प्रफुल्ल शिलेदार
एकीकडे रील्समध्ये अंदाधुंद रमलेल्या, माध्यमांमध्येच अतोनात हरवलेल्या सामाजिक अवस्थेत दोन नवी मराठी नियतकालिके ‘वाचक’ तयार करण्याच्या धडपडीत उतरलीत. पैकी ‘नव अनुष्टुभ्’ची जीर्णोद्धाराची आत्ताची तिसरी खेप, तर या आठवड्यात ‘सृजन’ या त्रैमासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले. महाराष्ट्राला साहित्यिक आणि वैचारिक मासिक-नियतकालिकांची फारच मोठी वगैरे परंपरा असताना सद्या:स्थितीत मात्र काय चित्र दिसतेय? नियतकालिकांच्या दोन विद्यामान संपादकांना खटाटोपाचा हा झेंडा पुढे नेताना नक्की काय वाटते?
युरोपात सतराव्या शतकात आणि अमेरिकेत अठराव्या शतकात सुरू झालेली नियतकालिके भारतातून निघेपर्यंत एकोणिसावे शतक आले. बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ सुरू करायला १८३२ साल उजाडावे लागले. तिथपासून आतापर्यंत आपली जवळपास दोन शतकांची वाटचाल लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मधल्या प्रदीर्घ काळात अक्षरश: शेकडो बरीवाईट नियतकालिके, अनियतकालिके, लघुनियतकालिके जन्माला आली आणि आपापले आयुष्य जगून गेली. ज्यांना काही चेहरा होता त्यांचे संदर्भ अजूनही दिले जातात, बाकी काळाच्या ओघात नाहीशी झाली. दिवाळी अंकांचा वार्षिकोत्सव वगळता या सुमारे दोनशे वर्षांचा वारसा सांगणाऱ्या नियतकालिकांचा आणि आपल्या मराठी समाजाचा संबंध आता फारसा उरलेला नाही हे कटू सत्य आहे.
मराठीत निघणारी बहुतांश नियतकालिके अल्पायुषी ठरली तरी अनेक दशकांपासून निघणारी काही वाङ्मयीन आणि वैचारिक नियतकालिके आजतागायत प्रकाशित होत आहेत. ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ (१९१३), ‘युगवाणी’ (१९४६), ‘नवभारत’ (१९४७), ‘प्रतिष्ठान’ (१९५३), ‘मराठी संशोधन पत्रिका’ (१९५३), ‘पंचधारा’ (१९५८ -हैदराबादहून प्रकाशित), ‘समाज प्रबोधन पत्रिका’ (१९६२), ‘ललित’ (१९६४) अशा केवळ वानगीदाखल इथे उल्लेख केलेल्या या नियतकालिकांचे प्रकाशन तर साठहून अधिक वर्षांपासून होत आहे. याशिवायही नंतरच्या काळात निघालेली आणि अगदी नव्याने निघत असलेली इतरही काही महत्त्वाची नियतकालिके आज मराठीत प्रकाशित होत आहेत. ‘सत्यकथा’, ‘अभिरुची’ ‘अस्मितादर्श’ यांसारख्या नियतकालिकांनी आपल्या कालावधीत महत्त्वाचे कार्य केले आणि ठसा उमटवला. दोन शतकांचा टप्पा गाठू पाहणारा हा आपल्या नियतकालिकांचा वाङ्मयव्यवहार कठोर शब्दात सांगायचे झाल्यास कधीचाच मृत्युपंथाला लागलेला आहे. आपल्या भाषेच्या थोडे बाहेर जाऊन तुलना करून बघितले तर या विधानातली सत्यता सहज पटू शकेल. नियतकालिके खरे तर लेखक-वाचक यातला सेतू असतो. या अंगाने मल्याळम्, बंगाली, ओडिया, हिंदी अशा काही भाषांतील नियतकालिके मोठे काम करीत आहेत.
