माझ्या डोळ्यासमोरून आजही ते व्हिज्युअल हटत नाही. आश्चर्य, अचंबा आणि थरार. नाटकाची इतकी प्रभावी सुरुवात फार क्वचितच बघायला मिळते. व्हिज्युअल सेटल झालं. प्रेक्षागृहात काही क्षण शांतता पसरली आणि त्यानंतर भानावर आल्यासारखा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. नाटकाची जादू अशी असते. नाटकात पुढे काय घडणार याचा अंदाज येतच होता. तरीही हे नाटक मला उत्तमरीत्या गंडवत होतं आणि मी आनंदाने देहभान हरपून गंडवला जात होतो.
ब्रॉडवे किंवा वेस्टएन्डवर लहान मुलांच्या नाटकाला इतर कुठल्याही नाटकाइतपत महत्त्व असतं. लायन किंग, विकेड, स्पायडर मॅन, मेरी पॉपिन्ससारखी नाटकं ब्रॉडवे आणि वेस्टएन्डवर जोरात सुरू आहेत. ब्रॉडवेवर ‘न्यू अ‍ॅमस्टरडॅम’ नावाच्या थिएटरमध्ये लायन किंगचा प्रयोग बघायला जायच असं ठरवलं. आम्ही २० जण होतो. माझ्या बरोबर नाटक बघायला मराठी नाटय़सृष्टीतली दिग्गज मंडळी होती. निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ.. ज्यांनी मराठी नाटकांमध्ये विविध पद्धतींचे प्रयोग केले होते अशी सगळी मोठी माणसं बरोबर होती. डॉ. श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर, विक्रम गोखले, प्रशांत दामले, राजन भिसे, वंदना गुप्ते ही काही नावं. या सगळ्यांबरोबर नाटक बघायला मजा येणार याची खात्री होती. सुयोगचा निर्माता सुधीर भट अमेरिकेत गेल्यावर आम्हाला एकतरी नाटक दाखवायचा. ‘लायन किंग’ बघायला तोच आम्हाला सगळ्यांना घेऊन गेला होता. न्यू अ‍ॅमस्टरडॅम थिएटर, प्रसिद्ध असलेल्या फॉर्टीसेकंड स्ट्रीटवर आहे. १९०२ साली बांधलेलं हे नाटय़गृह ब्रॉडवेवरच्या नावाजलेल्या नाटय़गृहांपैकी एक आहे. दोन मोठय़ा बाल्कनीज असलेलं हे थिएटर दिसायला देखणं होतं. प्रेक्षागृह अर्धवर्तुळाकार होतं. त्यामुळे साऊंडच्यादृष्टीने पण हे प्रेक्षागृह मस्त होतं. थिएटर बांधताना वास्तुविशारदांनी खूप काळजी घेतली असावी हे लक्षात येत होतं. प्रयोग अर्थातच हाऊसफुल्ल होता. आमची तिकिटं चांगली होती. मी नेहमीप्रमाणे प्लेबिल वाचून काढलं. तेवढय़ात तिसरी बेल होऊन, लायन किंग दिमाखात सुरू झालं. जोरदार चर्मवाद्य वाजायला लागली आणि त्या वाद्यांच्या लयीत मी कधी गुंतलो ते माझं मलाही कळलं नाही. मी अगदी सुरुवातीच्या व्हिजुअलपासूनच नाटकात अडकलो. पहिलं गाणं सुरू झालं आणि माझ्या अंगावर रोमांचं उभे राहिले. माझ्यात दडलेला लहान मुलगा कधी जागा झाला तेच मला कळलं नाही. प्रत्येक मोठय़ा माणसामध्ये एक लहान मूल असतं. या ‘लायन किंग’ने माझ्यातलं ते लहान मूल जागं केलं आणि मी नाटक एन्जॉय करायला लागलो.
