मलबाराव सरदेसाई पहिलेच असे भेटले की आधुनिक रेकॉर्डिंग तंत्रज्ञान, रेडियो वगैरेमुळे संगीताचं नुकसान झालं, असं म्हणाले. या तंत्रज्ञानामुळे संगीत एकसारखं व्हायला लागलं, असं त्यांचं मत. पूर्वी, म्हणजे या तंत्रज्ञानाच्या आधी, माणसं आपापल्या परीनं गायची-वाजवायची, प्रत्येक ठिकाणचा/व्यक्तीचा एक ढंग होता, स्थानिकता होती… ती या तंत्रज्ञानामुळे हळूहळू कमी व्हायला लागली… अशी त्यांची तक्रार…

लहानपणी आपण एक खेळ नक्की खेळलेला असतो. एक हात पोटावरनं फिरवायचा आणि दुसऱ्या हातानं त्याचवेळी डोक्यावर थापण्याची क्रिया करायची. किंवा उलटं. म्हणजे पोटावर एका हातानं थापण्याची क्रिया करायची आणि दुसरा हात डोक्यावरनं फिरवायचा. नाही जमत. दोन हातानं दोन वेगवेगळ्या क्रिया करायला कमालीचं कौशल्य आणि एकाग्रता लागते. आणि इथे माझ्यासमोर जे गृहस्थ बसले होते ते एका हातानं त्रिताल, दुसऱ्या हातानं एकतालाच्या मात्रा मोजत होते, एका पायानं झपताल आणि दुसऱ्या पायानं रूपक असे चार वेगवेगळ्या तालांना खेळवत सर्वांना एकत्र समेवर आणत होते. यांच्याविषयी खूप ऐकलेलं होतं. प्रभाकर आंगले, सीताकांत लाड अशा अनेकांनी या असामीविषयी भरभरून सांगितलेलं. वसंतराव जोशांनी तर त्यांची कौतुकभरली नक्कल करून दाखवलेली. ते ऐकल्यावर वाटलं त्यांना भेटायलाच हवं. फोन नंबर वगैरे काही नव्हता त्यांचा. पण पत्ता लगेच कळला. सावई-वेरे हे त्यांचं गाव. फोंडा परिसरातलं. आधीच हा फोंडा परिसर रम्य. गोव्यातल्या अन्य प्रांतांप्रमाणे या परिसराला समुद्र किनाऱ्याची साथ नसेल. पण डोंगर आणि देवळांनी या परिसराला प्रसन्न-सात्विक केलंय. किनारी प्रदेशात शरीराची मजा करून झाली की मनाची शांतता शोधत फोंडा परिसरात हिंडावं असा इथला निसर्ग. इथली देवळं आणि त्यामागची तळी… त्या तळ्याच्या कडेला असलेली उंचउंच गेलेली सुपारीची किंवा नारळाची झाडं. त्यांनी त्या तळ्याच्या पाण्यावर सावली धरलेली. त्या देवळाच्या परिसरातल्या स्थानिक खाणावळीत ‘शीत’ आणि ‘नुस्त्याच्या’… म्हणजे माशांच्या… कालवणावर आडवा हात मारायचा आणि देवळातल्या कोनाड्यात मुटकुळं करून आडवं व्हायचं… या इतकी उत्तम ‘पंचकर्म चिकित्सा’ दुसरी असू शकत नाही असं माझं ठाम मत आहे. नुस्त्याच्या कालवणानं कुंडलिनी जागृत होते आणि कोनाड्यातल्या गारव्यात तृप्त देहाला ती शांत करते. सावई-वेरेचा परिसर अशा सुखशांतीनं पुरेपूर भरलेला.

