ज्येष्ठ शायर मुक्तबा हसन ऊर्फ निदा फाजली यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या समर्थ लेखणीचा वेध घेणारा लेख..
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. उर्दूचा मुशायरा रंगात आला होता. आणि त्या ज्येष्ठ कवीचे नाव पुकारण्यात आले. तो शायर माईकवर येताच त्याने परंपरेनुसार शेर किंवा रुबाईने सुरुवात न करता आपल्या दोह्य़ांनी सुरुवात केली आणि प्रत्येक दोह्य़ाला हॉलमधील श्रोत्यांकडून अमाप दाद मिळत गेली. आपल्या शैलीदार आवाजात तो अमीर खुसरो, कबीर, रहीमच्या परंपरेतील दोहे पेश करीत होता..
‘तुलसी तेरे राम के कमती पड गये बान
गिनती में बढने लगी रावण की सन्तान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंदू का हो दान या, मुस्लिम की खैरात
गेहूँ चावल दाल का क्या मजहब, क्या जात

अग्निने पावन किया, सीता जी का नाम
राजा बनकर मौन थे, अन्तार्यामी राम

ईसा अल्ला ईश्वर सारे मन्तर सीख
जाने कब किस नाम पर, मिले जियादा भीख

मथुरा, अर्जुन, रुक्मिणी, किसके कितने श्याम
बन्सी की हर टेर तो बोले राधा नाम’
त्यांच्या प्रत्येक दोह्य़ाला टाळ्यांनी दाद मिळत होती. सहज, सोप्या भाषेत मिथकांसह आधुनिक जीवनावर भाष्य कणारे काही दोहे पाच शेरांच्या गजलेलाही मात देऊन गेले. हा होता उर्दूचा एक लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, ज्येष्ठ कवी मुक्तबा हसन ऊर्फ निदा फाजली.
उर्दूचे जनप्रिय शायर नजीर अकबराबादी, नजीर बनारसी यांची भाषिक परंपरा पुढे नेणारे एकमेव लोकप्रिय शायर निदा फाजलींचे नुकतेच निधन झाले. १२ ऑक्टोबर १९३८ ला दिल्लीत त्यांचा जन्म झाला आणि ग्वालियर येथे प्रारंभिक जीवन घडले. साठोत्तरी उर्दू शायरीचे ते एक महत्त्वपूर्ण शायर म्हणून भारत व पाकिस्तानात ओळखले जात. पहिला काव्यसंग्रह ‘लफ्जों का पूल’ने त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली. आपल्या कवितेत, गीत आणि गझलांत त्यांनी नातेसंदर्भ, सत्य आणि असत्य इत्यादींचा मानवी मनाचे विश्लेषण करीत शोध घेतला आहे. देशविभाजनामुळे विस्थापित झालेल्या व्यक्तिमत्त्वांचा संघर्ष, व्यक्तिगत दु:खे व तद्नुषंगाने मनुष्याच्या स्वभावातील परिवर्तन यांचा मागोवाही त्यांनी घेतला आहे. निदा फाजलींनी आपली दु:खे बाजूस सारून कुठलीही कटुता न येऊ देता सकारात्मक दृष्टिकोनातून गद्य-पद्य सर्जन केले. भारत-पाकिस्तानातील स्थितीचे अवलोकन केल्यावर ते म्हणतात-
‘हिंदू भी मजें में है
मुसलमाँ भी मजे में
इन्सान परेशान
यहाँ भी है वहाँ भी’
चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या उद्देशाने निदा फाजली मुंबईत आले आणि येथेच स्थायिक झाले, परंतु शहरी जीवन त्यांना तितकेसे भावले नसावे. येथे ते म्हणतात-
‘अपनी तरह सभी को
किसी की तलाश थी
हम जिसके भी करीब रहे
दूर ही रहे’
तसेच..
‘मिलने जुलनेवालों में तो सारे अपने जैसे हैं
जिससे अब तभ मिले नहीं वो अक्सर अच्छा लगता है’
इतर उर्दू शायरांप्रमाणे निदांना चित्रपटसृष्टीने फारसा हात दिला नाही. परंतु साहित्य क्षेत्रात ते इतरांहून श्रेष्ठच ठरले. आयुष्याच्या उत्तरार्धात- म्हणजे पन्नाशीनंतर मात्र त्यांना सर्व स्तरांवर मान्यता मिळाली. ते म्हणतात-
‘दिया तो बहुत जिन्दगी ने मुझे
मगर जो दिया वो दिया देर से’
अशावेळी दुसरा असता तर त्याला निराशेने, एकटेपणाने ग्रासले असते. पण निदा म्हणतात-
‘भीड से कट के न बैठा करो तन्हाई में
बेखयाली में कई शहर उजड जाते है’
निदा फाजलींच्या शायरीत माणसाला ग्रासणारे आर्थिक, मानसिक, सांस्कृतिक प्रश्न व सामाजिक मूल्ये ही विशिष्ट समाजाशी निगडित नाहीत. एक सर्वव्यापक सकारात्मक भूमिका त्यांच्या काव्यात प्रतिबिंबित होताना दिसते.
‘सफर में धूप तो होगी जो चल सको तो चलो