‘दि लायन किंग’ हे म्युझिकल १९९४ साली प्रदर्शित झालेल्या डिस्नेच्या त्याच नावाच्या अ‍ॅनिमेशन फिल्मवर आधारित आहे. ब्रॉडवे म्युझिकलही डिस्ने प्रॉडक्शनचच आहे. मी सुदैवाने किंवा दुर्दैवाने ती फिल्म पाहिली नव्हती. आणि रंगमंचीय आविष्कार पाहिल्यानंतर फिल्म बघावी असं वाटत नाही. सिनेमा आणि नाटक दोन्ही पाहिलेल्यांपैकी बऱ्याच जणांना नाटक जास्त आवडलं आहे. नाटकाद्वारे प्रेक्षकाला प्रत्यक्ष अनुभव घेता येतो हे त्याचं कारण असावं. अर्थात त्यासाठी नाटकाचं सादरीकरणही उत्तम व्हायला हवं. डिस्नेच्या लायन किंग या म्युझिकलचं सादरीकरण लाजवाब आहे. नाटक सुरू झालं. रंगमंचावर सोनेरी पिवळा प्रकाश. त्या प्रकाशात लांब पाय टाकत काही जिराफ आले. ती अर्थात माणसंच होती, पण ज्या पद्धतीने ते रंगमंचावर आले ते पाहता त्यांना जिराफ म्हणण्यावाचून पर्याय उरला नव्हता. त्या सोबतीने आफ्रिकन पद्धतीचं चँटिंग सुरू झालं. सोबतीला काही चर्मवाद्यं वाजत होती. एक आफ्रिकन बाई रंगमंचावर आली आणि वरच्या पट्टीत चँटिंग करायला लागली. तिच्या मागे सायक्लोरायावर मोठ्ठा ऑरेंज रंगाचा सूर्य वर यायला लागला आणि त्याबरोबर प्राण्यांची मोठ्ठी परेड सुरू झाली. जिराफांच्या सोबतीनं, हत्ती, वाघ, गेंडे हे सगळे प्राणी रंगमंचाच्या मागच्या बाजूनं, स्टेजवर आले आणि स्टेज भरून टाकलं. सोबतीला अखंड न्यू अ‍ॅमस्टरडॅम थिएटर हलवून टाकणारा त्या बाईचा आवाज. माझ्या डोळ्यासमोरून आजही ते व्हिज्युअल हटत नाही. आश्चर्य, अचंबा आणि थरार. नाटकाची इतकी प्रभावी सुरुवात फार क्वचितच बघायला मिळते. व्हिज्युअल सेटल झालं. प्रेक्षागृहात काही क्षण शांतता पसरली आणि त्यानंतर भानावर आल्यासारखा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. नाटकाची जादू अशी असते. आयुष्यात कधीतरी आपल्या हातून असं काहीतरी घडावं असं वाटून गेलं. दिग्दर्शिका ज्युलि टेमोरचा हेवा वाटला. सिम्बा या सिंहाची सूडकथा बघायला मी तयार झालो. जंगलात घडणाऱ्या नाटकाची नांदी इतकी परिणामकारक झाली, की पुढे घडणारं नाटक अधिकाधिक थरारक असणार याची खात्री झाली.
सिम्बा हा सिंहाचा छावा. राजपुत्र याची गोष्ट लायन किंग या म्युझिकलमध्ये सांगितली आहे. गोष्ट अतिशय साधी, सोपी अशी आहे, त्यामुळे ती कशी सांगितली जाते यावर प्रयोगाचा भर असणार होता हे ओघानं आलंच. दृष्यबंधाची रेलेचेल हे या म्युझिकलचं बलस्थान असणार होतं. पण हे सगळं असूनही प्रयोगात ही छोटीशी सूडकथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल याची उत्तमरीत्या काळजी घेतली होती. चित्रापेक्षा चौकट मोठी होणार नाही याची व्यवस्था दिग्दर्शिकेनं केली होती. सर्व व्हिज्युअल्स नाटय़वस्तूला पोषक अशीच होती. या प्रकारच्या म्युझिकलमध्ये दृश्यरूप आणि कथानक यांचा समन्वय साधणं खूप अवघड असतं. कधी कधी कथानक जोरदार असतं, त्यात चढउतार असतात, नाटय़पूर्ण घटना असतात, उल्लेखनीय अशा व्यक्तिरेखा असतात. अशा वेळी दृश्य आणि कथानकाचा समन्वय साधणं खूप कठीण नसतं. पण लायन किंगसारख्या सरधोपट कथानकाच्या संदर्भात मात्र ते खूप कठीण होऊन बसतं. ‘दि लायन किंग’ हे नाटक ‘राजा सिंह’ नावानं मराठीत हुन्नर नावाच्या संस्थेनं सादर केलं होतं. विवेक साठे यांनी ते लिहिलं होतं आणि प्रदीप मुळ्ये यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. त्याही प्रयोगात दृश्य रूप आणि कथानक यांचा समन्वय उत्तम साधला गेला होता.
