मेघश्री दळवी
जयंत नारळीकरांनी ‘कृष्णविवर’ (१९७४) ही आपली पहिली विज्ञानकथा टोपण नावाने लिहिली आणि ती मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञानरंजन कथास्पर्धेत पहिलं पारितोषिक पटकावून गेली – हा किस्सा आता सर्वश्रुत आहे. डॉ. नारळीकरांसारखे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ भाग घेतात म्हणून ही स्पर्धा गाजली, त्याहूनही जास्त गाजली ती अद्भुत विज्ञान कल्पनेवरची त्यांची कथारूपी मांडणी. आपणही हा अनोखा कथाप्रकार लिहून पहावा अशी उर्मी मी आणि माझ्या पिढीतील अनेक लेखकांना त्यातून मिळाली. आजदेखील तरुण लेखक मराठी विज्ञानकथा लेखनाकडे वळताना दिसतात त्यामागे डॉ, नारळीकरांच्या कथा-कादंबऱ्या आहेत.
१९७०-८० च्या दशकात मराठी साहित्यात विज्ञानकथा म्हणजे बालसाहित्य किंवा अनुवादित साहित्य असा गैरसमज होता. विज्ञान वेगळं आणि साहित्य वेगळं, असाही एक समज होता. ही दरी डॉ. नारळीकरांनी आपल्या सुगम लेखनातून दूर केली. त्यांनी मराठी वाचकांसमोर आणलेली विज्ञानकथा ही रोबो, अंतराळप्रवास, परग्रहवासी या ठरावीक चौकटीत अडकून न ठेवता वेगळ्या तऱ्हेने लिहिलेली माणसांची कथा होती. साहित्यातील विविध रसांना योग्य न्याय देणारी होती.
‘यक्षांची देणगी’ (१९७९) या त्यांच्या पहिल्या संग्रहाने वाचकांना चकवलं. विज्ञानातल्या विलक्षण संकल्पना वापरून एका नव्या जगाचं दार खुलं करून दिलं, तेही अस्सल भारतीय रूपात. माझ्यासारख्या कित्येक वाचकांनी या पुस्तकाची पारायणं केली आहेत. मराठी विज्ञानकथांच्या ठळक संग्रहांची यादी करायची झाली तर त्यात पहिलं नाव ‘यक्षांची देणगी’ हेच दिसेल. त्यांच्यासारखे भक्कम आधारस्तंभ मिळाल्याने मराठी विज्ञानकथा बहरली, तिला प्रतिष्ठा मिळाली, आणि पुढल्या पिढ्या आवर्जून लिहित्या झाल्या.
डॉ. नारळीकरांच्या कथांची मला तीन वैशिष्ट्यं वाटतात. स्वत: शास्त्रज्ञ असल्याने त्यांच्या कथांमध्ये अनेकदा शास्त्रज्ञांचं चित्रण असतं. तर्कबुद्धी आणि संशोधक वृत्ती असलेली ही पात्रं रंगवताना डॉ. नारळीकर त्या पात्रांमधील माणूस कधी विसरत नाहीत. ‘कृष्णविवर’ कथेतील प्रकाश, किंवा ‘हिमप्रलय’ कथेतील वसंत चिटणीस आपल्यासमोर ठसठशीतपणे उभे राहतात. त्यांच्यासोबत आपण त्या कथेत रंगून जातो.
‘यक्षांची देणगी’ कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत डॉ. नारळीकर म्हणतात, ‘‘विज्ञानाची गोळी जर कडू लागत असेल, तर त्याला साखरेचं कोटिंग म्हणजे कथेचे रूप देणे योग्य ठरेल, निदान मी लिहितो त्या कथा तरी याच उद्देशाने लिहिल्या आहेत.’’ मात्र त्यांनी हीच विज्ञानकथांची भूमिका असा आग्रह कधीही धरला नाही. उलट कथांमधून वैज्ञानिक दृष्टी रुजवताना मानवी भावभावनांचं अचूक चित्रण करून त्यातील पात्ररेखाटन जिवंत केलं.
