‘उत्क्रांती एक वैज्ञानिक अंधश्रद्धा?’ या पुस्तकावरील डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा ‘डार्विन मेल्याचं दु:ख नाही, पण..’ आणि डॉ. अरुण गद्रे यांचा ‘माझे पुस्तक छद्मविज्ञान नाही’ हे दोन्ही लेख वाचले. पुस्तकाचे लेखक डॉ. अरुण गद्रे यांनी अत्यंत चतुराईने आपली बाजू मांडली आहे. त्यात वैज्ञानिकांच्या संकल्पना आणि त्यांची परिभाषा हुशारीने वापरली आहे. (छद्मविज्ञानाचे सारे हुशार समर्थक हीच पद्धत वापरीत असतात!) पण असे करताना त्यांनी एक मोठी गफलत केली आहे. थॉमास कुन्ह याची ‘पॅराडाइम शिफ्ट’ची संकल्पना डॉ. गद्रे आपल्या समर्थनार्थ वापरतात. पण ही संकल्पना नेमकी काय आहे? कुन्ह सांगतो त्याप्रमाणे, ज्ञानसंपादनाच्या मार्गावर वैज्ञानिक चालत असताना काही नवीन गोष्टी अशा आढळतात की त्यातून नवीन प्रश्न तयार होतात. प्रस्थापित विज्ञान त्याचे स्पष्टीकरण करू शकत नाही. म्हणून सर्वस्वी नवीन दिशेने विचार करावा लागतो. त्याला ‘पॅराडाइम शिफ्ट’ म्हणतात. (वरील वाक्यांमधील ‘नवीन’ हा शब्द महत्त्वाचा.) उत्तम उदाहरण म्हणजे रुदरफोर्ड यांचा प्रोटॉन विकिरणांचा (प्रोटॉन स्कॅटिरगचा) प्रयोग व ‘कृष्णवस्तू प्रारण’ (ब्लॅक बॉडी रेडीएशन) यासंबंधीचे प्रयोग. यातले निष्कर्ष नवे, अनपेक्षित व धक्कादायक होते. त्यांची स्पष्टीकरणे शोधताना पुंजविज्ञानाचा (क्वान्टम मेकॅनिक्स) जन्म झाला व ‘निश्चित पद्धतीने चालणारे विश्व’ याची जागा ‘संभाव्यतेच्या नियमांनुसार चालणारे विश्व’ या पॅराडाइमने घेतली. एक पॅराडाइम शिफ्ट झाला. तात्पर्य, नवी निरीक्षणे, नवे प्रश्न आणि त्यांची उत्तरे शोधण्यासाठीच्या नव्या दिशा यातून पॅराडाइम शिफ्ट होतो. आता गद्रे यांच्या साऱ्या युक्तिवादात नवीन काय आहे? तर काहीच नाही! पूर्वापार मानवाला पडलेले आणि अजूनही अनुत्तरित असलेले काही जुनेच प्रश्न गद्रे उपस्थित करतात, आणि त्याची उत्तरे म्हणून ते ‘परमेश्वर’ हे जुनेच उत्तर पुढे करतात. त्यांनी शब्द भले ‘निर्मिक’ हा वापरला असेल; पण ती कल्पना जुनीच आहे. अगदी सुरुवातीला माणसाला पडणाऱ्या साऱ्या प्रश्नांचे उत्तर ‘परमेश्वर’ किंवा ‘देव’ हे एकच होते ना? पाऊस कसा पडतो? तर ‘परमेश्वर पाडतो!’ नारळात पाणी कुठून येते? तर ती ‘देवाची कारणी’ असते! आणि असे अनेक..
मग विज्ञानाने निसर्गाचे नियम शोधले. त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरे शोधली. तितक्या प्रमाणात देवाला ती कामे करण्यापासून सुटका मिळाली, पण अजूनही अनुत्तरित प्रश्न आहेतच. त्यांची उत्तरे देताना परमेश्वराचा सहारा घेणे (मग भलेही तुम्ही त्याला ‘निर्मिक’ म्हणा.) ही विचारांची नवी दिशा कशी? हा नवा पॅराडाइम कसा? हे जुन्या उत्तराकडे परत जाणे आहे. शिवाय ‘अमुक एक गोष्ट परमेश्वराने केली आहे’ हे खोटे ठरवण्यासाठी एखादी कसोटी आहे का? तर नाही! आणि अशी कसोटी ही तर वैज्ञानिक पद्धतीची मूलभूत आवश्यकता आहे. त्यातून पार पडल्यावरच एखादी गोष्ट विज्ञानात सत्य म्हणून स्वीकारली जाते.
डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्तातील काही त्रुटी भविष्यात लक्षात येऊही शकतील. मूळ सिद्धांतात काही मूलभूत बदलही होतील. (काही यापूर्वी झालेही आहेत.) परंतु ‘निर्मिक’ किंवा ‘इंटेलिजन्ट डिझाईन’ ही संकल्पना त्यातली नव्हे. हा ‘पॅराडाइम शिफ्ट’ही नव्हे. हे निश्चितपणे छाद्मविज्ञान आहे.
सुधीर पानसे
सद्य:स्थितीवरही भाष्य करणारी कादंबरी
‘लोकरंग’ (८ जानेवारी) मधील ‘देव चालले.. अर्थात मोकाशींचा सिनेमा!’ हा गणेश मतकरी यांचा लेख दि. बा. मोकाशी यांच्या ‘देव चालले’ या कादंबरीबद्दल सांगताना सद्य:स्थितीवरही भाष्य करणारा आहे. जुनी पिढी छोटय़ा गावात राहताना तेथील रुढी-परंपरांना सांभाळून होती. दिवसमान बदलत गेले, कालमानानुसार पुढची पिढी शहरात गेली. शिक्षण नोकऱ्या व्यवसाय करीत तिथेच स्थायिक झाली. या पिढीच्या बालपणीच्या आठवणी गावाशी, तेथील वातावरणाशी जोडलेल्या होत्या. पण तिथे जाऊन राहणे शक्य नव्हते. गावातील परंपरेशी अगदी जवळचे नाते असले तरीही गाव सोडून जाताना होणारी घालमेल मन बेचैन करते. कादंबरीतील पात्रे त्यांची परिस्थिती वेगवेगळी असली तरी नात्याने बांधलेली असून, या व्यक्ती केवळ गाव सोडत नाहीत तर ग्रामीण संस्कृतीपासून, एकत्र कुटुंबापासून व आपुलकीच्या नात्यापासून दूर जात आहेत. त्यांची घालमेल, उलघाल प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. खरे तर आजही अनेक व्यक्ती गाव कायमचे सोडून जेव्हा शहराकडे येतात तेव्हा त्यांच्या भावना त्याच आहेत. इतकी वर्षे जाऊनही मनातील भावभावना व बदल होताना आर्थिक प्रगती व आधुनिकतेकडे जाताना आपण बरेच काही गमावत आहोत ही भावना मात्र अजूनही दिसते तेव्हा जुन्या नव्याची कुठेतरी सांगड घातली जाईल हा आशावाद मनात निर्माण होतो.
– प्रफुल्लचंद्र काळे, नाशिक.
lokrang@expressindia.com