अतुल पेठे
अंतर्यामी अस्वस्थता ही आजच्या आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा भाग बनलीय. समाज अभ्यासक त्यावर काम करीत असतीलही, पण त्यांच्याहाती निष्कर्ष काढण्यापलीकडे काय असू शकते? व्यसने, अंधश्रद्धा, बथ्थडपणा, असंवेदनशीलता, असहिष्णुता, अस्थिरता यांच्या भोवऱ्यात सापडलेल्या समाजाचे निरीक्षण आजचा सजग रंगकर्मी आपल्या नोंदींमधून कसा करतोय? त्याला दिसतायत त्या माणसांच्या जथ्थ्यात आपल्या प्रत्येकाला आपण कुठे दिसतोय?

ज अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी अस्वस्थ वाटत आहे. मात्र अनेकांना अस्वस्थ वाटतही नसेल किंवा आपण अस्वस्थ आहोत हे कदाचित कळत नसेल. शक्यता अनेक आहेत. पण अनुभव असा की, बऱ्याच लोकांना काम करताना, झोपताना आणि श्वास घेतानासुद्धा कसला तरी त्रास होत आहे. त्रागा, ताणतणाव, चिडचिड, नकोसेपण, हताशपण, असह्य होणे, संताप होणे, आत्महत्या किंवा खून करावा असे मनात वाटत आहे. मन, शरीर आणि आजूबाजूचे जग यातील काही तरी हरवले आहे असे जाणवत आहे. क्षणाक्षणागणिक साचून राहणाऱ्या अस्वस्थतेने कडवट आजारपण येत आहे. अनेक माध्यमांतून बदाबदा कोसळणारे ऐकायला, पाहायला आणि समजावून घ्यायला मेंदू कमी पडत आहे. या स्थितीत हतबलता येत आहे. नेमकं काय करावं हे काही सुधरत नाहीये. परिणाम असा की कसेही बोलले आणि वागले जात आहे. भावना भडकत किंवा बथ्थड होत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाऊन मन बिथरू लागलेय. व्यक्तीव्यक्तीचे असे होत आहे, म्हणजे पुरत्या समाजाचेच होत आहे असे आपण म्हणू शकतो.

व्यसने, अंधश्रद्धा, बथ्थडपणा, असंवेदनशीलता, असहिष्णुता, अस्थिरता या साऱ्यातून बिथरलेले आणि बिघडलेले मन प्रकट होत आहे. कोणाला भीती वाटत आहे तर कोणाला भास-भ्रम. कोणाला संशय येत आहे तर कोणाला नकोसेपण. कोणी ‘वेटिंग फॉर गोदो’तल्या ‘लकी’ या पात्राप्रमाणे अनियंत्रित अती बोलते तर कोणी गप्प झाले आहेत. काही लोक त्रास देत आहेत तर काही लोकांना त्रास होत आहे. काहींना पैसे, परिस्थिती, उपलब्धता, संधी, राजकीय प्रभाव यामुळे शक्तिशाली वाटत आहे तर काहींना शक्तिहीन आणि दिशाहीन वाटत आहे. असे विविध प्रकार आहेत. कोणीही कुठल्याही बाजूचे असो, अंतर्यामी अनेक लोक अस्वस्थ आहेत. कदाचित हे सारे जगभर असेल. आताचा काळ हा अनेक प्रश्नांच्या तंगड्यात तंगड्या अडकून गच्च गुंतलेला आहे. मुद्दा असा की यात आपले काय होत आहे? आपल्या मनाची फरफट काही होतेय का? आत्ताच्या नव्या जगाला सामोरे जाताना आपलेही मन आजारी पडले आहे का? मन बिघडलेल्या जनतेची आकडेवारी माझ्याजवळ नाही. पण ती जरी नसली तरी जगण्यातले रोजचे विविध अनुभव सौम्य, मध्यम वा गंभीर मानसिक आजारपणाची लक्षणे दाखवत आहेत. नागरिक आणि लेखक म्हणून जमतील तशा ‘आजारी समाजाच्या नोंदी’ मी करू लागलो. त्या अशा…