समाजाच्या अभिरुचीचा एक मानदंड त्या भाषेतली नियतकालिके हादेखील आहे. लेखकाचे नवे लेखन, त्यावरील चर्चा, समीक्षा, इतर ज्ञानशाखांशी जोडले जाणे, नवी वैचारिक आणि सैद्धांतिक मांडणी, परंपरेचा धांडोळा अशा गोष्टी नियतकालिकातून होतात. साहित्याचे चित्रकला, नाटक, संगीत, सिनेमा अशा इतर कलाक्षेत्रांशी संबंध नियतकालिकातून जोडले जाऊ शकतात. इतर भाषांमधील प्रवाह, भाषांतरे, समाजाच्या सर्व वर्गापुढील भेडसावणारे प्रश्न, विविध प्रवृत्तींची चिकित्सा अशा साहित्याची आणि जीवनाची समज वाढवणाऱ्या गोष्टी नियतकालिकांमधून येतात. नियतकालिके ही आपल्या समाजाची जिवंत वाङ्मयीन स्पंदने असतात. जे घडतंय ते टिपून घ्यायची क्षमता त्यांच्यात असते. पण मुळात साहित्याचेच महत्त्व आपल्या संस्कृतीत खूप खाली असल्याने, वाङ्मयीन नियतकालिके ही आपल्या समाजाच्या सांस्कृतिक गरजेतली शेवटची गोष्ट झालेली आहे. जीवनाचा तळ शोधणाऱ्या गंभीर कलांपेक्षा वरवरचा विरंगुळा हवाहवासा वाटतो आहे. एका बाजूने पाहिल्यास समाजापासून लेखक जितका जोडलेला राहील तितका समाज त्यात आपले प्रतिबिंब शोधून त्याच्याशी जोडलेला राहील याचा लेखकाला विसर पडलेला आहे. दुसऱ्या बाजूने पाहिल्यास आपल्या समाजाची एकंदर मानसिकता अशी आहे की तो फार बौद्धिक आणि अपारंपरिक गोष्टी जवळ करत नाही, त्याला लेखक त्याच्या फार पुढे गेलेला चालत नाही, त्याला तो स्वीकारत नाही. याचे प्रत्यंतर आपणास अनेकदा येत असते. असे अनेक पेच यात आहेत.
बारा-तेरा कोटी भाषक असलेल्या आपल्या मराठी भाषेत अक्षरश: मूठभर नियतकालिके-तीही जेमतेम बरी म्हणावी अशी निघत आहेत. या मासिकांच्या वर्गणीदारांची संख्या हजारांच्या वर जात नाही. गंभीर वाङ्मयीन नियतकालिकांचे भवितव्य कसेबसे जगणे आणि अल्पजीवी आयुष्य हेच राहणार का? याची कारणे काय असावीत? या नियतकालिकांना आपली जमीन सापडत नाही का? नियतकालिके वाचकांना अनाकर्षक वाटत आहेत का? संपादनात त्रुटी आणि ढिसाळपणा आहे का? काळाच्या गतीशी आपली नाळ जोडून घेण्यात ती अपयशी ठरत आहेत का? साहित्याचा इतर कलांशी संबंध जोडून घेऊन अधिक व्यापक भूमिका घेत आपला सर्जनशील परीघ विस्तारणे त्यांना शक्य होत नाहीय काय? जगभरातल्या प्रवाहांशी, घडामोडींशी, परिवर्तनाशी जोडले जाण्यात ती कमी पडत आहेत का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधून त्यावर उपाय काढणे निकडीचे झालेले आहे.
मराठीत जी काही चांगली नियतकालिके निघाली ती कुणा एखाद्याच्या बांधिलकीच्या आणि असोशीच्या बळावर निघाली. काही नियतकालिकांच्या प्रकाशनामागे एखादा ट्रस्ट, एखादी साहित्य संस्था, एखादे मंडळ असले तरीही त्यातली काहीच वर्षे ती एखाद्या एकट्याच्या बळावर चांगल्या तऱ्हेने निघतात. कुठलीही सर्वंकष संरचनात्मक व्यवस्था नसणे ही आपल्याकडील फार मोठी त्रुटी आहे. कशातरी तुटपुंज्या साधनांवर अंक काढणे आणि त्यातच धन्यता मानणे यात आपले दिवस चालले आहेत. एखादा संपादक एकखांबी तंबूसारखा एखाद्या नियतकालिकाचा डोलारा काही वर्षे सांभाळतो. एक-दोघे त्याला टेकू देतात. तो स्वत: अगदी अंकाच्या रॅपरला पोस्टाची तिकिटे लावण्यापासून सगळी कामे करतो, असे हे सांगण्यात धन्यता मानणारी आपली साहित्य-संस्कृती आहे. तो थकल्यावर सगळा डोलारा कोसळतो. त्याजागी एक शून्य उरते. पुन्हा नवे एकखांबी तंबू जन्माला येतात. ते तकलादू असतात. चिवटपणा नसल्याने तेही लवकरच कोसळतात. असे आपले जग आहे.