सभी हैं भीड में तुम भी निकल सको तो चलो’
महानगरीय जीवनाबद्दल ते म्हणतात-
‘और तो सब कुछ ठीक हैं लेकिन
कभी-कभी यूँ ही
चलता-फिरता शहर अचानक
तन्हा लगता है’
कारण-
‘कुछ लोग यूँ ही शहर में
हमसे भी खफा है
हर एक से अपनी भी
तबिअत नहीं मिलती
किसी से खूश है किसी से खफा-खफा-सा है
वह शहर में अभी शायद नया-नया-सा है’
शहर, घर, आई हे विषय निदांच्या समग्र काव्यात वारंवार डोकावतात. विभाजनामुळे हरवलेले घर, दुरावलेली आई आणि सोडावे लागलेले शहर हीच ती कारणे असावीत.
‘गिरजा में ईसा बसें मस्जिद में रहमान
माँ के पैरों से चले हर आँगन भगवान
तुलसी की चौपाई हो या मीरा के गीत
तन में माँ का दूध ही जग में बाँटे प्रीत
निर्मल निश्चल प्रेम था, या हातों में स्वाद
हर भाजी हर दाल में माँ आती है याद’
निदांची कविता जनकविता आहे. त्यातली प्रतीके कधी धूसर वा अगम्य वाटत नाहीत. जनसामान्यांसह बुद्धिजीवी वर्गातही ती वाखाणली जाते. एका समीक्षकांच्या मते-
‘निदा फाजली की शायरी एक कोलाज के समान है। इसके कई रंग और कई रूप है। किसी एक रुख से इसकी शिनाख्त मुमकिन नहीं। उन्होंने जिन्दगी के साथ कई दिशाओ में सफर किया है। उनकी कविता इसी सफर की दास्तान है। जिस में कहीं धूप हैं, कहीं छाँव है। कहीं शहर हैं, कहीं गॉंव है। इस में घर, रिश्तें, प्रकृति और समय अलग-अलग किरदारों के रूप में ेएक ही कहानी सुनाते हैं- एक ऐसे बंजारा मिजाज शख्स की कहानी- जो देश के विभाजन से अब तक अपनी ही तलाश में भटक रहा है। बँटी हुई सरहदों में जुडे हुए आदमी की यह तलाश रचनाकार निदा फाजली का निजी दर्द भी है और यही उनकी शायरी की ताकत भी है। उन्होंने करनी और कथनी की दूरी को अपने शब्दों से कम किया है और वही लिखा है जो जिया है। इसकी तासीर का राज भी यह है।’
राजकीय संदर्भात निदांचा दोहा ऐका-
‘सात समुन्दर पार से कोई करे व्यापार
पहले भेजे सरहदें, फिर भेजे हथियार’
आता एक मतला ऐका-
‘मुठ्ठी-भर लोगों के हाथों में लाखों की तकदीरें है
अलग अलग हैं धरम इलाके एक सी सबकी जंजीरे हैं
सकारात्मक आशावाद हे निदा फाजलींच्या काव्याचे एक स्वरूप आहे-
‘छोटा करके देखिए जीवन का विस्तार
आँखों भर आकाश है मुठ्ठी भर संसार’
धार्मिक, सांप्रदायिक विवादाच्या संदर्भात निदांचा एक शेर मुलाहिजा हो-
‘हमेशा मन्दिरो-मस्जिद में
वो नहीं रहता
सुना है वाच्यों में छूप कर
वो खेलता भी है’
निदा फाजली स्वत:च्या शायरीच्या संदर्भात म्हणतात, ‘मी क्लासिकल शायरांच्या गजल छंदात रदीफ आणि काफियात गजला लिहिल्या. याचे कारण म्हणजे मी अतीताला बदलणाऱ्या वर्तमानाच्या आरशात पारखायचो. त्या मूलभूत गोष्टींचा मला शोध घ्यायचा होता- ज्या काळाची निरंतरता दर्शवितात अन् वर्तमानाला सरलेल्या भूतकाळाच्या प्रकाशात मार्गक्रमण करणे शिकवितात. या काव्यसंसारात मी त्या सामान्य माणसाला काल आणि आजच्या आरशात साकारण्याचा प्रयत्न केला आहे. तो सामान्य माणूस- जो निनावी व चेहराविहीन आहे. मी आपल्या परीने त्याला चेहरा प्रदान करण्याचा प्रयत्न केला आहे.’
निदा फाजलींचा हा प्रयत्न निश्चितच यशस्वी झाला आहे, हे त्यांच्या समग्र वाङ्मयसंपदेवरून स्पष्टपणे जाणवते. निदा फाजलींचं अचानक मैफलीतून एक्झिट करणं उर्दू साहित्यप्रेमींना एक दु:खद व धक्कादायक घटना होती. मात्र, निदा फाजली एक समृद्ध जीवन व्यतीत करून गेले.
‘कुछ तबीअत ही मिली थी ऐसी..
जिससे जब तक मिले दिल ही से मिले..’
त्यामुळे त्यांच्या या अकाली प्रयाणाबद्दल त्यांच्याच शब्दांत एवढंच म्हणता येईल..
‘इक मुसाफिर के सफर जैसी है सबकी दुनिया
कोई जल्दी में कोई देर में जाने वाला..’
राम पंडित

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urdu writer and poet nida fazli
First published on: 14-02-2016 at 01:55 IST