अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील निवडक वेच्यांद्वारे भाषासौष्ठव समजून घ्यावे, त्यातून विचारांचे व भाषेचे ‘मराठी वळण’ कसे घडत गेले हे कळावे आणि आपण या वळणाच्या कोणत्या टप्प्यावर आहोत, याबद्दलचे प्रश्न सुजाण वाचकांना पडावेत याकरता हे सदर. यावेळचे मानकरी- मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘महाराष्ट्र भाषेंत शुद्ध रीतीनें वाक्ययोजना करून रसभरीत असे पहिले ग्रंथ सदाशिव काशिनाथ छत्रे यांणी रचिले; म्हणोन यांस गद्यात्मक ग्रंथांचे जनक म्हटल्यास हि साजेल.’’

गेल्या आठवडय़ात ज्यांच्या लेखनशैलीचा आपण परिचय करून घेतला त्या बापू छत्रेंविषयीचे हे उद्गार. ते काढले आहेत दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी. मराठीची इंग्रजी-फ्रेंचशी तुलना करताना छत्रेंनी आपल्याकडे व्याकरण आणि कोश निर्माण न झाल्याची तक्रार केली होती. परंतु या तक्रारीनंतरच्या आठ वर्षांतच- म्हणजे इ. स. १८३६ मध्ये छत्रेंच्या योगदानाची दखल घेणाऱ्या याच दादोबांनी मराठी भाषेचे व्याकरण सिद्ध केले. ‘महाराष्ट्र भाषेचे व्याकरण’ या पुस्तकाद्वारे ते सर्वांपर्यंत पोहोचले. त्याच्या प्रस्तावनेतच त्यांनी छत्रेंची ही प्रशंसा केली आहे. या पुस्तकाच्या १८५७ साली आलेल्या तिसऱ्या आवृत्तीत ते लिहितात-

‘‘याच काळीं कित्येक पंडितांनीं मिळून एक महाराष्ट्र कोश केला हें एक मोठें उपयोगी काम झालें. अलिकडेच दर्पण व तदनंतर प्रभाकर हीं वर्तमानपत्रें निघाल्यापासून मोठा लाभ हा झाला कीं, त्यांच्या द्वारें लोकांस ज्ञान होऊन एथील लोकांत मराठींत गद्यरूपानें लिहिण्याचा प्रचार चांगला वाढत चालला आहे. तेव्हा अशासमयीं व्याकरणद्वारानें भाषेचें नियमन करणें किती आवश्यक आहे हें सूज्ञ पुरुष जाणतच असतील. जितकें साधेल तितकें करून, आजपावेतों जिला नियमांत आणण्याविषयीं कोणीं प्रयत्नच केला नाहीं म्हणोन अत्यंत विस्कळित झालेली व व्याकरणरूप फणीनें जिला कोणीं विंचरलेंच नाहीं म्हणोन जींत अनेक ग्रंथि जमून फारच गुंतलेली, अशी जी ही मराठी भाषा, तिला कांहीं तरी नियमांत आणावी, आणि दीर्घकाळग्रथित जी तिची गूत ती हातीं घेऊन तिचे पदर कांहीं सोडवून काहीं तरी उकलण्याच्या धोरणांत आणून बसवावी..’’ अशा शब्दांत मराठीसाठी व्याकरणाच्या फणीची आवश्यकता का आहे, हे सांगितल्यावर दादोबांनी पुढे तत्कालीन मराठी भाषेच्या विविध प्रादेशिक प्रकारांची माहिती दिली आहे. ती अशी..

‘‘ही महाराष्ट्र भाषा आजपावेतों नियमांत नव्हती, म्हणोन इचे प्रकारहि फार आढळतात, दहाबारा कोशांवर भाषा बदलत्ये, म्हणून जी लोकांची म्हण आहे ती अक्षरश: खरी आहे, इतकेंच नाहीं परंतु जे भाषाभिज्ञ आहेत त्यांच्या ऐकण्यांत शब्दवैचित्र्यावरून, स्वरभेदावरून व जातिपरत्वेंहि निरनिराळे प्रकार येतात. कोंकणांतच या भाषेचे चार पांच प्रकार आढळतात, दमणपासून मुंबईपर्यंत एक प्रकार. यांत कांहीं गुजराती शब्दांची मिसळ आहे. यांत वर्तमानकाळीं एकवचनी, तृतीय पुरुषाचीं रूपें पुल्लिंगी स्त्रीलिंगाप्रमाणें आणि प्रथम पुरुषाची स्त्रीलिंगीं पुल्लिंगीप्रमाणें होतात. मुंबईच्या दक्षिणेस अष्टागर प्रांताच्या भाषेचा प्रकार निराळा; पुढें रत्नागिरी प्रांताची शुद्ध कोंकणी भाषा यापेक्षां विशेष निराळी. राजापुर प्रांताच्या भाषेचा प्रकार निराळा; तेथून मालवणी भाषा निराळी, ईत गोमंतकी शब्द व क्रियापदांची कांहीं रूपें हि निराळ्या प्रकारचीं आढळतात. पुढें गोमंतकी भाषा, ही मराठी भाषेहून निराळी भाषा म्हटल्यासहि चिंता नाहीं. देशस्थ भाषेंतहि याचप्रमाणें प्रकार आढळतात. ज्या ज्या देशांच्या सीमेवर महाराष्ट्र देशाची सीमा मिळाली आहे, त्या त्या प्रांतीं त्या त्या भाषेची शब्द यांत मिसळून स्वरभेदही निराळा होतो. कर्नाटक देशांच्या सीमेजवळच्या प्रांतीं म्हणजे करवीरापासून सोलापुरापर्यंत जो प्रदेश त्यांत वेगळ्या प्रकारची भाषा आढळत्ये. वऱ्हाड प्रांताच्या थेट देशस्थी भाषेचा प्रकार निराळा, बऱ्हाणपुरापासून नंदुरबापर्यंत खानदेशाच्या समीप भागाच्या भाषेचा प्रकार निराळा. पुढे खानदेशाची भाषा गोमंतकी भाषेप्रमाणें मराठी भाषेहून निराळी म्हटल्यास चिंता नाहीं. आता हे सर्व प्रकार वजां घालून महाराष्ट्र भाषेचे मुख्य दोन प्रकार मानिले आहेत- देशस्थ भाषा आणि कोंकणस्थ भाषा, त्यांत या व्याकरणांत, महाराष्ट्र देशाचा मध्यभाग जो पुणें प्रांत, त्यांत, जी भाषा राजकीय आणि विद्वान् लोक बोलतात, तिचें अनुकरण केलें आहे.’’

