वर्ष १९६०. तिचं वय २६. आफ्रिकेतील टांझानिया स्थित ‘गोम्बे नॅशनल पार्क’मध्ये सलग चार-पाच महिने ती तळ ठोकून होती, केवळ एका गोष्टीसाठी, ती म्हणजे या नॅशनल पार्कमधील चिम्पांझी माकडांनी तिला स्वीकारावं! तिला त्यांच्या जवळ येऊ द्यावं म्हणून. अखेर काही महिन्यांच्या अथक प्रयत्नांनी या मोहिमेत ती यशस्वी झाली. चिम्पांझींच्या या वर्तनशास्त्राचा तिला सूक्ष्म अभ्यास करायचा होता. या अभ्यासावर तिनं नंतर काही प्रबंध लिहिले, त्यातल्या निष्कर्षांनी प्राणी अभ्यासकांची झोप उडवली. त्यांच्या समजेची मुळंच हलली. तारुण्यातली गुलछबू स्वप्नं पाहण्याऐवजी ही तरुणी गोम्बेतल्या चिम्पांझीवर संशोधन करत होती. त्या संशोधनाचा निष्कर्ष होता, की सर्वच माकडं काही शाकाहारी नाहीत. तिनं चिम्पांझी माकडांच्या टोळ्यांची युद्धं स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली. टोळीवर सत्ता मिळवण्यासाठी एकमेकांचे लचके तोडणारे चिम्पांझी तिनं पाहिले. चिम्पांझींवरच्या अनेकअंगी संशोधनावर तिनं केंब्रिजमधून ‘पीएच.डी.’ मिळवली… ही मुलगी म्हणजे ज्येष्ठ निसर्ग, पर्यावरण, प्राणी अभ्यासक डॉ. जेन गुडाल.

३ एप्रिल १९३४ रोजी जेन यांचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यांच्यावर लहानपणापासून आईचा- वेन यांचा मोठा प्रभाव होता. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकदा जेन यांची एक मैत्रीण केनियाला गेली होती. तिथून तिनं जेन यांना केनियातले प्राणी, निसर्गाचं वर्णन करणारं पत्र लिहिलं. त्या पत्रात तिनं लिहिलं, की ‘जर तुला प्राण्यांवर संशोधन करण्यास रस असेल, तर नैरोबीतल्या डॉ. लीकी (पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. लुईस लीकी) यांच्याशी संपर्क साध.’’ डॉ. लीकी हे नैरोबीतील ‘नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी’चे क्युरेटर म्हणून काम करत होते. त्यांच्याशी चर्चा करताना जेन यांच्या लक्षात आलं, की आफ्रिकेतल्या चिम्पांझी माकडांवर मूलभूत असं संशोधन झालेलंच नाहीये. इथेच जेन यांना संशोधनाचा विषय मिळाला- ‘चिम्पांझी’.

marathi play savita damodar paranjape
‘ती’च्या भोवती..! अगम्य शक्तीमागची कुचंबणा!
readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Growing digital divide in education
शिक्षणातली वाढती डिजिटल दरी!

हेही वाचा : ‘भय’ भूती : वारसा हक्काने मिळालेली भीती

डॉ. लीकी यांनी सुचवलं, की टांझानियातल्या ‘गोम्बे नॅशनल रिझर्व’मध्ये हे काम करणं योग्य आहे. सुरुवातीला जेन यांच्यासह त्यांची आई वेन गोम्बेत आल्या. वेन एक चांगल्या लेखिका होत्या. तीच लेखनआवड जेन यांच्यातही उतरली. चिम्पांझी हा प्राणी फार बुजरा. त्यामुळे त्यांना एकटीनंच हे संशोधन करायचं होतं. मदतीला दिलेले सगळे ‘स्काऊट’ न घेता त्यांनी अॅडॉल्फ आणि रशीदी या दोनच मदतनीसांना सोबत ठेवलं. सुरुवातीच्या दिवसापासून जेन यांनी कामाचा झपाटा लावला. त्यांच्या लक्षात आलं, की चिम्पांझी हे कधी मोठ्या कळपात येत, तर कधी दोघे-तिघे मिळून येत, तर कधी एकएकटेच येतात. चिम्पांझींच्या टोळ्या या स्थिर नाहीत. पण ही निरीक्षणं तशी साधीसुधीच होती. गोम्बेत येऊन दोन-तीन महिने झाले तरी त्यांच्या पदरी काही पडलं नव्हतं. ठोस काही मिळणं भाग होतं, अन्यथा त्यांची आर्थिक मदत दोन-तीन महिन्यांनी बंद होणार होती. जेन चिम्पाझींच्या वर्तनांचे, भावभावनांचे बारकावे टिपत. एकदा एका मादी चिम्पांझीने एका नर चिम्पांझीसमोर आपला हात पसरला आणि त्या नरानं त्या हाताचं चुंबन घेतलं. एकदा दोन प्रौढ नरांनी एकमेकांना आलिंगन दिलं. त्यांच्यातली भावनाप्रधानता जेन यांना दिसली.