‘व्हायरस’ (१९९६) या कादंबरीत कम्प्युटर व्हायरससारख्या गुंतागुंतीच्या तांत्रिक संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी त्यातल्या अनेक व्यक्तिरेखा लहान लहान प्रसंगांतून प्रभावीपणे उभ्या केल्या आहेत. शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ यांचे भावविश्व, त्यांच्या दुविधा, वेगवेगळ्या प्रवृत्ती, आणि निर्णयप्रक्रियांमधले संघर्ष रंगवताना व्यक्तिरेखांचे पैलूदार चित्रण आहे. आज क्रिप्टोकरन्सी, हॅकिंग, सोशल मिडिया यांसारख्या तंत्रज्ञानाच्या नव्या वाटा आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न प्रकर्षाने आपल्यासमोर येतात. गेल्या पंधरा-वीस वर्षांतील या तंत्रज्ञानाच्या स्फोटाची नोंद घेत डॉ. नारळीकरांनी या नव्या विषयांवर कथा लिहिल्या असत्या तर मराठी वाचकांना एक लक्षवेधी अनुभव मिळाला असता, हे निश्चित.
त्यांच्या लेखनाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे कथेतील विज्ञान सोप्या शब्दात मांडलेलं असतं. ‘सूर्याचा प्रकोप’ मधली ‘सोलर कॉन्स्टंट’ संकल्पना, ॅ‘ट्रॉयचा घोडा’ कथेतील अॅन्टीमॅटरची माहिती, ‘गंगाधरपंतांचं पानिपत’ या कथेत मांडलेली कॅटॅस्ट्रोफी थिअरी – कुठेही क्लिष्टपणा न येता विज्ञान आणि कथेतील घटना नैसर्गिकरीत्या उलगडत जातात. विज्ञान आणि साहित्य यांची अशी सांगड घालणं सोपं नसतं. म्हणूनच २०२१ मध्ये नाशिकला झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देऊन त्यांच्या साहित्यातील भरीव योगदानाचा गौरव करण्यात आला.
विज्ञानकथांमध्ये ‘हार्ड’ आणि ‘सॉफ्ट’ असं एक सर्वसाधारण वर्गीकरण असतं. हार्ड विज्ञानकथांमध्ये वैज्ञानिक तथ्य आणि त्याच्या प्रक्षेपित शक्यता हा कथेचा गाभा असतो. तर सॉफ्ट विज्ञानकथांमध्ये विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर मानवी भावना, सामाजिक आणि नैतिक जाणिवा, आणि काही वेळा तत्त्वचिंतन दिसतं. डॉ. नारळीकरांची ‘उजव्या सोंडेचा गणपती’सारखी कथा हार्ड विज्ञानकथा असूनही कुठेही कठीण, बोजड होत नाहीत. जन्मखुणेची जागा बदलणे, सावकाश जेवणे, अशा रोजच्या आयुष्यातील गोष्टींमधून ‘मोबियस स्ट्रिप’ ही अमूर्त संकल्पना अप्रतिमपणे समोर येते. ‘धोंडू’ या माझ्या आवडत्या कथेतही एक वेगळा एलियन, त्याची झपाट्याने विकसित होणारी बौद्धिक क्षमता, आपण नकळत पुरवलेला ऊर्जास्राोत, आणि त्याच्याकडून असलेल्या धोक्याची जाणीव – सर्व टप्पे वाचकापर्यंत सहजतेने पोचतात. एका अर्थाने हे रूपक एआयसारख्या कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाला किंवा विज्ञानातील अभूतपूर्व शोधाला लागू होईल, हेही लक्षात घेण्यासारखं आहे.
