‘विचारानें ज्ञान वाढतें, नीति सुधारते’

बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं ‘दर्पण’ १८४० मध्ये बंद पडलं. ते द्वैभाषिक नियतकालिक होतं.

अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे आणि भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे आकळावे, यासाठी हे सदर. यावेळचे मानकरी आहेत- भाऊ महाजन !

बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं ‘दर्पण’ १८४० मध्ये बंद पडलं. ते द्वैभाषिक नियतकालिक होतं. त्यातील इंग्रजी मजकुराचं संपादन स्वत: जांभेकर करत, तर मराठी विभाग भाऊ महाजन पाहत असत. या भाऊंचं मूळ नाव होतं- गोविंद विठ्ठल कुंटे. मूळचे ते पेणचे. बापू छत्रे हे त्यांचे मेव्हणे. त्यांनी भाऊंना वयाच्या आठव्या वर्षी शिक्षणासाठी मुंबईला आणलं. छत्र्यांच्या घरी राहत असल्याने भाऊंना नवे ज्ञान व इंग्रजीची ओळख होण्यात मदत झाली. नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. तिथं दादोबा व भास्कर पांडुरंग तर्खडकर हे बंधुद्वय त्यांचे सहाध्यायी होते. पुढे १९३७ साली ते एल्फिन्स्टन महाविद्यालयात दाखल झाले. शिक्षण घेत असतानाच त्यांनी एक मराठी साप्ताहिक सुरू केलं. ‘प्रभाकर’ हे त्याचं नाव. २४ ऑक्टोबर १९४१ रोजी त्याचा शुभारंभाचा अंक निघाला. त्यावेळी भाऊंचं वय होतं- फक्त २४! ‘देशकल्याण’ हा त्यातील लेखनाचा गाभा होता. ब्रिटिश वसाहतवादाची इथल्या ज्या विद्वानांना प्रथम जाणीव झाली, त्यात भाऊ महाजन हे एक होत. ‘प्रभाकर’मधील ‘फ्रिमेसन्स’ या शीर्षकाखालील संपादकीयातील हा उतारा पाहा-

‘‘भारतातील इंग्रज धर्मप्रसारक, लष्करी अधिकारी, शासकीय नोकरवर्ग, नौदल अधिकारी, तसेच उद्योग व्यावसायिक- सर्व जण एकजूट होतात आणि एकत्रितपणे कृती करतात. भारताबद्दल ते जे काही लिहितात त्यावर इंग्लंडमधील लोक सहजपणे विश्वास ठेवतात. त्यानुसारच भारताचे प्रशासन चालविले जाते. यामुळे देशाचा सर्वनाश ओढवला आहे.. एतद्देशीय कोणत्याही प्रकारचे धाडस दाखवीत नाहीत आणि देशाच्या प्रगतीसाठी काहीही करीत नाहीत. इंग्रज याचा फायदा उठवतात आणि उघडपणे सांगतात की या देशात शहाणे व शिकलेले लोक नाहीत. भारतीयांना याची लाज वाटली पाहिजे.’’

