प्रमोद मुजुमदार

सभोवताली घडणाऱ्या विविध भौतिक घटना, भाषिक संवाद, भवतालच्या परिसरातील वस्तू आणि वास्तू माणसाच्या मनात एकाच वेळी वेगवेगळय़ा पद्धतीने पोहोचतात. ते एक घटित असते. त्या समग्र घटिताचे ती व्यक्ती आपापल्या पद्धतीने आकलन करते. ‘नवल’ कादंबरी ही एका नव्या आर्थिक, सामाजिक परिप्रेक्ष्यातील तरुण नायकाचे अनुभवविश्व समोर आणते. जगण्यातील गुंतागुंत व्यक्त करण्याची आणि आत शोषून घेण्याची लेखकाच्या भाषिक अभिव्यक्तीची क्षमता वाचकाला सतत चकित करत राहते.

how to make kaju curry at home
Recipe : घरच्याघरी बनवा ढाबा स्टाईल ‘काजू करी’! जाणून घ्या अचूक प्रमाण अन् कृती….
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?

पपायरस प्रकाशनाने आणलेली प्रशान्त बागड यांची ‘नवल’ ही कादंबरी तुम्ही वाचता तेव्हा ती ‘लेखका’ची कलाकृती उरत नाही. वाचकाचा तो एक स्वतंत्र अनुभव बनत जातो. फार कमी वेळा असे घडते. कादंबरी किंवा ललित साहित्यकृती वाचताना त्यामागील लेखक आणि लेखकाची एक भूमिका, त्यातील घटनांमधील लेखकाचा तर्क आणि विधान हे वाचकाला खुणावत राहते. वास्तविक लिखित कलाकृती वाचकापर्यंत पोहोचते तेव्हा ती स्वत:चा स्वतंत्र परिघ निर्माण करत असते. कलाकृतीतून व्यक्त होणारे शब्द, त्यामागील भाव आणि अनुभवांचे आकलन वाचकसापेक्ष ठरत जाते. ते तसे ठरले पाहिजे. तरच ती कलाकृती स्वत:चे अस्तित्व घडवते. ‘नवल’ कादंबरीत काय घडते? याविषयी लेखक, प्रकाशकाला काय वाटते, यासंबंधीचे एक विधान मुखपृष्ठाच्या आतील दुमडय़ावर सापडते; परंतु त्या विधानाशी वाचकाने आपली निष्ठा बांधण्याची आवश्यकता नाही. प्रशांन्त बागड लिखित ‘नवल’ कादंबरी वाचताना तो वाचकाचा एक स्वतंत्र अनुभव ठरत जातो, हे या कलाकृतीचे यश म्हणता येईल.

मराठीत वाचकाला असा स्वतंत्र अनुभव देणाऱ्या कादंबऱ्या कमीच आहेत. किरण नगरकरांची ‘सात सक्कं त्रेचाळीस’, नेमाडेंची ‘कोसला’ आणि श्याम मनोहरांची ‘हे ईश्वरराव.. हे पुरुषोत्तमराव..’ यांसारख्या वेगळय़ा धाटणीच्या कलाकृती या ठिकाणी आठवतात. या कलाकृतींमध्ये भाषा, भावना आणि मानवी संवेदना यांचा विविध पद्धतीने केलेला प्रायोगिक वापर वाचकाला रोजच्या जीवनातील अनुभव नव्या स्वरूपात पोहोचवण्यात यशस्वी होतात. मुख्य म्हणजे ते केवळ भाषिक आणि साहित्यिक प्रयोग न राहता एक समग्र कलाकृती म्हणून स्वतंत्र अनुभव देणारे ठरतात. वर नमूद केलेल्या कादंबऱ्या त्या त्या काळातील विशिष्ट सामाजिक, आर्थिक बदलाच्या वातावरणातील नायकांचे अनुभवविश्व आणि जाणीव, संवेदना साकारतात. ‘नवल’ कादंबरी ही अशाच एका नव्या आर्थिक, सामाजिक परिप्रेक्ष्यातील तरुण नायकाचे अनुभवविश्व समोर आणते. या व्यामिश्र अनुभवविश्वाशी आणि बदलत्या जाणिवांशी वाचकाला विविध पातळय़ांवर जोडत राहते. हे सर्वसाधारण पातळीवर जाणवणारे साम्य सोडता या सर्व कादंबऱ्या नक्कीच स्वतंत्र कलाकृती आहेत.