मलबाराव सरदेसाई इथले. गावात सरदेसायांचा मोठा वाडा आहे. मोठे भाटकार. म्हणजे जमीनदार. सारस्वत. गोव्यात सरदेसाई घराणं प्रतिष्ठित. शांबाराव, लक्ष्मणराव, मनोहरराव अशा अनेक सरदेसायांनी घराण्याचं नाव काढलं. मलबाराव त्यातले. मी भेटायला गेलो ती १९९२-९३ ची गोष्ट. मलबारावांचं सहस्राचंद्रदर्शन काही वर्षांपूर्वी होऊन गेलेलं. पण वयानं त्यांच्या वाणीशी, वृत्तीशी कधीच फारकत घेतली असावी, असं त्यांचं दिसणं/वागणं. धोतर. वर पूर्ण बाह्यांचा शर्ट. पांढराच. त्या वरती काळा कोट. डोक्याला टोपी. हलकी तिरपी अशी. नाटकवाले घालतात तशी. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाला अशी एक रगेल धार. वाणी स्वच्छ. सार्वजनिक बसनं प्रवास करायचे त्या वयातही. दरारा असा की बसमध्ये मलबाराव आहेत असं दिसलं की मंडळी बसायचं टाळत. गोव्यातील कर्मठ समाजव्यवस्थेचाही परिणाम होता तो. मलबारावांना या सगळ्या समाजव्यवहाराशी कितपत घेणंदेणं होतं हा प्रश्नच. शक्यता अशी की ते तसं नसावं. त्यांचं वागणं पाहून असं वाटलं. मलबाराव तुम्हा-आम्हा मर्त्य मानवांप्रमाणे माणसांच्या सान्निध्यात नसायचे. त्यांच्या डोक्यात अखंड बैठक चाललेली असायची. तास दोन तास तरी असेन मी त्यांच्याकडे त्यावेळी. नंतर गोव्यात होतो तोपर्यंत दोन-तीनदा भेटही झाली. (त्यांच्या त्या गप्पांवर आधारित एक लेख त्यावेळी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या रविवारच्या अंकात मी लिहिलेला. त्याची प्रत दुर्दैवाने मिळू शकली नाही.) कधीही भेटा मलबारावांना, डाव्या नाही तर उजव्या हाताच्या बोटांची अखंड हालचाल. एखादा रेला जणू चालला असावा मनात त्यांच्या… नाहीतर कसला तरी ठेका धरलेला. आतापर्यंत संगीतसाधकांच्या, अभ्यासकांच्या अनेक मुलाखती घ्यायची संधी मिळालेली. पण मलबाराव पहिलेच असे भेटले की आधुनिक रेकॉर्डिंग तंत्रज्ञान, रेडियो वगैरेमुळे संगीताचं नुकसान झालं, असं म्हणाले. या तंत्रज्ञानामुळे संगीत एकसारखं व्हायला लागलं, असं त्यांचं मत. पूर्वी, म्हणजे या तंत्रज्ञानाच्या आधी, माणसं आपापल्या परीनं गायची-वाजवायची, प्रत्येक ठिकाणचा/व्यक्तीचा एक ढंग होता, स्थानिकता होती… ती या तंत्रज्ञानामुळे हळूहळू कमी व्हायला लागली…अशी त्यांची तक्रार.

मी त्यांचं ते मत ऐकून गडबडलो. आधुनिकतेचा, विज्ञानाचा वगैरे खंदा पुरस्कर्ता या नात्यानं ते त्यांचं म्हणणं मला पटेना. पण इतकी अधिकारी, आयुष्यभर संगीताचा-आणि त्यातही लयीचा-ध्यास घेतलेली व्यक्ती असं म्हणत होती. त्यामध्ये काही तरी तथ्य असणार. त्याविषयी आत्ता लिहिताना काय असेल ते असा विचार करायला गेलो तर मला मग एकदम एका अनुभवाची आठवण आली. अलीकडे एकदा सिक्कीम भटकत असताना एका सायंकाळी गंगटोकमध्ये गाडी शिरली आणि हे भलंथोरलं ‘बिग बझार’ समोर आलं. वाईट वाटलं ते पाहून. काळाच्या ओघात सगळी शहरं सारखी दिसू लागणार या भीतीनं ते पाहून छातीत हलकीशी कळ आली होती, त्याची आठवण झाली. मलबारावांच्या तेंव्हाच्या म्हणण्याचा अर्थ आता कळला. आणि तेव्हा त्यांच्यासाठी तर तो अर्थ पूर्णपणे खरा असणार ; कारण…

गोमंतकीय संगीत म्हणजे तिथली रम्य देवळं, भजनांची परंपरा, घुमट, सुवारी, पखवाज, लोकनाट्य, धालो… हेच ते जगत आले. ‘‘दहा कोसावर भाषा बदलते तसं संगीतही बदलतं…’’ हे त्यांचं निरीक्षण. रेकॉर्डिंग तंत्रज्ञान, आकाशवाणी वगैरेंनी या सांगीतिक वैविध्यावर घाला घातला, असं त्यांचं म्हणणं. मला रस होता तो त्यांनी अनुभवलेल्या संगीतात. श्वासाप्रमाणे त्यांच्या शरीराचा भाग झालेल्या लय या संकल्पनेत. त्याविषयी ते बोलत गेले आणि स्वरलयीचं नैसर्गिक शिंपण झालेल्या गोमंत भूमीचा रसाळ सांस्कृतिक पटच उलगडायला लागला.