भाऊंनी ज्या नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले, त्या सोसायटीने भाषांतरित पुस्तके प्रकाशित करायला सुरुवात केल्याचे आपण आधीच्या लेखांतून पाहिलेच आहे. ही पुस्तकं शालेय स्तरावरील वाचनासाठी होती. तरीही या पुस्तकांनी विविध अभ्यासशाखांशी नव्याने ओळख झालेल्या मराठी भाषेला व समाजाला प्राथमिक वळण देण्याचे कार्य केले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यानंतर मराठीत नवे, समर्थ गद्य लिहिणाऱ्यांची एक फळीच उदयास आली. बापू छत्रे, बाळशास्त्री जांभेकर, हरी केशवजी आदी पहिल्या पिढीतील मंडळींनी भाषांतरित पुस्तकांद्वारे मराठी समाजात ज्ञानार्जन, ज्ञानप्रसार यांविषयी आस्था निर्माण केली. तथापि ही पुस्तके मुख्यत: सोसायटीच्या कॅण्डी, जाव्‍‌र्हिस आदी इंग्रज अधिकाऱ्यांच्या कल्पनेतून व त्यांच्या साहाय्यानेच निघाली होती. ही मंडळी या पुस्तकांतील मराठी भाषेबद्दलही भाषांतरकारांना सूचना करत असत. मराठीबद्दलच्या त्यांच्या सूचनांना नव्या पिढीतल्या काहींनी विरोध करायला सुरुवात केली. अशांमध्ये भाऊ प्रमुख होते. इंग्रजी मंडळींच्या कल्पनेतून किंवा त्यांच्या नियंत्रणाखालील भाषांतरित पुस्तकांनी मराठी भाषा व वाङ्मयाचा दर्जा उंचावणार नाही, इथल्या विद्वानांनी त्यासाठी स्वतंत्रपणे प्रयत्न करावयास हवा, अशी भाऊंची भूमिका होती.

असे असले तरी आधुनिक शिक्षणाची भाऊंनी नेहमीच पाठाराखण केली. इतकेच नव्हे तर स्त्रीशिक्षण आणि विधवाविवाहाविषयी आग्रही भूमिका घेतली. इथल्या समाजाच्या सणांवर पैसे खर्चण्याच्या सवयीवर त्यांनी ‘प्रभाकर’मधून वेळोवेळी टीकाही केली. पुढे १८५७ च्या उठावाबद्दलही त्यांनी लेखन केले. फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देणाऱ्या २५ लेखांची मालिका त्यांनी लिहिली. भाऊंचे हे सारे लेखन त्यांनी सुरू केलेल्या नियतकालिकांतूनच झाले. ‘प्रभाकर’नंतर भाऊंनी ६ मे १८५३ रोजी ‘धूमकेतू’ हे चार पानी साप्ताहिक सुरू केले. त्यातला विचारांची गरज कळकळीने सांगणारा हा उतारा पाहा-

‘‘जे लोक विचार न करिता मार्गात येईल तेवढय़ावरच निर्वाह करितात ते आपली स्थिती स्वतां कधींहि सुधारत नाहींत. यावरून असें समजावें, कीं विचार हा मोठा उपयोगाचा आहे. विचारानें केवळ अन्न-वस्त्र प्राप्त होतें, इतकेंच नाही तर विचारानें ज्ञान वाढतें, विद्या वृद्धिंगत होते, नीति सुधारते व नाना प्रकारचीं मन:कल्पित भयें व अनर्थ दूर होतात.

विचार केल्यानें एका मनुष्यास जे फायदे होतात तेच त्याच्या कुटुंबास होतात, तेच त्याच्या गावांस, देशास व कालेंकरून सर्व जगास होतात. यास्तव जितकीं विचारवंत मनुष्यें अधिक असतील तितकें जगाचें सुख विशेष व सत्वर वाढेल. विचारानें बहुतेक जुन्या चाली, जुन्या समजुती व जुनीं मतें मोडून टाकलीं जातात. विचारानें एकी जमतीं. विचारानें वाद तुटतो. विचारानें द्वेष मिटतो. विचारानें सद्गुण वाढतात. याप्रमाणें विचारानें अनेक कार्ये होतात.

आजपर्यंत या देशांत विचाराची बहुत कमताई होती. लोकांमध्यें जो विचार म्हणून होता ते केवळ खाण्यापिण्याच्या वस्तूंसंबंधी व मनाची चार घटका कर्मणूक करून कसाहि वेळ लोटण्याविषयीं होता. ज्या ॠषिमंडळांनीं व साधुसंतांनी एकांतवासांत बसून विचाररूप अन्न सिद्ध केलें तें थोडय़ांच्याच वाटणीस आलें व ज्यांनीं त्याचें सेवन केलें त्यांस त्यापासून विशेष हित झालें असें म्हणतां येत नाहीं. आणि आतां जी नवीन प्रजा उत्पन्न होत आहे त्यांच्या कोमळ वाढत्ये क्षुधेस तें बहुता दिवसांचें जडान्न उपयोगाचें नाहीं; तर अशा बाळकांस निऱ्या दुधाप्रमाणें स्वच्छ व पुष्टिकारक अन्न पाहिजे. तें आपल्याच लोकांनी सिद्ध करावें.

