टेराकोटा, फोटोग्राफी अशी माध्यमं पुष्पमाला यांनी स्वीकारली. ‘स्वत:चेच फोटो काढवून घेणं आणि त्यासाठीचं दिग्दर्शन तसंच ‘कलादिग्दर्शन’ करणं’-ही पद्धत त्यांनी अनेक कलाकृतींसाठी वापरली, पण त्यांची ‘शैली’ यापेक्षा निराळी. तिचा निव्वळ हस्तकौशल्याशी संबंध नाही…
देशोदेशींची कला आपल्याकडे पाहायला मिळावी आणि या देशांनाही आजची आधुनिक भारतीय कला कशी आहे हे दिसावं, म्हणून भारत सरकारच्या संस्कृती खात्याचं पाठबळ असलेल्या ‘ललित कला अकादमी’नं सन १९६८ पासून एक आंतरराष्ट्रीय त्रैवार्षिक प्रदर्शन (ट्रायएनिअल किंवा ‘त्रिनाले’) सुरू झालं होतं. त्यात अनेक देश भाग घ्यायचे आणि भारतीय कलावंतांनी उत्तमोत्तम कलाकृतीच इथं द्याव्यात यासाठी खास सुवर्णपदक/ रौप्यपदक वगैरे असायचं. आचके देत ही ‘त्रिनाले’ ११व्या खेपेला- २००५ मध्ये- बंदच पडली. मग २०१९ मध्ये १२वी त्रिनाले ‘होणार, होणार’ असा गाजावाजा करण्यात आला. कोविड हे आयतंच निमित्त मिळालं. पण अगदी १९९०च्या दशकापर्यंत दिल्लीतली, भारताची त्रिनाले हे एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय महाप्रदर्शन होतं. सहाव्या खेपेच्या, म्हणजे १९८६च्या ‘त्रिनाले’मध्ये त्या वेळी तिशीच्या उंबरठ्यावरल्या पुष्पमाला एन. यांना ‘शिल्पकलेचं सुवर्णपदक’ मिळालं, ही मोठीच बातमी होती. पण त्या वेळी काहीजण खवळलेही होते म्हणतात… कारण काय तर, पुष्पमाला यांचं ‘शिल्प’ हे टेराकोटाचं- म्हणजे मातीचंच – होतं. शिल्पकला म्हणजे दगडातून (/संगमरवरातून) किंवा ब्राँझ ओतून घडवलेली कलाकृती, या अभिजाततावादी व्याख्येचं भांडं पुष्पमालाच्या सुवर्णपदकानं फोडून टाकलं होतं. ‘क्राफ्टलासुद्धा आता शिल्पकलेची बक्षिसं मिळू लागली,’ असा टोकाचा वैताग त्यामुळे व्यक्त झाला होता. वास्तविक क्राफ्ट (हस्तकला किंवा कारागिरी) आणि उच्च कला यांच्यातला भेद मिटवण्याच्या, भारतीय आशयाचा शोध घेण्याच्या प्रयत्नांची प्रेरणा यामागे होती. ही प्रेरणा अर्थातच, बडोदे इथल्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कलाविभागाचे तत्कालीन प्रमुख आणि थोर भारतीय कलावंत- विचारवंत के. जी. सुब्रमणियन यांची. पुष्पमाला बंगलोरहून बडोद्यात कलाशिक्षणासाठी आली. मूळची कल्पक, पण तिच्यावर केजींचा प्रभाव पडला. जवळच्या पाड्यांवर अभ्याससहलीला जाणं, तिथल्या आदिवासींच्या कलाकृती पाहताना त्यांच्या जगण्याबद्दलही विचार करणं, हे अनुभव तिला नवे होते. यातूनच ‘द फूल’ किंवा ‘स्लीपिंग पिग’ अशा टेराकोटातल्या शिल्पकृती पुष्पमालानं घडवल्या. यापैकी ‘द फूल’ मध्ये चेहऱ्याच्या जागी मडकं असलेली, बसलेली मानवाकृती होती. डोकं/ मडकं हे नाट्य छानच साधणाऱ्या या कलाकृतीला पदक मिळणं साहजिक होतं.