कोणाचातरी सतत द्वेष करणे हे मोठे आजारी लक्षण सध्या दिसत आहे. सर्वसामान्य माणसे सहज छोट्या गोष्टीवरून एकमेकांना नष्ट करण्याची भाषा बोलत आहेत. राष्ट्र अणुयुद्ध करून बेचिराख करण्याच्या वल्गना करत आहेत. कोणालातरी शत्रू म्हणून उभे केल्याशिवाय जणू जगताच येत नाही अशी अवस्था आहे. एकमेकांतील संभाषण, मोबाइल, टीव्ही, वर्तमानपत्र, भाषणे, धार्मिक उत्सव या सर्व माध्यमातून विद्वेष पसरवला जात आहे. सतत युद्धाच्या तयारीत राहा असा शंखनाद ठिकठिकाणी केला जात आहे. खरं तर माणसांना आजची परिस्थिती आणि वास्तव दिसू नये हा घाट आहे. मात्र यातून विखारी द्वेष शिकवणारे आणि शिकणारे दोन्ही लोक मानसिक आजारी पडत आहेत.

***

सतत अनाहूत भीती वाटणे आणि दाखवणे हेही एक तीव्र स्वरूपाचे लक्षण आहे. कोणीतरी आपल्या वाईटावर आहे, हल्ला करणार आहे, लढाई होणार आहे येथपासून ते पृथ्वी नष्ट होणार आहे येथपर्यंत कसल्याही भीतीचे थैमान मनात घोंघावत असते. दारी आलेला प्रत्येक माणूस खुनी आहे आणि कोणालाही भेटताना हातात पिस्तूल हवे असे वाटू लागले आहे. सध्याचे राजकारणी पक्ष चॅनल्स आणि सोशल मीडियाने तर भीतीची दुकाने ठायीठायी उघडलेली आहेत. एकच चित्र सतत दाखवून आणि पाहून मन बिथरत आहे. त्यात एआय तंत्राची भर पडली आहे. ती आदळणारी चित्रे आपल्या मनात दर क्षणी भीतीची भर घालतात. हा भीतीचा विषाणू एका मनातून दुसऱ्या मनात, एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात पसरतो. या भीतीपोटी लोक भयग्रस्त किंवा आक्रमक किंवा अंधश्रद्ध होत आहेत. विवेकाला खुंटीवर टांगून लोक जगत आहेत.

***

समाजात अनेक प्रकारच्या दऱ्या वाढत आहेत. त्यातील आर्थिक दरी टोकाची होत आहे. श्रीमंत अतिश्रीमंत, तर गरीब अतिगरीब होत आहेत. या भेदाने दोन्ही बाजूचे मन अस्थिर झालेले आहे. श्रीमंतीचे फलक डोळ्यांसमोर नाचवले जात असताना बहुसंख्य वंचिताना दु:खाच्या खाईत ढकलले जात आहे. शिक्षण आणि आरोग्य यात दोघांना उपलब्ध असलेल्या संधीत फरक आहे. ऐहिक सुखाला चटावलेला समाज कमालीचा आत्मकेंद्री आणि आत्मलुब्ध झालेला आहे. एकीकडे ओबेसिटी (जाडपणा) तर दुसरीकडे अॅनिमिया (रक्ताची कमतरता) हे आजार दिसत आहेत. कुठलेही अनारोग्य हे मानसिक आजाराला आमंत्रणच असते.