‘दि लायन किंग’च्या सुरुवातीला प्राण्यांची परेड स्थिरावल्यानंतर राफ्की म्हणजे गाणारी बाई. ती राजा मुफासा आणि राणी साराबी यांना अभिवादन करते. त्यानंतर राफ्की सिंहाच्या छाव्याचं चित्र काढते आणि भूताखेतांना पाचारण करते. ती येतात आणि त्या छाव्याचं नाव ठेवतात सिम्बा. जल्लोष होतो. त्याचवेळी दुसरीकडे मुफासाचा भाऊ स्कार आपली राजा होण्याची संधी हुकली म्हणून चरफडत असतो. सुरुवातीच्या थरारक व्हिज्युअलनंतरचा हा प्रसंग अतिशय साध्या पद्धतीनं सादर करून, नाटकाच्या गोष्टीची सुरुवात करून दिली. इथून पुढे स्कार काय करणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. तसेच सिम्बा हळूहळू मोठा होत जाणार. तो प्रवास कसा दाखवणार याबद्दल मनात विचार करायला लागलो. एखादं नाटक बघत असताना अशा प्रकारच्या भावना प्रेक्षकांच्या मनात निर्माण करणं हे उत्तम कलाकृतीचं लक्षणच असतं आणि तसं घडत होतं. त्यानंतरच्या प्रवेशांमध्ये मुफासा आणि सिम्बाचे आपापसातले नातेसंबंध. मुफासा सिम्बाला जंगलामध्ये घडणाऱ्या गोष्टींची माहिती देत असतो. मुफासा सिम्बाला ‘प्राइड रॉक’ची महती सांगतो, तसंच ‘प्राइड लँड’च्या पलीकडे न जाण्याची धोक्याची सूचना देतो. सिम्बा हळूहळू मोठा होत असतो. या वेळी जे गाणं वापरलं आहे ते श्रवणीय तर आहेच, पण जंगलात घडणाऱ्या नैसर्गिक बदलांचं सूचन करणारंही आहे. ग्रासलँड्स चँट अशी त्या गाण्याची सुरुवात आहे. या प्रवेशांमध्ये मुफासाचं काम करणारा सॅम्युअल राइट आणि सिम्बाचं काम करणारा जेसन रेझ यांनी वापरलेली शारीरभाषा अविस्मरणीय आहे. या प्रवेशांनंतर झाझू हा मुफासाचा सल्लागार येऊन त्याला जंगल राज्यात घडणाऱ्या घडामोडीविषयी सांगतो, तो भागही अतिशय देखणा होता. रंगांची उधळण, रंगीबेरंगी पेहेराव आणि उत्तम वातावरणनिर्मिती होती. मला चटकन या प्रवेशाचं प्रयोजन लक्षात येत नव्हतं. पण पुढचा भाग सुरू झाला आणि ते लक्षात आलं. पुढचा भाग अतिशय डार्क होता. कारण त्यात सिम्बा आणि त्याचा धूर्त काका स्कारची भेट होते. या प्रवेशातला ‘डार्क’ भाग पोहचवण्यासाठी आधीचा कलरफूल प्रवेश होता, तसंच मुफासा किती कर्तव्यदक्ष असा राजा आणि स्कार कसा त्याच्या विरुद्ध आहे हे समजायला मदत झाली. मला पुन्हा एकदा प्रयोगाच्या संरचेनाला दाद द्यावीशी वाटली. नाटकात पुढे काय घडणार याचा अंदाज येतच होता. तरीही हे नाटक मला उत्तमरीत्या गंडवत होतं आणि मी आनंदानं देहभान हरपून गंडवला जात होतो. मीच नव्हे तर प्रेक्षागृहातले लहान थोर सर्वच मानव. समोर प्राणी त्यांची कथा आम्हाला सांगत होते आणि आम्ही माणसं सॅम्युअल कोल्डरिज या तत्त्वज्ञाच्या थिअरीप्रमाणे ‘विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलिफ’ म्हणजे समोर घडणाऱ्या गोष्टींवर संपूर्ण विश्वास ठेवून समर्पण करून ती बघत होतो. ‘थिएटर अ‍ॅट इट्स बेस्ट’ करणारे आणि बघणारे यांचा उत्तम सहप्रवास.
