‘लोकरंग’ मधील ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरात गिरीश कुबेर यांनी शब्दबद्ध केलेली सर्व व्यक्तिचित्रे अगदी तंतोतंत डोळ्यांसमोर उभी राहतात. सीताकांत लाड आणि गोविंदराव तळवलकर यांच्यावरील लेख आणि त्यातून दिलेला मांडवी हॉटेलचा संदर्भ हा विशेष भावला. त्याचं कारण म्हणजे माझे (दिवंगत) सासरे हिराकांत किनारी हे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे माजी महाव्यवस्थापक होते. त्यांच्या कारकीर्दीत ते राष्ट्रीय स्तरावरील National Federation of State Co- operative Banks ( NAFSCOB) चे १९८२ ते १९८८ दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO) होते. या संस्थेच्या सर्व वार्षिक सभा केणींच्या मांडवी हॉटेलमध्ये व्हायच्या. त्यावेळी त्या हॉटेलचे व्यवस्थापक सतीश प्रभू (लेखात उल्लेखलले सतीश कामत ही तीच व्यक्ती आहे का?) त्यांची आणि सभेसंबंधातील इतर मान्यवरांची सर्व बडदास्त ठेवण्यात तत्पर असत. त्यांच्या गप्पांमध्ये आपण नमूद केलेल्या गोविंदराव, सीताकांतजी आणि इतर वलयांकित मंडळींच्या सर्व बैठकांचे चर्वण होत असे, त्यामुळे तिथल्या किसमूर, हुमण, सुके इ. मत्सप्रकारांचा (सु)वास अजूनही आमच्या नाकात दरवळत आहे. २०१६ साली किनारी यांचे वयोपरत्वे देहावसान झाले. पण मांडवी हॉटेल, केणी बंधू, सतीश प्रभू, किसमूर आणि ताजी नुकतीच कापलेली पपई यांची आठवण ते शेवटपर्यंत काढायचे. या लेखांतील मांडवी हॉटेलचे सर्व संदर्भ पुनर्प्रत्ययाचा आनंद देऊन गेले.- मंगेश वैद्या
तळवलकरांच्या व्यक्तिमत्त्वाचं गारूड
‘लोकरंग’मधील गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील गोविंदराव तळवलकर यांच्यावरील दोन्ही लेख वाचले. रूढार्थाने पुन:पुन्हा वाचले. तळवलकरांच्या व्यक्तिमत्त्वाचं गारूड मनावर इतकं आहे की, त्यांच्याविषयी काही छापून आलं की वाचल्याशिवाय राहवत नाही! लेखकाचं ओघवतं लेखन आणि तळवलकरांचे किस्से हे एक अजब रसायन आहे. तळवलकरांच्या निधनानंतर लेखकाने लिहिलेला लेख कायम लक्षात राहिला आहे. माझा जन्म झाला तेव्हा तळवलकर निवृत्तसुद्धा झाले होते, त्यांच्याविषयी वाचायला, कळायला कैक वर्षे जावी लागली, पण नंतर त्यांनी लिहिलेलं सर्व लिखाण वाचून काढलं आणि काढत आहे. तळवलकरांचा व्यासंग, त्यांचा अभ्यास, त्यांची ग्रंथसंपदा सारंच थक्क करणारं आहे. अशी माणसं होऊन गेली यावर आता विश्वाससुद्धा बसणार नाही. खरंच तो काळ वेगळा होता. वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, सीताकांत लाड, बा. भ. बोरकर ही नुसती यादीच मनात आदरभाव निर्माण करणारी आहे. या सदरातील प्रत्येक लेख काही तरी नवीन शिकवून जातो.- शुभम पाठक, पुणे
सडेतोड, टोकदार व परखड…
‘लोकरंग’ मधील (३ ऑगस्ट) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील ‘व्यक्त – अव्यक्त !’ हा लेख वाचला. प्रभावी आणि व्यासंगी संपादक असलेल्या गोविंदराव तळवलकर यांच्याविषयीच्या दोन गोष्टी आठवतात. त्याकाळी मुंबईतून प्रसिद्ध होणारे पाक्षिक ‘गगनभेदी’चे संपादक अनिल थत्ते यांनी आपल्या संपादकीयात लिहिले होते की, मुंबईतील इतर वृत्तपत्रांचे संपादक आपल्या अग्रलेखातून वाचकांच्या ‘भावनेला’ हात घालतात; मात्र ‘मटा’चे संपादक गोविंदराव तळवलकर थेट वाचकांच्या ‘बुद्धीलाच’ हात घालतात. केवळ अग्रलेख वाचण्यास्तव त्यावेळी इतर वृत्तपत्रांचे वाचकदेखील मटा घेत असत. वर्तमानपत्र हातात पडताच सर्वप्रथम अग्रलेख वाचणारे वाचक माझ्या पाहण्यात आले आहेत, हेही खरेच!