आज पुष्पमाला यांना कुणी शिल्पकार म्हणून ओळखत नाही, इतकं काम त्यांनी फोटोग्राफी-आधारित कलेमध्ये केलेलं आहे. पुष्पमाला यांच्या फोटो-आधारित कलाकृतींमागचा विचार अधिक चांगल्या प्रकारे पोहोचला, असंही म्हणता येईल. त्याआधीची काही वर्षं त्या टेराकोटामध्ये काम करत होत्या. यापैकी एक म्हणजे, मुंबईच्या केमोल्ड आर्ट गॅलरीत प्रदर्शित झालेलं, जुन्या कागदपत्रांची बाडं गुंडाळून ठेवली आहेत अशी कलाकृती. त्यात तर ‘कारागिरी’सुद्धा नाही, असं पुष्पमालाला हिणवणाऱ्यांचं मत होतं. यापैकी एका चित्रकाराचे ‘केमोल्ड’शी मतभेद होण्याचं एक कारण, ‘पुष्पमालासारख्यांना ही गॅलरी डोक्यावर चढवते आहे’ हेसुद्धा होतं! पण ‘केमोल्ड’चाही तो पिढीबदलाचा काळ होता. या आर्ट गॅलरीचे संस्थापक केकू गांधी यांची कन्या शिरीन गांधी या स्वत:च्या पिढीतल्या दृश्यकलावंतांचं नवं काम दाखवू इच्छिताहेत, हे सरळच दिसत होतं. एकंदरीतच, १९५०-६०च्या दशकातलं भारतीय चित्रकला क्षेत्र आणि १९८०च्या नंतर, विशेषत: संगणकीकरण, जागतिकीकरण हे सारे बदल पाहाणारी पिढी असा तो संक्रमणाचा काळ होता. याच काळात पुष्पमाला यांचा आत्मशोधही सुरू होता. पुष्पमाला अशा परिस्थितीत होत्या की, हा आत्मशोध कशाहीमुळे सुरू होऊ शकला असताच. म्हणजे उदाहरणार्थ, समवयस्क पुरुष चित्रकार विवाहित आहेत की नाहीत, याची उठाठेव कुणी करत नाही- १९५६ साली जन्मलेल्या महिलेबद्दल मात्र या चौकशा एकविसाव्या शतकातही केल्या जातात, असंही एखादं ‘साधं’ (!) कारण अस्वस्थ करू शकलं असतं. किंवा ख्रिास्टोफर पिन्नी या अभ्यासकाचं ‘कॅमेरा इंडिका- द सोशल लाइफ ऑफ इंडियन फोटोग्राफ्स’ हे पुस्तक १९९८ मध्ये प्रकाशित झालं, हेही एक कारण ठरलं असतं. साधारण १९९७ पासून, म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवापासून भारतीयत्वाचा पुनर्शोध नवी पिढीदेखील घेत होती आणि त्यात ‘कॅलेंडर आर्ट’कडे आपल्या दृश्यसंस्कृतीचा इतिहास म्हणून पाहून, याही संस्कृतीचा अभ्यास होत होता. एकंदर पुष्पमालाचं फोटो-आधारित काम ‘दृश्यसंस्कृती’कडे झुकलेलं दिसतं. पण तेवढंच आहे का ते?