परंतु ही बुद्धि आमच्या लोकांस कशी उत्पन्न होईल? ते स्वतां या गोष्टीचा विचार करीत नाहींत व दुसऱ्यासहि मोकळेपणीं करूं देत नाहींत. त्यांचा विचार लग्न, मुंजी, सणवार, जेवणावळीं करणें, वरघोडा काढणें, जातीसंबंधी वृथा वाद करणें यांतच घोळत असतो. तेव्हां शहाणपण वाढविण्याचा व देश सुधारण्याचा गोष्टीचा विचार करायास त्यांस अवकाश कोठून मिळेल? बडे लोकांचें मन या कामांत गुंतलें, तर ब्राह्मण, उपाध्ये यांनीं सारीं श्लाघ्य कर्में पत्करावीं, तेंहि नाहीं. ग्रामण्याच्या मसलतींत व ‘दछना’ मिळण्याचे उपाय शोधून काढण्यांत त्यांचें सर्व मन, बुद्धि, विचार लागले आहेत. हरदासबावास हें काम सांगावे तर तेंहि टाळ कुटण्याच्या व घिरटय़ा घालण्याच्या गोंधळांत पडले आहेत, तेव्हां त्यांची विचारशक्ति कोठून जागृत होईल? पुराणिकांस विनंती करावी तर ते सप्ताह करण्यांत व कौरव-पांडवांच्या युद्धांत निमग्न होऊन बसले आहेत. तेव्हां अर्थातच त्यांस फुरसत होत नाहीं.

वाणी लोकांचे महाराज विचार करितील असी आशा बाळगावी तर त्यांच्या भाविक शिष्यांची रात्रंदिवस गुरूचें दर्शन घेण्यास जी महाराजापासीं दाटी होती तिजमुळें त्यांस किमपी विश्रांती मिळत नाहीं.

याप्रमाणें जिकडे पाहावें तिकडे सर्वत्र शिथिलता दृष्टीस पडती. या लोकांनीं विचाराचीं द्वारें बंद करून सर्व कारभार परंपरागत चालीप्रमाणें चालविला आहे. जर हे लोक हीं द्वारे उघडतील तर सत्याचा प्रकाश आंत येऊन त्यांचीं बहुतेक कर्मे दूषणीय आहेत असें त्यांस दिसूं लागेल व त्यांचा त्याग करून त्याबद्दल दुसरीं कोणतीं निर्दोष कृत्यें आरंभावीं हेंहि त्यांस समजेल. यास्तव हे लोक हो, जर तुम्हांस ज्ञान, विद्या, नीति यांच्या उंच पायरीवर चढायचें असलें तर तुम्हीं सदसद्विचार करूं लागा. आपण पूर्वी कसे होतों, आतां कसे आहों, पुढें कसें होऊं, आपल्या देशास काय पाहिजे, तें कोठून मिळेल, व केव्हां मिळेल इत्यादि अनेक विषयांवर विचार करा म्हणजे तुम्हांस आपले चांगले मनोरथ सिद्धिस नेण्यास उपाय सुचतील.’’

