डॉ. पूर्वा अष्टपुत्रेलिखित ‘महाराष्ट्रातील नृसिंह मंदिरे- एक शोध’ या संशोधनपर ग्रंथाचे प्रकाशन २ मे रोजी होत आहे. ज्येष्ठ स्थापत्य तसेच मूर्तिकला अभ्यासक गो. बं. देगलूरकर यांनी या ग्रंथाला विवेचक प्रस्तावना लिहिली असून, त्यातील हा संपादित अंश..
वि ष्णूचे वर्णन ऋग्वेदापासून मिळते आहे. त्या वेळी इंद्रादी देवतांपैकी ती एक देवता मानली जाई, तिचे माहात्म्य लक्षणीय असले तरी तुलनेनी इतरांपेक्षा ती सामान्यच मानली जाई. कालांतराने तिचे महत्त्व वाढत गेले आणि अंतिमत: सृष्टीच्या पालनकर्त्यांचा मान तिला मिळाला. या कर्तृत्वविशेषाला अनुसरूनच तिला युगायुगात प्रगट व्हावे लागले. जेव्हा जेव्हा दुष्टशक्ती बळावत असते, तेव्हा तेव्हा सुष्टशक्तींना बळ देण्यास्तव श्रीविष्णूला पृथ्वीवर उतरावे लागत असे. या उतरण्यालाच अवतार म्हणायचे. रामायणकाळी असलेल्या केवळ पाच अवतारांची संख्या वाढत जाऊन ती ३९ पर्यंत पोहोचली. याचाच अर्थ असा घ्यावा लागतो की दुष्टशक्ती वरचेवर फोफावतच गेल्या. येथे एक बाब लक्षात घ्यायला हवी की, एकाच कारणामुळे श्रीविष्णूने अवतार घेतले असे नसून अनेक कारणाच्या निराकरणासाठी त्याला अवतार घ्यावे लागले. मत्स्यावताराच्या कारणापेक्षा कूर्मावतार घेण्याचे कारण वेगळे होते. असेच अन्य अवताराबद्दलही म्हणता येईल. मात्र सगळय़ाच अवतारासंबंधात एकच अनुस्यूत गोष्ट होती ती म्हणजे पृथ्वीचे रक्षण, याला कलीचा अवतार अपवाद समजावा.
या अवतार संकल्पनेबद्दलही मतमतांतरे असल्याचे दिसते. कोणी यातून उत्क्रांती पाहिली तर कोणी अन्य विचार मांडले. पुराणातून यांच्यासंबंधी आलेल्या कथा काही संकेताकडे निर्देश करणाऱ्या आहेत. त्यापैकी काहींचा उलगडा करून घ्यावा लागतो, त्यांच्यात वेगळाच अर्थ अनुस्यूत असतो.
या अवतारासंबंधी एक मत असेही आहे की वराह, संकर्षण इत्यादी देवता इसवीच्या ४थ्या-५व्या शतकांच्या आधीही होत्या. पैकी वराहाची अवतारात गणना झाली ती नंतरच्या काळात. दुसरे असे, की अवतारांच्या महत्त्वानुसार त्यांना मान्यता दिली गेलेली दिसते, कारण काही अवतार तत्कालिक तर काही अंशावतार असतात. पैकी नृसिंहही पहिल्या प्रकारचे तर वराह, वामन, परशुराम हे दुसऱ्या प्रकारात मोडतात. राम-कृष्ण हे पूर्णावतार म्हणून मान्यता पावलेले आहेत. पूजनीय म्हणून मान्यता लाभलेल्या या अवतारातही तरतमभाव असल्याचे यावरून दिसते.
