अत्रे- एक उत्तम शिक्षक

‘अत्र्यांचे ‘गुरू’त्वाकर्षण’ व ‘अत्रे असताना-नसताना’ हे अनुक्रमे पु. ल. देशपांडे व दिलीप माजगावकर यांचे लेख आवडले. त्यातील ‘अत्रे उत्तम मास्तर होते’ हे पुलंचं विधान, तसंच पाडगावकरांनी उल्लेखलेल्या ‘सुकुमार, हळव्या’ अत्र्यांचा अनुभव माझ्या पिढीला त्यांनी संपादित केलेल्या ‘नवयुग’ वाचनमालेने दिला.

आचार्य अत्र्यांच्या ‘नवयुग’ वाचनमालेने आमच्या पिढीला सहज-सुलभ व सुंदर मराठी भाषेची गोडी लावली. देशोदेशीच्या नामवंत साहित्यिकांचा सुंदर परिचय अत्रेंनी या वाचनमालेच्या माध्यमातून घडवला. मुरलीवाला, सदूचा सदरा, चांदोबाचा अंगरखा, पावसाचा थेंब, दिनूचे बिल, सुखी माणसाचा सदरा, पोटोबाचे पत्र, शेतकरी आणि अस्वल.. असे अनेक धडे तसेच फुलपाखरू, हस रे माझ्या मुला, आमचा मोत्या यांसारख्या कविता, त्यातील मनाची पकड घेणारी भाषा यामुळे आजही पन्नास वर्षांनंतर अत्रे स्मरणात आहेत.

लहानपणी वाचलेल्या त्यांच्या अनेक कथा-कवितांनी त्यावेळी मनात जी कालवाकालव झाली, त्याचा परिणाम अजूनही आहे. या सर्व गोष्टीरूप गद्य/पद्यातून शाश्वत मूल्यांचे संस्कार कुठलाही अभिनिवेश न बाळगता घडले. त्यासाठी वेगळ्या मूल्यशिक्षणाची गरज भासली नाही.

‘नवयुग’ वाचनमालेचे हे चारही भाग अभ्यास व मनोरंजनाची उत्तम सांगड घालून निर्माण केलेले होते. प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम आखताना मुलांना द्यावयाचे ज्ञान व त्यांची बौद्धिक क्षमता यांचाही मेळ घालायचा असतो. त्याचबरोबर ते कंटाळवाणं होणार नाही याची दक्षताही घ्यावी लागते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे अत्र्यांची ही वाचनमाला. अत्र्यांसारखा उत्तम शिक्षकच हे करू जाणे! माझ्या पिढीतर्फे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे या उत्कृष्ट मास्तरांना साक्षात दंडवत!

– सुलभा संजीव, मुंबई</strong>