माधवी वैघ
केवळ आवड म्हणून विद्यापीठात दृक्श्राव्य भाषेसाठीच्या पटकथा लेखनाच्या शिबिरात पोहोचलेली शिक्षिका डॉक्युमेण्ट्री या माध्यमाची ताकद ओळखते. दुर्लक्षित राहिलेल्या विषयांवर माहितीपट तयार करून चक्क राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारते. एका प्राध्यापिकेच्या माहितीपटांचा प्रवास…

मी काही रीतसर फिल्म इन्स्टिट्यूट किंवा तत्सम संस्थेतून शिक्षण घेतले नाही. पण लहानपणापासून दृक् -श्राव्य माध्यमाचे आकर्षण होते. हे सिनेमावाले काहीतरी अद्भुतरम्य निर्माण करतात असे ‘प्रभात’चे सिनेमे बघितल्यानंतर वाटायचे. पुढे आकलनाच्या वयात पुण्याच्या फिल्म अर्काइव्ह्जमधे काही उत्कृष्ट चित्रपट, माहितीपट पाहिले. त्यामध्ये सत्यजीत रे हा मनात ठसलेला दिग्दर्शक! त्यांची पंडित रविशंकर यांच्यावरील डॉॅक्युमेण्ट्री बघितली आणि मी माहितीपट या आकृतिबंधाकडे आकर्षित झाले. पुढे काही योगायोग असे घडले, की माझा या माध्यमाशी थेट संबध आला.

former femina editor vimla patil passes away vimla patil life information
व्यक्तिवेध : विमला पाटील
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Student told Hilarious Math Full Form funny Answer
MATHS चा फुल फॉर्म माहितेय? विद्यार्थ्याने दिले भन्नाट उत्तर, पाहा Viral Video
wardha microvascular plastic surgery marathi news
प्लास्टिक सर्जरीने संभाव्य अपंगत्वावर मात, विदर्भात फक्त इथेच…
Student Support Committee Pune  organization working for needy students
स्कॉलरशिप फेलोशिप: ‘विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे’; गरजू विद्यार्थ्यांचा पुण्यातला हक्काचा आधारवड
teacher, teacher latest news, Wardha,
‘तुमचे नुकसान भरून काढू, पण एक दिवस सुट्टी घेऊ द्या’, शिक्षक करताहेत विनंती
How to prepare for JEE Main 2025
JEE Main 2025 परीक्षेचा विद्यार्थ्यांनी घरबसल्या अभ्यास कसा करावा?
कुलगुरू पदाची अवनती जुनीच… डॉ. रानडे हे त्यातील नवे पान!

डॉ. भा. दि. फडके हे माझे पीएच.डी.चे मार्गदर्शक. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझे काम सुरू असताना त्यांनी मला विचारले, ‘तुम्ही विद्यापीठातील ई.एम.आर.सी.ने आयोजित केलेल्या दृक् -श्राव्य भाषेसाठीच्या पटकथा लेखनाच्या एक महिन्याच्या शिबिरात भाग घेणार का? शर्ले व्हाईट नावाच्या बाई हे शिबीर घेणार आहेत.’ माझ्या मनात आले, सर म्हणत आहेत तर करावं. शर्ले व्हाईट यांच्या शिबिरात मिळालेल्या शिक्षणाचे ठसे मनावर अजूनही आहेत. आज दृक् भाषेचा अभ्यास गांभीर्याने केला जातो किंवा त्यासाठी इतकी शिस्तबद्ध शिबिरे घेतली जातात की नाहीत माहीत नाही. पण बाईंनी आम्हाला एखादा परिच्छेद देऊन त्याचा चित्र शैलीत विचार कसा कराल, याचा सराव आमच्याकडून करून घेतला. आपण ज्या दृक् -श्राव्य माध्यमाचे शिक्षण घेणार आहोत त्यात भाषेचा म्हणजे शब्दांचा किती आणि कसा सहभाग असावा याचे रीतसर शिक्षण आम्हाला दिले. त्या शिबिरात ‘संहिता लेखना’तील पुष्कळ प्रयत्न त्यांनी मोडीत काढले. जर दृक् भाषेत तुम्हाला तुमच्या विषयाची मांडणी करावयाची असेल, तर कॅमेऱ्याची साद्यांत माहिती तुम्हाला असायला हवी आणि तो वापरण्यासाठी आवश्यक ते ज्ञानही हवे. तुम्ही जे चित्र टिपणार आहात ते पडद्यावर येताना त्याला वापरण्यात येणारे संगीत, रंगसंगती, दृश्याची फ्रेम या साऱ्याचा सांगोपांग परिचय त्यांनी करून दिला. नंतर त्यांनी आमचे ५/६जणांचे गट पाडले आणि त्या गटांमध्ये चक्क लहानपणी शाळेत खेळलेले खेळ त्यांनी घेतले. याशिवाय त्यातील एकेकाला संहिता, कॅमेरा, दिग्दर्शन, ध्वनी यांची जबाबदारी वाटून दिली. त्यामुळे प्रत्येक जण आपसूक या बाबींमध्ये निष्णात झाला. त्यांच्यात स्पर्धाही घेण्यात आल्या, ज्यामुळे प्रत्येक गटामधील संघभावना वाढीस लागली. कारण माहितीपट बनवणे किंवा चित्रपट बनवणे ही शेवटी एक ‘सांघिक कला’ आहे. कारण ती झालेली किंवा होऊ घातलेली कलाकृती ही एकट्याची कधीच असू शकत नाही. माझ्या माहितीपटनिर्मितीची सर्व सिद्धता त्या शिबिरात अर्ध्याहून अधिक झाली. त्यानंतर सरांनी आणखी एक चांगली वाट मला दाखवली. मला म्हणाले, ‘आता तुम्हाला या माध्यमाची ओळख तर झाली, पण आता सराव होणे तितके महत्त्वाचे! तेव्हा तुम्ही असे करा की फिल्म इन्स्टिट्यूटचे एक विश्राम रेवणकर नावाचे प्राध्यापक आहेत ते माहितीपट बनवतात. त्यांच्याकडे संहिता लेखनासाठी तुम्ही जावे असे मला वाटते.’ मी त्यांच्याकडे संहिता लेखनाची सुरुवात केली.

