मराठीवर आपले प्रेम आहे काय? 

‘मराठी राज्यात इंग्रजीच प्रथम!’ हा डॉ. प्रकाश परब यांचा ‘लोकरंग’ मधील

(८ सप्टेंबर) लेख वाचला. हा लेख कितीही जीव तोडून लिहिलेला असला तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही, हे खेदाने नमूद करावेसे वाटते. आज मराठीवर कुणाचे प्रेम उरले नाही आणि गरज तर कुणालाच नाही, असे चित्र आहे. मराठीच्या सक्तीचा परिणाम थोडाफार होईल, पण तो कायम टिकणारा नाही. आम्हाला नोकरीत पगारवाढीसाठी हिंदीची सक्ती होती. पगार वाढल्यावर किती लोकांनी हिंदीचा वापर सुरू ठेवला? तीच गोष्ट मराठीची. आपण लहानपणापासून मराठी बोलतो आहोत म्हणून सध्या बोलण्यापुरती मराठीची गरज उरली आहे. वर्तमानपत्रांनी मराठी टिकवली आहे. वृत्तपत्रीय, प्रकाशन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे अभिनंदन अशासाठी, की त्यांनी आस्था कमी होत जाणारे मराठी भाषेचे क्षेत्र उपजीविकेसाठी निवडले. मराठी नुसती टिकविणे नाही, तर तिची उन्नती करण्याची मनोमन इच्छा असेल तर कृती करणेच आवश्यक. – यशवंत भागवत, पुणे.

हे महापाप कुणाचे?

‘लोकरंग ’मधील (८ सप्टेंबर)‘ना घर का, ना घाट का’ हा आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीसंदर्भातील अभिषेक साहा यांचा लेख  वाचून खरंच आम्ही किती सुखी आहोत, असे वाटते. वास्तविक पाहता यापूर्वीच्या राजकीय पक्षांनी याकडे दुर्लक्ष तर केलेच पण हा प्रश्न भविष्यात अडचणीत आणू शकतो याकडेही दुर्लक्ष केले. याला जबाबदार जसे स्थानिक पातळीवर असलेले पक्ष व केंद्रातील पक्ष- जे सोयीनुसार बदलतात- तितकेच जबाबदार आहेत. १९ लाख नागरिक यातून वगळले जातात, तर त्यांना काही परकीय राष्ट्रे साहजिकच अशा वेळी साहाय्य करतील, तेही सहानुभूतीपूर्वक! अशावेळी मात्र नव्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. – सुनील समडोळीकर, कोल्हापूर.