एकीकडे शासन साहित्य संमेलनाला दोन कोटींचे अनुदान देते तर दुसरीकडे नियतकालिकांना देत असलेले अनुदान इतके तुटपुंजे आहे की, त्यातून वर्षातला अर्धा अंकही काढणे शक्य नाही. शिवाय पोस्टेज प्रचंड वाढल्याने नियतकालिके काढणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. महाराष्ट्रात आज सुमारे ११,१५० ग्रंथालये आहेत. तुटपुंजे अनुदान देण्याऐवजी काही निकष लावून किमान तीन हजार ग्रंथालयांकरिता जर शासनातर्फे थेट नियतकालिकांकडे वर्गणी भरली गेली, तर आलेल्या वर्गणीच्या रकमेतून नियतकालिक स्वत:च्या बळावर उभे राहू शकेल, अनेक वाचकांपर्यंत नियतकालिक पोहोचेल आणि आणि वाचनसंस्कृती वाढायला मदत होईल. या कोंडीतून बाहेर पडायचे असे अनेक मार्ग निघू शकतात.
जगभरात अनेक विद्यापीठांमधून विशिष्ट विद्याभ्यासकेंद्री नियतकालिके दीर्घकाळापासून निघत आहेत. विशिष्ट प्रकारचे साहित्य, जसे दक्षिण आशियायी साहित्य, उत्तर-वासाहतिक साहित्य, एकोणिसाव्या शतकातील साहित्य, असे अभ्यासविषय केंद्रस्थानी ठेवून विद्यापीठे अभ्यासपूर्ण नियतकालिके काढतात. पण आपल्या विद्यापीठांकडून अशी अपेक्षाही कुणी ठेवताना दिसत नाही. विशिष्ट किंवा सगळ्या प्रकारच्या जगभरातल्या साहित्याचा खुलेपणाने विचार करणारी ‘ग्रँटा’ किंवा ‘द पॅरिस रिव्ह्यू’ किंवा शंभरी ओलांडलेले ‘पोएट्री’ यांसारखी अनेक नियतकालिके आज निघत आहेत आणि आपले मराठी वाचक ती मिळवून आपली भूक भागवत आहेत. अशा कामांकरिता पैसा उपलब्ध करून देणे हीदेखील शासनाची जबाबदारी आहे. अशा नियतकालिकांना मिळणारे व्यवस्थेचे पाठबळ काढून घेतले तर तिथला समाज मदतीचा हात पुढे करतो. नुकताच ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाचा सुमारे दोन अब्ज डॉलर्सचा निधी काढून घेतल्यानंतर तिथल्या अनेक संशोधन प्रकल्पांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे झाले होते. विद्यापीठाने लोकसहभागाचे आवाहन केले आणि या शासननिर्णयाला कायदेशीररीत्या आव्हान दिले. लोकांनी विद्यापीठाला भरघोस मदत केली आणि न्यायालयानेही ट्रम्प प्रशासनाचा विद्याकेंद्रे कमकुवत करण्याचा बेत हाणून पाडला. शासन निर्णयाविरुद्ध न्यायालयात आणि जनतेपुढे जाण्याचे धैर्य आपल्या विद्यापीठांकडून किंवा संस्थांकडून दाखवले जाणे आपल्या देशात सध्या तरी अशक्यप्राय आहे.
नव्वदच्या दशकानंतर प्रसिद्धीची अनेक माध्यमे हळूहळू खुली झाली. समाजमाध्यमांचे महत्त्व पटून प्रत्येक जण आपल्या आभासी छबीची काळजी घेऊ लागला. स्वत:च मुद्रण करून प्रकाशन करणे, समाज माध्यमावरून पुस्तकविक्री करणे अशा गोष्टी सहज शक्य झाल्या. मूठभर प्रकाशकांची मक्तेदारी जाऊन नवे प्रकाशक पुढे आले आणि प्रकाशनविश्वाचे उदारीकरण झाले. लोकशाही मार्गाने आलेल्या या खुलेपणाचे आपण स्वागतच करायला हवे. नव्या लेखकांची संख्या आणि लिहिण्याचा रेटा वाढत असल्याने नवे प्रकाशक येणे अपरिहार्य होते. सोबतच काही नवी नियतकालिकेही नव्या जाणिवेतून नव्या उत्साहाने प्रकाशित झाली. मात्र तीदेखील दुर्दैवाने सातत्य पाळू शकली नाही.
