घरात बाळ येणार म्हटले की घरात आनंद पसरतो. होणाऱ्या आईची व बाळाची वाटचाल सुसहय़, सुदृढ व आनंदी व्हावी यासाठी कौतुक सोहळे सुरू असतात. गरोदर अवस्था आणि बाळंतपण या आत्मिक सुख देणाऱ्या गोष्टी आहेत. पण गरोदरपणात शारीरिक आणि काही वेळा मानसिक ताणही सोसावा लागतो. वैद्यकशास्त्राने या बदलांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे हे नऊ महिने यशस्वीरीत्या कसे पार करायचे याची माहिती सर्वाना असते. या काळात  नव्या जीवाच्या उत्तम वाढीसाठी त्याचे आई-वडील आणि  कुटुंबीय झटत असतात. या काळात सर्व गोष्टी वेळेत व्हाव्यात अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण सर्वाची ही इच्छा पूर्ण होतेच असे नाही. कारण काहींना  वेळेआधीच  होणाऱ्या प्रसूतीला सामोरे जावे लागते. बाळ जगात येण्याची साधारण तारीख तपासण्यांच्या आधारे दिली जाते. चातकासारखी त्या तारखेची वाट पाहिली जाते आणि ती तारीख गाठली जावी असे प्रत्येक जोडप्याच्या मनात असते.
पण नेहा आणि शशांकच्या बाबतीत काहीसे अनपेक्षितच घडले. सातव्या महिन्याच्या नियमित तपासणीला ते गेले असता त्यांना एक विलक्षण निर्णय घ्यावा लागला. बाळंतपणाच्या अपेक्षित तारखेस अजून दोन महिने बाकी असताना तात्काळ प्रसूतीचा निर्णय त्यांना घ्यावा लागला. हा निर्णय म्हणजे सक्तीने स्वीकारावा लागलेला अंतिम पर्याय होता. भीती, असहायता, गोंधळ या भावनांनी त्यांचं मन व्यापलं. त्यांच्या डोळ्यांपुढे अंध:कार पसरला.
डॉक्टरांनी तपासणीचा अहवाल पुन्हा पाहिला व त्वरित बाळंतपण करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. नेहा आणि बाळाच्या जीवाच्या दृष्टीने तोच योग्य निर्णय होता. त्यामुळे शशांकने जराही वेळ न दवडता सगळी सूत्रे हाती घेतली. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल गाठले. तिथे  नेहाला अतिदक्षता विभागात दाखल केले. परंतु यावेळी मनात भीती दाटली होती ती- बाळ ठीक असेल ना, याची. ही एकच चिंता मनात घोंघावत होता. तब्बल दीड तास नेहाच्या वैद्यकीय इतिहासाची विचारणा करण्यात आली. नेहाला काही आठवत नव्हते. सुचत नव्हते. सांगावेसे वा बोलावेसेही वाटत नव्हते. बाळाच्या हृदयाचे ठोके लागले आणि काहीसे हायसे वाटले. पण अंतिम निकाल मनासारखा लागायला हे पुरेसं होतं का, ही धाकधूक नेहाच्या मनात होतीच. तिने आपलं मानसिक संतुलन ढळू न देण्याचा कसोशीने प्रयत्न केला. ‘आता जे होईल त्याला सामोरं जाऊ. पण आपल्या मनासारखंच होईल ही तीव्र आशा मात्र बाळगू!’ असा विचार नेहानं केला. बिचाऱ्या बाळाला काही त्रास होत नसेल ना, याबद्दल मात्र तिला सतत धास्ती वाटत होती. मागच्या वेळेसारखं यावेळीही काही विपरीत तर घडणार नाही ना? तसं घडू नये अशी मनोमन ती प्रार्थना करत होती.
