वर्षां गजेंद्रगडकर 

एकोणिसाव्या-विसाव्या शतकांत पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीला हातभार लावणारे अनेक लोकनेते होते, स्वातंत्र्ययोद्धे होते, सुधारक होते तशा सामान्य मध्यमवर्गीय घरातल्या अनेक स्त्रियाही होत्या. या स्त्रियांच्या कर्तृत्वाची नोंद महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात झालेली नसली तरी काही चरित्रं-आत्मचरित्रांमधून अशा अनेक कर्तबगार स्त्रियांचं आयुष्य समोर आलेलं दिसतं. संजय कुलकर्णी यांनी लिहिलेलं ‘माई’ हे पुस्तक, स्वत:च्या कुटुंबासह सामाजिक वीणही घट्ट करणाऱ्या अशाच एका स्त्रीची जीवनगाथा मांडणारं आहे. माईंकडे विसाव्या शतकातल्या सुसंस्कृत, कर्तृत्ववान सुगृहिणींची प्रतिनिधी म्हणून पाहता येईल. त्या काळातल्या माईंसारख्या अनेक स्त्रियांनी प्रतिकूलतेशी झुंजत आपली कुटुंबं उभी केली आणि घराची चौकट सांभाळताना, समाजशिल्पाचे कळस घडविणाऱ्या अनेक स्त्री-पुरुषांसाठी फार भक्कम आणि आश्वासक पाया रचला.

Loksatta anvyarth Priest Literary and social environmental activist Father Francis Dibrito
अन्वयार्थ: पर्यावरणप्रेमी फादर
Hundred years of Bhiskrit Hitkarini Sabha founded by Dr Babasaheb Ambedkar
‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची शंभर वर्षे
Vidyut Bhagwat, women studies,
एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व!
dharmarao baba atram
तिसऱ्या आघाडीची चर्चा असतानाच शरद पवार- छगन भुजबळ भेटीवर राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे महत्वपूर्ण विधान…
Why does hatred of Gandhi remain even today
गांधीद्वेष आजही का उरतो?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : महिलांचे वर्तमानकालीन प्रश्न
Loksatta chaturang Menstrual cycle maternity leave Professionals of women Parental Leave
स्त्री ‘वि’श्व : मातृत्वाच्या रजेतील ताणेबाणे
Haravlelya Kathechya Shodhat book review
अस्वस्थ करणारा संघर्ष

माईंचा जन्म १९०६ सालचा, सावंतवाडीमधल्या सिधये कुटुंबातला. त्या वेळच्या प्रथेनुसार दहाव्या वर्षीच त्यांचा बालविवाह झाला. दुर्दैवानं वर्षभरातच त्यांना वैधव्य आलं. मात्र, इतक्या लहान वयातही त्यांचे विचार आणि निर्णय ठाम होते. त्यांना पुनर्विवाह करायचा होता. त्यामुळे केशवपन आणि विधवेला लागू असलेले जाचक नियम झुगारून त्या सासरच्या घरातून निघून परत सावंतवाडीला आल्या. बालमैत्रीण तारा नाबर हिचं घर पुढारलेल्या विचारांचं होतं. त्यांनी समाजाचा रोष पत्करून माईंना आश्रय दिला, मालवणला पाठवून त्यांना चौथीपर्यंतचं शिक्षण देण्याची व्यवस्था केली आणि नंतर राष्ट्रीय कीर्तनकार विनायकबुवा पटवर्धन यांच्या मध्यस्थीनं धुळयात वकिली करणारे त्रिम्बक कुलकर्णी यांच्याशी माईंचं लग्नही लावून दिलं.

इथपर्यंतचा माईंचा प्रवास एकवेळ सर्वसामान्य म्हणता येईल, इतकं त्यांचं पुढचं आयुष्य विशेष आहे. सुशिक्षित नवरा, त्यांची प्रतिष्ठा, मोठं घरदार, घोडागाडी, दागदागिने, एकूणच संपन्नता असलेल्या माई चूल-मूल अशा त्या वेळच्या प्रस्थापित चौकटीत रमल्या असत्या तर नवल नव्हतं. त्यांच्या पुनर्विवाहाला धुळयातल्या सामाजिक विश्वाने स्वीकारलेलं नव्हतंच; समाजाचा तो रोष पेलणंही सोपी गोष्ट नव्हती. पण माई कशानेच डगमगणाऱ्या नव्हत्या. त्या बग्गीतून बाहेर पडायच्या आणि बाजारहाट करण्यापासून सगळी कामं पार पाडायच्या.