अशी परिस्थिती आणण्यात आपल्या वाङ्मय व्यवहारातील प्रत्येकाने हातभार लावला आहे. आपला मध्यमवर्गीय लेखक हा ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ अशा थंड आणि सुखासीन वृत्तीचा आहे. आपल्या समृद्ध संतपरंपरेतील बाकी गोष्टी बाजूला ठेवून नेमकी तेवढीच ओळ त्याने अंगात मुरवून घेतली आहे. समाजात कितीही पडझड झाली तरी त्याचे सोयरसुतक तो मानत नाही. राजकीयदृष्ट्या संवेदनशील गोष्टीवर आपल्या लेखनातून तो सहसा व्यक्त होत नाही. बहुतांश साहित्यविषयक संस्था, मंडळे, प्रतिष्ठाने या मोडकळीस आलेल्या जुनाट विचारांच्या पगड्याखाली आहेत. तिथून नवी पालवी फुटणे अशक्यप्राय दिसते आहे. पण नवे रक्त तर सळसळते आहेच. ते वाट कुठून शोधत आहे या प्रश्नाचे उत्तर थोडे आजूबाजूला पाहिल्यास चारी बाजूने टपून बसलेली इंग्रजी भाषा आपल्याला अभिजात वाकुल्या दाखवताना दिसेल. नव्या पिढीच्या हाती आपण आपल्या भाषेत काही देऊ शकणार आहोत की नाही, हा प्रश्नही कळीचा आहे. एवढी स्थितिशीलता असतानाही आपल्याकडच्या सांस्कृतिक घडामोडींनी फार वेग घेतला आहे असा भास सतत होतो आहे. ही आपण वेगाने करत असलेली सांस्कृतिक आगेकूच नसून ती प्रत्येकाला न आवरता येणारी घाई आहे. काळ फार वेगाने पुढे चालला आहे आणि आपण मागे पडतो की काय अशी भावना भाऊगर्दीतल्या सगळ्यांच्या मनात आहे. याचे कारण काळाचे नव्याने आलेले भान असते तर चालले असते कारण लेखक लिहितो ती त्याने लावलेली काळाशी एक शर्यतच असते. आपल्या खुणा वाहत्या पाण्यासारख्या काळाच्या प्रवाहावर ठेवाव्या याची असोशी प्रत्येक लेखकाला असते. आपल्या लेखनाचे अल्पजीवित्व लेखकाला ठाऊक असते. ते चिरंतनाच्या आसपासही जाऊ शकत नाही याची त्याला जाणीव असते. आपण असेपर्यंतच आपल्या या अपत्याला पुढील वर्गात ढकलण्याचा प्रयत्न करू या, अशा खजील जाणिवेने सुसाट सुटलेल्या सांस्कृतिक एक्स्प्रेसच्या मिळेल त्या डब्यात धक्काबुक्की करत आत शिरून जागा पटकवण्याची ही ओढाताण आहे. या ओढाताणीत कुठलीही गंभीरपणे सुरू असलेली गोष्ट मागे पडली तर नवल ते काय. ही गाडी कुठे चालली आहे, तिचे पुढचे स्टेशन कुठले याबाबतीत तो पूर्णपणे अंधारात आहे. आपण कुठेतरी जाणाऱ्या गाडीने पुढे जातोय या भावनेने त्याला भारून टाकले आहे. काळाची गती आपण आपल्या स्थलात स्थिर असल्याशिवाय कशी आकळणार? लेखक स्वत:च्या ‘स्थलात’ स्थिर असायला हवा आणि काळाचा व्यापक पट समोर असायला हवा तर काही नीट साधू शकते.वॉशिंग्टन डीसी येथील ‘लायब्ररी ऑफ काँग्रेस’ येथे जगभरातील लाखो पुस्तकांसह मराठी नियतकालिके आणि पुस्तके जपून ठेवलेली आहेत. ‘युगवाणी’चे गेल्या पंच्याहत्तर वर्षांचे अंक तिथे आहेत. अलीकडे कॉर्नेल युनिव्हर्सिटीत गेलो असताना तिथे अंजली नेर्लेकरांनी तयार केलेल्या ‘बॉम्बे पोएट्स अर्काइव्ह’मध्ये अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, आदिल जसावला, अरविंद मेहरोत्रा यांची हस्तलिखिते अत्यंत सुरक्षितपणे जपलेली आढळली आणि मागणी करताच उपलब्ध करून दिली. इंडियाना विद्यापीठात विलास सारंगांची कागदपत्रे जपलेली आहेत. आपल्याकडे हे शक्य नाही, हे त्यांना ठाऊक असल्यानेच त्यांनी ती तिकडे दिली. का शक्य नाही, याची कारणेदेखील उघड आहेत पण वारंवार तीच ती कारणे सांगायला आता लाज वाटते.
shiledarprafull@gmail.com
(लेखक विदर्भ साहित्य संघाच्या ‘युगवाणी’ या त्रैमासिकाचे संपादक आहेत.)