मलबारावांच्या घराच्या आसपास देवळं भरपूर आणि या देवळांतले भजनी उत्सवही विपुल. त्यातही गोव्यात घरोघर भजनाची परंपरा. शेतीच्या किंवा अन्य पोटापाणाच्या उद्याोगासाठी दिवसभर बाहेर असलेले दिवेलागणीला घरी परतले की जेवणाची वेळ होईपर्यंत भिंतीवरच्या खुंटीवरचे टाळ-मृदुंग काढायचे आणि भजनात गळा साफ करायचा ही प्रथा. ज्यांच्या मनात गोव्याची फक्त पर्यटनी परंपरा रुतलेली आहे, त्यांना हे खरं वाटणार नाही. पण मी हे प्रत्यक्ष अनुभवलंय. कार्तिक पौर्णिमेच्या आसपास तुळशीची लग्नंही गोव्यात बेंड-बाजा लावून होतात. माघ पौर्णिमेच्या आसपास होणाऱ्या जाई-जुईच्या उत्सवात गावात उमलणारं जाई-जुईचं प्रत्येक फुल स्थानिक देवळात वाहिलं जातं. सारा आसमंत सुंगधांनं उजळून निघालेला असतो. पर्यटकांना खेचण्यासाठी ‘दाखवला’ जाणारा गोवा आणि गोव्याचा गाभा हे पूर्ण वेगळे. मलबारावांच्या रक्तात तो गाभ्यातला गोवा होता. त्या गोव्यात घरोघर भजनी सप्ताहांची परंपरा दोनेकशे वर्षांपूर्वी सुरू झाली असावी. यातनं एक स्पर्धाही तयार झाली. भजनी सप्ताहांची चर्चा व्हायची. कोणाचा सप्ताह चालला, कोणाचा पडला यंदा वगैरे. यावर्षी कोणाचा आवाज चांगला लागला, नवीन कोण गायला वगैरे चर्चा नंतर बराच काळ होत राहायची. गावाबाहेरची मंडळीही मग या सप्ताहांत सहभागी होण्यासाठी येत असत. ऐकणाऱ्यांची देवळं भरून गर्दी असायची. त्यातनं मलबारावांना दोन जबरदस्त गुरू मिळाले.

एक खाप्रुमाम पर्वतकर आणि दुसरे विख्यात संगीतकार पी. मधुकर. हे अंजनीबाईंप्रमाणे खरे मालपेकर. हे पेडण्याजवळचं एक गाव. मधुकरांनी पेडणेकर आडनाव लावलं. चित्रदुनियेत गेल्यावर त्यांचे पी. मधुकर झाले. या मधुकरांना तालीम मिळाली होती सांगलीतल्या अण्णासाहेब माईणकरांची. त्यांच्याकडे अगदी बालगंधर्व वगैरेंची उठबस. त्यामुळे लहानपणीच उत्तम संगीत, त्याची चर्चा कानावर पडली आणि या सगळ्यांना साथ करता करता मधुकर फार उच्चकोटीचे हार्मोनियमवादक बनले. ते गोव्यात परतले आणि चांगली तीनेक वर्ष मलबारावांकडे राहिले. (विख्यात ऑर्गन/हॉर्मोनियमवादक तुळशीदास बोरकर हे पी. मधुकर यांचे शिष्य. यावरून गुरू काय तोलाचा होता याचा अंदाज येईल.) मग काय सकाळ-संध्याकाळ फक्त गाणं आणि गाणं. दररोज सहा-सात तास किरकोळीत त्यांच्याबरोबर मलबारावांचं शिकणं व्हायचं. खरं तर ते शिकवणं/शिकणं नव्हत. नसतंच तसं. ती आनंदप्रक्रिया असते. फार कमी जणांना अशी शिकण्यातली आनंदसंधी मिळते. मलबारावांना ती अनेक पातळ्यांवर मिळाली. मधुकर यांच्याबरोबर पेटीची तालीम झाली की उरलेल्या काळात वडील, येणारे-जाणारे वगैरेंच्या गाण्याच्या गप्पा, चर्चा आणि प्रसंगी वाद. हे असं शिकणं डोक्याला चालना देणारं असतं. मलबारावांचं भाग्य असं की मधुकर मुंबईला परत गेले आणि खाप्रुमाम घरचे झाले. आजच्या पिढीच्या अनेकांना खाप्रुमाम माहीत नसतील.

