डेन्मार्कमधील एका गावात लिंडा व जिनी या दोघी मैत्रिणी राहत असत. दरवर्षी त्यांच्या गावात जत्रा भरत असे आणि त्या जत्रेत वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा घेतल्या जात. त्यात सायकलची शर्यत, पळण्याची शर्यत, बादलीत बॉल टाकणे, फुगे फोडणे अशा विविध प्रकारच्या स्पर्धा असत.
लिंडा, जिनी आणि त्यांच्या इतर मैत्रिणी जत्रेची आणि त्यातल्या स्पर्धांची तयारी करत होत्या. त्या सर्वांची त्यासाठी खूप गडबड चालू होती. आकाशातल्या ढगातील पावसाचे थेंब वरून ही सगळी मजा बघत होते. त्यांना वाटायला लागले की, आपणही या जत्रेतल्या खेळात भाग घ्यावा. पावसाच्या थेंबांची आणि लिंडाची चांगली दोस्ती होती. मग पावसाचे थेंब ढगातून हळूच खाली आले आणि लिंडाला म्हणाले, ‘‘मलाही तुमच्या खेळात भाग घ्यायचा आहे.’’
लिंडा त्याला म्हणाली, ‘‘आता फक्त पळण्याच्या शर्यतीत एक जागा शिल्लक आहे, त्यात तू भाग घेऊ शकतोस.’’ हे ऐकून पाऊस खूश झाला आणि आनंदात शिट्टी मारत परत ढगात जाऊन बसला. इकडे पाऊस खाली आल्यामुळे जिनी भिजली आणि पळत पळत घरात गेली. तिनं कपडे बदलून स्वत:साठी गरम कॉफी बनवली आणि कॉफीचा कप घेऊन फायर प्लेसशेजारी जाऊन बसली. कॉफी पिताना ती आणि विस्तव गप्पा मारायला लागले. जिनी विस्तवाला जत्रेतल्या खेळाच्या गमतीजमती सांगायला लागली. ते ऐकून विस्तव तिला म्हणाला, ‘‘मलाही तुमच्या खेळात भाग घ्यायचा आहे.’’
जिनी म्हणाली, ‘‘हो जरूर ये. पळण्याच्या शर्यतीत एक जागा शिल्लक आहे, त्यात तू भाग घेऊ शकतोस.’’
पाऊस थांबल्यावर जिनी बाहेर आली आणि लिंडाला म्हणाली, ‘‘आपल्या पळण्याच्या शर्यतीत एक जागा शिल्लक होती ती आता भरली आहे. विस्तवाला त्यात भाग घ्यायचा आहे म्हणून मी त्याला ये म्हणून सांगितले.’’
त्यावर लिंडा म्हणाली, ‘‘अरे, गोंधळ झाला! मगाशी पाऊस आला होता, त्यालाही जत्रेतल्या खेळात भाग घ्यायचा आहे. त्यानं मला विचारल्यावर मी त्याला पळण्याच्या शर्यतीत ये असं सांगितलं. आता चांगलीच पंचाईत झाली की. आपण आता त्या दोघांपैकी कोणाला शर्यतीत घ्यायचं?’’
लिंडा व जिनीनं ही गोष्ट स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या इतर मैत्रिणींना सांगितली व त्यावर त्यांचा सल्ला विचारला. त्या सर्वांनी विचार करून असं ठरवलं की विस्तव आणि पाऊस या दोघांचीच वेगळी पळण्याची शर्यत लावायची. त्यात जो कोणी जिंकेल त्याला जत्रेतल्या स्पर्धेत भाग घेता येईल. जिनी व लिंडाला ते पटलं व त्यांनी तसं विस्तव व पावसाला सांगितलं. सगळा बेत पक्का झाला.
दुसऱ्या दिवशी सगळे जण पाऊस आणि विस्तवाची पळण्याची शर्यत बघायला हजर झाले. शर्यत जिथे संपणार होती तिथे जिनी आणि लिंडा जाऊन बसल्या. आकाशात ढग जमले होते, विस्तवदेखील शर्यतीसाठी तयार होता. ड्रम वाजवून शर्यतीची सुरुवात करण्यात आली. ड्रम वाजल्याबरोबर विस्तवानं पळायला सुरुवात केली. आकाशातून ढगही त्याच्याबरोबर पळायला लागले. विस्तव निम्मे अंतर पार करून गेला तरी अजून पावसाचा पत्ता नव्हता. लोकांना काही कळेना. त्यांना वाटलं, पाऊस बहुतेक विस्तवाला घाबरला असावा.
विस्तव आता अगदी शेवटच्या टप्प्याजवळ पोचला. आता तोच शर्यत जिंकणार असं सर्वांना वाटू लागलं, तेवढ्यात ढगातून गडगडाट झाला आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. पावसाच्या पाण्यानं जोरजोरात पळणारा विस्तव विझून गेला. पाऊस शेवटचा टप्पा ओलांडून अंतिम रेषेच्या पलीकडे गेला. पाऊस शर्यत जिंकल्यामुळे तो जत्रेतल्या पळण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र ठरला. सर्वांनी टाळ्या वाजवून पावसाचं अभिनंदन केलं. पाऊस आणि विस्तवाचं तेव्हापासून जे वाकडं झालं ते कायमचंच. म्हणूनच ते दोघे आपल्याला एके ठिकाणी कधीच दिसत नाहीत.
(डॅनिश कथेवर आधारित)
mrunal mrinaltul@hotmail.com