जयंतराव खरेखुरे विज्ञानवादी होते. खरेखुरे म्हणजे उपग्रह प्रक्षेपण यशस्वी व्हावं म्हणून तिरुपती बालाजीला साकडं घालण्याची वेळ येईल, इतका बौद्धिक दुबळेपणा त्यांच्यात नव्हता. आणि खरेखुरे विज्ञानवादी असल्यानं नास्तिकही होते. पण नास्तिक असूनही समोरच्याचा आस्तिकतेचा हक्क नाकारण्याचा कर्कश्शपणा त्यांच्यात कधीही नव्हता…
अनेकांप्रमाणे ‘जयंत नारळीकर’ यांचं पहिलं काही वाचलं गेलं ते शालेय काळात. त्यांचं संशोधन, मांडलेले सिद्धांत वगैरे कळायचं वय नव्हतं. पण ते फार मोठे कोणी आहेत इतकं मात्र कळत होतं. शिक्षक, आसपासचे वगैरेंकडून नारळीकर हे कसे फार मोठे शास्त्रज्ञ आहेत असं कानावर यायचं सतत. आणि असं काही ऐकलं की ‘म्हणजे काय?’ असं काही विचारायची पद्धतही नव्हती तेव्हा आपल्याकडे. त्यांनी कसलं संशोधन केलं, त्यांनी मांडलेला सिद्धांत काय, वगैरे समजून सांगणारं शाळेत कोणी नव्हतं आणि असं काही समजावून सांगण्याची गरजही कधी कोणाला वाटत नव्हती. त्यात आपल्याकडची एखाद्याला चौकटीत मुडपून टाकण्याची सवय आणि निकड ! दोन्हीही फार. एकदा का असं एखाद्याला चौकटीत डांबून टाकलं की मग त्याच्यासारखं काही करायची, त्याच्याकडून काही घ्यायची/शिकायची जबाबदारी आपल्यावर अजिबात राहात नाही. मग अशा चौकटीत डकवलेल्याचा विषय कधी निघालाच तर मग आपण ‘‘त्यांचं काय बाबा…ते तर शास्त्रज्ञ.’’ वगैरे म्हणत हात झटकायला रिकामे. त्याच वातावरणातला असल्यानं ‘जयंत नारळीकर’ यांच्याशी कधी संपर्क होईल, संबंध येईल, संदर्भ तयार होईल, याचा कधी विचारही त्यावेळी मनात येण्याची शक्यता नव्हती. पण हे सगळं घडलं.
कॉलेजच्या काळात लिहिणं हा वाढत्या वयातल्या गरजेचा भाग बनलं. वाचन हे तसं आधीपासून होतं. वाचनानं मनाचं भांडं भरतं राहिलं की ते लिखाणात सांडत असावं. त्या टप्प्यावर नेमकं नारळीकरांचं विज्ञानाला ललिताची जोड देणारं लिखाण हाती पडत गेलं. शुद्ध वैज्ञानिक लिखाण करण्याइतकी माझी बौद्धिक प्राज्ञा नव्हती आणि तितका अधिकार तर अजिबात नव्हता. त्यामुळे विज्ञानाला हा असा ललिताचा बुरखा घालण्याचा प्रकार फारच भावला. त्याआधी (चांगलं) मराठी ललित लिखाण वाचनात होतं आणि सुगम इंग्रजी विज्ञान लिखाणाचा परिचय होत होता. ‘स्पेस ओडिसी’ लिहिणारे ऑर्थर क्लार्क, आयझॅक असिमॉव्ह हे आधी भेटले आणि आद्या ललित विज्ञान लेखक ‘टाइम मशीन’कार एच.जी. वेल्स यांची ओळख तशी नंतर झाली. पुढे पूर्ण वेळ पत्रकारितेत यायच्या आधी आकाशवाणीवर जयंत एरंडे वगैरेंच्या सौजन्यानं विज्ञानविषयक कार्यक्रम लिहिण्याची, त्यात सहभागी होण्याची संधी मिळत गेली. आणि या सगळ्याचा (दु)ष्परिणाम असा की असं काही ललित-वैज्ञानिक किंवा विज्ञान-ललित आपल्यालाही लिहिता येईल असं वाटू लागलं. त्यावेळी नवलेखकांसाठी तीन प्रभावक्षेत्रं होती. एक भावपूर्ण/भावगर्भ इत्यादी (आहे असं मानल्या जाणाऱ्या) अशा कविता लिहू लागायचे, ते न जमणारे चारोळ्यांना हात घालायचे, दुसरा वर्ग मध्यमवर्गीयांच्या भावविश्वाचा (?) वेध घेणाऱ्या (म्हणजे तसा दावा करणाऱ्या) कथा लिहायचा आणि तिसऱ्या गटातले यापेक्षाही तरल (की हलके?) होते त्यांच्यासाठी वात्रटिका हा पर्याय होता. यातला दुसरा पर्याय माझ्यासाठी जवळचा होता. त्याला विज्ञानाची जोड दिली की आपल्यालाही विज्ञानकथा लिहिता येईल, असं वाटलं. मी तसा प्रयत्न केलाही!