तिला ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल करण्यात आलं. वैद्यकीय टीमच्या गराडय़ात नेहाला अगदी एकटं एकटं वाटू लागलं. ‘सगळं ठीक व्हावं’ ही इच्छा मात्र तीव्र होत चालली होती. आणि एकदाची तिची ही इच्छा पूर्ण झाली. बाळाच्या रडण्याचा सूर कानावर पडला आणि नेहाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. डोळ्यांत चमक आली. हायसं वाटलं- बाळाची फुप्फुसं विकसित झाली आहेत. ‘मुलगी झाली’ हे शब्द ऐकून तिचा जीव सुखावला. डॉक्टरांनी नेहाच्या गालाला बाळाचा गाल लावला. नेहाच्या डोळ्यांतील अश्रू थांबेनात. तिला बाळाला स्पर्श करायचा होता. उराशी घ्यायचं होतं. पण ते मात्र शक्य झालं नाही. त्या छोटय़ाशा जीवाला त्वरित लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात नेण्यात आलं. ती रात्र नेहा व शशांकने बाळाच्या विरहातच काढली. पुढचा दीड महिना बाळ आई-वडिलांपासून दूर, एकटं अतिदक्षता विभागात होतं.
गर्भारपणाचा असाही एक असामान्य प्रवास.. मानसिक घालमेल व द्वंद्व, असहायता, अशाश्वतता, विरह, शंका, राग तसंच अपराधीपणाच्या भावनेचा! भावनिक वादळांचे थैमान घालणारी ही घटना प्रत्यक्षात जे अनुभवतात त्यांनाच ती समजू शकते. अशावेळी त्या जोडप्याची, मुख्यत: त्या आईची मानसिकता समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं. अशा जोडप्याला ‘खंबीर राहा. टेन्शन घेऊ नका. सर्व काही ठीक होईल’ असे तथ्य नसलेले सल्ले देण्यापेक्षा त्या भावनिक वादळातून सावरायला वेळ व अवकाश द्यावा. बाळंतपणानंतरचा काळ हा आई-बाळाच्या कौतुकाचा असतो. अशा घटनेत त्या आईच्या बाबतीत हे शक्य होणार नाहीये याचं भान राखावं. त्या जोडप्याच्या गरजेप्रमाणे सांत्वन आणि आधार द्यावा. अशा आकस्मिक बाळंतपणानंतर आरामाऐवजी, कौतुक करून घेण्याऐवजी, घरात आनंदाने भारलेल्या वातावरणाऐवजी त्या आईला हॉस्पिटलच्या चकरा माराव्या लागतात. दिवसातला काही वेळच ती बाळाला पाहू शकते. अ‍ॅप्रन घालून, तोंडाला मास्क लावून बाळाला स्पर्श करू शकते.
यावेळी किती विलक्षण चमत्कारिक भावना त्या आईच्या मनात येत असतील याचा अंदाज बांधणंही कठीण! हॉस्पिटलच्या रोजच्या खेपा.. त्यात स्वत:ही शारीरिकदृष्टय़ा कमकुवत झालेली, वर बाळाच्या प्रकृतीची अहोरात्र काळजी करणाऱ्या त्या आईची व्यथा तीच जाणे! त्यामुळे तिला भेटायला जाण्याआधी तिची भेट घेण्याची मानसिकता, तयारी आणि गरज आहे का, हे प्रथम पाहावं. इतर वेळी जे सहज केलं जातं ते याबाबतीत करण्याचा (भेट घेणं) अट्टहास व आग्रह टाळावा. बाळ आपल्या घरी, आई-वडिलांच्या कुशीत येईतो आणि नंतर तब्येतीने ठणठणीत होईपर्यंत भेट घेण्याचं टाळावं. त्या जोडप्यानं आधार मागितल्यास तो नक्कीच द्यावा. परंतु इतर बाळंतिणींना उठसूट जे सल्ले दिले जातात (स्तनपान, खुराकाविषयी) ते टाळावेत. ही योग्य वेळ नाही आणि पारंपरिक गोष्टी या स्थितीत लागू पडतीलच असंही नाही. त्या जोडप्याला प्राप्त परिस्थितीला कशा तऱ्हेनं सामोरं जायचं, हे त्यांचं