त्यानंतर फर्गसनमध्ये मी प्राध्यापक म्हणून काम करीत असताना माझ्याकडे संगीतकार राहुल घोरपडे एक प्रकल्प घेऊन आले. त्यांनी ‘कवी शब्दांचे ईश्वर’ या मालिकेचा विषय माझ्या समोर ठेवला. ‘अनन्वय’ ही आमची संस्था कावितेसाठी काम करीत होतीच. त्याला पूरक असेच हे काम होते. तोपर्यंत मला माहितीपट निर्मितीसाठी ज्ञान मिळालेले होते. हे काम सोपे नव्हते आणि आमचा कस बघणारेही होते. पण धोके पत्करूनही आणि अनेक अडचणींना दूर करत आम्ही ही कवींवरची मालिका अत्यंत परिश्रम आणि जिद्दीने पूर्ण केली. या निमित्ताने महाराष्ट्रातील तेरा कवींवर हे काम झाले. आरती प्रभु, इंदिरा संत, मंगेश पाडगांवकर, विंदा करंदीकर, वसंत बापट, ग. दि. माडगूळकर, शांता शेळके, सुरेश भट, ना. धों. महानोर, पु. शि. रेगे, नारायण सुर्वे, ग्रेस आणि कुसुमाग्रज या तेरा कवींवर आम्ही ही मालिका दूरदर्शनसाठी सादर केली. त्याचे शूटिंग प्रत्येक कवीच्या घरी जाऊनच करायचे असे ठरवले.

मॉडर्न कॉलेजमध्ये मी मराठीची प्राध्यापिका म्हणून दोन वर्षे काम केले. तेव्हा मला एम.ए.ला विभावरी शिरूरकर/ मालतीबाई बेडेकर हा विषय स्पेशल ऑथर म्हणून शिकवायचा होता. माझ्या शिकवण्याच्या प्रक्रियेत आता कॅमेराही मदतीला सज्ज झाला होता. मला असे वाटून गेले की, या कॅमेऱ्याच्या मदतीने मी हा विषय या विद्यापीठातल्या अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकेन. मी मालतीबाईंच्याकडे गेले. त्यांना आणि विश्राम बेडेकरांना हा विषय बोलून दाखवला. स्वत: विश्राम बेडेकर हे डॉक्युमेण्ट्री मेकिंगमधील राजा माणूस! त्यांना माझा विचार आणि विषय एकदम पटला. पण मालतीबाईच तयार होईनात. बेडेकर मला म्हणाले, ‘अहो! ती ‘हो’ म्हणेल हो! तिला समाजासमोर व्यक्त व्हायला आवडते मनापासून. ९१वर्षांच्या मालतीबाई माझ्या माहितीपटाच्या हिरॉईन होत्या. आणि त्या दोघांच्या संवादांचा आस्वाद घेणे हा तर एक सुखद आणि श्रीमंत करणारा अनुभव होता. विश्राम बेडेकरांशी चर्चा करताना या निर्मिती क्षेत्रातल्या अनेक गोष्टी त्यांनी मला अत्यंत प्रेमाने समजावून दिल्या. तोदेखील एक फार मोठा लाभ मला झाला.