सिम्बाचा धूर्त काका, त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगून हत्तींच्या स्मशानाकडे घेऊन जातो. जिकडे जायची त्याला मुफासानं बंदी घातलेली असते. या प्रसंगात स्कार या सिंहाचं काम करणाऱ्या जॉन विकरी या अभिनेत्यानं मुफासापेक्षा निराळी शारीरभाषा वापरली होती. दोघंही सिंहच पण स्वभावानुसार वेगळी शारीरभाषा. दिग्दर्शिकेनं किती छोटय़ा छोटय़ा गोष्टींकडे लक्ष दिलं होतं बघा. लायन किंग मुख्यतो करून लहान मुलांसाठी केलेलं असल्यामुळे अभिनय थोडासा सूक्ष्मविस्तृत (एलॅबोरेडेट) होता. म्हणूनच त्यातल्या शारीर भाषेतला बदल अधोरेखित झाला होता. सिम्बा त्याच्या नाला या मैत्रिणीला घेऊन झुझूबरोबर हत्तींच्या स्मशानभूमीत जातो. झुझूला चकवून सिम्बा आणि नाला सटकतात. हत्तीच्या स्मशानात आत आत जायला लागतात. झुझू त्यांना शोधून काढतो. इतक्यात तीन हायनास त्यांना घेरतात. हायनास हा हत्तींचीही हाडं तोडू शकेल असा खतरनाक प्राणी. हायनास ही प्राणी जमात आता नष्ट झाली आहे. ते तीन हायनास सिम्बा आणि नालावर हल्ला करतात. तेवढय़ात मुफासा तिथे येतो आणि त्यांना वाचवतो. सिम्बाला खूप ओरडतो आणि त्याला घेऊन तिथून निघतो. तेवढय़ात स्कारच्या सांगण्यावरून हायनासचं सैन्य सिम्बावर हल्ला करतं. ते एका दरीच्या टोकावर असतात, मुफासा आपल्या मुलाला हायनासपासून वाचवतो. पण स्कार त्याला दरीत ढकलून देतो. हायनासचा हल्ला आणि मुफासाचा खून हा सगळा भाग सर्व तांत्रिक अंगांचा वापर करून अप्रतिम पद्धतीनं सादर केला गेला. नेपथ्यबदल, प्रकाश योजनेतले बदल, चर्मवाद्यांचा उत्तम वापर आणि त्या नंतरच मुफासाचं दरीत पडणं ही सगळी व्हिज्युअल्स भन्नाट होती आणि ती परिणामकारक करण्यासाठी जलद गतीचा वापर केला होता, तो अतिशय योग्य होता. म्हणजे लक्षात घ्या, एक लहान मुलांसाठी केलेलं नाटक मोठय़ांसाठीसुद्धा किती एन्जॉएबल होऊ शकतं याचं हे ‘लायन किंग’ हे उत्तम उदाहरण आहे.