***

बेदरकारपणा, बेभानपणा आणि बेजबाबदारपणा वाढणे ही वृत्ती सर्व थरात बोकाळली आहे. वाहने कशीही हाकणे, रस्त्यात डीजे लावून धिंगाणा करणे, फालतू गोष्टींवरून हाणामाऱ्या करणे, गाड्या फोडणे ते तार स्वरात किंचाळत शिव्या देणे असे काहीही घडत आहे. यात मर्यादेपलीकडे आवाज करणे हेही आजाराचे लक्षण दिसते. स्वत:चा ठेहेराव ( patience) गमावून दुसऱ्याला अस्वस्थ करणे हा भाग त्यात आहे. अति आवाजाने एकतर बहिरेपणा येतो किंवा स्वरयंत्रावरील नियंत्रण गमावले जाते. मिरवणुकांमध्ये स्पीकर्सच्या भिंतीसमोर आपल्या लहान बाळांना खांद्यावर नाचवणारी वडील मंडळी पाहिली की मन सुन्न होते. रस्त्यात कर्णकटू हॉर्न वाजवत राहणारी माणसे याच पंथातली असतात. ‘सतत आवाज करा’ हे राज्यकर्ते शिकवत आहेत. आवाज करण्याला धर्माचे अधिष्ठान मिळालेले आहे. हेच वर्तन सोशल मीडियावर घडत आहे. रोज अनेक ठिकाणाहून ‘शब्दांचे आणि वाक्यांचे दगड’ भिरकावले जात आहेत. अश्लाघ्य भाषा आणि वर्तन सवयीचे होत चालले आहे. त्यात अनेकांना वर्मी घाव लागत आहेत. पण आम्हाला कसलीही क्षिती उरलेली नाही. सामान्य माणूस ते आजचे लोकनेते यांच्या वागण्यातून सभ्यतेचा लोप झाला आहे. शांतता आणि सभ्यता हे मूल्य असते हे आपल्या गावीही नाही. यातून मन दुभंगून हरवलेले आहे.

***

पटकन भावना उद्दीपित होणे आणि करणे हे एक तीव्र आजाराचे लक्षण आहे. वर उल्लेख केलेल्या लक्षणांतून हे उद्भवते. मनावरील ताबा सुटून पटकन अतिहळवेपण किंवा निगरगट्टेपण येते. कोणत्याही मुद्द्यावरून भावना भडकावून ‘कोणता धोंडा घेऊ हाती’ अशी अवस्था चटकन येत आहे. आवेश आणि अभिनिवेश यातून तयार होतो. आपण चित्रपट पाहू लागलो की याचा प्रत्यय लगेच येतो. अमानवीपण आणि अतर्क्यता यांनी चित्रपट भरलेले आहेत. त्यात देशभक्तीचा तडका आहे. त्यागाची आणि अन्यायाची परिसीमा दाखवताना तयार केलेल्या शत्रूच्या नरडीचा घोट घेत देव, देश, धर्म, रूढी, परंपरांचा बुभुक्कार केला जात आहे. बटबटीतपणा स्थायिभाव झालेला आहे. खासगी ते सामूहिक ‘लिचिंग’ करत मन बेभान होत आहे. माझ्याकडे पाहून हसलास म्हणून किंवा गर्दीत स्कूटरचा नुसता स्पर्श झाला तरी हिंसेचा उद्रेक होतो आहे.

याला जोडून लैंगिकता हा मुद्दा आहे. सुयोग्य लैंगिक शिक्षण आणि संवाद नसल्याने एकूण लैंगिकतेविषयी भयानक गैरसमज आहेत. त्यात मन चेतावले जाण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असताना तीव्र उद्दीपनाचे काय करायचे याचे यक्ष प्रश्न आ वासून उभे आहेत. या लैंगिक दबावातून मन मोकाट होत आहे.

जगण्या-वागण्यातील एकूण तारतम्य गमावल्याची हरक्षणी प्रचीती आपल्याला येते. अतिशय छोटी गोष्ट अनाठायी प्रमाणाबाहेर अति मोठी किंवा मोठी महत्त्वाची गोष्ट पूर्ण दुर्लक्षित केली जात आहे. ‘Sense of proportion’ गमावलेले आहे. यात वर्तमानपत्र, चॅनल्स आघाडीवर आहेत. बातमीचे महत्त्व किती आणि तिचे पेपरच्या पानावर नेमके किती स्थान असायला हवे याचे भान हरवलेले रोज दिसते. फालतू विषय सतत चघळायचे आणि महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल द्यायची हे सध्याचे तंत्र आहे. बातमी कायम चटकदार आणि चमचमीत बनवणे हेच उद्दिष्ट आहे. हेच धोरण व्यासपीठावर राबवले जात आहे. व्याख्यानात तोल हरघडी सुटलेला दिसतो. त्यामुळे आमदार ‘आई-माई’ काढतो आणि स्टेजवरील सर्व लोक खिदळत टाळ्या पिटतात. आपण नेमके काय आणि किती वाचत, बोलत वा ऐकत आहोत याचा अंदाज गमावलेला आहे. अंतिमत: मन निष्क्रिय होत आहे. किंबहुना ते व्हावे हाच हेतू आहे.