‘दादोकृत’ या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या या व्याकरण ग्रंथामुळे पुढे मराठीला स्थैर्य मिळाले. व्याकरणाच्या या उभारणीमुळे वाक्यातील शब्द तोडून न लिहिण्याची, विरामचिन्हेरहित ओळीच्या ओळी सलग मजकूर लिहिण्याची आधीची पद्धत मागे पडली. वाचनापासून तुटलेली लेखनपद्धती आता वाचनाशी अधिक बांधलेली होऊ लागली. दादोबांच्या या व्याकरणाचा प्रभाव पुढे सुमारे अर्धशतकभर राहिला. विशेष म्हणजे दादोबांनी हे व्याकरण वयाच्या २२ व्या वर्षी पूर्ण केले आहे. त्यासाठीची त्यांची धडपड आपल्याला त्यांच्या आत्मचरित्रातून ध्यानात येईल. हे आत्मचरित्र (इ. स. १८४६ पर्यंतचा काळ) अ. का. प्रियोळकरांनी संपादित करून १९४७ साली पुन:प्रकाशित केले होते. अव्वल इंग्रजीतील शिक्षित मराठी समाजाची स्पंदने या आत्मचरित्रात उमटली आहेत. यात त्यांनी स्वत:च्या शिक्षणाविषयीही विस्ताराने लिहिले आहे. आधी काही गावठी शाळांमध्ये शिकल्यानंतर ते १८२५ मध्ये नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत दाखल झाले. त्याविषयी ते लिहितात-

‘‘मी या शाळेंत (सोसायटीची शाळा) गेल्यावर सुमारें एक दीड वर्षांत आमच्या सर्व गुरुजींस व पंतोजींस असा एकाएकी हुकूम आला कीं या सोसायटीच्या शाळांत जितकीं कुळवाडय़ाचीं मुलें असतील, त्या सर्वास काढून टाकावें व पुढे या जातीचीं मुलें घेऊं नयेत. तेव्हां या जातीचीं दहा वीस अधिक मुलें आमच्या शाळेंत होती. त्यांत कित्येक वरच्या वर्गात चढलेलीं व त्यांचा अभ्यास चांगला झाला होता, त्यांस एकदम रजा मिळाली. पुढें थोडक्याच दिवसांनी माझे ऐकण्यांत असें आलें कीं असा परस्परांचा नियम ठरविण्यास मुख्य कारण धाकजी दादाजी परभू हे होते. हे गृहस्थ त्या काळच्या सोसायटीचे एक सभासद होते, यांनीं जगन्नाथ शंकरशेट व दुसरे हिंदु सभासद मोठय़ा आग्रहानें आपल्या पक्षाचे करून हा नियम त्याजकडून करविला आणि इतर पारशी व युरोपियन सभासदांस असें भय दाखविलें कीं जर तुम्ही असा नियम न ठरवाल तर मी सभासदाचें काम पहाणार नाहीं व परभु लोकांची मुलें येथें येण्यास मना करीन. धाकजी दादाजी हे त्या वेळेस वयातीत व मोठे प्रतिष्ठित गृहस्थ होते. यांचें म्हणणें असें पडलें कीं, जर हे हलक्या जातीचे लोक शिकून पुढें हुषार झाले, तर उंच जातीच्या लोकांस इंग्रजींत रोजगार मिळणार नाहीं व त्यांची आपली बरोबरी होत जाईल. हें त्यांचें म्हणणें त्या काळच्या बहुतेक लोकांस मोठें शहाणपणाचें व दूरदर्शिपणाचें असें वाटलें व त्यांची हिंदु लोकांत बरीच वाहवा झाली, त्यांत त्यांच्या जातींत तर फारच झाली. त्यांच्या त्या काळच्या आखूड समजुतीप्रमाणें ह्य़ांना मोठा दोष द्यावा असें मला वाटत नाहीं. अद्यापि आतां इतके शिक्षित लोक झाले आहेत व सुधारलेपणाचा मोठा अभिमान बाळगतात, त्यांच्याहि मनांतून ही ग्रंथी सुटत नाहीं. किंबहुना तेव्हांपेक्षां आता जातिद्वेष आंतून अधिक वाढल्यासारखा दिसतो. मग वृद्ध धाकजींकडे या नियमाचा मोठा दोष लावावा हें मला प्रशस्त दिसत नाहीं. पुढें धाकजींच्या वृद्धपणामुळें या सभासदपणाचें काम सोडलें आणि हा नियम फार दिवस टिकला नाहीं.’’

