|| तीर्थराज कापगते
सुनील यावलीकरांच्या दृकसंवेदनांनी युक्त कवितांच्या ‘पीळ’ या संग्रहातील अल्पाक्षरी कवितांमधील सूचक आणि प्रसरणशील शब्दयोजना लक्ष वेधून घेते. शब्दांच्या सूक्ष्म अर्थच्छटा मनात तरंगत राहतात.
मुखपृष्ठावर मातीने लगडलेला कविदेह आहे आणि त्या देहाची मुळे धरतीच्या कुशीत खोलवर जलतत्त्वाचे झरे शोधण्यासाठी रुतलेली आहेत. ‘कोणतीच पोथी। नको डोक्यावर। कंठातला सूर। मुक्त होवो।।’ असे मुक्तीचे पसायदान मागत त्या देहाच्या मेंदू-मनातून इवली, पण सशक्त पर्णे उगवली आहेत. त्यांच्या सर्वागात आभाळाची आस आहे. देहाची शीव ओलांडून मुक्तीचा श्वास घेण्यासाठी ती हरितपर्णे क्षितिजाकडे झेपावत आहेत.
कवीच कशाला, या जगात एका रेषेत चालणाऱ्या साध्यासरळ माणसालाही जगताना अस्वस्थतेचा पीळ सहन करावा लागतो. कवी-कलावंत हा तर लौकिक आणि अलौकिक अशा दोन जगांचा रहिवासी असतो. त्यामुळे त्याच्या निर्मितिगर्भात कवितेचे बीज अंकुरताना होणारी त्याच्या हळुवार मनाची घुसमट पुढील ओळींमधून नेमकी कळते- ‘वाजता पायात। लौकिकाचे चाळ। गर्भातले बाळ। गुदमरे।।’ ऐहिक जगात वावरत असतानाच त्याचे वनवासी मन ‘चंद्राच्या वावरी। घर माझे दूर।’ म्हणत जगाच्या पलीकडे कुठेतरी दूर दूर भटकत असते. खरे तर कलावंताच्या लौकिकातून अलौकिकाकडच्या प्रवासातली तगमग, पीळ सोसणे म्हणजेच कवी असणे! मधुकर केचे म्हणायचे, ‘माझ्या समोर सागर, त्याला आकाश टेकले, झाली असती त्रिवेणी, माझे घर आड आले!’ पुढील ओळींतील यावलीकरांची अनुभूती अगदी तशीच.. ‘उधानले पंख, पेलण्या अंबरा, ठेचाळे पायात, घराचा उंबरा!’
लौकिकातील विसंगत वास्तव, संभ्रम आणि विषमता; ज्यामुळे वर्तमानकाळ अधिकच ओसाड, उजाड झाला आहे. अशा वेळी कवीचे मन आंतरिक आर्त घेऊन प्रकटते- ‘राखेत झाकला। वर्तमानकाळ। सभोवती जाळ। साहवेना।।’ जणू सर्वत्र वणवा पेटला आहे. जाळ असह्य़ झाला आहे, असे कवी म्हणतो. आगीची आच लागून केळीचे बाग सुकत आहेत, असा आकांत मांडताना कवी अनिलांनी लिहिले होते- ‘अशी कुठे लागली आग, जळती जसे वारे, कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे’! तसेच या कवीचे गुदमरणे पाहा : ‘चारही बाजूंनी। प्रदुषली हवा। श्वास आता नवा। घेऊ कसा?’
खऱ्याखोटय़ाची दलाली सुरू आहे. नुसते तोंडदेखले उपचार चालू आहेत. नाती उपरी झाली आहेत. धर्म, पंथ, जात पेटते ठेवणारे राजकारण, मस्तवाल सत्ता, भ्रष्ट शिक्षणव्यवस्था, धर्माचा बाजार आणि सुमार लोकांच्या हाती गेलेले संपत्तीचे कासरे. सर्व जण इथे फक्त जिंकण्याची भाषा बोलत आहेत. माणसांची रानटी कळपे झाली आहेत. ते कधी आपल्या उरावर झडप घालतील याचा नेम नाही, अशी भीती कवीला वाटते.. ‘हरपली कशी, स्पर्श ओली माय, उपऱ्या नात्याची, डोळ्यांवर साय’!