गोविंदराव तळवलकर हे जाहीर सभांमध्ये अपवादात्मक वावरत असत; त्यांचा खरा पिंड हा केबिनमध्ये बसून लिहिण्याचा होता. त्याकाळी मुंबईतीलच एक संपादक पायाला भिंगरी बांधून सतत जाहीर सभांमध्ये चौफेर फड गाजवण्यात धन्यता मानीत असत. त्यावर खरमरीत प्रतिक्रिया म्हणून तळवलकर म्हणायचे, ‘‘मोर्चे – सभा गाजविणे हे खऱ्या पत्रकारांचे काम नाही; संपादक/ पत्रकारांनी कार्यालयात बसून काम करण्याची ब्रिटिश परंपरा आहे आणि मी तीच पाळतो इतकेच!’’ गोविंदरावांना अग्रलेखांचे सम्राट मानले जात असे. सडेतोड, टोकदार व परखडपणे अग्रलेख लिहिणाऱ्या या संपादकाला अभिवादन!- बेन्जामिन केदारकर, नंदाखाल, विरार
गोविंदराव लोकमान्यांना गुरू मानत
‘लोकरंग’मधील (२० जुलै) गोविंदराव तळवलकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ‘लिप्त अलिप्त’ या लेखावरील प्रतिक्रिया वाचल्या. त्यातील अशोक आफळे यांनी लिहिलेल्या पत्रातील शाम लाल यांच्याबद्दलचा संदर्भ चुकीचा आहे. खरी माहिती अशी की, लोकमान्य टिळक हे गोविंदरावांचे गुरू होते. शाम लाल यांना गोविंदराव कधीही गुरुस्थानी मानत नव्हते. दोघांना एकमेकांबद्दल आदर होता. स्वातंत्र्योत्तर काळात गोविंदराव तळवलकर हे सर्वश्रेष्ठ संपादक व इतिहासकार होते असे शाम लाल यांचे मत होते. १९९६ साली निवृत्तीनंतर गोविंदराव त्यांच्या मुलींकडे अमेरिकेत स्थायिक झाले. शाम लाल दिल्लीत होते. दोघे एकमेकांशी फोनवरून बोलत असत व ईमेल करीत असत. दृष्टी जवळजवळ गेल्यामुळे शाम लाल यांनी गोविंदरावांना सांगितले की, मला वाचता येत नाही तेव्हा तुम्ही जे ग्रंथ व नियतकालिकांतील लेख वाचाल, टी.व्ही.वरील चर्चा ऐकाल त्याबद्दल मला नियमितपणे लिहाल तर बरे वाटेल. त्याप्रमाणे गोविंदराव शाम लाल यांना महिन्यातून दोनदा वा तीनदा ईमेलने पत्र लिहीत. याबद्दल फार समाधान वाटते असे शाम लाल यांनी गोविंदरावांना लिहिले होते. गोविंदरावांच्या मुलींनी लिहिलेल्या ‘ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर’या पुस्तकात हा संदर्भ आहे. शाम लाल यांच्या घरी जाऊन गोविंदराव त्यांना वृत्तपत्रे वाचून दाखविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.- प्रदीप चंद्रचूड
समाजमाध्यमांचा संयत वापर हवा!
