनोहरांसारख्या लक्षणीय वेगळ्या प्रवाहाकडे मोठय़ा प्रमाणात उत्सुकतेने पाहू लागला, ही बाब सामान्य नक्कीच नाही. आसमंतात घडणाऱ्या सामाजिक, राजकीय घटनांवर जबरदस्त तिरकस नजरेने पाहणारा ‘पेट्रोलबाळ्या’ही फार अल्पावधीत लोकप्रिय झाला होता. एखाद्या मुद्दय़ाकडे केवढय़ा संतुलित आणि वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहता येतं, गाभ्याला धक्का न लागू देता त्याचे पदर कसे उकलता येतात, हे आजमावायचं असेल तर सुनील तांबेंच्या पोस्ट्स वाचाव्यात. प्रकाश संतांसारख्या एकमेवाद्वितीय प्रवाहातली भाषा आणि पौगंडवयातली अत्यंत तरल उमज पुनश्च समजून घ्यायची असेल तर माधवी भट यांनी लिहिलेली ‘सुमीची लंप्यास पत्रे’ वाचावीत. फेसबुकसारखं माध्यम नसतं तर हे असलं काही लोकांपर्यंत पोहोचलंच नसतं कदाचित.
इथे लिहिलेल्या छोटय़ा गद्य पोस्ट्समधूनसुद्धा काहीतरी अप्रतिम साहित्यिक दर्जा असलेलं निर्माण होऊ शकतं याचं नेमकं उदाहरण म्हणून पत्रकार रवीशकुमार यांच्या ‘लप्रेक’संग्रहाकडे पाहता येतं. ‘माझी फेसबुकगिरी’ हा सचिन परांजपेंचा संग्रहही याच माध्यमातून आला. अनेक फेसबुक ग्रुप्समधून प्रातिनिधिक स्वरूपाचे कवितासंग्रह येऊन त्यातूनही नव्या दमाचे कवी लोकांपर्यंत पोहोचले आहेत.
दहाएक वर्षांपूर्वीही गावागावातून लिहिणारी मंडळी असतील; पण ती लिहीत आहेत याचाच कुणाला पत्ता नव्हता. मनात उफाळून येऊ पाहतं आहे ते एखाद्या वहीत उतरवून ठेवण्यापलीकडे त्यातल्या बहुसंख्य लिहिणाऱ्यांना दुसरा काही पर्यायच नव्हता. वर्तमानपत्रांनी कथा-कविता प्रकाशित करणे बंदच केलेले होते. (अजूनही वृत्तपत्रांच्या पुरवण्यांमधून ज्याला ‘साहित्य’ म्हणावे अशा लेखनाला काहीही स्थान नसते.) वाङ्मयीन नियतकालिकं माहीत नसायची. कुठे पाठवलं तर हे लेखन प्रकाशित होईल याची काही माहिती आणि खात्रीही नसायची. कुणी फारच हौशी आणि ऐपतदारही असला तर तालुक्याच्या गावातला एखादा प्रकाशक गाठून स्वत:च्या खर्चाने आपलं पुस्तक प्रकाशित करून घ्यायचा. हे ‘प्रकाशित करून घेणं’ म्हणजे निव्वळ ‘छापून घेणं’ असायचं. त्याच्या ना प्रसिद्धीची काही व्यवस्था असे, ना वितरणाची. परिणामी पुस्तक छापून होई, पण ते कुठेही पोहोचत नसे. पुणे-मुंबई, नागपूर-औरंगाबादेतल्या ठरावीक लोकांनी लिहायचं आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या लोकांनी ते मिळेल तसं वाचायचं, एवढय़ापुरताच समग्र साहित्यव्यवहार सीमित झालेला होता.
समाजमाध्यमं आली आणि हे चित्र पार बदललं. ज्याला लिहावं वाटेल त्यानं लिहावं आणि पुढच्या मिनिटात ते जगभर दिसू लागावं- असला खाक्या चालू झाला. साहित्याच्या झारीतले शुक्राचार्य एका झटक्यात बादच होऊन बसले. या लाटेत जे लिहिलं जातं ते सगळंच उत्तम असतं असं नाहीच. पण एखादा जयसिंगपूरचा श्रेणिक नरदे ‘‘पिच्चरात नटनटीचं प्रेम हुतंय, आजूबाजूची जंता गाण्यात नाचतीय.. आणि देशात लोकशाही आहे’’ अशी एखाद्या वाक्याची पोस्ट लिहितो आणि एकूण भोवतालातलं सामाजिक-राजकीय पोकळपण अत्यंत ताकदीने अधोरेखित करतो तेव्हा, किंवा दिंद्रुडसारख्या एखाद्या आडगावातला कुणी ज्ञानेश्वर कटारे जेव्हा ‘‘आपला जॉब, नोकरी, काम, सगळं करायचं. आमदार, खासदार, डॉक्टर, इंजिनीयर, वकील, ड्रायव्हर, खाजगी-सरकारी नोकर- सगळ्यांनी! दिवसाचे ८, महिन्याचे २४०, वर्षांचे २८८० तास! पण पगार एका अटीवर! पाऊस चांगला झाला तरच पूर्ण पगार. पाऊस कमी- पगार कमी. झालाच नाही तर पगार नाही ! ही अट कुणालाच पटणार नाही! शेतकरी याच अलिखित अटीवर पिढय़ान् पिढय़ा राबतोय..’’ असलं काही लिहून जातो तेव्हा पिढय़ानुपिढय़ा मातीत राबणाऱ्या आपल्या शेतकरी बापाच्या कष्टांना तो फुल मागत असतो. ज्ञानेश्वरने लिहिलेली ही तीन-चार वाक्ये म्हणजे इथल्या आर्थिक विषमतेवर, जगबुडी आली तरी महिनोमाल आपला निश्चित ठरलेला पगार मिळवणाऱ्या निर्विकार यंत्रणेवर आणि जिला ‘व्यवसाय नव्हे, ही एक जीवनशैली आहे’ अशा शब्दांत आजवर सातत्याने कष्टाचं मोलच नाकारलं गेलं ती कृषीसंस्कृती आणि या संस्कृतीत जगणाऱ्या बहुसंख्यांना कधीच लाभलं नाही ते सौख्य- यांतल्या भयानक दरीच्या दुखण्यावर नेमकं बोट ठेवणारी एक अख्खी कादंबरी आहे. हे असलं काही लिहिण्याचं कदाचित नसेल; पण हे लिहिलेलं लोकापर्यंत पोहोचवण्याचं एक ताकदीचं माध्यम या पोरांना तंत्रज्ञानाने घेतलेल्या एका वेगळ्या वळणामुळे उपलब्ध झालं, हे निर्विवाद आहे. एरवी ही पोरे त्यांचं म्हणणं कुठे सांगू शकली असती?