हायनासच्या मोठय़ा हल्ल्यातून सिम्बा वाचतो, तेवढय़ात स्कार त्याला हेरतो आणि पटवून देतो, की मुफासाचा मृत्यू हा अपघात आहे. स्कार सिम्बाला पटवून राजा बनण्यासाठी जायला निघतो, पण जाताना हायनास आर्मीला सिम्बावर पुन्हा एकदा हल्ला करायला सांगतो. सिम्बा जीव वाचवून सटकतो. हायनास आर्मीला वाटतं तो मेला. ते तसं येऊन स्कारला सांगतात. जंगल राज्यात सिम्बाची आई नाला आणि राफ्की दोघांच्या मृत्यूबद्दल दुखवटा पाळतात. जंगल राज्यावर दु:खाची अवकळा पसरते. राफ्कीचं दुखवटय़ातलं गाणं पण लाजवाब होतं. मुफासाच्या खुनाच्या प्रसंगातली गती जलद होती, पण दुखवटय़ाच्या प्रसंगातली गती संथ होती. दिग्दर्शिकेला या दोन्ही प्रसंगांमधली लय इतकी छान समजली होती, की त्यामुळेच हे दोन्ही प्रसंग उठावदार झाले होते. मुफासाच्या खुनानंतर स्कार राजा होतो. प्राण्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी तो हायनासना ‘प्राइड लँड’वर येण्याची परवानगी देतो. जंगलराज्यातील वातावरण बदलते.
थोडक्यात आपल्याकडे जसं गुंड सत्तेवर आल्यानंतर होतं तसं स्कारला मिळणारा आदर मनापासून नसून भीतीपोटी असतो. प्राण्यांमध्येही माणसांसारखं दहशतीचं राजकारण असू शकतं हे जाणवतं. आपल्या आसपासचं दहशतीचं राजकारण आपण पाहतो, अनुभवतो, पण प्राण्यांमध्येही तसंच असू शकतं हा एहसास लायन किंगमधल्या या प्रसंगानं करून दिला किंवा खरं तर दहशतीचं राजकारण करून मानव आपल्यातली अ‍ॅनिमल इन्थटिंक्ट बाहेर काढत असतो हे जाणवलं. हायनासच्या प्राइड लँड्सवरती येण्यावरून केलेलं गाणं पण छान होतं. ‘बि प्रिपेअर्ड’ असे त्याचे शब्द होते आणि चालीतून तसंच नृत्यामधून वॉर्निग आपल्यापर्यंत पोहोचत होती. जंगलाच्या दुसऱ्या भागात वाचलेला तरुण सिम्बा बेशुद्ध पडतो. त्याच्या भोवती गिधाडं फिरायला लागतात. इतक्यात टायमन हा मुंगूस आणि पुम्बा हा डुकरासारखा दिसणारा एक प्राणी हे तिथे येऊन गिधाडांना हाकलतात. सिम्बा शुद्धीवर येतो, मुफासाच्या मृत्यूला तो स्वत:ला जबाबदार मानतो. दु:खी होतो. टायमन  आणि पुम्बा त्याला जंगलातल्या त्यांच्या घरात घेऊन जातात. ते कसे मोकळेपणाने जगतात ते दाखवतात. तिथे ‘हकूना मटाटा’ हे गाणं होतं. तो प्रसंगपण धमाल होतो. हकूना मटाटा म्हणजे स्वाहिली भाषेत ‘कसल्याही चिंता नाहीत’ असा होतो. इथे परत एकदा नाटकाचा पोत बदलतो. सिम्बा या परिसरात वाढतो आणि तरुणाचा पुरुष होतो. इथे नाटकाचा पहिला अंक संपतो.
मी थोडावेळ खुर्चीत बसून होतो. सुन्न झालो होतो. पहिल्या अंकानेच मला इतका आनंद दिला होता, की मी तृप्त झालो होतो. मी मध्यंतरात कँटिनमध्ये जाऊन चहा प्यालो. मला कुणाशीही बोलावंसं वाटत नव्हतं. एक परिपूर्ण नाटक बघत असल्याचं समाधान मिळत होतं. मी माझ्या सीटवर येऊन बसलो. चर्मवाद्यं वाजायला लागली. आनंदी संगीत सुरू झालं. पडदा वर जायला लागला आणि मी पुन्हा एकदा लहान होऊन प्राण्यांच्या राज्यात जायला सज्ज झालो. सिम्बा आता स्कारचा सूड कसा घेणार, प्रयोगात त्यासाठी काय काय केलं जाणार, कशी व्हिजूअल्सची रेलचेल असणार हे बघायला मी उत्सुक होतो.
(पूर्वार्ध)    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onसंगीतMusic
मराठीतील सर्व रंगसंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lion king
First published on: 25-11-2012 at 01:42 IST