‘लोकरंग’मधील (२० जुलै) ‘द्वेषाभिसरणाचा रील्स रोग’ हा चिंतन थोरात यांचा लेख द्वेषमुलक समाजाचं वास्तव चित्रण करतो. भारतीय राज्यघटनेतील कलम १९(१) अ अन्वये प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले असले तरी एकूण समाज आणि देशाचे व्यापक हित लक्षात घेता त्यावर काही प्रमाणात /अंशी मर्यादाही घालण्यात आल्या आहेत. मात्र त्याची नेमकी अंमलबजावणी समाजमाध्यमांच्या बाबतीत होताना दिसत नाही हे अलीकडच्या काळात घडत असलेल्या हिंसक आणि द्वेषपूर्ण घटनांवरून अधोरेखित होते. आज आपण वर्तमानपत्रांना/ समाजमाध्यमांना फोर्थ इस्टेट असे संबोधत असलो तरी त्यात सत्यतेचा आणि सामाजिक प्रश्नांची आणि व्यवहारांची चिकित्सा करणे यांसारख्या सामाजिक बांधीलकीच्या तत्त्वांचा काही प्रमाणात अभाव आढळतो. एकूणच स्वस्थ समाज आणि निकोप लोकशाहीच्या दृष्टीने अपेक्षित असलेली भूमिका न निभवता ही समाजमाध्यमं अलीकडच्या काळात एकांगी, हिंसक, भडक आणि द्वेष भावना भडकवणारा आशय समाजात पसरवताना दिसतात. याबाबतची अधिक चिकित्सा करायची म्हटली तर अलीकडची समाजमाध्यमं गोबेल्स नीती अंगीकारताना दिसतात. आज या समाजमाध्यमांतून अनेक गोबेल्स तयार होत आहेत. या गोबेल्स नीतीचा अवलंब करून विशिष्ट समाजाकडून एका विशिष्ट समाजातील लोकांबद्दल द्वेष पसरवला जातो.
काही प्रसंगी त्यांना ठारही मारले जाते. त्यापुढे जाऊन असेही म्हणता येईल, नवनवीन फंडे वापरून इतिहासाचे अपभ्रंशीकरण आणि विकृतीकरणही केले जात आहे. परिणामी समाजमाध्यमांतून सत्य विपरीत करून त्यातून निर्माण केले जात असलेले भ्रामक वास्तव हे आजच्या काळातील भयानक वास्तव बनले आहे! आजच्या समाजाची आजची शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक प्रगल्भता म्हणावी तेवढी विकसित झालेली नाही. अशा विपरीत परिस्थितीत भारतात तरी अशा समाजमाध्यमांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच नैतिक जबाबदारीचेही भान बाळगणे गरजेचे आहे.– डॉ. बी. बी. घुगे, बीड.
महत्त्वाच्या विषयावर दृष्टिक्षेप
‘लोकरंग’मधील (२० जुलै) अतुल पेठे यांचा ‘आजारी समाजाच्या नोंदी’ हा लेख वाचला. समाजाच्या आजाराचे नेमके निदान करणेच कठीण आहे असा हा काळ आहे. समाज खूप तुकड्यांत विभागला गेला आहे. एका विभागाचे प्रश्न दुसऱ्याला माहीतच नाहीत. ते कळणे, समजणे तर दूरच. अशा विखंडित समाजात आपापल्या ठिकाणाहून त्या आजाराकडे पाहावे लागत आहे. एकाचे आकलन दुसऱ्यांना पोचेल याची शाश्वती नाही. त्यामुळे समग्र उपाययोजना करणे दुरापास्त झाले आहे. कारण संपूर्ण चित्र कोणत्याही एका लोकेशनवर दिसत नाही आणि उमगतदेखील नाही. तो आजार आहे की आपले प्राक्तन आहे याचे आकलन सामान्य माणसाला होत नाही. त्या आकलनाची पद्धतच हरवली आहे. त्यातील काही आजार अतुल पेठे यांनी नेमके नोंदवले आहेत. जगण्याची वाढलेली गतीदेखील हे आजारपण व समाजातील मूल्यांची धूप वाढवत आहे. नदी जितकी वेगाने वाहते तेवढी भोवतालच्या जमिनीची धूप अधिक वाढते. तेच मानवी जीवनाला लागू आहे. विचार करायला, रुजायला उसंत लागते. ज्या समाजाला उसंत नाही त्या समाजात संत निर्माण होणे कठीण असते, त्यामुळे उन्नत जीवनमूल्ये, परस्परांबद्दल आदर, माणुसकी, प्रेम, सहानुभूती, व्यापक पातळीवर न्याय, समता, बंधुभाव, अहिंसा, शांतता लोपत चाललेली दिसतात. बाजारव्यवस्थेचा जगण्यावर वाढणारा प्रभावदेखील मूल्यव्यवस्था आमूलाग्र बदलून टाकतो. सर्वकाही नफ्यासाठी, विक्रीसाठी स्वार्थासाठी हा दृष्टिकोन माणसांच्या परस्परसंबंधांवर स्वार होतो. देशाच्या राजकारणावर, राजकीय व्यवस्थेवर स्वार होतो. राजकीय कृतीचे प्राधान्यक्रम बदलतात. झटपट सत्ता, झटपट श्रीमंतीची स्वप्ने समाजभान व्यापून टाकतात.
