सध्या एक खंत नेहमी व्यक्त होत असते.. शिक्षणाचा गाभाच हरवलाय, विद्यापीठीय प्रशासन भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलंय, प्रत्येक गोष्टीचं राजकारण होतंय, गुणवत्ता नव्हे तर दादागिरी वरचढ ठरते, नवे प्रयोग होत नाहीत. परंतु शिक्षणच काय, अगदी पर्यावरणापासून  विकासकामांपर्यंत माणूस नावाच्या प्राण्यानं सगळ्याची वाट लावली आहे. त्यामुळे ‘माणसापरीस मेंढरं बरी’ असाच काहीसा धागा डॉ. विजय पांढरीपांडे यांनी ‘जंगल मंगल विद्यापीठ’ या आपल्या छोटेखानी पुस्तकात पकडला आहे. थेट टीका न करता वेगळ्या पद्धतीनं विषय मांडण्याचा प्रयत्न त्यात केला आहे. माणसाला जे जमत नाही ते प्राणी करून दाखवतात. मोठय़ा हुशारीनं, कष्टानं आणि मुख्य म्हणजे मूल्यभान राखून. फँटसी हा लेखनप्रकार निवडून मिश्कीलपणे लेखक अनेक विषयांवर टिपण्णी करतो.

एका विद्यापीठाच्या जवळ अशोकवन आहे. तिथले प्राणी माणसांचं वर्तन बघून आश्चर्य करतात, त्रासतात आणि उद्विग्न होतात. त्यांना वाटतं की, आता वेळ आली आहे या माणसांना धडा शिकवण्याची; त्यांना उदाहरण घालून देण्यासाठी आपणच एक नवं विद्यापीठ स्थापन करू. स्वतंत्र स्वायत्त आणि सर्वार्थानं मुक्त विद्यापीठ! हा ठराव एकदा मंजूर झाल्यावर त्या प्राणी जगतात काय काय घडतं, सगळ्यांचा समावेश करून गोष्टी कशा आखल्या जातात, कशा पार पडल्या जातात, त्यात कोणते पेच येतात आणि ते कसे सोडवले जातात, यांचा आलेख म्हणजे ‘जंगल मंगल विद्यापीठ’!

बोलणारे प्राणी आणि पक्षी यांची आपल्याला बालकथांपासून सवय असते. प्राण्याच्या तोंडी घातलेली माणसांची भाषा मजा आणते. उदाहरणार्थ, ‘आपण आपल्या प्रायॉरिटीज फ्रिज करून टाकू. हे सगळं साधायचं तर धावावं नाही, उडावं लागेल. ग्लोबल स्पर्धा आहे, गंमत नाही.’ हे प्राण्यांच्या तोंडून ऐकताना हसू फुटतं.

इथे गाय कुलसचिव, कुलगुरू सिंह, प्र-कुलगुरू वाघोबा आणि कुलपती गजराज आहेत. मुंगीसारख्या छोटय़ा प्राण्यालाही बोलायची मुभा आहे.

एकीकडे माणसांच्या जगातलं अराजक, भ्रष्टाचार, एकमेकांचे पाय ओढणं आणि त्याच्याविरोधात असलेलं प्राणिजगत. त्यांनी काही एक तत्त्व बाळगून सगळ्याला एक शिस्त लावायचा झपाटा लावला. हे प्राण्यांचं विद्यापीठ कायदा, ऑर्डिनन्स अशा क्लिष्ट जाळ्यात फसलं नाही. इथं कुणीही ‘वरून ऑर्डर्स’ दिल्या नाहीत. जे काही करायचं ते सगळ्यांनी एकत्र बसून ठरवलं. प्रत्येकानं उत्स्फूर्तपणे काम केलं.

शिवाय प्राण्यांनी नदी साफ केली, झाडे लावली, दरुगधी नाहीशी केली; तेही आरडाओरड आणि गोंधळ न करता. कुणी कुणाच्या उणिवा काढल्या नाहीत. विषारी रसायनांविरोधात ठिय्या आंदोलन प्राण्यांनी सुरू केलं. कारखान्यातले विषारी द्रव्य टाकणारे टँकर आणि माणसं परत गेली. आंदोलनाचा विजय झाला.

पुस्तकाच्या शेवटाकडे मराठी वृत्तवाहिनीवर चर्चा होते. विषय अगदी वेगळा : जंगल मंगल विद्यापीठात फेरफटका मारायला गेलेल्या वार्ताहरांना दिसलेलं  दृश्य आणि तिथे घडलेले बदल, प्राणी आणि पक्षी यांनी सुरू केलेले सृजनशील प्रकल्प! जंगल मंगल विद्यापीठाची चित्रफीत यावेळी दाखवली जाते. चच्रेत सहभागी झालेले वक्ते ती पाहून आधी अवाक होतात; मग सध्याच्या माणसांच्या जगातल्या स्थितीबद्दल एकमेकांवर जबाबदारी ढकलायला लागतात. आम्ही काहीच करू शकत नाही, असा प्रत्येकाचा सूर असतो. आणि मग पोपटरावांना बोलावलं जातं जंगल मंगल विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून आणि समोर येते परंपरागत विद्यापीठांची अधोगती व दुसरीकडे प्राणी-पक्ष्यांनी निर्माण केलेल्या विद्यापीठाची गरुडझेप.

प्राणी सांगतात, ‘आमच्या संघटनेला जात नाही, झेंडा नाही, आम्ही गळ्यात उपरणं मिरवीत नाही की डोक्यावर प्रिंट केलेल्या टोप्या वापरत नाही. लोक काय म्हणतील, याने आम्ही विचलित होत नाही. माणसं गंगा शुद्धीकरणाच्या फक्त जाहिराती देतात; आम्ही केवळ आठवडाभर पहारा दिला आणि आमच्या पात्रात सांडपाणी सोडणे, विषारी रासायनिक द्रव्ये टाकणे बंद झाले.’

दुसऱ्या दिवशी सर्व माध्यमांत एक घोषवाक्य गाजत राहतं- ‘चार पायांच्या जनावरांनी दोन पायांच्या मनुष्यप्राण्याला टांग मारली!’

थोडक्यात, प्राणिजगताचं एक आदर्शवत चित्र या पुस्तकातून उभं राहतं. या जगातही पेच आहेतच. उदाहरणार्थ, शिकार करून प्राण्यांनी एकमेकांना मारणं. परंतु पुस्तकात त्यावर सुचवलेला तोडगा मात्र बाळबोध आहे. रूपकामध्ये काही त्रुटी जाणवतात. हे सगळं स्वप्नरंजन आहे, कल्पनेची भरारी आहे, हे गृहीतक मान्य करूनही ते जाणवत राहतं.

‘जंगल मंगल विद्यापीठ’ – डॉ. विजय पांढरीपांडे,

विजय प्रकाशन,

पृष्ठे – १३३, मूल्य – १५० रुपये