रूढ अर्थाने कोणतेही ठोस कथानक ‘नवल’ कादंबरीला नाही. घटनांचा आणि मानवी अनुभवांचा क्रम नाही. कधी लेखकाचे प्रथमपुरुषी निवेदन आहे. कुठे प्रसंगांच्या माध्यमातून सामाजिक वास्तवाची नोंद आहे, तर कधी शब्द आणि भाषिक आविष्काराच्या प्रयोगातून संवेदना व्यक्त होत राहते. एकूण हा एक समुच्चय भाषिक आविष्कार बनतो. तरीही ती कादंबरी वाचकाला गुंतवून ठेवू शकते. एका वेगळय़ा पातळीवर आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या सरळ साध्या अनुभवाचे मानवी संवेदनात रूपांतर कसे होत जाते, याचा शोध घ्यायला उद्युक्त करते.

म्हणजे काय? तर असे की, प्रत्येक माणसाचे अस्तित्व द्वंद्वात्मक असते. सभोवताली घडणाऱ्या विविध भौतिक घटना, भाषिक संवाद, भवतालच्या परिसरातील वस्तू आणि वास्तू माणसाच्या मनात एकाच वेळी वेगवेगळय़ा पद्धतीने पोहोचतात. ते एक घटित असते. त्या समग्र घटिताचे ती व्यक्ती आपापल्या पद्धतीने आकलन करीत असते. त्या आकलनाच्या आधारे सुसंगत असा प्रतिसाद ती व्यक्ती देत असते. त्याच वेळी या घटना, त्यातील संवाद आणि परिसर यातून निर्माण होणाऱ्या संवेदना आणि भाषिक आशय माणसाच्या अस्तित्वाचा भाग बनत राहतात. थोडक्यात, अशा रीतीने मानसिक पातळीवर एक स्वतंत्र भावनिक प्रतिमा तयार होते. ही प्रतिमा त्या व्यक्तीच्या पुढील अस्तित्वाचा भाग बनून जाते. अशा एका गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा अखंड शोध ‘नवल’ कादंबरी घेत राहते. त्या प्रक्रियेविषयी वाचकाला किती ओढ आहे, एक व्यक्ती म्हणून तुम्ही या शोधाशी स्वत:ला किती जोडू शकता यावर तुमचे ‘नवल’ कादंबरीशी नाते निर्माण होत जाते. एका अर्थाने वाचकाचा कस पाहणारी ही कादंबरी आहे. परंतु एवढेच नाही. या कादंबरीचा पट आणखीही विविध पातळय़ांवर तुमच्याशी नाते बांधत राहतो. विशेषत: या कादंबरीतील मराठी भाषेचा आविष्कार अनेक अर्थाने अपूर्व आहे. आजच्या संगणक युगात भाषा हे एक मानवी अभिव्यक्तीचे ‘सॉफ्टवेअर’ म्हणून तुम्ही पाहू शकता. अर्थातच मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात माणसाने निर्माण केलेले हे सर्वात पहिले सॉफ्टवेअर! परंतु भाषानिर्मिती आणि भाषिक वापर हे मानवी सर्जनशीलतेचा एक अत्यंत तरल आविष्कारसुद्धा असतो. माणसाबरोबरच भाषासुद्धा उत्क्रांत होत जाते. मानवी भावभावना व्यक्त करतानाच, भाषेचा पोत बदलतो. वापराचे स्वरूप बदलते. त्याच त्याच शब्दांचे अर्थ आणि संदर्भही बदलत जातात. त्यामुळेच भाषेची संवाद साधण्याची क्षमता विकसित होत राहते. मानवी भावभावनांच्या आविष्काराचे ‘सॉफ्टवेअर’ म्हणून तयार झालेली भाषा आता तुमचा मनोव्यापार आकारत राहते. एका प्रकारे हे माणसाचे भाषेशी असलेले द्वंद्वात्मक नाते. हे सर्व अनुभव तुम्ही-आम्ही प्रत्येक जण घेत असतो. ‘नवल’ कादंबरीचा नायक सोनकुळेचे अस्तित्व भाषेच्या आविष्कारातून तुमच्यासमोर साकारत राहते. कादंबरीची रचना आणि भाषिक प्रयोग, शब्द आणि शब्दांच्या वापराचे प्रयोग हे या कादंबरीचे अपूर्व आणि अफलातून असे वैशिष्टय़ आहे. या कादंबरीत लेखकाने वापरलेले अनेक शब्द हे नव्याने निर्मित झालेले आहेत. तर अनेक ठिकाणी प्रस्थापित शब्दांना नव्या परिप्रेक्ष्यात वापरून पाहिले गेले आहे. काही ठिकाणी भाषिक प्रयोग नायकाचे भावनिक अस्तित्व व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. अर्थात हा भाषिक प्रयोग करण्यामागे लेखकाचा निश्चित उद्देश आहे. या भाषिक प्रयोगातून नायकाचे भावनिक अस्तित्व आणि वास्तव यातील समग्र नाते शोधण्याचा, अधोरेखित करण्याचा हा प्रयोग आहे. त्यामुळेच सुरुवातीला वाचताना काहीसा दुबरेध, रटाळ वाटलेला मजकूर हळूहळू वाचकाची पकड घेऊ लागतो. होय, हे मात्र नक्की की तुम्ही ही कादंबरी आणि हा अनुभव समजून घेण्यासाठी उत्सुक असाल तरच ही भाषा आणि त्यातील संवेदना प्रवाह भिडतात.