अगदी अलीकडे ‘लोकसत्ता’च्या गप्पांत तौफिक कुरेशी येऊन गेले. तौफिक हे अल्लारखां अब्बांचे सुपुत्र आणि झाकीर हुसेन यांचे छोटे भाई. त्यांच्याशी गप्पा मारताना खाप्रुमाम यांचा उल्लेख झाला तर त्यांनी कानाची पाळी पकडली. झालंच तर पुलंनीही खाप्रुमामवर लिहिलंय. अनेक संगीतप्रेमींना ते आठवेल. ते एक विलक्षण रत्न. गोंयच्या खाणीतलं. ‘लयभास्कर’ ही त्यांची खरी ओळख. एखाद्या भजनी सप्ताहात, देवळात ‘‘आज खाप्रुमाम असा मरे…’’ अशी नुसती बातमी पसरायची खोटी. झुंडी यायच्या त्यांना ऐकायला. भजनांसाठी, देवदर्शनासाठी येतील न येतील. पण माणसं खाप्रुमामना वाजवताना ‘कानांनी पाहायला’ आणि ‘डोळ्यांनी ऐकायला’ यायची. त्यांचा तबल्यावरचा हात म्हणजे ‘सामको बिजली’. ते आधी भजनी सप्ताहांच्या निमित्तानं येत होते मलबारावांच्या घरी. नंतर राहायलाच आले. आणि पुढे तर असं झालं की मधुकर मुंबईतनं परत आले आणि खाप्रुमामही राहिले. त्या काळातले उत्तम हॉर्मोनियमवादक आणि उत्तम तबलिये… हे मलबारावांचे साथी झाले. घर स्वरांगण झालं. गोव्यात येणारं प्रत्येक संगीत नाटक, मेळा, जत्रा, दशावतारी खेळ… सगळं सगळं हे तिघांनी एकत्र अनुभवलं. तिघांनाही रस त्यातल्या संगीतात. एक स्वरांचा धांडोळा घेणारा… दुसरा लयीचा मागोवा काढणारा…! या सगळ्याच्या उत्तरकालातला अलीकडच्या पिढीतल्या सगळ्यांना माहीत असलेला एक साक्षीदार म्हणजे जितेंद्र अभिषेकी. ते मलबारावांचे घनिष्ट.
मलबाराव सांगत होते मधुकर, खाप्रुमाम यांचं एकत्र असणं ही अखंड सांगीतिक शिकवणी कशी असायची ते. एकदा हिराबाई बडोदेकरांची एक चीज (मलबारावांनी गुणगुणून दाखवलेली…आता आठवत नाही.) या सगळ्यांनी ऐकली. खाप्रुमाम घरी आल्यावर म्हणाले…आणखी कोणत्या तरी रागातही हीच चीज आहे. ती ते गुणगुणायला लागले. स्वरावली आठवत होती त्यांना. ते ऐकून मधुकर यांना लक्षात आलं ही चीज कोणत्या रागात आहे ते. त्यांनी पेटी काढली. मलबारावांना म्हणाले, बस तबल्यावर… त्रिताल धर… त्यांनी ठेका धरला. मधुकर गायला लागले. ते ऐकून खाप्रुमामनी मान डोलावली; बरोबर आहे म्हणाले… पण आणखीही एका रागात हीच चीज आहे, हा त्यांचा धोशा सुरूच होता. ते तीही गाऊन दाखवायला लागले. वेगळी कशी आहे ती ते सांगण्याचा प्रयत्न होता त्यांचा. शेजारी मधुकर आलटून-पालटून ती चीज हिराबाईंनी गाईली तशी गातायत…नंतर मधेच आणखी एका रागात शिरतायत आणि तरीही खाप्रुमामना वाटतंय तिसऱ्याही एका कोणा रागात ती आहे… मग ते ‘त्या’ रागातली सुरावट गाऊन दाखवतायत… हे असं बराच वेळ चाललं आणि मग अचानक खाप्रुमामांचा ‘युरेका’ क्षण आला आणि तिसऱ्या कोणत्या रागात ती चीज आहे, हे त्यांना आठवलं. मग ते तिघे एकच चीज त्या तीन वेगवेगळ्या रागात गातायत…त्यातल्या तिसऱ्या रागाचं तर मी नावही तो पर्यंत ऐकलेलं नव्हतं… मलबाराव सांगतात. आता त्यांनाही माहीत नसलेला तो राग…!