त्यांना ठरवायची मुभा द्यावी. एरवी आपण तान्ह्य़ा बाळाच्या बाललीलांबद्दल ऐकून सुखावतो. त्याची चर्चा करतो. हे जोडपं मात्र बाळाचं वजन किती वाढलं, तब्येतीतील प्रगती/अधोगती, त्यासाठीचे उपचार यासंबंधीच्या चिंतेत व्यग्र असतं याची आपण जाणीव ठेवावी आणि आपले परंपरागत सल्ले स्वत:कडेच ठेवावेत. डॉक्टरी सल्ल्यानुसारच वागण्याचा सल्ला त्यांना द्यावा. ‘हे त्यांचे भोग आहेत, प्राक्तन आहे’ वगैरे शाब्दिक सहानुभूतीने त्यांना आणखीन दुखावू नये. आपल्या ऐकिवातल्या ‘अशा’ मुलांबद्दल, त्यांच्या अनुभवांबद्दल त्या जोडप्याला उमेद वाटावी म्हणून सद्हेतूने सांगावंसं वाटेल; परंतु ते जोडपं हे सगळं तेव्हा ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत असेलच असं नाही. प्रसंगी त्यांची चिडचीड, रडारड याकडे स्वाभाविक पडसाद म्हणून पाहावं. परंतु त्याची तीव्रता वाढताना दिसली तर निकटच्या कुटुंबीयांनी त्या दोघांना मानसिक आरोग्यतज्ज्ञाच्या मदतीची गरज आहे का, हे जाणून घ्यावं आणि त्यानुसार त्वरित पावलं उचलावीत.
कोणताही गैरसमज करून न घेता त्यांची व्यथा समजून घ्यावी. त्यांच्या भावनांचा आदर राखावा. कुतूहलापोटी अनावश्यक चौकश्या करणं टाळावं. विसंगत सल्ले कटाक्षाने टाळावेत. किंवा आपल्या सल्ल्याचा उपयोग होईल असं वाटल्यास ते जोडपे तो ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत आहे का, हे पाहावं, नाही तर आपलं म्हणणं त्या जोडप्याच्या भावनिकदृष्टय़ा निकटतम व्यक्तीपर्यंत पोहोचवावं. त्या जोडप्यास मन मोकळं करावंसं वाटलं तर प्रगल्भ श्रोता बनावं.
प्रत्येक जोडप्याचा या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन असतो. तणावाशी झगडण्याची आपापली मानसिकता असते. एकमेकांवर दोषारोप न करता भांडण, वाद टाळावेत. एकमेकांची साथ घट्ट ठेवावी. वैद्यकीय सल्ल्यांकडे प्रगल्भतेने पाहावं. तसंच वागावं. इतर कोणत्याही गोष्टींनी विचलित न होता डॉक्टरी सल्ल्याने संगोपन पद्धतीचा स्वीकार करावा. गरज भासल्यास सपोर्ट ग्रुप्सचा आधार घ्यावा. मानसिक आरोग्यतज्ज्ञांची मदत आवर्जून घ्यावी. बाळाला अतिदक्षता विभागातून कधी सोडणार, घरी आल्यावर काय आणि कशी काळजी घ्यायची, इतर ‘बघे’ आपल्या बाळाच्या संदर्भात (उदा. वजन व शरीरयष्टी इ.संबंधी) काही बोलणार तर नाहीत ना? आणि समजा, त्यांनी तशी मल्लिनाथी केलीच, तर त्याला काय उत्तर द्यायचं, या व अशा असंख्य शंका या पालकांच्या मनात असतात असं संशोधन सांगतं. त्यामुळे इतक्या दिव्यांतून सुखरूप पार पडलेल्या बाळाला घरी आणल्यावर त्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत केवळ डॉक्टरांचा सल्ला आणि अशा प्रसंगातून गेलेल्या अन्य पालकांचे अनुभव याआधारेच आपलं वर्तन आखावं. संघर्षांचा हा काळ सदैव आपल्या स्मरणात राहील यात शंका नाही. परंतु बाळानं आपल्याकडे पाहून केलेलं स्मितहास्य पाहून आपण म्हणू- It’s all worth it.
डॉ. केतकी गद्रे – ketki.gadre@yahoo.com
(लेखिका मानसशास्त्रज्ञ आहे.)