सत्तेसाठी काहीही हा अग्रक्रम बनतो. मग समाज/ देश घडवणे, पुढे नेणे या कामात आधुनिक लोकशाही व्यवस्थेत मोठी जबाबदारी निभावणारी सरकार नामक व्यवस्था जर सत्ता टिकवण्यासाठी याच विकृतींना प्रोत्साहन देणारी असेल तर हे आजारपण देशव्यापी होते. समाजाच्या प्रत्येक भागाला त्याची बाधा होते.
तात्कालिक शॉर्टकट्स, तसेच उपाय, तात्पुरते सुख किंवा सुखाचा आभास याची रेलचेल होते. आता तर आपल्या जाणिवांचा बहुतांश भाग आभासी वास्तवाने व्यापला आहे. अहोरात्र टीव्हीवर चालणाऱ्या बेगडी सिरीयल्स, मोबाइलवर समाजमाध्यमांवर सत्ताधाऱ्यांची पगारी कुमक राबवत असलेला अजेंडा डोक्याची, विचार करण्याच्या क्षमतेची वाट लावत आहेत. खऱ्याखोट्याची पारख करण्याची कुवत संपवण्यात आली आहे. परिस्थितीचे विश्लेषण तर दूरच राहिले. या परिस्थितीत व्यक्ती आजारी आहेत हे काही अंशी खरे असले तरी संपूर्ण समाजव्यवस्थाच किडते आहे आणि ती सडवली जात आहे हे अधिक खरे आहे. या विकृतीला हातभार लावला जात आहे. त्यामुळे उपाय व्यक्ती वर नव्हे व्यवस्थेवर हवेत. ते करणारे मार्ग, विचारधारा, ते घडवणारे आकृतिबंध कोसळत आहेत कोसळवले जात आहेत अशा टप्प्यावर आपण आहोत. या आजारावर, आव्हानावर मात करायला नवे मार्ग, नवे पर्याय उभारायला हवेत. आजाराची नीट ओळख व निदान करायला हवे, तर त्यावर उपाय सापडेल. ते करण्यासाठी, बिघाड दुरुस्त करण्यासाठी विचार करणारे, वेळ देणारे, प्रयोग व प्रयत्नांचे सातत्य मानणारे निष्ठावंत, ध्यासकर्मी हवेत. विकृती नव्हे संस्कृती घडवणारे आधुनिक धुरीण हवेत. पण ही स्थिती कायम राहणार नाही, हा प्रकृतीचा नियम आहे. नवे बदल नवी पिढी आणणार हे नक्की. अशाच आघात व स्थित्यंतरातून मानवी संस्कृती इथपर्यंत पोचली आहे.- उल्का महाजन
सत्तासंघर्षाचे आणि राजकीय दडपशाहीचे साधन
‘लोकरंग’ मधील (३ ऑगस्ट) ‘अण्वस्त्रे शांततेचे हत्यार?’ हा संकल्प गुर्जर यांचा लेख वाचला. हिरोशिमा-नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ल्यानंतर अण्वस्त्रे जागतिक राजकारणातील सत्ता संतुलनाचे मुख्य साधन बनली. शीतयुद्ध काळात अमेरिका व सोव्हिएत युनियन यांच्यात अण्वस्त्रांवर आधारित ‘‘ Mutually Assured Destruction’’ या तत्त्वाने थेट युद्ध टळले, पण शस्त्रशर्यतीला चालना मिळाली. आजही अमेरिका-रशिया यांच्यातील संघर्ष, चीनचे आक्रमक धोरण, उत्तर कोरियाचे अण्वस्त्र चाचण्यांद्वारे केलेले इशारे आणि इराणच्या अणुउद्याोगावरून झालेला तणाव यामुळे अण्वस्त्रे पुन्हा जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. भारताने ‘‘No First Use’’ नीती स्वीकारून जबाबदारी दाखवली असली तरी पाकिस्तान आणि चीनसारख्या शेजाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सजग राहणे आवश्यक आहे. अण्वस्त्रांच्या विरोधात NPT व CTBT सारखे करार असले, तरी अमेरिका, चीन व रशिया यांसारख्या महासत्तांनी आपल्या राजकीय फायद्यांसाठी त्यातून अपवाद घेतल्यामुळे जागतिक स्तरावर या करारांची प्रभाविता कमी झाली आहे. त्यामुळे अण्वस्त्रे शांततेचे नाही, तर सत्तासंघर्षाचे आणि राजकीय दडपशाहीचे साधन ठरत आहेत.- फ्रँक डॉम्निक मिरांडा, वसई