अर्थात त्यांच्या अवतीभोवती राहूनही सुरुवातीला जेन यांचं अस्तित्व चिम्पांझी स्वीकारत नव्हते. नंतर मात्र त्यांची एकेकाशी ओळख होऊ लागली. जेन ज्या दोन नरांना चांगल्या ओळखू लागल्या, त्यांची नावं त्यांनी डेव्हिड ग्रेबियर्ड आणि गोलिएथ अशी ठेवली. एक दिवस एका झाडावर जेन यांना चिम्पांझीचा एक लहान समूह दिसला. नीट पाहिल्यावर त्यातल्या एकाच्या हातात एक गुलाबी वस्तू दिसली. तो त्याचे लचके तोडत खात होता. समूहातली मादीही त्याचे तुकडे मधून तोंडात टाकत होती. त्याच क्षणी जेन यांच्या लक्षात आलं, की ती वस्तू म्हणजे मांस आहे. नीट निरखून पाहिल्यावर लक्षात आलं की तो नर डेव्हिड ग्रेबियर्डच होता. चिम्पांझी मांसही भक्षण करतात, हा जेन यांच्यासाठी अत्यंत नवीन शोध होता. कारण यापूर्वी सर्व संशोधकांनुसार चिम्पांझी क्वचित कीटक खात असले तरी ते शाकाहारी असतात.

एकदा गवतात हालचाल दिसली. जेन पुढे सरकत पाहू लागल्या तर समोर डेव्हिड होता! तो गवताचं भक्कम असं लांब पातं मुंग्यांच्या वारुळात खुपसत होता व ते खेचून त्याला लटकून येणाऱ्या मुंग्या खात होता. म्हणजे गवताच्या पात्याचा वापर तो हत्यार म्हणून करत होता. जेन यांना अत्यानंद झाला. संशोधनासाठी नेमका विषय सापडला होता. त्यांनी ‘नॅशनल जिओग्राफिक सोसायटी’ला ही माहिती कळवली. तेव्हा त्यांनी जेन यांना संशोधनासाठी आणखीन एका वर्षासाठी आर्थिक मदत देऊ केली.

हेही वाचा : सांधा बदलताना : नव्यातले जुने…

जंगलातच तळ ठोकलेल्या जेन आणि वेन यांचं सगळंच काही छान छान सुरू होतं असं नाही. वेन यांची पचनशक्ती नाजूक असल्याने तिथल्या पाण्याचा त्यांना कायमच त्रास व्हायचा. कधी कधी बबून माकडांची टोळीच जेन यांच्या तंबूवर हल्ला करायची तर कधी पंधरा पंधरा दिवस चिम्पांझी गायब असायचे. अशा वेळी जेन यांचे संशोधन ठप्प व्हायचे. कधी सतत उभ्याने दुर्बिणीतून निरीक्षण केल्याने डोळ्यांना त्रास व्हायचा तर कधी तासन्तास पडणाऱ्या पावसामुळे निरीक्षण करण्यात मोठा अडथळा यायचा. दिवस दिवस ओल्याचिंब कपड्यात राहायला लागायचे. कधी धारदार गवताच्या पानांनी शरीरावर ओरखडे उठत तर कधी जीवावर बेतण्याचे प्रसंग येत. एकदा एका चिम्पांझीच्या समूहाने जेन यांना घेरलं. ते सर्व एकामागून एक इतके कर्कश ओरडू लागले की कुणाचीही पाचावर धारण बसेल. जेन पळाल्या असत्या तर चिम्पांझींनी त्यांचं काय केलं असतं कुणास ठाऊक? पण जेन एका जागेवर स्तब्ध उभ्या राहिल्या. काही वेळाने सारे तिथून निघून गेले. जंगलातील याच निरीक्षणांच्या आधारे जेन यांनी पुस्तके लिहिली. जेन यांच्या निरीक्षणांना कायमचं बंदिस्त करण्यासाठी ‘नॅशनल जिओग्राफिक’ने एक व्यावसायिक फोटोग्राफर ह्युगो वैन लाविक यांना पाठवले. त्यांच्या मदतीने जेन यांना माकडांचे मांस भक्षण करण्याचे आणि वारुळातून काठीचा वापर करून मुंग्या खाण्याचे चित्रण करता आले. पुढे जेन आणि ह्युगो यांनी विवाह केला. जंगल हेच घर झाले.

बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जेन यांच्या आयुष्यात महत्त्वाची घटना घडली. ती म्हणजे डेव्हिड ग्रेबियर्ड या चिम्पांझीने जेन यांना स्पर्श करू दिला! मानव आणि चिम्पांझी यांचा हा समजूतदार स्पर्श. जेन त्यांच्या कॅम्पजवळ केळी ठेवत, जेणेकरून चिम्पांझींचे जवळून निरीक्षण करता यावे. एका चिम्पांझीने केळी मिळवण्यासाठी केलेला स्वार्थीपणा तसेच झाडाच्या पानांचा चावून चोथा करून त्या चोथ्याचा स्पंजसारखा उपयोग पिलांना पाणी पाजण्यासाठी केला ही महत्त्वाची निरीक्षणं जेन यांनी नोंदवून ठेवली आहेत. आणखी एक वेगळा अनुभव जेन यांना घेता आला तो मादा चिम्पांझीचा माता होण्याचा. एक आत्मीय अनुबंध. चिम्पांझीमध्येही मैत्री भावना असते, हेही त्यांना जाणवलं. आपल्या कळपातील नरांनी दुसऱ्या कळपातील तरुण मादीकडे आकर्षित होऊ नये याची दक्षता प्रौढ माद्या घेताना दिसायच्या. जेन यांच्या लक्षात आलं होतं, की माणसं आणि चिम्पांझी यांच्या वर्तनात खूप साम्य आहे. अनेक वर्षं चिम्पांझीच्या वर्तनाचा अभ्यास केल्यावर चिम्पांझीच्या सामाजिक वर्तनात व माणसांच्या वर्तनात साम्य असल्याचं त्यांना आढळून आलं होतं. चिम्पांझींच्या वर्तनशास्त्राचा हा जो अभ्यास चाळीस-पन्नासच्या दशकात झाला त्या संशोधनानेच प्रेरित होऊन व्यंकटेश माडगूळकरांनी ‘सत्तांतर’ ही कादंबरी लिहिली. ‘सत्तांतर’ ही कादंबरी वानरांच्या जीवन वर्तनावरून मानवी सत्तासंघर्षावर, चालू राजकीय स्थितीवर मूकपणे टीका-टिप्पणी करते. जेन यांच्या कामावर त्यांनी एक दीर्घ लेख ‘अशी माणसे अशी साहसं’मध्ये लिहिला.

हेही वाचा : ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!

जगभरातील इतरही संशोधनानुसार शरीररचना, मेंदूची रचना, वर्तन या सर्व बाबतीत चिम्पांझी माणसाशी सर्वांत जास्त साधर्म्य साधणारा प्राणी आहे. त्यामुळे माणसासाठी निर्माण करण्यात येणाऱ्या लशी, औषध यांच्या प्रयोगासाठी चिम्पांझींचा वापर केला जातो. जेन यांना मात्र हा सर्व प्रकार फार क्रूरपणाचा वाटतो. त्याचा ते विरोध करतात. चिम्पांझींसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या जेन यांच्या वैयक्तिक जीवनातही बरेच चढ-उतार आलेत. जेन यांना मिळणारी प्रसिद्धी, यश ह्युगोला खुपू लागले. परिणामी ते एकमेकांपासून वेगळे झाले.

आपण आशावाद विसरून निराशेला जवळ करत आहोत असं जेन यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लोकांमध्ये आशावाद जागवण्याची जणू मोहीमच उघडली. ‘द बुक ऑफ होप’ या पुस्तकाचे जेन यांचे सहलेखक डग्लस अब्राम व गेल हडसन यांनी जेन यांना विचारलं, ‘‘तुम्ही जागतिक महायुद्ध पाहिलं, नरसंहार पाहिला, निसर्गाच्या इतक्या मोठ्या संहाराच्या तुम्ही साक्षीदार आहात, वैयक्तिक जीवनात तुमचे दुसरे पती (डेरेक ब्राइसन) कर्करोगाने गेले तरी तुम्ही आशावादी कशा?’’ जेन यांची चार कारणे सांगतात १) अत्यंत आश्चर्यकारक असलेली मानवी बुद्धी २) निसर्गाची लवचीकता ३) तरुणाईची ध्येयनिष्ठा ४) मानवाची दुर्दम्य आंतरिक शक्ती या चार गोष्टींनी जीवन रंगलेलं असेल तर निराशा घेरणार नाही, असे त्यांचे ठाम मत आहे.

हेही वाचा : ‘एका’ मनात होती : काळिमा!

मानवाने पर्यावरणाला आणि पर्यायाने पृथ्वीला कडेलोटाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे. पर्यावरणाच्या इतक्या विविध परिषदा होत असतानाही पर्यावरणजज्ज्ञ जागतिक नेतृत्वाला अपयशी ठरवत आहे. हे लक्षात आल्यावर जेन यांनी १९८० पासून संशोधनापासून वेगळं होत पूर्णवेळ पर्यावरण कार्यकर्त्या झाल्या. जेन म्हणतात, ‘‘मला हवामान बदल समजतो. बदलाला विरोध करणाऱ्या आर्थिक, राजकीय शक्ती समजते. पण, आशावादी असणं ही मानवी अस्तित्वाइतकीच महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या कृतीमुळे काही फरक पडेल अशी आशा तुम्हाला नसेल तर तुम्हाला नैराश्य येऊ शकतं. २०२४ हे वर्ष पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे कारण या वर्षात जगातील ४० मोठ्या देशांत निवडणुका होत आहेत. तरुणाई निसर्गाभिमुख सरकार निवडून देतील अशी मी आशा करते!’’

ajjukul007@gmail.com