याशिवाय माझ्या वडिलांना प्रिय असणाऱ्या दोन विषयांवर मी माहितीपट केले. पहिला ‘मराठी संगीत नाटकाची वाटचाल’ – निर्मात्या सरिता वाकलकर होत्या. हा माहितीपट पाहून माझ्याकडे दिल्लीचे हरीश पळसुले आले आणि त्यांनी भारताच्या ‘कल्चरल अफेअर्स ऑफ मिनिस्ट्री’ या खात्यातर्फे ‘मराठी नाट्यसंगीताची वाटचाल’ हा माहितीपट करण्याची इच्छा दर्शवली. त्याचं अँकरिंग निर्मला गोगटे यांनी केले. आणि तो विषयही या माहितीपटात समाधानकारक पद्धतीने मांडला गेला. या माहितीपटांबरोबरच ‘सफर वनराईची- (भाग १ आणि २) हा माहितीपट आम्ही ‘वनराई’तर्फे काढला. आणि मोहन धारियांनी स्वत: तो विषय माहितीपटात मांडला. तसेच ग. प्र. प्रधान यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाची कहाणी ‘भारताचा स्वातंत्र्य संग्राम’ या माहितीपटात निवेदनातून मांडली गेली.

माहितीपटाचा विषय कोणताही असो, तुमचा त्याविषयी साद्यांत अभ्यास होणे अतिशय गरजेचे आहे. उदा.‘कवी शब्दांचे ईश्वर’ किंवा ‘इट्स प्रभात’ सारखे मोठे विषय हाताळताना मला हे कसून करावेच लागले. दिलेल्या मर्यादित वेळात हे विषय मांडताना तुमचा अभ्यास जर पुरेसा झाला असेल तर अडचण येत नाही. ‘कवी शब्दांचे ईश्वर’ विषयी सांगायचे झाले तर माझ्या हाताशी प्रत्येक कवी मांडताना फक्त २३ मिनिटे होती. या मर्यादित वेळेत तो कवी मांडताना मला माझा प्रत्येक कवीवर झालेला अभ्यास फार उपयोगी पडला. ‘प्रभात’सारखा महत्त्वाचा विषय मांडतानाही मला माझ्या संशोधनाचा खूप उपयोग झाला कारण तो विषय पेलणे आणि मर्यादित वेळात मांडणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे होते. विश्राम बेडेकरांनी एक महत्त्वाची सूचना मला केली होती की, कोणत्याही प्रेक्षकाला तुमची कलाकृती बघताना कंटाळा आला की समजावे आपण कुठेतरी विषय मांडताना चुकलो आहोत. यासाठी पटकथा फार विचारपूर्वक आखावी लागते. माहितीपटाचा प्रेक्षक, लक्ष्यगट कोणता आहे याचा विचारही अगत्याने करावाच लागतो. तो विषय मांडताना प्रत्येक मिनिट महत्त्वाचे आहे याचे भान ठेवावेच लागते. विषय मांडताना त्याचे स्वरूप काय असावे याचाही विचार करावा लागतो. माझ्या सर्व कामात मी त्या त्या व्यक्तींची मुलाखत ‘ऑफ दि कॅमेरा’ प्रश्न विचारूनच घेतलेली आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेचा पुरेपूर उपयोग त्या विषय मांडणीसाठीच मला करता आला.