नृसिंह अवताराची पुराणात कथा येते त्याप्रमाणे विष्णुभक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी नृसिंह अवतार झाला असे मानले जाते. मात्र चिकित्सक दृष्टीने पाहता असे दिसते की, आंध्रात असलेल्या प्रबळ अशा चंचू या वन्यजमातीला अभिजन व्यवस्थेत सामावून घेण्याच्या प्रयत्नाचे ते द्योतक आहे. चंचू जमातीचे सिंह हे दैवत होते. (टोटेम) नृसिंहाची पहिली प्रतिमा सिंहाच्याच रूपात आढळते. आंध्र प्रदेशातील कोंडामोतु या ठिकाणी सापडलेल्या शिल्पपटात पाच खांद्यावर शंख-चक्र कोरलेले आहेत. भरीतभर म्हणून सिंहाच्या छातीवर श्रीवत्सही दाखविलेले आहे. नृसिंह प्रकट झाला तो स्तंभातून. बावन्न वीरांच्या बहुधा सगळय़ा उपलब्ध याद्यातून नृसिंहाचे नाव आढळते. हे वीर काष्ठरूपात असत. म्हणजेच नृसिंह स्तंभ रूपात होता. त्याचा अर्थ असा की वीर रूपात तो होता आणि प्रल्हादामुळे अवतारात त्याची गणना होऊ लागली. वर सांगितल्याप्रमाणे अवतारांची संख्या वाढतच गेली. शेवटी दहा अवतार लोकप्रिय ठरले. यापैकी मत्स्य व कूर्म हे जलचर, वराह आणि नृसिंह हे वनचर, तर वामन नि परशुराम हे दोन बाह्मण आणि राम व कृष्ण हे दोन क्षत्रिय असे हे आठ अवतार मान्यता पावले. शिवाय बुद्ध व कल्की (पुढे होणारा) मिळून एकूण दहा अवतार झाले. इतर अवतारांच्या मूर्ती घडविण्यात आल्या नाहीतच, पण या दहा अवतारांपैकी सर्वाच्या मूर्ती घडवून त्यांची स्वतंत्र मंदिरात प्रतिष्ठापना निदान गुप्त काळापर्यंत तरी होत नसे.
नृसिंहाची स्वतंत्र मंदिरे उभारली गेली, विशेषत: दक्षिण भारतात. महाराष्ट्रातही ती उभारली गेली असावीत हे त्याच्या उत्कृष्ट घडणींच्या अनेक मूर्तीच्या उपलब्धतेवरून म्हणता येते. आज नृसिंहाची प्राचीन मंदिरे महाराष्ट्रात अभावानेच दिसतात, मात्र त्या काळच्या अनेक मूर्ती उपलब्ध आहेत.
नृसिंह मूर्ती – या अवतार देवतेच्या मूर्तीचा आढावा घेताना आढळते की याच्या आधीच्या म्हणजे मत्स्य, कूर्म, वराह यांच्या मूर्तीच्या प्रकारापेक्षा नृसिंहाच्या मूर्ती विविध प्रकारच्या आहेत. स्थौण नृसिंह, गिरीज नृसिंह, केवल नृसिंह, विदरण नृसिंह, योग नृसिंह, नृत्य नृसिंह आणि लक्ष्मी नृसिंह. या सर्व प्रकारांचे वर्णन येथे अर्थातच अभिप्रेत नाही. मात्र लक्ष्मी नृसिंहाबद्दलची एक विशेषता येथे नमूद करावी असे वाटते.