माहेरीच पहिलं बाळंतपण करायचं, या ईर्षेनं आठव्या महिन्यात धुळे ते सावंतवाडी असा एकटीनं केलेला प्रवास, वडिलांनी प्रवेश नाकारल्यावर सावंतवाडीच्या संस्थानिक असलेल्या भोसले परिवारातल्या राणीसाहेबांनी केलेलं माईंचं पहिलं बाळंतपण, त्या काळात माईंनी केलेला विम्याचा व्यवसाय, धुळयातल्या बायकांना आपलंसं करण्यासाठी सुरू केलेला साडयांचा व्यवसाय, गांधी हत्येनंतर घराची झालेली जाळपोळ आणि नेसत्या वस्त्रानिशी मुलांना घेऊन पुण्याला हलवलेला मुक्काम, स्वखर्चाने चालवलेलं वधूवरसूचक मंडळ, स्वत:च्या मुलीचं लग्न ठरवण्यासाठी रायपूपर्यंत केलेला प्रवास आणि चांगलं स्थळ असल्याची खात्री झाल्यावर लग्न पक्कं करण्याचा एकटीने घेतलेला निर्णय, वयाच्या सत्तरीपर्यंत केलेला मोत्याच्या दागिन्यांचा व्यवसाय, त्यासाठी माईंकडे असलेलं मार्केटिंग कौशल्य, नातेवाईकांसह घरात सतत असणारा कार्यकर्त्यांचा, पतीच्या अशीलांचा राबता आणि माईंनी केलेलं त्यांचं आदरातिथ्य, काळाची पावलं ओळखून नव्याचा सहज स्वीकार करण्याची त्यांची वृत्ती, अडचणीत असलेल्या माणसांना नुसती मदत नव्हे तर त्यांना स्वावलंबी करण्याचा त्यांचा दृष्टीकोन, हे सगळं या पुस्तकातून फार प्रभावीपणे समोर येतं तेव्हा फारसं शिक्षण नसतानाही आपलं घर सांभाळत समाज घडवणाऱ्या विसाव्या शतकातल्या अशा अनेक स्त्रियांचं आंतरिक सामर्थ्य आपल्याला थक्क करून सोडतं.

लेखक संजय कुलकर्णी हे माईंचे नातू असल्यामुळे त्यांच्या या लेखनात एक अकृत्रिम भाव सहज उमटला आहे. साध्या-सोप्या, रंजक शैलीतून त्यांनी चितारलेलं माईंचं हे चरित्र विसाव्या शतकातल्या एका सुधारणावादी, उद्यमशील आणि कणखर स्त्रीचं दर्शन घडवणारं तर आहेच, पण आजच्या आणि उद्याच्या पिढयांनाही उजळ भविष्याची वाट दाखवणारं आहे.

माई काय आणि त्यांच्यासारख्या कालच्या आणि आजच्या गृहिणी काय; त्यांच्या स्वप्नांची, त्यांच्या कष्टांची आणि त्यांच्या मनातल्या खंतीची नोंद कुठेच होत नाही. कुठलाच इतिहास त्यांची दखल घेत नाही. पण याच सगळया जणी अवकाशात उंच भरारी घेणाऱ्या अनेकींच्या पंखांना बळ देतात. त्यांनी उभी केलेली कुटुंबाची, घराची चौकट आजच्या अस्वस्थ कालखंडातल्या सामाजिक विणीला विस्कळीत होण्यापासून वाचवते आहे, वाचवत राहील, असा विश्वास जागवणारं हे पुस्तक आवर्जून वाचावं असं आहे.

‘माई’, – संजय अनंत कुलकर्णी,

रावा प्रकाशन, कोल्हापूर,

पाने-१६४, किंमत- ३१० रुपये.