***

सुमार ( Mediocre) आणि कमी कुवतीच्या लोकांना मानाचे स्थान मिळणे हे तारतम्य गमावल्याचे असेच लक्षण आहे. सुमार दर्जा असलेले अतिसुमार लोक समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाच्या पदावर थक्क करणाऱ्या आत्मविश्वासाने वावरताना दिसतात. सुमार गायक हजारो लोकांसमोर चुकीच्या स्वरात केकाटत गातो. सुमार नेता आगाऊपणे वाट्टेल ती विधाने करतो आणि आश्वासने देतो. सुमार कलाकार रोज विविध विषयांवर तारे तोडत वर्तमानपत्राचा अवकाश व्यापतो. सर्व समाजाची ‘सुमार समजूत’ हा मोठा प्रश्न त्यातून उद्भवलेला आहे. याला जोडून एक आजारी लक्षण दिसते ते म्हणजे कामातील कौशल्य गमावणे. ( Deskilling) कोणालाच कुठल्याही क्षेत्रातील एक गोष्ट नीट येत नाही. अगदी राजस्थानातून आलेला आजचा तरुण सुतार सरळ रेषेत पट्टी मारू शकत नाही. हे छोटे उदाहरण. मात्र सांगायचा उद्देश हा की, परंपरागत काम अथवा रीतसर शिक्षण घेऊन शिकलेले काम नेमके आणि नेटके करता न येणे ही मोठी समस्या आहे. आता हे सुमारपण आपण नगररचना, रस्ते, शिक्षण संस्था, वैद्याकीय संस्था, शासकीय संस्था, विद्यापीठीय काम अशा अनेक क्षेत्रात अनुभवू शकतो.

***

सतत अव्याहत आहाराची आणि फिटनेसची चर्चा करणे. या चर्चा बहुधा मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गात सुरू असतात. अनेक लोक अचानक कडक उपवास धरतात. खाण्याच्या निरनिराळ्या तऱ्हा अवलंबतात. याचे दुसरे टोक म्हणजे सतत काहीतरी विकत घेणे. अमेझॉन, स्विगी, झोमॅटो हीच ऑनलाइन संस्कृती आहे. अस्वस्थ वाटले की काहीतरी विकत घेऊन आनंद ओरबाडायचा. हे असे नसेल तर कुठल्याही प्रहरात काहीही खायचे. कितीही खाल्ले तरी आनंद आणि समाधान कायम दूर राहते. वखवखत्या अशांत मनाला खाई खाई सुटते. वजन वाढले की त्यावर अघोरी उपाय सुरू होतात. जिममध्ये जाऊन अनाठायी क्षमतेपलीकडचा अपरिमित व्यायाम करणे, कानात संगीताची बुचे कोंबून पळत सुटणे, शरीर नको म्हणत असताना घड्याळ लावून १५/२० हजार पावले चालणे असे प्रकार दिसतात. व्यायामाला अर्थातच नकार नाही, पण या साऱ्यातून शरीराचे भान यापलीकडे मनाची भीती दिसत राहते. त्यामुळे काही लोक अचानक शक्तिहीन, खपडे दिसतात तर काही सुजलेले, फुगलेले दिसतात. भुकेनुसार आवश्यक तितके खावे आणि झेपेल तितका व्यायाम करावा हे साधे तत्त्व आपण विसरून गेलो आहोत.

