प्रिय तातूस,
बघता बघता पाऊस आला आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण आले बघ. सगळे खड्डे ओसंडून वाहताना दिसले की कसं बरं वाटतं. यावर्षी मान्सून विदर्भाकडून आला, ही खरं तर क्रांतिकारी घटना! शतकानुशतके तो नैऋत्येकडून येतो ही अंधश्रद्धा आपण जोपासली. पण पूर्ण शहाण्या फडणवीसांनी तिला छेद दिला बघ! यात काहीतरी काळेबेरे असावे असं लोक उगीचच म्हणतात. वेधशाळेवर उगाच खोटेनाटे आरोप करण्यात काय अर्थ आहे? मागे एकदा वेधशाळेवर मोर्चा नेण्याचा विरोधी पक्षांचा डाव होता. पण त्यादरम्यान पाऊस आल्याने सगळ्यावरच पाणी पडलं. लोक उगाचच हे सरकार काही फारसे टिकणार नाही म्हणतात. पण अरे, सूर्य-चंद्र असेपर्यंत ही युती राहील असं मुख्यमंत्री म्हणाले. परवा मातोश्रीवर देवेंद्रनी दोन्ही हातांनी जॅकेट उघडलं तर त्यात आत बाळासाहेबांची प्रतिमा निघाली.
अरे, बाळासाहेबांचा विषय निघालाय तातू, पण खरं म्हणजे आपल्याला त्यांचं मोठेपण कळलंच नाही. अरे, त्यांच्या सभेला होणारी गर्दी बघायला उभ्या महाराष्ट्रातून गाडय़ा भरभरून लोक यायचे. मध्यंतरी युवा-शिवा साहित्य संमेलन झाले. त्यात अध्यक्षांनी ‘कृष्णाजी केशव दामले या केशवसुतांनी तुतारी फुंकली, तर शंभर वर्षांनी मराठी माणसासाठी तुतारी फुंकणारे बाळासाहेब ठाकरे हे दुसरे केशवसुत होते,’ असं म्हटल्यावर दहा हजार लोकांनी वीस हजार हातांनी टाळ्या वाजवल्या. मला नेहमी क्रांती करणारे लोक आवडतात. माओंनी शहराकडून खेडय़ाकडे जा सांगितलं, ही गोष्ट इतिहासजमा झाली. पण मोदींनी पन्नास वर्षांनंतर लोकांना शहराकडे यायला सांगितलं; याला म्हणतात क्रांती! शहरामध्ये वीकएण्ड असतो. त्यामुळे अनेक शेतकरी शुक्रवारी गावाकडे जाऊन शेतीची कामे आटपून सोमवारी उजडत परत येऊ शकतात. एक चिनी वचन मला नेहमी आवडतं- तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि उरलेल्या रुपयाचं फूल घ्या. मागे मी हे वचन नानाला सांगितलं तर त्याचं म्हणणं : एक रुपयाची भाकरी घेतली तर कोरडी कशी खाणार? म्हणून दुसऱ्या रुपयाची भाजी घ्या, असं म्हणायला हवं! नाना सगळ्याची चेष्टा करतो. पण त्याचंही बरोबर आहे.. भाकरी फुलाबरोबर कशी खाणार?
तातू तुला सांगतो, नानाची परवा गंमतच झाली. अरे, हल्ली सगळीकडे योगाचं फॅड निघालंय. आता योग घरी करावा, वगैरे ठीक आहे. नानानं लोकलमध्ये ऑफिसला जाताना पद्मासन घातलं आणि स्टेशन आलं तरी त्याला पद्मासनातनं उठता येईना. शेवटच्या स्टेशनाला जिथे गाडी थांबते तिथे लोकांनी त्याला उचलून बाहेर बाकावर बसवलं तेव्हा कुठं पद्मासन सुटलं! मी योग वगैरे वेगळं काही करत नाही. अरे, आपण ज्या स्थितीत असतो ती प्रत्येक स्थिती खरं तर आसनच असते! असो.
राजन जाणार जाणार अशी भीती होती तेव्हा एकदाचे ते गव्हर्नरपदावरून गेले बघ. आपल्याकडे अशी काय भीती घालतात, की जणू काय रिझव्‍‌र्ह बँक उद्यापासून बंद पडणार की काय! अर्थात् माझं काही रिझव्‍‌र्ह बँकेत खातं नाही म्हणा! अरे, पण कोणी आल्या-गेल्यानं काही बंद पडत नाही. तातू, तू बँकेतून रिटायर झालास म्हणून काय तिथला काऊंटर बंद पडलाय का? पण आपल्याला उगाच काळजी करायची सवय लागलीय. अरे, ज्यानं कोल्ड्रिंक तयार केलं त्यानं स्ट्रॉदेखील बनवली. असो!