गोव्यात मंदिर संगीतात ‘घुमट’ हे वाद्या अगदी केंद्रस्थानी. खाप्रुमाम तबल्याच्या बरोबरीनं घुमट, मृदुंग अशी अन्य तालवाद्याही वाजवायचे. त्याचीही तालीम मलबारावांना सहज मिळत गेली. घुमट म्हणजे… घरचा पाण्याचा माठ समजा अधिक गोल केला, एका बाजूनं त्याचं तोंड आणखी चिंचोळं, अरुंद करून ते तसंच उघडं ठेवलं आणि बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेला तबल्याच्या तोंडाइतकं मोठं तोंड करून त्या बाजूनं तबल्यासारखं चामडं लावलं… तर ते जसं दिसेल तसं हे वाद्या. ते वाजवलं जातं मोठ्या बाजूच्या तबल्यासारख्या गोलावर. एक हातानं त्यावर बोल वाजवायचे आणि दुसरा हात दुसऱ्या बाजूच्या उघड्या, चिंचोळ्या तोंडावर. त्या हातानं हवेचा दाब, प्रवाह यावर नियंत्रण ठेवायचं. तबल्याच्या बोलात जी मात्रा ‘खाली’ असते त्या मात्रेला त्या चिंचोळ्या तोडावरचा हात सैल सोडून हवा जाऊ द्यायची. म्हणजे पलीकडच्या तबल्यासारख्या भागावरचा आघात, थाप वेगळी वेगळी ऐकायला येते. गणपती उत्सवात घराघरातल्या तासनतास चालणाऱ्या आरत्या या घुमटांशिवाय पूर्ण होत नाहीत. तबल्यावरचे ताल या घुमटावर वाजतात… पण त्याचे बोल काहीसे वेगळे. मात्रांत बदल होत नाही. म्हणजे तबल्याप्रमाणे घुमटावरचा केरवा आठ मात्रांचाच असतो. पण बोल तबल्याप्रमाणे… ‘धा गे ना ति न क धि ना’ हे नसतात. मलबाराव बसल्या बसल्या हे फरक इतके सहज वाजवून, समजावून सांगतात की आपणही थोड्यावेळानं तज्ज्ञ असल्यासारखं वाटायला लागतं.

ही खरी लोकसंगीताची ताकद. शास्त्रीय संगीत ‘मोठं’ असं मानून जनसंगीताविषयी नाकं मुरडणाऱ्यांनी मलबारावांसारख्यांना ऐकायला हवं. कुमारजीचंही हेच म्हणणं. ते आधुनिक काळातले. त्यामुळे त्यांचं म्हणणं रेकॉर्ड झालं, त्यावर लिहिलं गेलं, चर्चा झाल्या. पण खाप्रुमाम, मलबाराव यांचं कसलं ना रेकॉर्डिंग ना त्यांच्या काही नोंदी. या लेखासाठी गोव्यात चौकशी करत होतो तर त्यांचे वंशज सोडले तर कोणाला फारसं काही माहीतही नाही मलबारावांविषयी. जुना मित्र, गोव्यातला ज्येष्ठ पत्रकार राजु नायक यानं मलबारावांच्या घराची आताची छायाचित्रं पाठवली. ‘गोवा हिंदु असोसिएशन’नं मलबारावांचं एक पुस्तक प्रसिद्ध केल्याची मौलिक माहितीही त्यानं दिली. त्या व्यतिरिक्त त्यांच्यावर काही संदर्भ साहित्य नसावं याचा त्यालाही खेद वाटला. सुदैवानं ‘गोवा हिंदु’च्या इथल्या कार्यालयात एक प्रत होती. ती मिळाली. पण त्या पुस्तकाचा भर आहे तो गोव्यातल्या मंदिरी संगीताविषयी. त्यांच्या वाद्यापरंपरेविषयी. त्यावर मलबारावांची मतं, निरीक्षणं वगैरे. पण खुद्द मलबारावांवर त्यात काही माहिती नाही. आणि ते पुस्तक मलबारावांनीच लिहिलेलं असल्यानं स्वत:वरती काय लिहिणार…असा रास्त प्रश्न त्यांना पडला असणार…!

काहीही असो. खाप्रुमाम, मलबाराव…अशा दंतकथा बनून गेलेल्यांचं पुढच्या पिढीसाठी काहीच मागे न उरणं किती करंटेपणाचं ! इतका मोठा कलाकार. पण काहीच रेकॉर्डिंग नाही. आजही कोणी दोन हातांनी दोन वेगवेगळ्या कृती करायचा खेळ खेळताना दिसलं की मलबाराव आठवतात…अशा अवलियांची पैदास होत नाही हल्ली…!! ‘‘त्या’’ निर्मितीकाराचाही ताल चुकू लागलाय आताशा…

girish.kuber@expressindia.com

@girishkuber