|| मकरंद देशपांडे

मागच्या सदरात ‘सखाराम बाइंडर’वर आधारित ‘सखाराम की खोज में हवालदार’च्या पहिल्या प्रवेशाच्या शेवटी हवालदार नाकाबंदीवर ‘सखाराम बाइंडर’च्या तालमीवरून परतणाऱ्या रंगकर्मीना हटकतो आणि सांगतो, की त्याला ‘सखाराम बाइंडर’बद्दल, त्याच्या हिंसक वृत्तीबद्दल, त्याच्या जीवनातल्या आणि समाजानं घराबाहेर काढलेल्या बायकांबद्दल, त्याच्या अस्तित्ववादी मूल्यांबद्दल जास्त माहिती आहे.

सुशीलला- या नाटकाच्या दिग्दर्शकाला- हवालदार विश्वासात घेतो आणि केवळ एक ग्रेट, चांगलं नाटक करण्यापेक्षा ते खरं करणं जरुरीचं आहे हे पटवून देतो. त्यासाठी मुळात कलाकार त्या पात्रासारखा वाटला पाहिजे. खरेपणा तिथून सुरू होतो. सुशीलच्या लक्षात येतं की आसावरी आपल्याबरोबर राहते, आपले तिच्याशी शारीरिक संबंध आहेत म्हणून तिला चंपाचं पात्र दिलंय. पण खरं तर ती लक्ष्मी आहे. आणि दीपा- जिला लक्ष्मीचं पात्र दिलं आहे, ती स्वभावानं फार महत्त्वाकांक्षी नसल्यानं तिनं ‘मला चंपाची भूमिका का दिली नाही?’ हा प्रश्नच विचारलेला नाही. पण खरं तर तीच चंपा आहे. सखारामाच्या भूमिकेसाठी निवडला गेलेला सूर्या हा सखाराम करूच शकणार नाही, कारण तो कुणाच्या लग्नाला जायचं किंवा सिनेमा पाहायचा म्हणून तालीम टाळूच शकणार नाही. सखाराम हा शिस्तप्रिय आहे. ‘‘घर घरासारखं हवं. हा राजाचा महाल नाही, सखाराम बाइंडरचं घर आहे. तोंडात विडी आणि शिवी एकत्र राहते असं लोकं म्हणतात..’’ अशी सखारामची नाटकातली वाक्यं सूर्या बोलूच शकणार नाही. सुशील हवालदाराच्या ‘सखाराम’बद्दलच्या केस स्टडीपुढे नमतो आणि ठरवतो, की उद्याच्या तालमीत ‘ग्रेट’ नाटक करण्यापेक्षा ‘खरं’ नाटक करण्याचा प्रयत्न करू.

दीपा आणि आसावरीला एक खेळ खेळायला सुशील सांगतो. त्यात त्यांचे सकारात्मक आणि नकारात्मक गुण लिहायचे असतात. आसावरी स्वतचे जे नकारात्मक गुण सांगते ते ‘लक्ष्मी’साठी सकारात्मक ठरतात आणि त्यामुळे सुशीलला हवालदाराच्या समजेबद्दल आदर निर्माण होतो. आसावरी ‘चंपा’ नाही, तर ‘लक्ष्मी’ आहे, हे ठरवल्यावर आसावरी चिडते, त्रागा करते. तिला चंपाच करायची असते. पण ‘चंपा जेवढी जिवंत; तेवढाच तिचा मृत्यू अंगावर येणारा!’ असं हवालदाराचं म्हणणं असतं. आसावरी ‘लक्ष्मी’ करायला नकार देते. ती नाटक सोडते- आणि सुशीललाही! दीपा ‘चंपा’ करायला तयार होते. सूर्या ‘सखाराम’ करणार की नाही यापेक्षा सूर्या हा सखाराम वाटणारच नाही, तर त्याने प्रयत्न करण्यातही काही अर्थ नाही, असं हवालदाराचं म्हणणं पडतं. सुशील आणि हवालदारमध्ये वेगळाच वाद होतो- ‘सखाराम हा नायक की खलनायक?’ या वादात सखारामला नायक ठरवताना सुशील ज्या आवेशाने सखारामाची वाक्यं म्हणतो ते पाहून हवालदाराचं म्हणणं पडतं की सुशीलनंच सखाराम करावा. सुशीलला धक्का बसतो. कारण आता हवालदार त्याला सुशीलपासून दूर नेऊन ‘सखाराम’ बनवणार.. म्हणजे खरंच आयुष्याचं नाटक होणार.

सुशीलचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या संजूला चंपाचा नवरा बनवलं जातं. जो सबंध नाटकात एवढंच म्हणतो, ‘‘चंपा, दरवाज़ा खोलो चंपा! मुझे मार डाल चंपा. मं आ गया. मुझे मार डाल चंपा!’’ संजू सुरवातीला खुश होतो, की त्याला रोल मिळाला. पण लवकरच त्याच्या लक्षात येतं की, ज्या दीपाला त्यानं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्रास दिलेला असतो, त्या चंपाचा नवरा बनून आता चंपाकडून त्याला लाथाबुक्क्यांचा मार खायचा असतो. आणि तो खराखुरा असायला हवा असा दीपाचा आग्रह असतो. सखारामबरोबर चंपा राहायला आल्यावर ती सखारामच्या आखून दिलेल्या दिनक्रमानुसार दारू पिणं आणि संभोग करणं या गोष्टी करते. तिला संभोगासाठी दारू पिणं जरुरी असतं. कारण तिच्या नवऱ्यानं तिच्यावर केलेले लैंगिक अत्याचार! ते विसरण्यासाठी दारू!!

एका प्रवेशात दीपा, सुशील, संजू दारू पिऊन मध्यरात्री रस्त्यावरून चालत असताना अचानक दीपाला चंपाचा ‘नवऱ्याला मारण्याचा’ सीन करायचा असतो. संजूला काही कळायच्या आतच दीपा तो सीन खूपच खरा करते. भररस्त्यात चंपा नवऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारते. संजू कळवळतो. त्याला पोटात जोरात लाथ बसलेली असते. तो जीवाच्या आकांताने ओरडतो. सुशील घाबरतो. त्याच वेळी हवालदार तिथे नाकाबंदीसाठी येतो. त्याला घडलेली घटना कळते. दीपा अजूनही रागावलेली त्याला दिसते. हवलदार तिला त्या अवस्थेत पाहून म्हणतो की, ‘आता नाटक खरं व्हायला लागलंय. कारण तालमीत मारलं गेलं तर मग नाटकाबाहेर का दुखतंय?’ संजूला डॉक्टरांकडे नेण्यात येतं. वास्तव आता खरं व्हायला लागल्याने अस्तित्ववादाचं सत्य समोर यायला लागतं. मध्यमवर्गीयांना परिस्थितीतल्या विदारक सत्याला सामोरं जायची ताकद नसल्यानं केवळ मानसिक आक्रोश करावा लागतो- तोसुद्धा मौनपणे. पण चेहऱ्यावर मात्र सर्व काही व्यवस्थित आहे असे भाव ठेवावे लागतात. मात्र, परिस्थितीला सामोरं जायची ताकद असली की हिंसा ही होणारच, हे वास्तववादी अस्तित्ववादाचं सत्य सखाराम बाइंडरला पटलंय.

दीपा आता चंपासारखी दिवसभर दारूच्या नशेत असते. गायत्री ही नवीन नटी लक्ष्मीच्या पात्रासाठी तालीम करायला लागते. तिला तिच्या प्रियकराने वाईट वागवून सोडलेलं आहे. हवालदारानंच तिचं कास्टिंग केलंय. मात्र एक पंचाईत होते. आसावरी परत येते. तिला आता नाटकात परत यायचं असतं. सुशील याला तयार होत नाही. आसावरी लक्ष्मी करायलाही तयार असते. आता सुशीलला पक्कं  वाटतं की आसावरी ‘लक्ष्मी’च आहे. कारण लक्ष्मीसारखंच तिला सखारामला सोडायचं नसतं, गायत्रीला बाहेर काढायचं असतं. पण गायत्रीला बाहेर काढायचं कसं, हा प्रश्न हवालदार सहज सोडवतो. तो गायत्री आणि आसावरीला सांगतो की, शेवटच्या प्रवेशात सुशील ऊर्फ सखाराम हा दीपा ऊर्फ चंपाचा खून करणार तेव्हा त्याला तिचा जीव घेण्यासाठी मदत करायला कोण तयार आहे? आसावरी सुशीलसाठी.. त्याच्या प्रेमासाठी या गोष्टीला राजी होते. गायत्रीला नेमकं कळत नाही की, नाटकातल्या खुनासाठी खरी मानसिक तयारी कशासाठी?