अनेक ग्रुप्समधून समीक्षेच्या एखाद्या स्वतंत्र पुस्तकाइतकं महत्त्व द्यावं एवढय़ा मौलिक स्वरूपाच्या चर्चा घडतात. ‘चव्हाटा’ नावाच्या एका समूहात तिथल्या सदस्यांनी घेतलेली नाटककार चं. प्र. देशपांडेंची मुलाखत नाटकाच्या संदर्भात एवढी सांगोपांग झाली होती, की ती नंतर ‘खेळ’ या नियतकालिकात पुन:प्रकाशित झाली. अगदी ‘शिव्यांना असलेल्या भाषिक महत्त्वा’पासून ते ‘ऑनर किलिंग’सारख्या दाहक सामाजिक प्रश्नांपर्यंत अनेक गोष्टींवर जे मंथन इथे घडत असतं, ते अत्यंत सर्वस्पर्शी असतं. ते असं सर्वस्पर्शी होऊ शकतं याचं कारण या माध्यमांनी झुगारलेली भौगोलिक अंतराची मर्यादा. एकाच वेळी एखाद्या चर्चेत एखाद्या कुग्रामातल्या साध्या माणसापासून ते अमेरिकेत राहत असलेल्या उच्चशिक्षित आणि एकूणच वेगळी जीवनशैली असलेल्या माणसापर्यंत अनेक स्तरांतले चर्चक आपलं योगदान देत असतात. त्यामुळे ऐरणीवर घेतलेल्या विषयाच्या बहुतेक बाजू स्पष्ट होऊ शकतात. एखाद्या विषयावर लिहिताना नियतकालिकात, वृत्तपत्रात किंवा अगदी पुस्तकातही असू शकते ते शब्दमर्यादेचे बंधन इथे नसते. त्यामुळे अधिकाधिक मुळांशी भिडणे शक्य होते.
अर्थात इथे लिहिलं जातं ते सगळंच चांगलं असतं असं नाही. टाकाऊ म्हणता येईल अशा लेखनाचीही भरमार असते. सहज उपलब्धतेमुळे लोक इथे भरमसाट बोलत/लिहीत असतात. ही गोष्ट चांगली मानावी की वाईट, याबाबत प्रश्न उभा राहू शकतोच. ज्या विषयाशी आपला काडीचाही संबंध नाही, त्यातलं गम्य नाही अशाही विषयावर लोक अव्वाच्या सव्वा बोलताना दिसतात. अहमहमिका दिसते. इतरांचा मुद्दा मान्य केला तर ‘आपण कमी पडलो’ असं कुणाला वाटेल की काय, अशा शंकेने तर्कहीन, निर्थक गोष्टी हिरीरीने रेटण्याचे प्रकारही घडताना दिसतात. पण हे असं सगळीकडेच असतं. चांगलं असेल ते त्यातूनही वर येतं आणि वाचकाला अधिक समृद्ध करतं.
सतीश तांबेंनीच लिहिलेल्या ‘‘वातावरणाची आता ‘सोशलमीडियापूर्व’ आणि ‘सोशलमीडियापश्चात’ अशी विभागणी करण्याची वेळ आली आहे..’’ या पोस्टवर ‘‘ ‘सोशलमीडिया पश्चात्ताप’ असाही एक कालखंड त्यात गृहीत धरावा लागेल..’’ असे मी गमतीने लिहिले होते. असा पश्चात्ताप करावा अशा वेळाही अनेकदा येतात हे खरं असलं तरी तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या साहाय्याने साहित्याने, किंबहुना एकूणच जीवनाने घेतलेल्या या वेगळ्या वळणाचे तूर्तास तरी स्वागतच करायला हवे.
कसदार असेल ते यातूनही दशांगुळे उरेलच. नक्की.
बालाजी सुतार majhegaane@gmail.com