डॉ. संजय ओक
बाप्पा, हा लेखांक प्रकाशित होईल तेव्हा तुम्ही परत कैलासावर जायला निघाले असाल. तुमच्या आईला कोण काळजी लागली असेल! या वर्षी तुमचे आगमन आम्ही मास्कच्या दडपणाखालीच केले. बाप्पा, आज परत जाताना तुम्ही कमीत कमी आमचा हा मास्क घेऊन जा. ज्या कानात कर्णभूषणे मिरवायची त्या कानात मास्कचे लूप अडकवून आम्ही अगदी जेरीस आलो आहोत. कुठे जाणं नाही, कुणाला भेटणं नाही. किती वाट पाहतो आम्ही या दहा दिवसांची. खरे तर दिवाळी सणांचा राजा. पण तो कौटुंबिक सोहळा. तुमचे दहा दिवस म्हणजे सार्वजनिक आनंदाचा गोंधळ. पण गेली दोन वर्षे..

बाप्पा प्लीज, जाताना या कोव्हिड-१९ विषाणूला त्याच्या सर्व अल्फा, डेल्टा पिलावळीसह घेऊन जा. निपाह, हंटा वगैरे चुलत भावंडांनाही पोत्यात भरा आणि बुडवा एखाद्या निर्मनुष्य तळ्यात. आमचा मास्क गेला की आमच्या चेहऱ्यावर पूर्वीचे हसू येईल. पण बाप्पा, मास्कबरोबर आणखीनही काही नकार तेवढे घेऊन जा आणि तुमच्या रूपातल्या काही गोष्टी कायमस्वरूपी मागे ठेवा. बारीक नजर मागे ठेवा. निरीक्षणातून खूप काही शिकता येते. फक्त ते निरीक्षण नीरक्षीरविवेकपूर्ण असायला हवे. सर्जरीतल्या माझ्या उदयोन्मुख विद्यार्थ्यांना मी तुमची नजर घ्यायला सांगतो ते उगाच नाही. एखाद्याची बुद्धिमत्ता अचाट, तेवढी आमची पोच नाही. पण एखादी गोष्ट घडल्यावर knee-jerk reaction न देता त्याचे विश्लेषण करून प्रतिक्रिया देण्याची आणि करण्याची सवय आमचे राजकारणी, वृत्तपत्र संपादक, वाहिन्यांचे निवेदक यांना लागो बाप्पा. तेवढय़ासाठी तुमचे हत्तीचे डोके महत्त्वाचे! आमच्यातील मंडळींचे आकारमान हत्तीचे होते, पण बुद्धिमत्ता तुमच्या पायाशी लुडबुडणाऱ्या उंदराप्रमाणे सूक्ष्म होते. अर्थात तुमच्या वाहनाकडून- मूषकराज श्रीमान उंदीरमामांकडून आम्ही संकटांना कुरतडून नेस्तनाबूत करण्याची सवय लावून घ्यायला हवी.

20th April Panchang Marathi Horoscope 12 Zodiac Signs
२० एप्रिल पंचांग: शनिवारी अद्भुत योगायोग १२ राशींना ‘या’ रूपात लाभाचे संकेत; तुम्हाला कशी प्राप्त होईल लक्ष्मीकृपा?
Amruta Khanvilkar slam trollers
“तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे”, ट्रोलर्सवर संतापली अमृता खानविलकर; म्हणाली, “गप्प राहणं हे…”
prakash raj on joining BJP
अभिनेते प्रकाश राज भाजपात जाणार? ‘त्या’ पोस्टबद्दल म्हणाले, “मला विकत घेण्याइतके…”
Nutritious but tasty Makhana Uttapam Try this recipe once
पौष्टिक पण चविष्ट असा मखाना उत्तपा! एकदा खाऊन तर पाहा, ही घ्या रेसिपी

समाजात संकटे येतातच. तुम्ही हत्ती आणि उंदीर या दोन्ही भिडणाऱ्या प्रतीकांना सामावून घेता. एकतर हत्तीप्रमाणे मुसंडी मारून संकटांचे तख्त फोडायचे, नाहीतर सूक्ष्म रूपात शिरून, पोखरून, कुरतडून संकट खिळखिळे करायचे. या दोन्ही शिकवणी आमच्यासाठी माघारी ठेवून निघा बाप्पा.

मोदकांचे भरलेले ताट समोर असतानाही तुमचा संयम वाखाणण्याजोगा. आजकाल प्रलोभने फार, संयम दुर्मीळ- तो आम्हाला समजवावा देवा. सुटलेले पोट झाकण्यासाठी आम्ही काय काय करत नाही? पँट वपर्यंत खेचणे, शर्ट इन न करणे, suspenders मिरविणे, जॅकेट घालणे, नेहरू कुर्ता घालणे, प्लास्टिक सर्जरीचा हात फिरवून घेऊन Liposuction किंवा Abdominoplasty करून घेणे; आणि त्यानेही नाही जमले तर Bariatric Surgery चा मार्ग पत्करून पोटाला (stomach) बॅण्ड स्टेपल मारून घेणे हे सर्व आम्ही करतो. तुमच्याकडून खरे तर लंबोदरातील सौंदर्य आम्ही जाणून घ्यायला हवे. एखाद्या व्यक्तीच्या सुटलेल्या पोटाच्या घेरापेक्षा त्याची विचारांची खोली आणि प्रज्ञेचा विस्तार महत्त्वाचा हे आम्हाला स्वीकारायल हवे. (पक्षी : या सुविचाराची सुरुवात आमच्याच घरातून करा देवा!)

तुम्ही आज परत जाताना आमचे काही दुर्गण कायमचे घेऊन जा देवा. नुसता तोंडावरचा मास्कच नाही तर तोंडातले अपशब्द, ठायी ठायी इतरांचा अपमान करण्याची जीभेला लागलेली सवयही घेऊन जा देवा. असहिष्णुता आणि असमंजसपणा घेऊन जा. गटातटाची गलिच्छ सवय घेऊन जा आणि पार सातासमुद्रापलीकडे बुडवून टाका देवा. आणि हो, रिद्धीसिद्धीला जे स्थान तुम्ही तुमच्या उजव्या-डाव्या अंगाला देता, तेच स्थान आणि तसाच सन्मान प्रत्येक स्त्रीला मिळावा ही बुद्धी आम्हाला देऊन जा देवा. निर्भयाचे कटू प्रसंग यापुढे घडू द्यायचे नसतील तर जसे स्त्रीला सक्षमित आणि शक्तीशाली तसेच पुरुषाला संयमित आणि सद्विचारी बनविण्याची गरज आहे. माणसातील पशुता घेऊन जा देवा!

खरेच गेली दोन वर्षे तुम्हाला निरोप देताना चैन पडत नाहीए. खूप काही राहून गेल्याची रुखरुख लागून राहिली आहे.

आशा आहे..

पुढच्या वर्षी याल तेव्हा करोना नसेल आणि माणसे कर्दनकाळासारखी नाही तर माणसासारखी वागू लागली असतील..

विचारी आणि विवेकी..

वाट पाहेन देवा!

sanjayoak1959@gmail.com