आधी म्हटल्याप्रमाणे ‘नवल’ कादंबरीचा नायक हा जागतिकीकरणाच्या नव्या युगाचा प्रतिनिधी आहे. पांडुरंग सांगवीकरप्रमाणेच हा नायकही खेडय़ातून शहराकडे आला आहे. पांडुरंग सांगवीकर साठ वर्षांपूर्वी पुण्यात आला होता. शेतकरी कुटुंबातील पांडुरंग बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करत होता, तर ‘नवल’चा नायक सोनकुळे आजच्या निमशहरी, अर्ध आधुनिक अशा सामाजिक परिप्रेक्ष्यातील मध्यम जातीचा, नवमध्यमवर्गाचा प्रतिनिधी आहे. हा हुशार तरुण पुण्यात येऊन पोहोचला आहे. त्याला नव्या जगातील स्पर्धेचे भान आहे. त्याला पुण्यातील आधुनिक शहरी वातावरण परके वाटत नाही. उलट त्याची आकांक्षा मोठी आहे. तरीही निमशहरी वातावरणातून आलेल्या सोनकुळेला पुण्यासारख्या अत्याधुनिक वातावरणाशी जोडून घेताना परत परत आपले अस्तित्व जोखत राहावे लागते; पण त्याला स्वत:च्या अस्तित्वाचा न्यूनगंड नाही किंवा या आधुनिक शहरी वातावरणाशी तुटलेपण नाही. त्याचे जगणे द्वंद्वात्मक आहे; पण त्यात परात्मकता नाही. त्याच्या अस्तित्वाचा हा प्रवास त्याच्या मानसिक संवेदनांमधील बदलांना आवाहन देणारा असतो; पण त्यात एक वस्तुनिष्ठता आहे. त्याचे असे जगण्याचे तत्त्वज्ञान साकारणारा हा प्रवास आहे. म्हणूनच सोनकुळे सहज म्हणून जातो की, ‘त्याला नदीच्या पाण्यासारखं सरळ वाहून जायचं आहे. चक्र त्याला माहितीही नाही. सुरुवात झाली आहे, वाहणं चालू आहे. वाहत पुढे जायचं आहे, पुढे पुढे खूप काही आहे, असेलच, अशा भावनेने- सुप्त, अव्यक्त, पण सशक्त भावनेने तो ओढय़ासारखा वाहतोय. कालचे जुने आपण, आराम करून, निसर्गनियमानुसार आज ताजेतवाने होतो, हे त्याला मान्य नाही.. कदाचित चक्राचा स्वीकार म्हणजे मर्त्यत्वाचा स्वीकार; स्वत:ला सृष्टीचा एक घटक मानण्याचा प्रारंभ.. दुसऱ्या शब्दांत म्हणायचं तर स्वत:ला स्वत:पुरता अमर मानणं..’ असे काहीसे अबोध वाटणारे, पण तरीही अस्फुट महत्त्वाकांक्षा व्यक्त करणारे तत्त्वज्ञान!