***

सर्वांचा एकमेकांना सहन करण्याचा वेळ ‘अटेन्शन स्पॅन’ कमी झालेला असताना आणि कशाबद्दलही काही वाटत नसताना ‘डिमोशनल’ स्थितीत सतत आपल्याकडे लक्ष वेधून घेणे ही भयावह समस्या सोशल मीडिया नामक मोफत अवकाशात अव्याहत उद्भवत असते. ‘जेन झी’चेच नव्हे तर सर्वांचे मोबाइल नामक यंत्राला दिवसरात्र आयुष्य चिकटलेले असते. एकतर ते स्वत:च्या चेहऱ्यासमोर धरणे किंवा इतरांच्या समोर फिरवत राहणे याविना राहवतच नाही. फोनमध्ये डोकावून सर्व समाज कृतक म्हणजे खोटा अभिनय करायला शिकलाय. आपल्याकडे लक्ष वेधले जावे म्हणून क्षणाक्षणाला चित्रविचित्र हावभाव आणि नाचवारे करून ‘घटना किंवा रिल्स तयार करून फेमस होण्याचे’ वेड लागलेले आहे. मूर्ख, अल्लडपणाला मान्यता मिळवताना अतिशय चुकीचे हावभाव आणि हास्यास्पद विभ्रम केले जात आहेत. यात वयाला साजेसे वर्तन नसल्याने विद्रूपता आलेली आहे. लाइक्स, डिस्लाइक्स, ईमोजी हेच मेंदूत फेर धरून असतात. मी जिवंत आहे की नाही पाहायला नाडी नव्हे तर सोशल मीडियाचे सूत नाकाला लावावे लागत आहे. या पायी कड्यावर जीव धोक्यात घालून लोक सेल्फी काढायला उद्याुक्त होतात. प्रदर्शन आणि दाखवेगिरी करण्यावाचून जगताच येत नाही अशी स्थिती झाली आहे.

***

वय, काम आणि अनुभव यातून येणाऱ्या शहाणपणाचा अभाव जाणवत आहे. त्यातून व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावर एकमेकांत विविध कारणांनी दुरावा येत आहे. प्रत्येक गोष्ट गुंतागुंतीची झाल्याने असहाय्यता आणि एकाकीपणा येतो आहे. त्यात सतत खंत करण्याची, निराशाग्रस्त, तुच्छतायुक्त बोलण्याची सवय लागलेली आहे. कधी याचा सूड म्हणून सतत मज्जा करण्याचा आणि ती करताना इतरांना दाखवण्याचा रोग जडलेला आहे. अतिऐहिक किंवा अतिपारलौकिक गोष्टी जवळच्या वाटत आहेत. वास्तवापेक्षा काल्पनिक जगात वावरणे सोयीस्कर वाटत आहे. वास्तवाला अथवा वर्तमान स्थितीला सामोरे जाण्याची क्षमता गमावल्यामुळे लोक वेगवेगळ्या अवकाशात भरकटलेले आहेत.

***

आकलन, परिशीलन आणि मूल्यमापनाला तिलांजली देणे हे आजारपणाचेच लक्षण वाटते. चिकित्सा आणि टीका नकोशी झाल्यामुळे अभ्यास नावाच्या गोष्टीला नकार दिला जात आहे. वेगळे विचार आणि वाद-प्रतिवाद यांना बाद केले जात आहे. दुतर्फी संवाद बंद होऊन दुसऱ्याचे न ऐकता एकटेच बोलत बसणे हा आजार बळावला आहे. या सोबत संभाषणात विनोद न कळणे आणि न करता येणे, भाषा नीट न येणे, मुद्दे नीट न मांडणे, मूलभूत प्रश्नच न पडणे, आपल्याला सर्व ज्ञान आहे असे वाटणे, प्रतीके आणि रूपके न उमगणे, दुसऱ्याचा विचार मान्य न झाल्यास त्या व्यक्तीला नष्ट करायची इच्छा असणे अशी लक्षणे दिसतात. या गदारोळात अंतर्मुख होणे, अंतर्दृष्टी मिळणे आणि अंतर्नाद ऐकू येणे बंद झालेले आहे.

