प्रिय तातूस-
तू पाठवलेले देवगड हापूसचे फोटो मिळाले. आंबा इतका प्रभावी असतो की नुसते फोटो बघूनदेखील शुगर वाढते असे मध्यंतरी माझ्या वाचनात आले. कुठलीही गोष्ट प्रमाणात असेल तर त्याचा त्रास होत नाही. खाण्यावर कंट्रोल पाहिजे. डिपार्टमेंटमध्येसुद्धा बघ- ठरल्याप्रमाणे देवघेव झाली तर ते किती सुरळीत चालते. एकेकाळी एखादे मोठे टेंडर पास झाले की ऑफिसात कोणी उपाशी आहे का, अशी दवंडी पिटली जायची. आता ती शिस्त राहिली नाही. ‘सहनौभुनक्तु’ हा संस्कारच मागे पडलाय की काय? त्यामुळे यातना होतात. पंचतंत्रामध्ये एक कथा होती. पाच भाऊ ऑफिसातून परत येतात. त्यातला एक सुपरिटेंडन्ट, एक प्रभारी, एक हेडक्लार्क, एक क्लार्क आणि एक चतुर्थश्रेणी सेवक असतो. तेव्हा आई म्हणते आतून- ‘जे काय आणलंय ते सर्वानी वाटून खा.’ ते सगळे भाऊ गुण्यागोविंदाने रिटायर होतात. हल्ली वाचन कमी झाल्यामुळे या कथा कोणी वाचतही नाहीत आणि कानावरही पडत नाहीत. आपल्या वेळेला सगळीकडे कसा मोकळेपणा होता. खरे सांगू तातू, अरे, कुठल्याही सार्वजनिक ऑफिसमध्ये गेले की लोक हल्ली घाबरतात. आपण अडकू की काय, अशी सगळ्यांना भीती वाटते. सगळ्या बायकांना आपले हे घरी येतील की आत जातील अशी काळजी असते. समाजात हे भयाचे वातावरण आहे, ते बदलायला पाहिजे. मला ती रवीन्द्रनाथांची ‘भयशून्य चित्र जेथे..’ अशा अर्थाची प्रार्थना आठवते.
अरे, गंमत म्हणजे परवा मी एका ऑफिसवरून जात होतो. तिथे कंपनीच्या नावाखाली ‘भारत सरकारचा उपद्व्याप’ असे लिहिले होते. मराठी भाषा न जाणणारे लोक सगळीकडे असल्याने हा प्रकार होतो. माझं तर म्हणणं- प्रत्येक ऑफिसात एक मराठी ऑफिसर नेमायला हवा. पण आपले लोक भलत्याच गोष्टींसाठी आंदोलने वगैरे करतात. मोदीजी जर भेटले तर मला हे त्यांच्या कानावर घालायचंय. हल्ली खरे तर ते पंतप्रधान झाल्यापासून माझी त्यांची गाठभेट नाही. पूर्वी कसं आपण सहज चहाला म्हणून त्यांच्याकडे जात होतो. माणूस कुठेच्या कुठे गेला बघ. ‘मराठी माणूस पंतप्रधान होत नाही तोवर मी दाढी वाढवणार नाही’ असा मी नवस बोललोय. मराठी माणूस मागे का आहे, याचं उत्तर परवा वसंत व्याख्यानमालेत वक्त्यांनी- तो पुढे काय चाललंय ते बघण्यासाठी सगळ्यांच्या मागे असतो, असं सांगितलं. ते खरंही आहे म्हणा. अरे, परवा एका गुजराती माणसाने मराठी माणसाला विचारलं, ‘तुम्ही काय करता?’ तर त्याने ‘मी मराठीत बोलतो,’ असे सांगितले. त्यावर पुन्हा ‘पण करता काय?’ असं त्याने विचारल्यावरही ‘मी मराठीत बोलतो,’ असेच त्याने सांगितले.
हल्ली सगळीकडे सुट्टय़ा लागल्यामुळे गावी जाण्याचे डोक्यात होते; पण सगळीकडे पाण्याचे हाल असल्याने जायला मन धजावत नाही. नानाचे म्हणणे- उन्हाळ्यात आपल्याकडे पूर्वीपासूनच ही पाण्याची रड आहे. पण बरेच लोक मीडियाला हाताशी धरून हा पाण्याचा कांगावा करताहेत म्हणे. आता येणाऱ्या नातलगांना, पाहुण्यांना असे भय दाखवले की ते काय बिशाद कुणाकडे जातील! परिस्थिती अशी आहे की, बायकांना हल्ली घरच्यांसाठी काही बनवणंच कठीण वाटत चाललंय! त्यात आणखीन एवढी कणीक भिजवायची म्हणजे पोटात गोळाच! हे मी आपलं एक जनरल बोलतोय. अरे, वहिनीबद्दल मला काही म्हणायचं नाही. मध्यंतरी अगदी उशिरा आम्ही तुझ्याकडे आलो, तर तिने पटकन् राजूला पाठवून लंच- बॉक्स मागवला. हवापालट म्हणून मध्यंतरी दोन दिवस आम्ही दापोलीला गेलो होतो. पण तिथे कोकिळेचा खूपच त्रास होता म्हणून आम्ही परत आलो. कोकिळेचा आवाज सुरुवातीला बरा वाटतो, पण सारखे सारखे ऐकायला कंटाळा येतो. आणि सारखं माणसं बघायची सवय असली की चुकल्यासारखे होते. अति झालं की निसर्गाचादेखील कंटाळा येतो. एकदा फरशी आणि सिमेंट कोब्याची सवय झाली की मातीतून चालायचा वैताग येतो. त्यात पुन्हा अंगावर पालापाचोळा पडतो. त्यामुळे गावी फार दिवस राहणे मला मानवत नाही.