त्यामधल्या त्यातल्या त्यात बऱ्या म्हणता येईल अशा ‘तो’ या कथेला काही बक्षिसंबिक्षिसं मिळाली. ऐंशीच्या दशकातली ही कथा २०२५ नंतरच्या आयुष्याचं भविष्य हे वर्तमान झाल्यासारखं मांडते. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा शब्द जन्माला यायचा होता त्याच्या आधीचा हा काळ. त्या कथेतल्या संगणकाच्या ‘मनात’ भावना उत्पन्न होते आणि जे काही घडतं त्याची ही गोष्ट. ती प्रकाशित झाल्यावर दोन महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रतिक्रिया कळवली. एक डॉ. बाळ फोंडके आणि दुसरे साक्षात जयंत नारळीकर. या प्रतिक्रिया उत्साह वाढवणाऱ्या होता. पण मोठ्यांनी केलेल्या कौतुकात आपल्यातल्या कथित गुणापेक्षा त्यांच्या मनोदौऱ्याचा भाग अधिक असतो; याचं भान एव्हाना आलेलं. त्यामुळे त्यांनी केलेलं कौतुक तितकं काही मनावर घेतलं नाही. पुढे या दोघांमुळे आकारास आलेल्या निवडक विज्ञान कथासंग्रहात मान्यवरांच्या पंगतीत ‘तो’ला स्थान मिळालं. नंतर डॉ. फोंडके यांच्याबरोबर पत्रकारितेत काम करण्याची संधी मिळाली आणि डॉ. नारळीकरही सपत्निक भेटत गेले. प्रत्येक पुढची भेट ही आधीच्या भेटीत निर्माण झालेल्या त्यांच्याविषयीच्या चांगुलमताला अधिक बळकट करत गेली. पण ‘इकॉनॉमिक टाइम्स’मध्ये गेल्यावर तिथल्या कामाच्या स्वरूपामुळे डॉ. नारळीकरांना आवर्जून भेटायला जायची गरज कधी वाटली नाही.
‘लोकसत्ता’त आल्यावर मात्र पुन्हा तशी संधी वरचेवर मिळत गेली. एकदा त्यांना ‘आयडिया एक्स्चेंज’ला बोलवायचं ठरलं. पण जयंतरावांशी शेवटचा संपर्क साधला त्यानंतर मधे जवळपास १२-१५ वर्ष अशीच गेली. आता कशाला ते ओळखतील, हा प्रश्न. पण जुना मित्र आणि ‘लोकसत्ता’तला सहकारी मुकुंद संगोराम आणि नारळीकर कुटुंबीय एकमेकांना परिचित होते. त्यामुळे म्हटलं त्याचं बोट धरून जयंतरावांपर्यंत पुन्हा नव्यानं पोचूया. ‘लोकसत्ता’चं निमंत्रण देण्यासाठी त्यांच्या त्या विख्यात ‘दूधघड्याळ’ घरी गेलो. तिथे पुन्हा एकदा जाणीव झाली. आपल्या बौद्धिक उंचीचा भार जयंतराव किती सहजपणाने वागवतात, याची.