विज्ञान-तंत्रज्ञानाशी परिचित वाचकांना डॉ. नारळीकरांच्या अशा हार्ड विज्ञानकथांमधल्या कल्पना साहजिकच आवडतात. पण आश्चर्य म्हणजे विज्ञान-तंत्रज्ञानात फारशी रुची नसलेल्या वाचकांनाही या कथा मोहवून टाकतात. इतर भारतीय भाषांच्या तुलनेत मराठीत बऱ्याच हार्ड प्रकारच्या विज्ञानकथा लिहिल्या आणि वाचल्या जातात याचे श्रेय डॉ. नारळीकरांच्या सुलभ आणि मनाला भिडणाऱ्या लेखनाला आहे.
डॉ. नारळीकरांच्या कथालेखनाचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कथा फक्त रंजन करणाऱ्या नसून त्या विचार करायला लावतात. विज्ञानाबद्दलचं प्रेम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या गोष्टी त्यांच्या लेखनातून सतत पुढे येतात. सोबत विज्ञानाच्या मर्यादा, त्याचा चुकीचा वापर होण्याची शक्यता, मानवी अहंकार, भविष्याची अकल्पित दिशा, नैतिक पेच, प्राचीन परंपरांचं अंधानुकरण, यावर त्यांच्या कथा भाष्य करतात. हे भाष्य निरीक्षण आणि चिंतनातून आलेलं असतं. ते डॉ. नारळीकरांच्या व्यक्तिमत्त्वासारखं ठाम आणि सौम्यपणे येतं हे विशेष. त्यात आवेश किंवा उपदेश नसतो.
पुढील काळात डॉ. नारळीकरांनी आवर्जून बालकुमार वाचकांसाठी कथा लिहिल्या. संशोधन, आयुकासारख्या संस्थेचे कामकाज, आणि इतर व्याप यामधून वेळ काढून मुलांसाठी लिहिणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक विशेष पैलू आहे. त्यात ‘टाइम मशीनची किमया’ सारख्या कथा असोत, ‘गणितातील गमतीजमती’ ही किर्लोस्करमधील लेखमाला असो, की ‘चला जाऊ अवकाश सफरीला’ अशी खगोलावर सोपी करून लिहिलेली पुस्तकं असोत. त्यातही उपदेश नसतो, फक्त विज्ञानातील शक्यता आणि रंजकता यांच्यावर भर असतो.
मॅजेस्टिक गप्पांमध्ये त्यांची मुलाखत घेण्याची संधी मला आणि जयंत एरंडे यांना मिळाली होती. त्यावेळी विज्ञानकथा लेखनामागील त्यांची भूमिका इतक्या वर्षात बदलली आहे का, असा प्रश्न मी केला होता. त्याला उत्तर देताना विज्ञानकथेत विज्ञान आणि साहित्यगुण दोन्ही हवेत असं त्यांच्या प्रसन्न स्वरात सांगितलं होतं. हा संतुलित विचार आणि स्टेजमागे झालेल्या अनौपचारिक गप्पांमधून लक्षात राहिलेला त्यांचा ऋजू स्वभाव त्यांच्या लेखनातही बहुतांश वेळा प्रत्ययाला येतो.
विज्ञानाशी साहित्याचा प्रभावी समन्वय साधत डॉ. जयंत नारळीकर यांनी मराठी विज्ञानकथेला मानाचं स्थान मिळवून दिलं. त्यांच्यासारख्या आधारस्तंभांमुळेच विज्ञानातील रोमांचकारी शक्यता वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं एक सशक्त माध्यम तयार झालं आणि मराठी विज्ञानकथेची वैभवशाली परंपरा उभी राहिली. नव्या पिढीतील लेखक हा वारसा पुढे नेतील, मराठी विज्ञानकथेला अधिक समृद्ध करतील, आणि तिला जागतिक पातळीवर पोहोचवतील, तीच डॉ. नारळीकर यांना उचित आदरांजली होईल.