माझी विषय शिकवण्याची एक विचित्र खोड आहे. मी कोणताही विषय दहा बाय दहाच्या खोलीतच फक्त शिकवत बसत नाही. मला तो विषय शिकवण्याच्या विविध गोष्टी सुचत असतात. माझे अनेक विद्यार्थी यामुळे खूश असत. मला ‘कविराय राम जोशी’ शिकवायचे होते. त्यांच्यावर एक चांगला सिनेमा आहे आणि तो ‘प्रभात फिल्म कंपनी’ने काढलेला आहे या समजुतीने मी थेट प्रभातच्या दामल्यांचे घर गाठले. तिथे अरुणाताई दामले यांना भेटले तेव्हा तो सिनेमा व्ही. शांताराम यांनी काढलेला आहे असे समजले. मग बोलण्याबोलण्यामधे त्यांना ‘प्रभात’वर फिल्म काढायची आहे हे कळले. मी आजवर केलेल्या माहितीपटांविषयी त्यांना माहिती होती. ते काम त्यांना आवडले आणि ते काम त्यांनी मला दिले. मला फारच आनंद झाला. प्रभातचे कवी शांताराम आठवले माझ्या माहेरच्या घराच्या अगदी शेजारीच राहात होते. माझे वडील भा. नी. पटवर्धन बालगंधर्वांच्या उतारवयात त्यांना ऑर्गनची साथ करीत असत, त्यामुळे ते मास्टर कृष्णराव, गोविंदराव टेंबे यांची प्रभात चित्रातली गाणी नेहमीच ऑर्गनवर गाऊन वाजवीत असत. आणि शाळेत असताना आम्हाला दरवर्षी प्रभातचे सिनेमे शाळेतर्फे दाखवण्यात येत असत. शिवाय प्रभात चित्रांचे सप्ताह लागत असत. ते फारच आवडीचे झाले होते. लहानपणापासून आवडत्या असणाऱ्या विषयावर माहितीपट करायचा म्हटल्यावर मन आनंदित झाले, पण हे काम स्वीकारण्यात प्रचंड आव्हानही वाटले. मग भरपूर अभ्यास करून चित्रीकरणाला प्रारंभ झाला. या कामातली मानसिक गुंतवणूक खूपच मोठी आणि मन:पूर्वक होती. त्याचे फळही चांगले मिळाले. २००५ साली या माहितीपटाला आणि मलाही राष्ट्रीय फिल्म महोत्सवात माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलामांच्या हस्ते गौरविले गेले.

चित्रपट किंवा माहितीपट निर्मितीकला ही सांघिक असते याचा या क्षेत्रात काम करणाऱ्या कोणीही विसर पडू द्यायचा नसतो. आणि तेच खरे या कलेच्या यशस्वितेचे गमक असते, हे जर लक्षात ठेवले तर हाती घेतलेले काम एकोप्याने आणि अतिशय चांगले होऊ शकते हा माझा अनुभव आहे. मी पुण्याच्या ‘बार्स अँड टोन’ या टीमला बरोबर घेऊन हा माहितीपट बनवला. कॅमेरामन होते वीजेंद्र पाटील, एडिटर होते संजय दाबके आणि ध्वनिमुद्रण केले होते अतुल ताम्हनकर यांनी. या माझ्या टीमचा माझ्या यशात फार मोठा वाटा आहे. ‘प्रभात’चे दामले या माहितीपटाचे निर्माते होते.

माझ्या माहितीपटांच्या निर्मितीमागे व्यवसाय करणे हे प्रमुख ध्येय नव्हते. दस्तावेजीकरणाचे महत्त्वाचे काम आपल्या हातून झाले पाहिजे हे सूत्र होते आणि तसे घडून आले ही फार समाधानाची गोष्ट आहे. अर्थातच हे काम खूप खर्चीक आहे. तरीही एक मराठीची प्राध्यापिका म्हणून हे सर्व आपण करायला हवे, या एकाच भावनेने प्रेरित होऊन हे काम माझ्याकडून कोणीतरी करवून घेतले अशी माझी भावना आहे.

माहितीपट हे माध्यम अतिशय शक्तिशाली आहे, पण याचा व्हावा तसा जाणीवपूर्वक उपयोग आपल्याकडे होत नाहीए. एखाद्या विषयाची माहिती देणे आणि एखाद्या विषयाची माहिती घेणे हे दोन्ही प्रकार अतिशय महत्त्वाचे आहेत, पण खूप दुर्लक्षित राहिलेले आहेत. आपण एखादा सिनेमा अगदी सुमार दर्जाचा असला तरी त्याचे स्वागत करू शकतो; पण एखादा माहितीपट कितीही उत्कृष्ट असला तरी त्याची दखल फारशी घेत नाही. आजही प्रत्येक विषयाच्या ज्ञान शाखेत माहितीपटांचा चांगला उपयोग करून घेतला जात नाहीये. अशा प्रकारचा उपयोग आज आपल्याकडे सर्व साधने उपलब्ध असताना झालाच पाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे. हे जेव्हा कधी होईल, तो सुदिन असेल.

madhavivaidya@ymail.com