***

आता काही लक्षणांच्या नोंदी एकापाठोपाठ करतो. मालक आणि गुलाम या व्यवस्थेचे समर्थन करणे, प्रत्येक गोष्टीला आध्यात्मिक मखरात बसवणे, आपण सर्वश्रेष्ठ आहोत ही भावना प्रत्येक जातीधर्मातील लोकात पेरणे, कालबाह्य जुनाट गोष्टींना उजाळा देणे आणि गतस्मृतीत रममाण होणे, स्वत:चा आणि दुसऱ्याचा आब न राखणे, बोलण्या-वागण्यात संगती नसणे, आशय आणि अभिव्यक्ती यात समन्वय नसणे, कसलाही अभ्यास नसताना प्रत्येक गोष्टीवर मत देणे, पूर्ण शुद्ध आणि अति पवित्र तसेच उच्च नैतिक गोष्टींचा अवास्तव पुरस्कार करणे, कुठलीही जबाबदारी न घेता ठपका ठेवणारी मानसिकता जोपासणे, इतिहासाचे संदर्भहीन विसंगत दाखले देणे, तरलता आणि घनता लोप पावणे, सर्व स्तरांवर कोंडी झाल्याने मन निराशेने ग्रासणे, दुसऱ्यांच्या खासगी आयुष्यात डोकावणे इत्यादी अशी मानसिक आजारपणाची अनेक छोटी-मोठी लक्षणे दिसत आहेत. दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे.

***

सरते शेवटी – अनेकांना आपण आजारी आहोत हेच कळेनासे झालेले आहे. समाज आजारी पडलाय हा कदाचित माझा भ्रमही असू शकतो. पण तूर्तास मला जाणवणाऱ्या या ‘आजारी समाजाच्या नोंदी’ करताना त्या सोबत मी कारणे आणि उपचारही शोधू लागलो. काळ आणि अवकाशाला चिमटीत धरणाऱ्या आधुनिक वेगवान तंत्रज्ञानानं आजचे जगणे व्यापले जात असताना मनाच्या आरोग्याची काळजी हा प्राधान्याने अग्रक्रमाचा मुद्दा केला जायला हवाय. त्याकरता आपल्या राष्ट्रीय पातळीवर नियोजन करायला हवे आहे. आज प्रत्येकाला मानसिक आधाराची गरज प्रामुख्याने जाणवत आहे. डॉक्टरांचा सल्ला, सूज्ञ मित्रांचे मार्गदर्शन, आवडीचे काम आणि मन मोकळे करण्याच्या संवादी जागा समाजात हव्यात असे प्रकर्षाने लक्षात आले. युद्ध, विस्थापन, पर्यावरण, बेकारी, आर्थिकता, अनागोंदी आणि धर्म अशी अनेक कारणे मनाच्या आजारांच्या मुळाशी आहेत. या प्रदूषणाचा परिणाम भवतालावर आणि पर्यायाने आपल्यावर होतच असतो. ‘यामुळे ते’ आणि ‘त्यामुळे हे’ उद्भवते असे लक्षात आले. सांप्रत काळी या आजारी लक्षणांचा प्रादुर्भाव सर्वांत जास्त असला तरी एकमेकांच्या साथीने आपल्या क्षेत्रात गंभीरपणे काम करत आणि किमान विवेक बाळगत जगण्याचे काही मार्ग आहेत हे कळले. समाजात जबाबदारी स्वीकारून अनारोग्य माजविणाऱ्या घटकांशी संविधान हाती घरून नागरिक म्हणून हस्तक्षेप करायला हवा असे लक्षात आले. शांतता, प्रेम, क्षमाशीलता आणि सौहार्द हे शब्द नसून विचारसरणी असल्याचे प्रतित झाले. याच भवतालात काही मोजकी माणसे आपापल्या क्षेत्रात जीव लावून काम करत आहेत. अडचणींशी सामना करत तोडगे काढत आहेत. तरुण मुले-मुली जगण्याचे नवे शोध घेत आहेत. कोणी लेखन करत आहे, कोणी नाटक तर कोणी चित्रपट. रुळलेल्या वाटा सोडून अभियांत्रिकी, वैद्याक, वास्तुशिल्पी, पर्यावरणप्रेमी, शिक्षक काम करत आहेत. छोट्याशा गावातून दुर्बल परिस्थितीशी सामना करून खेळाडू वर येत आहेत. मानसिक आजारांनी ग्रस्त झालेल्या समाजातील खरंतर प्रत्येकाला जगण्याचे असे निरोगी मार्ग गवसू दे आणि आजारी नव्हे तर निरोगी समाजाची लक्षणे सर्वत्र दिसू दे हीच सदिच्छा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

atulpethe50@gmail.com