विचारांचे हे भान भाऊंनी व्यक्त केलेच; पण त्याहीपुढे जाऊन १८५४ मध्ये त्यांनी ‘ज्ञानदर्शन’ हे त्रमासिक सुरू केले. मराठीतून कायदा, नीतिशास्त्र, मानसशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, पदार्थविज्ञान, राजकीय अर्थशास्त्र, इतिहास या विषयांवरचे लेख त्यात प्रसिद्ध होत. याशिवाय उल्लेखनीय बाब म्हणजे त्याच्या ऑक्टोबर, १८५४ च्या अंकात एका कादंबरीचे पहिले प्रकरण प्रसिद्ध झाले होते. ही कादंबरी भाऊंनी लिहायला घेतली होती. तिचं नाव- ‘परागंदा जाहालेल्या गृहस्थाची कन्या’! त्यातील सुरुवातीचा हा भाग-

‘‘गांवच्या देवळांतली कथा आटोपून लोक आपआपल्या घरी निघून गेले. त्यावेळेस रात्र फार आंधेरी होती; वारा मोठय़ा सोसाटय़ाने वाहात होता; या वाऱ्याच्या योगाने झाडेंझुडें जमिनीपर्यंत लवत असत, व त्यांच्या खांद्या मोडून कडाकड शब्द होत असे, व तीं झाडें मुळांसुद्धां उपटून खाली पडतील असं सर्वास धास्ती पडली होती. शहरपन्ह्याचे स्वार आपल्या गस्तीवर हळूहळू फिरत होते. शब्दायमान् वायूने मिश्रित असा आसपासच्या शेतांवरील जागृत आणि सावध श्वानपुत्रांच्या भोंकण्याचा प्रतिध्वनि ऐकू येत असे. या रात्रीचें भयानक स्वरूप पूर्णतेस येण्याला एक पर्जन्याची कमती होती; परंतु शेवटी मोठा पाऊसही पडूं लागून रात्रीच्या त्या भयानक स्वरूपाची पूर्णता जाहाली.

परंतु असली वादळें अत्यंत व्यग्रचित्ताच्या खिसगणतीतही नाहीत आणि संभाजीराव आणि त्यांची कन्या ही देवळांतून निघाल्यावर सावकाश हळूहळू घरीं जात होती. त्याजवरून आपण वाऱ्यापावसांत चालतों आहों किंवा स्वच्छ रमणीय चांदिण्यात चालतों आहों इकडेस त्यांचे काहींच लक्ष नव्हतें हें उघड दिसून येतें.

‘‘ईश्वर तुझी काय गत करील ती खरी, तुझी काय गत करील ती खरी!’’ असें तो वृद्धमनुष्य तोंडातल्या तोंडांत ह्मणाला.

यमुनेनें त्यांच्या तोंडाकडेस पाहून ह्मटले, ‘‘बाबा, मात्क्याने तुह्मी दु:ख करितां मजविषयीं ह्मटले तर ही केवढी अविचाराची गोष्ट आहे. आपल्या गणूवर तुमची जशी प्रीति आहे तशी माझीही आहे. पण तो गेला ह्मणून मला दु:ख होत नाहीं. माझा त्याजवर विश्वास आहे. तुह्मी ही त्याजवर विश्वास ठेवतात. गरीबबापडा! त्याचा स्वभाव पाहून मला त्याची अंत:करणापासून दया येत्ये.’’

ही कादंबरीची सुरुवात आहे. कादंबरीची तीन प्रकरणे ‘ज्ञानदर्शन’मध्ये क्रमश: प्रसिद्ध झाली. परंतु पुढे १८५६ मध्ये तेही बंद पडले आणि कादंबरीचे लेखनही. ती पूर्ण झाली असती तर मराठीतील पहिली कादंबरी ठरू शकली असती. ही अपूर्ण कादंबरी ‘लोकसत्ता’च्या २००० सालच्या दिवाळी अंकात पुन:प्रकाशित करण्यात आली होती. डायमंड पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या ज. वि. नाईकलिखित ‘भाऊ महाजन आणि पहिली मराठी कादंबरी’ या पुस्तकातही ती वाचायला मिळेल.

संकलन – प्रसाद हावळे

प्रसाद हावळे – prasad.havale@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bhau mahajan role in marathi language development

ताज्या बातम्या