माझ्या मते त्यांचा हा सगळ्यात मोठा गुण. अत्यंत विलोभनीय असा. ते खरेखुरे विज्ञानवादी होते. खरेखुरे म्हणजे उपग्रह प्रक्षेपण यशस्वी व्हावं म्हणून तिरुपती बालाजीला साकडं घालण्याची वेळ येईल, इतका बौद्धिक दुबळेपणा त्यांच्यात नव्हता. आणि खरेखुरे विज्ञानवादी असल्यानं नास्तिकही होते. त्यांची ही नास्तिकता व्यक्तिश: मला खूप जवळची. पण नास्तिक असूनही समोरच्याचा आस्तिकतेचा हक्क नाकारण्याचा कर्कश्शपणा त्यांच्यात कधीही नव्हता. हा गुण त्यांच्याकडून अगदी आवर्जून घ्यावा असा. याविषयी विचारलं तर त्यांच्या उत्तरातला शांतपणा अगदी लोभस वाटे. त्यांचं म्हणणं अगदी साधं. ‘‘प्रयोग करून पाहा’’ किंवा ‘‘स्वत: तपासून घ्या’’ असं. त्यासाठी त्यांनी घरचंच उदाहरण दिलं. मुलीसाठी एकदा गाडी घ्यायची वेळ आली तर ‘चांगला दिवस’ पाहून गाडीची डिलिव्हरी घेण्याचा सल्ला विक्रेत्यानं दिला. त्यावर चांगला दिवस, मुहूर्त वगैरे असं काहीही नसतं. सगळी घटका-पळं एकसारखीच असतात, हे त्या दुकानदाराला सुनावण्याच्या फंदात जयंतराव पडले नाहीत, की त्यांची चिडचिडही झाली नाही. चांगला मुहूर्त वगैरे असं काही नसतं याचा वस्तुपाठ त्यांना मुलीलाही द्यायचा होता. त्यासाठी त्यांनी इतकंच केलं…गाडीची डिलिव्हरी सर्वपित्री अमावास्येला घेतली. ‘‘ती गाडी आणि मुलगी दोघीही उत्तम आहेत.’’, ‘लोकसत्ता’त गप्पा मारताना त्यांची त्यावर अशी प्रतिक्रिया. ‘‘आम्ही एकच नियम पाळतो. घरात कोणतीही इलॉजिकल गोष्ट करत नाही.’’, हे मंगलाताईंचं त्यावर म्हणणं.
अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तितक्याच आत्यंतिक साधेपणानं सहज मांडणं हे या दोघांचं कसब कौतुकास्पद. एकदा त्यांना म्हटलं…तुम्ही इतके मोठे शास्त्रज्ञ, पत्नी गणिती, तुमचे मामाही मोठे कर्तृत्ववान, वडिलांचंही तसंच…तर या इतिहासाचं ‘खानदान की इज्जत’ राखण्याचं दडपण तुमच्याकडून तुमच्या मुलींवर येतं का? त्यावर त्यांचं उत्तर भारी होतं: शर्यतीत धावणाऱ्या घोड्याची मुळीच इच्छा नसते आपण पहिलं यावं अशी… तो आग्रह त्याच्या मालकाचा आणि वरच्या स्वाराचा…!
त्यांच्या मनानं मंगलाताई अशी काही गंमत वगैरे करायच्या फंदात पडत नसत. गणित हा आवडीचा विषय असल्यानं असेल बहुधा. त्या थेट मुद्द्याला येत. दोघांच्या स्वभावातल्या फरकातही गंमत होती. म्हणजे दोघांच्याही मोबाइलवर दोघांनाही एकच मेसेज केला की मंगलाताईंचं उत्तर लगेच यायचं. जयंतरावांच्या उत्तरासाठी कधी दोन-तीन तासही लागायचे. जयंतराव आपला विषय सोडून अन्य काही विषयांवर व्यक्त होण्याच्या फंदात पडायचे नाहीत. मंगलाताईंचं तसं नसायचं. वेगवेगळ्या विषयांवर त्या मोकळेपणानं मेसेज करत. बोलत. आग्रह केला की लिहीतही. ‘लोकसत्ता’च्या त्या नियमित लेखिका. आता एका गोष्टीची खूप खंत वाटते. महाराष्ट्रातल्या गणित शिक्षकांसाठी एक तरी शिबीर, कार्यशाळा घ्यायची त्यांची इच्छा होती. ‘‘गणित शिकवावं कसं?’’ इतकाच विषय. त्यावर त्यांनी लेखमाला केली; पण असा प्रत्यक्ष कार्यक्रम काही करता आला नाही. आपल्याकडे ‘गणितबळीं’ची भयानक संख्या पाहिली की हा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांच्या शिकवणीची गरज लक्षात येते. तसं एखादं तरी शिबीर घेता यायला हवं होतं. आता मंगलाताई नाहीत. आणि जयंतरावही गेले. त्या दोघांचा एकत्र विचार केला की पुल-सुनीताबाईंची आठवण यावी. जयंतराव हे पुलंइतके अघळपघळ नसतीलही; पण मंगलाताई मात्र सुनीताबाईंइतक्या तर्ककठोर नक्कीच होत्या. एकदा त्यांचा मेसेज आला: मला पुन्हा कॅन्सर डिटेक्ट झालाय; उपचारात वेळ जाईल. आता वेळ आहे, तर एक लेख लिहिलाय. प्रसिद्ध करता येईल का?