नृसिंहाची भक्तप्रियता वाढली किंवा वाढावी म्हणून इतर अवतारांपेक्षा यांच्या मूर्तीची घडण थोडी वेगळी केल्याचे आढळते. इतर अवतार केवळ द्विभुज असतात. नृसिंह कमीतकमी चार अधिकात अधिक म्हणजे सोळा भुजांचा असतो. या दृष्टीने त्याचे साम्य श्रीविष्णूशी असल्याचे दिसते. नव्हे, नव्हे तर तो विष्णूच आहे हे कळावे म्हणून लक्ष्मीला त्याच्या पत्नीच्या स्वरूपात दाखविले जाते. वामन, परशुराम हे ब्रह्मचारी असले तरी राम, बलराम, कृष्ण, बुद्ध यांचे तसे नाही. सीता, रेवती, रुक्मिणी आणि यशोधरा या अनुक्रमे या अवतारांच्या पत्नी आहेत. क्वचित लक्ष्मी वराहासमवेत असते हे खरे, पण प्रामुख्याने ती नृसिंहासवे असते. याचाच अर्थ असा की नृसिंह अवतार नसून तो प्रत्यक्ष विष्णूच आहे, इतके त्याचे महत्त्व वाढले, तसे भक्तही वाढले. प्राचीन काळच्या काही राजकुलांचे ते दैवत होते आणि आजही अनेक कुटुंबांचे दैवत आहे. इतकेच नव्हे तर वैशाख मासात त्याचे नवरात्रही साजरे केले जाते.
महाराष्ट्रातील अनेक कुलांचे कुलदैवत झालेल्या नृसिंहाची अशी अशी आहे कहाणी. म्हणूनच महाराष्ट्र शत्रूंचा कर्दनकाळ ठरला आणि संतांच्या मांदियाळीचे स्थानही ठरला. राजी तरी देऊ कासेची लंगोटी! नाठाळाचे काठी हाणू माथी॥ अशा प्रकृतीचा महाराष्ट्र नृसिंहाची उपासना करतो, याचे रहस्य उलगडणे वरील लिखाणावरून सुलभ ठरावे.
या ग्रंथात नृसिंह मंदिरांची सविस्तर माहिती तर आलेली आहेच आणि अर्थातच त्यातील नृसिंह मूर्तीची शास्त्रपूत माहितीही दिली गेली आहे. हे करताना केवळ प्राचीन मंदिरांचाच विचार लेखिकेने केला आहे असे नव्हे, तर सार्वजनिक मंदिरांबरोबरच खाजगी मंदिरे एवढेच नव्हे, तर घरांतील वा वाडय़ांतील परंपरेने विशेष ठरलेली देवघरेही विचारत घेतली आहेत. सुमारे १५०च्या वर भरणाऱ्या या मंदिरांचे वा देवघरांचे ऐकीव नव्हे तर प्रत्यक्ष ती मंदिरे पाहून त्यांचे वर्णन केलेले येथे आढळते.
प्रस्तुतचा ग्रंथ अष्टपुत्रे यांच्या लिखाणाच्या दर्जाचा परिचय करून देणारा आहे. संशोधनपद्धतीचा सराव नसतानाही पूरक वाचनीय ग्रंथांचा अभ्यास करून लिहिण्याचा लेखिकेचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. हे करताना काही ठिकाणी नेमकेपण कमी पडले आहे असे दिसते. त्याचे कारण लेखिकेने इतकी माहिती गोळा केली आहे की त्यातील काय द्यावे नि केवढे द्यावे, यासंबंधीचा तिच्या मनात गोंधळ उडालेला दिसतो. पण हे साहजिक आहे, स्वाभाविकही आहे. मंदिरस्थापत्य आणि मूर्तिशास्त्र हे दोन्ही विषय एकापरीने शास्त्रीय आहेत. मंदिरात जाऊन देवतामूर्तीचे दर्शन घेणाऱ्या भक्तांना या वास्तूकडे चिकित्सकपणे पाहणे जमणार नाही म्हणून जितकी शक्य आहे तेवढी माहिती देण्याचा लेखिकेचा प्रयत्न आहे हे स्पष्टपणे जाणवते. मूर्तिकलेची परिभाषा, मूर्तीचे प्रकार, आयुधे, लांछने, हस्तमुद्रा, आसनस्थिती यासंबंधीची सविस्तर माहितीही लेखिकेने अभ्यासपूर्वक दिली आहे. याशिवाय जिज्ञासूंच्या उपयोगी पडावे म्हणून तत्संबंधीच्या ग्रंथांचीही यादी सोबत दिलेली आहे.