दृश्यसंस्कृतीकडे पुन्हा पाहण्यासाठी पुष्पमाला यांनी स्वत:ला या प्रतिमांमध्ये पाहिलं. तंत्र म्हणून हे त्याआधीही अमेरिकेत सिंडी शर्मन यांनी वापरलं होतं. ‘अनटायटल्ड फिल्म स्टिल्स’ या फोटोमालिकेतून शर्मन यांनी, हॉलिवुडमधल्या स्त्री- प्रतिमांचा आणि एकंदर हॉलिवुडी अमेरिकनपणाचा लेखाजोखा मांडला होता. त्यामुळे ‘फॅण्टम लेडी’ ही (फिअरलेस नादिया वगैरेंची आठवण करून देणारी) फोटोमालिका जेव्हा पुष्पमाला यांनी केली तेव्हा ‘सिंडी शर्मनची नक्कल’ असं हिणवणं अधिकच सोपं होतं. पण या मालिकेतून ‘नायिके’कडे पाहण्याचे दृष्टिकोन किती परस्परविरोधी आहेत हे पुष्पमाला यांनी उघड केलं, याकडे फार कमी जणांचं लक्ष गेलं. या फोटोंमधली नायिका (स्वत: पुष्पमालाच) एकाच वेळी मादक, शूर, भूतदयावादी, धूर्त, चटपटीत, ज्या पुरुषावर भाळली- त्याच्या विनवण्या करणारी… अशी सर्व ‘गुण’युक्त आहे. हे गुण आहेत, असं ठरवलं कोणी? चार घटका मनोरंजन हवं असलेल्या पुरुषांनी! हे सारं पुष्पमाला यांच्या ‘फॅण्टम लेडी’नं चव्हाट्यावर आणलं. पुढे हाच फोटो-चव्हाटा त्यांनी विविध कारणांसाठी वापरला. वसाहतवादी युरोपियनांनी भारतातल्या जातीजमातींचा ‘मानववंशशास्त्रीय अभ्यास’ करायचा म्हणून ज्या प्रकारचं छायाचित्रण केलं त्यावर पुष्पमाला यांची एक फोटोमालिका झाली, दुसरी ‘रस सिद्धान्ता’तल्या नव-रसांचे विभ्रम जुन्या कन्नड चित्रपटांतून कसे (बटबटीतपणेच) दिसले यावरची, तिसरी ‘नोकरी/ व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया’ या विषयावरली… या साऱ्यातून स्त्रीत्वाबद्दलचे आपल्या ‘दृश्यसंस्कृती’नं आणखीच खोल रुजवलेले ‘क्लीशे’- धोपटपाठ- त्या दाखवून देत होत्या.
पुढला टप्पा या धोपटपाठांना थेट आव्हान देण्याचा. याआधीच्या छायाचित्र-मालिकांसाठी जे विषय पुष्पमाला यांनी निवडले, त्यातून दिसणारे धोपटपाठ हे निरुपद्रवी होते. त्यामुळे त्या फोटोंमध्ये कुणाच्यातरी जागी पुष्पमालाच असणं, हा फारसा धक्का नवहता. पण पुढं थेट राजा रविवर्मा यांची ‘लक्ष्मी’, अबनीन्द्रनाथ टागोरांची शांतशीतल भारत-माता आणि हिंदुत्ववाद्यांना प्रिय असणारी सिंहारूढ भारतमाता, कर्नाटकात भरपूर चोऱ्या करून पकडली गेलेली सासूसुनेची दुक्कल… अशा विषयांना पुष्पमाला यांनी हात घातला. कोणतंही विडंबन न करता, फक्त या साऱ्या प्रतिमांच्या जागी स्वत: उभं राहून, त्यासाठीची साजसामग्री बनवून घेऊन त्यांनी हे फोटो साकारले. त्याहीनंतर आणखी कठीण असे विषय… सीताहरण, शूर्पणखावध यांसारखे. यातली शूर्पणखा ही लक्ष्मणावर भाळली आहे, पण लक्ष्मण तिच्यावर शस्त्र चालवून, तिचं नाक कापतो आहे, ही पुष्पमाला यांची कलाकृती आहे. कथानकाला पुष्पमाला यांच्या अन्य काही कलाकृतींत महत्त्व मिळालं, त्यांपैकी पॅरिसला फेलोशिपसाठी गेल्या असताना केलेली ३५ मिनिटांची, फक्त स्थिर छायाचित्रंच लागोपाठ दाखवणारी ‘फिल्म’ हा निराळा प्रयोग होता. या पॅरिस-मालिकेत त्या पॅरिसवासी महिला (नुसती नाही, पॅरिस ज्यासाठी कुख्यात आहे, ‘तसली’ बाई) अशा रूपात दिसल्या होत्या. पण हा अपवाद. एरवी त्यांच्या कलाकृती भारतातल्याच- एतद्देशीय- महिलांचं स्थान शोधणाऱ्या आहेत.