दरवर्षीच्या मानाने यंदा लग्नाची आमंत्रणे कमी होती. त्यामुळे आहेरावर फारसा खर्च झाला नाही. तातू, मी एक बघितलंय- अरे, हल्ली जेवढी मुलींची लग्ने होताना दिसतात तेवढी मुलांची लग्ने जमल्याचे ऐकिवात नाही. एकूणच मंदीची लाट असल्याने त्याचा हा परिणाम असावा. मार्केट डाऊन असले की एकूणच देण्याघेण्याच्या व्यवहारावर मर्यादा येतात. पुढच्या वर्षी पाऊस चांगला पडणार असल्याने लग्नसराई जोरात असणार. सराफांनादेखील याचा अंदाज आला असणार. त्यामुळे त्यांनी मध्यंतरी बरेच दिवसांचा बंद उरकून घेतला. आपल्याला कसं नोकरदारवर्गाला हक्काची रजा, सिक लीव्ह आणि पब्लिक हॉलीडे अशा नाना प्रकारच्या सुट्टय़ा असतात. मला खरंच या लोकांबद्दल वाईट वाटते. व्यवसाय बंद करून या वर्गातील लोकांनी नोकऱ्या स्वीकारल्या तर त्यांनाही आपल्यासारखी मजा घेता येईल.
असो. तुझ्याशी खरे तर अनेक गोष्टींवर बोलायचे असते, पण माझे सारखे विषयांतर होत असते. प्रत्येक गोष्टीत काहीतरी सुसंगती हवी असे म्हणतात. मला घरचे सगळेच टोकतात. पण अरे, आपल्या देशात तरी कुठे सुसंगती आहे? ‘नांदा सौख्यभरे’ किंवा ‘ये है मोहब्बते’ असं नाव ऐकून आपण सीरियल बघायला जावं तर त्यात दु:खाचा नुसता पूर वाहत असतो. मी फारसा टीव्ही बघत नाही. आपल्याला कसा डायबेटिसचा त्रास आहे म्हणून मी बसने प्रवास करीत नाही. रेल्वे बरी पडते. हल्ली टीव्हीवर प्रत्येक कार्यक्रमात जरा पाच मिनिटे झाली की हे तरुण निवेदक ब्रेक घेतात. मला तरी शंका येते, यांना आपल्यासारखाच डायबेटिसचा त्रास आहे की काय?
हल्ली सगळ्यांना देवळात गाभाऱ्यापर्यंत प्रवेश करायचाय! २१ व्या शतकात आपण कुणाला काही बोलणे कठीणच; पण मनाच्या गाभाऱ्यात आपण केव्हा प्रवेश करणार? असो.
तुझा,
अनंत अपराधी
(ता. क.- तुझे डोळ्यांचे ऑपरेशन झाल्याचे कळले. तरी पत्र योग्य माणसाकडूनच वाचून घ्यावे.)
अशोक नायगावकर – ashoknaigaonkar@gmail.com

pune Porsche car accident
अगरवालचा भागीदार अटकेत, जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात छोटा राजनच्या नावाने धमकी
license suspension, challenge,
पोर्शे घटनेच्या पार्श्वभूमीवर परवाना निलंबन कारवाईला आव्हान, बारमालकांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Ghatkopar hoarding collapse
घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरण: जाहिरात कंपनीच्या माजी संचालिकेला अटकपूर्व जामीन देण्यास नकार
Dombivli blast Company owners arrested
डोंबिवली स्फोट : कंपनीच्या मालकांना अटक; दुर्घटनेप्रकरणी अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
kalyan dombivli municipal corporation taken action against illegal hoardings
कल्याण डोंबिवली पालिकेची बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई; लोखंडी सांगाडे कटरच्या साहाय्याने भुईसपाट
Hero Electric Benling India will miss out on Fame discounts
हिरो इलेक्ट्रिक, बेनलिंग इंडिया ‘फेम’ सवलतींना मुकणार!
maharashtra recorded most hate speeches according to csss report
पुरोगामी राज्यात द्वेषजनक भाषणे…
Infosys tax fine Canada
कॅनडा सरकारने इन्फोसिसला ८२ लाखांचा दंड का ठोठावला?