त्याचबरोबर सामाजिक, राजकीय वास्तवाविषयी विचार करायला लावणारी टीकात्मक जाणीव हा नायक व्यक्त करत राहतो. तो म्हणतो, ‘‘आज १९९१च्या नंतरच्या काळात आपल्यासमोर शत्रू कोण आहे? देश तर स्वतंत्र आहे. शिवाय देश एका जागतिक व्यवस्थेचा भाग आहे. हेका म्हणून स्वदेशीचा प्रचार करणं यात काय हशील आहे? आपल्याच स्वतंत्र सरकारने अर्थव्यवस्था खुली केली आहे. परदेशी गुंतवणूक आमंत्रित केली आहे. याही परिस्थितीत स्वदेशीचा आग्रह धरता येईल कदाचित. स्वत:ला राष्ट्रप्रेमी समजणाऱ्या, पण स्वातंत्र्य आंदोलनातून अंग काढून घेणाऱ्या संघटना मात्र याविषयी विचार करताना दिसत नाहीत.’’ अशाच प्रकारच्या इतर भेदी वाटाव्यात अशा नोंदी हा नायक त्याच्याच समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या निवेदनांच्या आणि स्वाक्षऱ्यांच्या चळवळीविषयी व्यक्त करतो. तर १५ ऑगस्टविषयी तो म्हणतो, ‘‘आपण विनाकारण १५ ऑगस्टला महत्त्व देतो. हा देश आणि ही ‘सिव्हिलायझेशन’ एवढी जुनी, अवाढव्य. इंग्रजांचा काळ त्याच्या मनाने इवलुसा, त्याला किती महत्त्व द्यायचं? फक्त २६ जानेवारी साजरा करा. कारण आपण स्वत:चं काही तरी केलं आहे त्या दिवशी. प्रजासत्ताक, राज्यघटना.’’ उटपटांग वाटाव्यात अशा अनेक टिपण्या वाचताना हा पांडुरंग सांगवीकराचा अवतार वाटू लागतो, पण तो आजचा सोनकुळेच असतो.

‘नवल’चा हा नायक आजच्या नव्या युगातील प्रगल्भ तरुण आहे. अधिक सजग, भोवतीच्या व्यामिश्र जगाविषयी चिकित्सक आहे. त्याला या विश्वाची अथांगता भयचकित करते. निराशा जाणवते, विरोधाभास जाणवतात. तरी एक माणूसपणाची उत्स्फूर्त जाणीव खोल रुजून राहते. कथाकथनाच्या पलीकडे जाणारा, स्थलकालाचा एक सलग तुकडा नायकाच्या व्यक्तिगत अनुभवांच्या माध्यमातून शब्दांच्या प्रत्ययकारी रूपात आकारत जातो.

ही सर्व गुंतागुंत व्यक्त करण्याची आणि आत शोषून घेण्याची लेखकाची भाषिक अभिव्यक्तीची क्षमता वाचकाला सतत चकित करते, गुंतवून ठेवते. ‘नवल’ जाणवली ती अशी. प्रत्येक वाचकाला ती वेगळी जाणवेल. तीच या कादंबरीची ताकद.

या कादंबरीचे हे वेगळेपण ठोसपणे व्यक्त करणारे कादंबरीचे ले-आऊट, डिझाईन आणि मुखपृष्ठ नोंद घेण्यासारखे आहे. मुखपृष्ठावरील भगवा पापुद्रा धस लागल्यासारखा निघतोय आणि मूळचा अथांग पिवळा पट सलग असल्याचे दिसतेय. लेखक, कवी, चित्रकार गणेश विसपुते यांचे हे मुखपृष्ठ आणि पुस्तकाची संपूर्ण छपाई या ललित कलाकृतीच्या सर्वागसुंदर निर्मितीचे वैशिष्टय़ ठरते.

तीन दशकांपासून मुक्त पत्रकारिता. विविध नियतकालिकांमध्ये आरोग्य, शहर, पर्यावरणविषयक लेखन. त्याशिवाय अनुवाद. गेल ऑम्वेट यांच्या अनेक पुस्तकांचा मराठीत अनुवाद. ‘इन गुड फेथ’ या सबा नक्वी यांच्या ग्रंथाच्या ‘सलोख्याचे प्रदेश : शोध सहिष्णू भारताचा’ या मराठी अनुवादाला साहित्य अकादमी.

mujumdar.mujumdar@gmail.com