तातू, तुला आश्चर्य वाटेल, पण हे पत्र मी तुला लंडनहून लिहितोय. आपल्या वर्गातल्या दत्ता खामकरचा मुलगा इथे असतो. त्याने इथे नवीन घर घेतलं म्हणून अगत्यानं आम्हाला बोलावलं होतं. अरे, आपली मुलंदेखील करणार नाहीत इतक्या प्रेमानं त्यानं आम्हाला सगळं लंडन दाखवलं! तुला मी सावकाशीनं सगळं लिहीनच. मी जिथे जातो तिथे नेमक्या काहीतरी वेगळ्याच घटना घडतात. मी इथं आल्यानंतर ब्रिटनने युरोपीय युनियनमधून वेगळं व्हायचं का, यावर मतदान झालं. ते मतदान बघायला मला नेलं तर तिथे ना कुणी पोलीस! ना कुठले बॅनर वगैरे! त्यांनी मला अगदी मतदान केंद्राच्या आतपर्यंत प्रवेश दिला.
दुसऱ्या दिवशी अगदी काठावरचा निर्णय झाला आणि ब्रिटन वेगळा झाला. आणि मग सगळीकडे नुसता गोंधळ माजला. अरे, बाहेरून युरोपातून सगळे लोक इकडे ब्रिटनमध्ये यायला लागले. त्यामुळे आव-जाव घर तुम्हारा असं झालं. आपल्याकडे कसं मनसेमुळे आंदोलन झालं, अगदी तसाच प्रकार इकडे झाला बघ. माझ्या कानावर तर इथल्या वेगळं होणाऱ्यांनी राज ठाकरे यांचा सल्ला घेतला होता असं आलंय. स्थानिक आणि उपरे असा संघर्ष मनसेमुळे जगभर पसरणार असं वातावरण आहे.
गंमत म्हणजे इथला एक पौंड म्हणजे आपले एकशे एक रुपये व्हायचे ते आता नव्वदच्या खाली भाव आल्याने नुकसान झालंय. अर्थात तिकडे आपल्याला आता पौंड स्वस्तात मिळणार म्हणा. असं काय काय इकॉनॉमीचं होणार म्हणतात. खरं तर सूर्य उगवायचा तेव्हा उगवतो, झाडं वाढतात, पाऊस पडतो, बायका बाळंत होतात, इत्यादी सर्व घडतं आणि मुलंपण शाळेत जातात-येतात. मग इकॉनॉमीचं असं काय होतं काही कळत नाही! घरांचे भाव काय पडणार, नोकऱ्या जाणार, इन्फ्लेशन होणार, वगैरे वगैरे अफवांना नुसता ऊत आलाय.
सगळ्या ठिकाणी बॉर्डरवर कडक तपासणीमुळे नोकरीधंद्यासाठी येणाऱ्यांना प्रॉब्लेम येणारसे वाटते. मला नेहमी डहाणू, बांदा, निपाणी, नवापूर, कागल अशा बॉर्डरवर इमिग्रेशनचे लोक बसलेत आणि ते पासपोर्ट विचारतील की काय भविष्यात- असं वाटत राहतं. अर्थात असं काही होणार नाही म्हणा! पण मग देशभरातल्या मराठी माणसांचं काय होणार असं वाटत राहतं. महाराष्ट्रासाठी संरक्षणमंत्री नेमावा लागणार. आपली आर्मी वगैरे सगळं वेगळं होत गेलं तर एक दिवस विदर्भ वेगळा होणार आणि देवेंद्र फडणवीस विदर्भाचे पंतप्रधान होतील की काय असं आपलं उगाच वाटत राहतं. मी काही कोणी दूरदृष्टी असलेला कवी नाही. तात्यांचं म्हणणं, दूरदृष्टी असलेला माणूस खड्डय़ात पडतो. कारण त्याला जवळचं दिसत नाही. असो. इथल्या गमतीजमती कळवीनच, पण तू घाबरून जाऊ नकोस!
तुझा,
अनंत अपराधी – ashoknaigaonkar@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मिश्कीलीच्या मिषाने... बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article by ashok naigaonkar
First published on: 17-07-2016 at 01:01 IST