‘आम्हांस आम्ही पुन्हा पाहावे’ या प्रकारचा अनुभव पुष्पमाला यांच्या छायाचित्राधारित कलाकृती पाहताना सामान्यजनांनाही मिळू शकतो! पण पुन्हा स्वत:कडेच पाहायचं ते कशासाठी, हा प्रश्न पुष्पमाला यांना महत्त्वाचा वाटत असावा. अखेर आत्मशोधाशी निगडित असलेला हा प्रश्न के. जी. सुब्रमणियन यांच्या शिष्येला शोभणाराच आहे. पण त्या शोधात पुष्पमाला यांनी आता महिलांविषयीचा दृष्टिकोन आणि महिलांच्या प्रतिमांचं सादरीकरण हाही भाग महत्त्वाचा मानला. मात्र त्यातून त्यांना एक ‘शैली’ सापडली- समाजातले दुखरे- आणि म्हणून टाळले जाणारे- प्रश्न थेट पुन्हा लोकांपुढे मांडण्याची शैली! या शैलीचा संबंध हस्त-कौशल्याशी नाही. कारागिरीशी नाही. तो बुद्धीशी, विचारांशी, वैचारिकतेशी आहे.
या शैलीचा पुढला आविष्कार म्हणजे ‘डॉक्युमेण्टा इंडिका’ (२०२२) हे अख्खं प्रदर्शन. या प्रदर्शनात फोटोबिटो नव्हते. इथं ताम्रपट होते, शिलालेखसदृश वस्तू होत्या… आणि या साऱ्यांची – विशेषत: ताम्रपटांसारख्या वस्तूंची संख्या भरपूर होती. यातले बरेच ताम्रपट/ शिलालेख ‘घडवून घेतलेले’ होते. मात्र काही खरेही होते आणि त्यांवरल्या लिप्या फारसीपासून कन्नड/ तेलुगूपर्यंत अनेक होत्या. त्या पुरेशा वाचताही येत नव्हत्या. घडवलेल्या ताम्रपटांवरल्या लिप्या तर मुद्दामच अगम्य होत्या. या साऱ्यातून भूतकाळ वाटतो तितका साधा नाही, समजणाराही नाही हे प्रेक्षकावर ठसत होतं. कधीकाळी १९९४ साली पुष्पमाला यांनीच टेराकोटामध्ये जी ‘बांधून ठेवलेली बाडं’ मांडली होती, त्या बाडांमधला ऐवज जणू ‘आता प्रथमच’ लोकांपुढे आला!
पुष्पमाला पुढल्या वर्षी सत्तरीच्या होतील. आशीष राजाध्यक्ष यांना भारतीय चित्रपट-कोशाच्या कार्यात सहकार्य करण्याइतपत चित्रपट या माध्यमाचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. ‘चित्रपटाची भाषा’ भारतात कोणत्या भावनिक परिणामांसाठी वापरली जाते याची नेमकी जाण त्यांना आहे. ‘भारतीयत्वा’चा विचार कोण कसा करतं, कोणी कसा केला होता… त्यामध्ये महिलांचं स्थान काय, याकडेही पुष्पमाला यांचं लक्ष आहेच. तो त्यांच्या कलाकृतींना जोडणारा धागा आहे.
या कलाकृती काय करतात? ‘खऱ्या’ प्रतिमांऐवजी पुष्पमाला ‘स्वत:ला गोवून घेणाऱ्या’ प्रतिमा दाखवतात, त्यातून प्रेक्षकाला काय मिळतं? याचं एक महत्त्वाचं उत्तर असं की, गतकालीन/ दृश्यसंस्कृतीचा भाग झालेल्या प्रतिमांकडे नव्यानं प्रेक्षक नव्यानं पाहू शकतात ते पुष्पमालांमुळे. या नव्यानं पाहण्यात जर दृश्यसंस्कृतीच्या ‘रक्षणा’चा अभिनिवेश नसेल; आणि पुष्पमाला यांची कथानकं कला म्हणून स्वीकारण्याची तयारी असेल, तर स्वत:लाच नव्यानं पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते!
abhijeet.tamhane@expressindia.com