तो त्यांचा शेवटचा लेख ठरला. खरं म्हणजे कोण नाही म्हणालं असतं त्यांना? फोन करायचा असेल तरीही आधी मेसेज. स्वत:कडे इतक्या करकरीतपणे पाहण्याची या दोघांची ताकद अनुकरणीय; अशी. साहित्य संमेलनाला चार वर्षांपूर्वी जयंतराव यांनी जातीनं जायला हवं होतं, असं माझं मत. नाशकातल्या त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ त्यासाठी फार प्रयत्न करत होते. अनेकांना त्यांनी जयंतरावांना गळ घालण्यासाठी सांगून पाहिलं. अगदी हेलिकॉप्टरने न्यायची आणि लगेच आणून सोडायचीही त्यांची तयारी होती. मी त्यावेळी भुजबळांना म्हटलं…मंगलाताई जर नाही म्हणाल्या असतील तर काहीही उपयोग होणार नाही तुमच्या प्रयत्नांचा ! ते म्हणाले…हो.. मंगलाताई तयार नाहीत. जयंतरावांची प्रकृती, त्यांचा स्वत:चा आजार आणि करोनाची पूर्ण दूर न झालेली काळी सावली ही मंगलाताईंच्या विरोधाची कारणं. खरीच होती ती. त्या संमेलनातलं जयंतरावांचं भाषण अप्रतिम म्हणावं असं. ते त्यांनी तिथे जाऊन दिलं असतं तर बरं झालं असतं, असं मत असल्यामुळे त्यावरच्या संपादकीयात त्यांच्यावर हलकी टीका केली. नंतर वाटलं, मंगलाताईंना आवडणार नाही…! त्यावर त्यांचं मत कळलं नाही; पण इतरांच्या अशा टीकेच्या अधिकाराबाबत त्यांनी कसलीही तक्रार कधी केली नाही. ‘‘आमच्यावर टीका करणारा हा कोण’’ वगैरे आविर्भाव उभयतांचा कधीही नव्हता. ही खरी सर्वसमावेशकता !
सकाळी चालायला जाताना त्यांच्या हाती एक कापडी पिशवी असे. रस्त्यात प्लॅस्टिकची पिशवी, बाटली दिसली की हातातल्या पिशवीत जमा करून त्या कचऱ्यास ते योग्यस्थळी मुक्ती देत! आणि हे केवळ ‘फोटोऑप’साठी नाही; हे महत्त्वाचं ! जगण्यात कायम एक सत्शील, नेमस्त प्रामाणिकपणा! कर्तव्याची जाणीव इतकी की त्यांच्या वडिलांचं निधन झालं त्याच दिवशी त्यांनी एक व्याख्यानाचं निमंत्रण आधीच स्वीकारलेलं; पण आयोजकांची अडचण व्हायला नको म्हणून त्याही परिस्थितीत जयंतरावांनी आपल्या व्याख्यानाचा दिवस आणि वेळ पाळली.
…आणि अशी व्यक्ती जेव्हा जाते त्या दिवशी देखील त्यांनी स्थापन केलेल्या ‘आयुका’त सुटी न घेता नेहमीसारखंच काम होतं; याची ‘बातमी’ होते. ती वाचल्यावर जेआरडींच्या निधनाचा प्रसंग आठवला. आपल्याला भारतात मरण येऊ नये, अशी त्यांची इच्छा होती. का? तर आपल्या निधनवार्तेनं हातातलं कामधाम सोडून सगळे अंत्यदर्शनासाठी धावतील. असं होणं त्यांना मान्य नव्हतं. जेआरडींचं निधन स्वित्झर्लंडमधे झालं आणि ते गेले त्या दिवशीही टाटा समूहात सगळे नेहमीसारखेच कामावर होते.
हे असं आसपासचं जग आहे तसं, त्याच्याविषयी अजिबात कुरकुर न करता गोड मानून घेत जगता येणं…हा गुण या अशांकडून शिकावा असा. आपल्या आसपास अंधश्रद्धाळूंचा धुमाकूळ वाढत चाललाय, विद्यावंतांपेक्षा भोंदूबाबांनाच सध्या बरे दिवस आलेत वगैरे पाहून जयंतराव-मंगलाताईंची चिडचिड होत नसेल? असेलच. पण आपल्यासारख्या तर्कवाद्यांप्रमाणे तर्कशून्यांच्या अस्तित्वाचा अधिकार त्यांना सहजपणे मान्य होता. आपल्याला जग बदलायचं आहे, असा अट्टहास त्यांचा कधीच नव्हता. मी हे जग माझ्यापुरतं तरी सुंदर करून जाईन…इतकंच त्याचं सांगणं. आणि तसंच त्यांचं जगणं.
हे असं आपल्याआपल्यापुरतं तरी सुंदर होता आलं आपल्याला तरी या अशांचं आपल्यातलं अस्तित्व सुफळ संपूर्ण होईल !
(girish.kuber@expressindia.com, X@girishkuber)