या आत्मचरित्रपर लेखनाबरोबरच त्यांनी  ‘माबाईच्या ओव्या’, ‘धर्मविवेचन’, मोरोपंतांच्या केकावलीवरील गद्य-टीका ‘यशोदापांडुरंगी’, ‘शिशुबोध’ आदी लहान लहान पुस्तके लिहिली आहेत. त्यातील ‘शिशुबोध’ (१८८४) या पुस्तकातील पुढील उतारा आजही मननीय आहे-

‘‘मुलांनों, ही आपल्या लोकांत मोठीच गैरसमजूत चालली आहे कीं, ते जसे मनुष्यांच्या नीच जाती मानितात, तशा धंद्याच्याही उंच नीच जाती मानितात आणि असें मानण्यानेंच त्यांच्या बुद्धीस विपर्यास होऊन त्या धंद्याच्या जातीवरून व तो धंदा करणाऱ्या मनुष्यांच्या उंच नीच जाती मानल्यानें पूर्वीपासून जातीचा परस्परद्वेष वाढत चालला आहे. आणि याच कारणानें कलाकौशल्य कारागिरी व स्वतंत्र उद्योग यांस उत्तेजन न मिळतां त्यांचा ऱ्हास होत चालला आहे.. सर्व मनुष्यांची सर्व विषयांत सारखी बुद्धि नसते हें तर तुमच्याच अनुभवावरून तुह्मांस स्पष्ट समजायाजोगें आहे. कोणाचा कल कोणत्या गोष्टींकडेस व कोणाचा भर कोणत्या गोष्टीकडेस असतो, प्रति मनुष्याच्या बुद्धिचे कल निरनिराळे असतात. ते लहानपणीं मुलांत समजून येतात; मग तसे कल पाहून आपल्या मुलांस ती ती विद्या व तो तो धंदा शिकविला असतां त्यांतच मोठा फायदा आहे.. आमचे लोक हल्लीं असें न करितां जो उठला तो पुढें रोजगार मिळावा या उद्देशानें इंग्लिश भाषा शिकण्याकरतां आपल्या मुलांस इंग्लिश स्कुलांत व सामथ्र्य असल्यास कालेजांत पाठवितात. परंतु असा विचार करीत नाहींत कीं, इतक्या इंग्लिश शिकलेल्या लोकांस रोजगार तरी कसा मिळावा. मग अर्थात् हा असा रोजगार पहाणारे उमेदवारांची संख्या अतोनात वाढत चालली आहे, तशांत इंग्लिशांची प्रजाही वाढत चालली आहे. आणि रोजगाराच्या जागा आहेत तितक्याच. मग सहजच इतका श्रम करून अन्य भाषा व विद्या शिकून त्यांचा रोजगार आमच्या लोकांत मातीच्या मोलाचा होत चालला आहे.. या देशांत परराज्य होऊन सर्व हुद्यांची कामें, धंदे, रोजगार इंग्लिशांनी आपल्या उद्योगाच्या व अकलेच्या जोरानें आटोपल्यावर हीच दशा व्हावयाची. त्यांत जर एथल्या लोकांनी त्याच इंग्लिशांचीं उदाहरणें न घेतलीं, आणि हे लोक आपले गुडघे टेंकून कपाळावर हात ठेवून बसले, तर यापेक्षांही पुढें कठीण दिवस लौकर येतील. एथील लोकांचे डोळेच उघडत नाहींत. ज्या ज्या अज्ञानानें व दोषानें यांस विपत्ती येत चालली आहे व येणार आहे, त्या आपल्या अज्ञानास व दोषास सोडीतच नाहींत. उलटें त्यांस दिवसानुदिवस पाहतों तों अधिकाधिक वेटाळत चालले आहेत. त्यांची विपत्तीही त्यांस सावध करीत नाहीं. अशा लोकांचा नाश झाल्याशिवाय राहणार नाहीं हें खचीत समजा..’’

संकलन – प्रसाद हावळे

प्रसाद हावळे prasad.havale@expressindia.com

मराठीतील सर्व मराठी वळण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi language developer dadoba pandurang tarkhadkar
First published on: 15-01-2017 at 04:04 IST