हवालदार सुशीलला सांगतो की, चंपा झालेली दीपा पिऊन पिऊन मरण्याआधी तिला नाटकात चंपा म्हणून मारली पाहिजे. प्रयोगाची तारीख सुशील ठरवतो. आता चाललेल्या तालमी भीषण असतात. संजू बरा होऊन परततो, पण आता त्याला नाटकात काम करायचं नसतं. हवालदार एका बेवडय़ा माणसाला आणतो आणि सांगतो की, हा खरा चंपाचा नवरा आहे..कोतवाल शिंदे. आता नाटक एवढं खरं होतंय, की हवालदारानं खरंच एक बडतर्फ झालेला बेवडा कोतवाल नाटकात काम करण्यासाठी आणलाय.

प्रयोगाचा दिवस उजाडतो. पृथ्वी थिएटरमध्ये नाटकाचा शेवटचा प्रवेश सुरू होतो. गायत्री प्रेक्षकांना सांगते की शेवटचा प्रवेश होऊ देऊ नका. प्रेक्षक नाटकात आपलं भान हरवलेले असतात. गायत्रीला हवालदार बाहेर नेतो. सखाराम चंपाचा गळा दाबून खून करतो. लक्ष्मी त्याला मदत करते. दोघं नंतर घरातच खड्डा खणतात आणि चंपाला पुरतात. बंद दरवाजाबाहेर कोतवाल शिंदे ओरडतो- ‘‘चंपा, दार उघड. चंपा, दार उघड!’’

अंधार होतो. नाटक संपतं. पुन्हा रंगमंचावर प्रकाश. सगळे नट, बॅकस्टेजवाले सुन्न. प्रेक्षकांसमोर ‘कर्टन कॉल’साठी उभे राहतात. दीपा उठत नाही. गायत्री प्रेक्षकांमधून ओरडते, ‘‘दीपाचा खून झालाय. सुशीलने तिला मारलं आहे. त्याला पकडा.’’ हवालदार स्टेजवर येतो. दीपा मेली आहे का, हे पाहतो, खात्री करतो आणि सुशीलला पकडून घेऊन जातो.

तेंडुलकरांना सूचक हिंसा किंवा लैंगिक दृश्यं नको होती.. म्हणजे पडद्यामागे दाखवणं किंवा विंगेत दाखवणं! त्यांना वाटायचं की, नाटकाचा विषय जे म्हणू इच्छितो ते दाखवायला हवं, नाही तर नाटक करू नये.

मी विचार केला की, मी मध्यमवर्गीय लाज सोडून तेंडुलकरांच्या पात्रांची नियती किंवा नीति-अनीति खरी करू शकतो का? प्रयोग झाल्यावर बऱ्याच अंशी मी यात सफल झालो असं मला वाटलं. कारण प्रयोग पाहणारा प्रेक्षक हा खूपच नाजूक मन:स्थितीत असतो. त्याच्याकडून आपण अपेक्षित प्रतिक्रिया घेऊच शकतो. किंबहुना, तोच ती देतो.

कवि या कोलकात्याच्या फोटोग्राफरनं प्रकाशयोजना केली होती. अप्रतिम आविष्कार. प्रत्येक प्रवेश एक फोटोच होता. शैलेन्द्र बर्वेनं केलेलं पार्श्वसंगीत हे नवीन घेऊन आलं. खूपच परिणामकारक!

चंपाची भूमिका रत्नाबली भट्टाचार्य या बंगाली नटीनं खूपच भेदक केली. शबनम वढेराची आसावरी दु:खी, पण जास्त हिंसक वाटली. हवालदाराची भूमिका जितेंद्र शास्त्री या एनएसडीच्या नटानं केली. हा स्वतंत्र अभिनयशैली असलेला, कसलेला नट. त्याच्याबरोबर तालीम करताना मी म्हणायचो, ‘हा भारतीय रंगमंचावरील खूप महत्त्वाचा नट आहे.’ पण हल्ली माहीत नाही- तो कुठे आहे. या ‘सदरा’मुळे तो आठवला. त्याचा आता तपास करतो.

जय शास्त्री! जय नट!

जय चंपा! जय लक्ष्मी!

mvd248@gmail.com