बाजारभावाने करुणेचे मोल ठरते, अशा या सुनसान होत चाललेल्या माणूसविरहित जगात स्वत:शीच कण्हत कण्हत बोलावे लागते आणि त्यात माणुसकी हे मूल्य नुरल्याची कवीला खंत आहे : ‘स्वत:स विकोनी। स्वत्व केले उणे। ऐसे गा जिणे। लाचारले।।’
स्मरणगंधाची एक उबदार गोधडी कवीने उराशी लपेटून धरलेली आहे खरी; पण त्याच्या मनात त्या गोधडीचे खूप सारे संदर्भ खोलवर, अगदी आत रुजले आहेत. त्याचे एक गाव होते. ‘कौलांची बंडी’ आणि ‘लाकडाचे बैल’ अशा प्रतिमा त्याच्या बालपणाशी आजही त्याचे नाते जोडून आहेत. तशीच आतडय़ाची, बेंबीच्या देठापासूनची नाती होती. ज्या मातीत त्याची नाळ रुजली आहे, ते गाव दूर गेल्याची सल या कवितेत सारखी वाहते आहे. आता गावाकडे जाणाऱ्या वाटा विराण झाल्या आहेत. तेथील दुपार तर उदास आहेच; पण टाळांची धून असलेल्या पहाटेची खूणही हरवली आहे. घरभिंतींना तडे गेले आहेत. दारे खिन्न आहेत. खिडक्या मोडक्या झाल्या. अंगण उकरले आहे. गाईची गव्हाणे रिकामी आहेत. बैलांच्या पायांत त्राण उरले नाहीत. ओलावा सरून संपूर्ण जिंदगीच कोरडीठाक होऊ पाहतेय. डबघाईला आलेल्या गावाचे आणि लयाला गेलेल्या ग्रामसंस्कृतीचे अनेक संदर्भ या संग्रहात असे विखुरले आहेत : ‘सारे रान हे वसान, तोड ताड आमराई, दूरवर सावलीचा, कुठे मागमूस नाही’
ज्याच्या जिवावर सर्व व्यवस्थांचा गाडा चालतो, त्या शेतकऱ्याच्या जिवालाच आता घोर लागला आहे. त्यांच्या कष्टाला किंमत राहिली नाही. वावराच्या धुऱ्यावर रक्ताळलेले पाय घेऊन फिरणारा शेतकरी ‘खाई’ नावाच्या कवितेशेजारी एकाकी मूकपणे येऊन बसला आहे! ते चित्र पाहून जीव कासावीस होतो. ज्याच्या किंकाळीने धरतीही दुभंगून जावी अशा शेतकऱ्याचा हताशपणा वाचकाला अधिक स्पष्ट कळावा म्हणून की काय, यावलीकर कवितेसोबत इथे रेषांमधूनही त्याला साकारतात.. ‘खोपडीच्या निर्मिका रे, मारता तू किरकाई, दूभंगली भूई सारी, पुढे फक्त उरे खाई’!
हे असे गलबलणे आपल्या बधिर संवेदनांना जागे करते आणि मनावर करुणेची, वेदनेची एक अमीट रेघ ओढली जाते : ‘वात्सल्याचे वस्त्र। कारुण्याने ओले। अंतरंग झाले। विश्वरूप।। मानव्याचा झरा। कारुण्याची ओल। अंतरी कल्लोळ। वात्सल्याचा।।’
या कवितेत आत्मक्लेशाचा पीळ आहे, म्हणूनच ही कविता अभंग झाली आहे. आपल्या देहाच्या देहूत तळमळते तुकाराम जागे आहेत, असे कवी म्हणतो. या संग्रहातून बाहेर पडताना आपण या अशा श्रीमंत ओळी सोबत घेऊन येतो : ‘एका कोनाडय़ात मावे, माझे सामान केवढे, चार भिंतींचे हे घर, व्हावे आभाळा एवढे’!
‘पीळ’ – सुनील यावलीकर,
मीडिया वॉच पब्लिकेशन, मूल्य- १०० रुपये